-जयेश सामंत

मुंबई, ठाण्यातील मराठमोळ्या वस्त्यांमध्ये बाळसे धरलेल्या दहीहंडी, गणेशोत्सवात उत्सवात राजकीय नेत्यांचा शिरकाव तसा नवा नाही. कित्येक वर्षापासून तरुणाईला संघटित करत राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी हे उत्सव साधन म्हणून उपयोगात आणले जाऊ लागले, त्यालाही आता काही दशकांचा काळ लोटला आहे. गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपानंतर मराठीबहुल वस्त्यांमध्ये झालेले सामाजिक, राजकीय बदल आणि पुढे वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून मुंबईत शिवसेनेला मिळालेल्या कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, नेत्यांच्या फौजा हा जणू राजकीय यशाचा ठराविक असा ‘फॉर्म्युला’ ठरला. महाराष्ट्राच्या ग्रामीण पट्ट्यात, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसी राजकारणाचा सहकार पॅटर्न गाजत असताना त्याच काळात मुंबई, ठाण्यात शिवसेनेने उत्सवाच्या माध्यमातून रचलेले राजकीय यशाचे मनोरेही नेहमीच चर्चेत ठरले. एवढ्या मोठ्या संख्येने मिळत असलेली ही राजकीय ‘रसद’ पाहून इतर पक्षही उत्सवांच्या या खेळात उतरले खरे मात्र आजवर मोजके अपवाद वगळले तर शिवसेनेची ही ‘ताकद’ भेदणे फारसे कुणाला शक्य झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्यात नुकत्याच घडलेल्या सत्तांतराचा केंद्रबिंदू ठरलेले आणि नव्यानेच मुख्यमंत्रीपद मिळविणारे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या या ताकदीचा पुरेपूर अंदाज आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या दिमतीला असलेल्या भाजप नेत्यांनी यंदा अगदी पद्धतशीरपणे व्यूहरचना करत या उत्सवावर स्वत:ची छाप कशी पाडता येईल अशी आखणी केलेली दिसते. ठाण्यातील दहीहंड्यांच्या निमित्ताने याची पुरेपूर प्रचीती आली. 

दहीहंडी, गणेशोत्सव राजकीय उत्कर्षाचा मार्ग कसा?

मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव काही वर्षांपूर्वी एक साधासुधा सण होता हे लक्षात येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात यामध्ये बदल झालेला दिसतो. गिरगाव, दादर यासारख्या मुंबईतील मराठमोळ्या वस्त्यांमध्ये वेगवेगळे सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांचा गोपाळकाला उंच, लाखमोलाच्या राजकीय दहीहंड्यांमध्ये कधी बदलला गेला हे सांगता येणार नाही इतके हे स्थित्यंतर वेगवान राहिले आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपानंतर मराठी वस्त्यांमध्ये मोठी सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे पहायला मिळाली. याच काळात या वस्त्यांमधून शिवसेनेचे बालेकिल्ले उभे राहिल्याचे पाहायला मिळते. दहीहंडी, गणेशोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेच्या शाखाशाखांमधून कार्यकर्त्यांचे जथ्थे तयार झाले. पुढे शिवजयंती उत्सव हा या शाखांचा वैशिष्ट्यबिंदू ठरू लागला. मुंबईत रुजलेल्या या उत्सवांच्या पायावर शिवसेनेला शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदारांची मोठी रसद मिळाली. पुढे हाच उत्सवी फॉर्म्युला शिवसेनेने मुंबई महानगर क्षेत्रात आणि विशेषत: ठाणे, कल्याण, डोंबिवलीत रुजविल्याचे दिसते. दक्षिण मुंबईतील अंजीरवाडीतील गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेले छगन भुजबळ, पुढे त्यांचा पराभव करून चर्चेत आलेले आणि या भागातील दहीहंडी मंडळांचे आधारस्तंभ असलेले बाळा नांदगावकर, ठाण्यात आनंद दिघे, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड अशी कितीतरी नावे हे या उत्सवांमुळे प्रकाशझोतात येत राहिले.

ठाणे दहीहंडी उत्सवाची राजधानी कशी बनली?

शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून देणारे शहर म्हणून ठाण्याचे राजकीय इतिहासात एक वेगळे स्थान राहिले आहे. मुंबईतील उत्सवांचा शिवसेना पॅटर्न ठाण्यातही या पक्षाने अंगिकारल्याचे सुरुवातीपासून दिसले. तरीही टेंभी नाक्यावर स्वर्गीय आनंद दिघे यांनी दहीहंडीपाठोपाठ सुरू केलेला नवरात्रौत्सव हा अनेक अर्थाने चर्चेत राहिला आणि ठाणेकरांसाठी अैात्सुक्याचा केंद्रबिंदूही ठरला. ठाण्यातील शिवसेनेने दहीहंडी, गणेशोत्सवासोबत नवरात्रौत्सवाचा आणि त्यातही देवीभक्तीचा स्वीकारलेला मार्ग तशा अर्थाने मुंबईतील शिवसेनेपेक्षा काहीसा वेगळा ठरल्याचे दिसते. सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि लाखमोलाच्या बक्षिसांसाठी ओळखली जाणारी ‘दिघे साहेबां’ची टेंभीनाक्यावरील हंडी हा ठाण्यातील उत्सवी परंपरेचा पाया मानला गेला असला तरी या उत्सवाला खरी ‘श्रीमंती’ मिळवून दिली ती जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक या नेत्यांनी. नव्या शतकाच्या पहिल्या दशकात वाहिन्यांची, त्यातही मराठी वृत्तवाहिन्यांची संख्या वाढत गेली आणि थरांवर थर रचत जाणारा, लाखो रुपयांच्या बक्षिसांनी नटलेला हा उत्सव घराघरात लाईव्ह पाहिला जाऊ लागला. मग सुरू झाली बक्षिसांची, प्रसिद्धीची आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांची अहमहिमका. माझगाव, ताडवाडी, जोगेश्वरी, परळ, नायगाव यांसारख्या मराठी वस्त्यांमधील तरुणांची मंडळे महिनोंमहिने या लाखाच्या हंड्या फोडण्याचा आधी सराव करू लागली आणि सिनेतारे-तारका, प्रसिद्धीमाध्यमांचा गराडा पडलेल्या ठाण्याच्या दिशेने कूच करू लागली. उंच मनोरे रचण्यात तरबेज असलेली ही मंडळे आपल्याकडे यावीत यासाठी राजकीय नेतेही या मंडळांना संपर्क करू लागली. गर्दी, प्रसिद्धी, पैसा आणि त्यातून विस्तारत जाणारा राजकीय पाया असे गणित या उत्सवाच्या माध्यमातून मांडले जाऊ लागले. ठाण्याने दिलेला हा श्रीमंत हंड्यांचा मंत्र पुढे मुंबईतील काही नेत्यांनीही अंगिकारला आणि स्वत:चे राजकीय क्षितीज विस्तारत नेते हा इतिहास आहे.

यंदा दहीहंडीला इतके महत्त्व कशासाठी?

करोनामुळे सलग दोन वर्षे राज्यातील सर्वच उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. नव्याने घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दिमतीला-मदतीला असलेल्या भाजपच्या नेत्यांनी शपथ घेताच उत्सवांवरील निर्बध उठविण्यामागे पद्धतशीर अशी राजकीय आखणी असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मैदानात भाजपने उभारलेली हंडी चर्चेत आली खरी, मात्र भाजपचे हे राजकीय प्रदर्शन यंदा इतक्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. मुंबई, ठाण्यात भाजप आणि शिंदे सेनेने मंडळांना केलेले सर्व प्रकारचे सहाय्य, कार्यकर्त्यांना वाटलेले टी शर्ट, तयार केलेला माहोल अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. मुख्यमंत्री शिंदे यांचे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ठरवून करण्यात आलेले दहीहंडी पर्यटनही आगामी काळात हिंदुत्वाचे मनोरे अधिक उंच रचण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावर यंदा उभारण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचे छायाचित्र आगामी काळात शिंदेसेनेची वाटचाल नेमकी कशी असेल याचे निर्देशक ठरावे. मागील महापालिका निवडणुकीत मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. शिवसेनेला तारले ते दादर, परळ, लालबाग, शिवडी, नायगाव, वरळी या मराठमोळ्या मुंबईने. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे, डोंबिवलीतही यंदा शिवसेनेला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई, ठाण्यातील मराठी पट्ट्यातील शिवसेनेच्या बुरुजांना धक्का लावण्यासाठी दहीहंडीचे हे मनोरे भाजपला आणि शिंदे गटाला किती उपयोगी ठरतात हे येणारा काळच ठरवेल.