-डॉ. देवदत्त पोखरकर
Discover Dagdi Pala Benefits and medicinal uses of Tridax Procumbens: पावसाळ्यात हिरव्या रंगाची छटा सर्वत्र दिसते. रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर वेगवेगळ्या आकाराच्या, रूपाच्या वनस्पती आपल्या अस्तित्त्वाने निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतात. अनेकदा त्यांचा काही उपयोग नाही किंवा तण म्हणून त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यापैकी, अनेक वनस्पती औषधी गुणांनी समृद्ध असतात. आपल्यापैकी अनेकजण मुंबई-पुणे हा प्रवास ट्रेनने करतात. पावसाळ्यात हा प्रवास तरं खासच ठरतो. दुतर्फा बहरास आलेला निसर्ग …वातावरणातील गारवा, आकाशातील काळे-सावळे ढग, जमिनीवर पसरलेला हिरवा गालिचा आणि त्यावर दिसणारी पांढरी-पिवळी मोत्यासारखी फूल..हा नजाराच देखणा असतो. विशेष म्हणजे मोत्यासारखी दिसणारी ही फूलं केवळ निसर्गाचा शृंगार नाहीत तर प्रथमोपचार उपयोगी असणारे वरदान आहे.

महाराष्ट्राची कंबरमोडी

रेल्वे ट्रॅकच्या शेजारी, उजाड माळरानावर दिसणारी ही वनस्पती दगडी पाला (Tridax procumbens) म्हणून ओळखली जाते. सध्या आयुर्वेद, लोकवैद्यक, वनस्पतीशास्त्र आणि आधुनिक जैवरसायनशास्त्र या सर्व क्षेत्रांमध्ये या वनस्पतीने संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रात तिला दगडी पाला, घावपाला, जखमजोडी, कंबरमोडी, एकदांडी अशा विविध नावांनी ओळखले जाते. जखमांवर तिचा उपयोग होत असल्यामुळे ग्रामीण भागात आजही अनेक घरांमध्ये ही वनस्पती नैसर्गिक प्रथमोपचाराचा एक मुख्य भाग मानली जाते.

बहुवर्षायू- दगडी पाला

दगडी पाला हा सूर्यफूलाच्या कुलातील (Asteraceae) सदस्य आहे. या कुलातील वनस्पतींप्रमाणेच दगडी पाल्याच्या फुलांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. मूळची मध्य अमेरिकेतील असलेली ही वनस्पती आज भारतासह जगातील बहुतेक उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळते. भारतीय हवामानाशी तिने इतके उत्तम जुळवून घेतले आहे की, आता ती स्थानिक वनस्पतीच असल्याचा भास होतो. दगडी पाला ही बहुवर्षायू, जमिनीवर पसरत वाढणारी आणि अत्यंत अनुकूलनक्षम वनस्पती आहे. कोरड्या, खडकाळ, कमी सुपीक तसेच मध्यम सुपीक जमिनीतही ती सहज वाढते. पावसाळ्यात तिची वाढ विशेष वेगाने होते, परंतु योग्य आर्द्रता उपलब्ध असल्यास वर्षभर तिचा जीवनक्रम सुरू राहतो. तिच्या या वैशिष्ट्यामुळेच ती तण म्हणून मोठ्या प्रमाणावर आढळते. दगडी पाला ही कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच वातावरणात अत्यंत सहज वाढणारी वनस्पती असल्यामुळे तिची स्वतंत्र लागवड फारशी केली जात नाही. तिचा प्रसार बियांद्वारे नैसर्गिकरीत्या होतो.

असंख्य सूक्ष्म फुलांचा समूह

दगडी पाल्याच्या पानांमध्ये मानवासाठी उपयुक्त असे अनेक महत्वपूर्ण रासायनिक घटक असतात आणि त्यामुळेच औषधी उपयोगासाठी प्रामुख्याने या वनस्पतीच्या पानांचा वापर केला जातो. या वनस्पतीची फुले आकाराने लहान असली तरी अत्यंत आकर्षक असतात. दगडी पाल्याचे फूल प्रत्यक्षात एकच फूल नसून असंख्य सूक्ष्म फुलांचा समूह असतो. मध्यभागी पिवळ्या रंगाची नलिकाकृती फुले असतात, तर बाहेरील बाजूस पांढऱ्या रंगाच्या जिभेसारख्या पाकळ्या दिसतात. या रचनेमुळे मधमाश्या, फुलपाखरे आणि इतर परागीभवन करणारे कीटक सहज आकर्षित होतात. परागीभवनानंतर अकीन प्रकारची लहान फळे तयार होतात. प्रत्येक बियेला पांढऱ्या रेशमी केसांचा पापस असल्यामुळे वाऱ्याद्वारे बियांचा प्रसार अनेक किलोमीटरपर्यंत होऊ शकतो. हीच या वनस्पतीच्या व्यापक प्रसारामागील प्रमुख नैसर्गिक यंत्रणा आहे.

उपयुक्त पण नियंत्रण आवश्यक

पर्यावरणाच्या दृष्टीने दगडी पाल्याची भूमिका महत्त्वाची आहे. पडीक जमिनीवर सर्वप्रथम वाढणाऱ्या वनस्पतींपैकी ती एक आहे. त्यामुळे जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते. तिची फुले मधमाशा आणि इतर परागीभवन करणाऱ्या कीटकांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरतात. जैवविविधतेचे संवर्धन करण्यातही तिचा हातभार लागतो. परंतु, शेतीमध्ये ती फोफावल्यास पिकांशी स्पर्धा करून उत्पादन कमी करू शकते. म्हणून कृषीशास्त्रात तिला उपयुक्त पण नियंत्रण आवश्यक असलेले तण मानले जाते.

अँटीऑक्सिडंट, दाहरोधक आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म

दगडी पाल्यातील रासायनिक घटकांवर गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. या वनस्पतीमध्ये फ्लॅव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनीन्स, कॅरोटेनॉइड्स, ल्यूटिओलिन, क्वेरसेटिन, बीटा-सिटोस्टेरॉल आणि विविध फिनॉलिक संयुगे आढळतात. या घटकांमुळे अँटीऑक्सिडंट, दाहरोधक आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म प्राप्त होतात. प्रयोगशाळेतील संशोधनांमध्ये या वनस्पतीच्या अर्काने काही जीवाणू आणि बुरशींच्या वाढीस प्रतिबंध केल्याचे आढळले आहे. तसेच पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्याची क्षमताही काही अभ्यासांत नोंदवली गेली आहे.

प्रथोमोपचारासाठी उपयोगी

पारंपारिक घरगुती उपचारात दगडी पाल्याचा सर्वाधिक उपयोग जखमा भरून काढण्यासाठी केला जातो. ताजी पाने स्वच्छ धुऊन त्यांचा रस काढून किंवा त्यांचा लेप करून जखमेवर लावण्याची पद्धत अनेक भागांत प्रचलित आहे. किरकोळ रक्तस्त्राव कमी करणे, सूज कमी करणे आणि जखम लवकर भरून येण्यास मदत करणे, असे गुण या वनस्पतीला लोकपरंपरेत दिले गेले आहेत. काही भागांत त्वचेवरील पुरळ, फोड किंवा कीटकदंशावरही तिचा उपयोग केला जातो. परंतु, हे उपयोग पारंपरिक अनुभवांवर आधारित असून गंभीर जखमा किंवा संसर्गाच्या उपचारांसाठी आधुनिक वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.

वैद्यकीय सल्ला आवश्यक

अलीकडील संशोधनात मधुमेह, यकृत संरक्षण, दाह नियंत्रण, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, रक्तदाब नियंत्रण आणि कर्करोगविरोधी संभाव्य गुणधर्म यांवरही अभ्यास सुरू आहेत. मात्र यांपैकी बहुतेक संशोधन प्रयोगशाळा किंवा प्राण्यांवरील अभ्यासांपुरते मर्यादित आहे. त्यामुळे या वनस्पतीचा कोणत्याही गंभीर आजारासाठी औषध म्हणून वापर करण्यापूर्वी अधिक वैज्ञानिक पुरावे आणि वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.

वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची गरज

आजच्या काळात औषधी वनस्पतींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत असताना दगडी पाल्यासारख्या सहज उपलब्ध वनस्पतींकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक संशोधन यांचा योग्य संगम साधल्यास या वनस्पतीतील जैवसक्रिय घटकांचा उपयोग भविष्यात नवीन औषधांच्या निर्मितीसाठी होऊ शकतो. मात्र त्यासाठी नियंत्रित संशोधन, नैदानिक चाचण्या (क्लिनिकल ट्रायल) आणि प्रमाणित औषधी प्रक्रिया आवश्यक आहेत. योग्य संशोधनाच्या माध्यमातून भविष्यात या वनस्पतीचा उपयोग आरोग्य, पर्यावरण आणि औषधनिर्मिती या तिन्ही क्षेत्रांत अधिक प्रभावीपणे होऊ शकतो.
DISCLAIMER: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी किंवा गंभीर जखमेवर उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.