Dalai Lama 90th birthday and Future successor: ६ जुलै २०२५ रोजी दलाई लामा हे ९० वर्षांचे होतील. त्याआधीच त्यांनी जाहीर केले की, दलाई लामा ही परंपरा पुढे सुरु राहणार आहे. त्यांच्यानंतर ते पद कोणाकडे राहील याचा निर्णय त्यांची संस्था गदेन फोद्रांग ट्रस्ट (Gaden Phodrang Trust) घेणार आहे. यात चिनी सरकारचा कोणतीही हस्तक्षेप असणार नाही. भविष्यातील दलाई लामा ही स्त्रीदेखील असू शकते, असे त्यांनी सांगितले. चीन विरुद्ध दलाई लामा आणि त्यांना भारताकडून असलेले संरक्षण याचा इतिहास सर्वश्रुत आहे. दलाई लामा यांना तिबेटी बौद्ध धम्माचा चेहरा मानले जाते. १९५९ साली चीनच्या आक्रमणानंतर त्यांना तिबेट सोडावे लागले. त्यामुळे त्यांनी भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून ते भारतातच आहेत. म्हणूनच भारताचा तिबेटवर असलेला सांस्कृतिक पगडा दूर करण्यासाठी चीनने तिबेटमधील बौद्ध धम्म संपवण्याचा घाट घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतात बौद्ध धम्माचा ऱ्हास झाल्यावर तिबेटमध्ये बौद्ध धम्म कसा टिकला याचाच घेतलेला हा आढावा.

बौद्ध धम्माचा ऱ्हास

१३ व्या शतकात भारतातील बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० व्या शतकात बौद्ध धम्माला नवसंजीवनी दिली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात बौद्ध धम्माच्या ऱ्हासासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्याच अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे परकीय मुस्लीम आक्रमण होते. भारताच्या भूमीत आक्रमणकर्त्यांच्या माध्यमातून नव्या धर्म परंपरांचा वावर सुरु झाला होता. मूलतः हिंसावादी नव्या धर्मपरंपरांना बौद्धधम्माची अहिंसक मूलतत्त्वं समजणे शक्यच नव्हते. त्यामुळे भारताच्या सीमेवर असलेल्या महायान बौद्ध धम्माप्रती त्यांनी हिंसाचार अवलंबला. परिणामी अनेक बौद्ध भिक्षु तिबेटमध्ये गेले. म्हणूनच बौद्ध धम्माच्या मूळ भूमीत या धम्माचा ऱ्हास झाला तरी तिबेटमध्ये त्याची ज्योत तेवत राहिली.

चीनचे अतिक्रमण

परंतु, गेली अनेक शतकं तिबेटच्या अंगणात फुललेल्या बौद्ध धम्माला चीनने अतिक्रमण केल्यानंतर मुळासकट काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली. बौद्ध धम्माचा जन्म तिबेटमध्ये झालेला नसला तरी स्थानिक परंपरा आणि इतिहासात बौद्ध तत्त्वज्ञान तिबेटच्या नसानसात भिनलेले आहे. पूर्वी सहा तिबेटी पुरुषांपैकी एकजण बौद्ध भिक्षू होता, आता मात्र परिस्थितीत बदल झाला आहे.

बौद्ध धम्म तिबेटमध्ये कसा पोहोचला?

तिबेटन बौद्ध धम्माचा जन्म महायान बौद्ध तत्त्वज्ञानाच्या कुशीत झाला. तिबेटमधील बौद्ध धम्मावर वज्रयान संप्रदायाचा प्रभाव आढळतो. या परंपरेने गुप्तोत्तर काळातील बौद्ध तांत्रिक परंपरा आजही जपलेली आहे. भारतात बौद्ध धम्माची स्थापना झाल्यानंतर अनेक शतकांनी, महायान बौद्ध धम्म प्राथमिक स्वरूपात इसवी सनाच्या पहिल्या शतकात रेशीम मार्गाच्या माध्यमातून आधी तिबेटमध्ये नंतर चीनमध्ये पोहोचला. इ.स. तिसऱ्या शतकात, बौद्ध धम्म तिबेटच्या क्षेत्रात पसरू लागला. या धम्माचा तिबेटमधील झांगझुंग राज्यातील बोन धम्मावर लक्षणीय प्रभाव पडला.

तिबेटमधील बौद्ध धम्मातील पाळंमुळं अधिक खोल रुतली

असे असले तरी बौद्ध धम्माची खरी ओळख तिबेटचा राजा सॉन्गत्सेन गाम्पो (इ.स. ६१८–६४९) याच्या कालखंडात झाली. या कालखंडात अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करण्यात आले. इ.स. ८ व्या शतकात राजा त्रिसॉन्ग देत्सेन (इ.स. ७५५–७९७) याने बौद्ध धम्माला अधिकृत धम्माचा दर्जा दिला. त्याने भारतातील पद्मसंभव आणि शांतरक्षित (इ.स. ७२५–७८८) यांसारख्या श्रेष्ठ बौद्ध पंडितांना तिबेटमध्ये आमंत्रित केले. हेच भारतीय बौद्ध पंडित तिबेटमधील बौद्ध धर्माचे सर्वात प्राचीन न्यिंगम्पा परंपरेचे संस्थापक मानले जातात. परंतु, ९ व्या शतकात बौद्ध धम्माची काहीशी पीछेहाट झाली. परंतु, नंतरच्या कालखंडात पुन्हा एकदा पुनरुज्जीवन मिळाले. इसवी सनाच्या १० व्या शतकात तिबेटच्या पश्चिमेकडील राजाच्या आमंत्रणावरून बंगालमधील महान भिक्षू अतिश दीपंकर (९८२–१०५४) हे तिबेटमध्ये आले. त्यांनी तिबेटमधील पहिलं बौद्ध विहार बांधलं. त्यांच्या पाठोपाठ पद्मसंभव आले. त्यामुळे तिबेटमधील बौद्ध धम्मातील पाळंमुळं अधिक खोल रुजली. १४ व्या शतकात तिबेटमध्ये स्थानिक राजघराण्यांनी सत्ता सांभाळली. जे त्सोंगखापा यांनी गेलुग परंपरेची स्थापना केली आणि पुढे दलाई लामा हे या परंपरेचे प्रमुख धार्मिक गुरु झाले.

तिबेटी बौद्ध धम्मातील विविध संप्रदाय

  • न्यिंग्मापा (Nyingmapa): पद्मसंभव यांनी स्थापन केलेला हा तिबेटी बौद्ध धम्मातील सर्वात प्राचीन संप्रदाय आहे. या संप्रदायाचा Bardo Thodol (Tibetan Book of the Dead) हा ग्रंथ पाश्चिमात्य देशांत विशेष प्रसिद्ध आहे.
  • काग्युपा (Kagyupa): इ.स. ९८८–१०६९ दरम्यान या संप्रदायाची स्थापना तिलोपा यांनी कर्मापा लामांच्या मार्गदर्शनाखाली केली. नारोपा, मार्पा आणि मिलारेपा हे या परंपरेतील महत्त्वाचे गुरु आहेत.
  • साक्यापा (Sakyapa): या संप्रदायाची स्थापना गोंचोक ग्येलपो (१०३४–११०२) आणि त्यांचा पुत्र गुंगा न्यिंगपो (१०९२–११५८) यांनी केली.
  • गेलुगपा (Gelugpa): त्सॉन्ग खापा लोबसांग ड्रक्पा (इ.स. १३५७–१४१९) यांनी या संप्रदायाची स्थापना केली. त्सॉन्ग खापा लोबसांग ड्रक्पा हे रिंपोछे म्हणूनही ओळखले जातात. या परंपरेचे नेतृत्त्व दलाई लामांकडे असते.
  • नवीन कदम्पा परंपरा (New Kadampa Tradition-NKT): गेशे केलसांग ग्यात्सो यांनी युनायटेड किंगडममध्ये स्थापन केलेली ही बौद्ध धम्माची प्रमुख शाखा आहे. काही जण या परंपरेला मुख्य प्रवाहापासून वेगळी मानतात.

तिबेटी बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये:

  • गुरू किंवा ‘लामा’ या व्यक्तीला असलेले विशेष स्थान आहे.
  • तिबेटी बौद्ध धम्मात जीवन आणि मृत्यू या चक्रावर भर, संस्कार, विधी व दीक्षा यांना महत्त्व दिले जाते.
  • तिबेटी बौद्ध धम्मात समृद्ध दृश्यक प्रतीकशास्त्राचा (Visual Symbolism) समावेश होतो.
  • तिबेटी बौद्ध धम्मावर प्राचीन तिबेटी श्रद्धांचा प्रभाव आहे.
  • तिबेटी बौद्ध धम्मात मंत्रोच्चार आणि ध्यानाच्या प्रथांचा समावेश होतो.
  • तिबेटी बौद्ध धम्मामध्ये योगसाधना व तांत्रिक पद्धतींचा समावेश होतो.

भारत हे बौद्ध धम्माचे जन्मस्थळ असले तरी मध्ययुगीन कालखंडात तिबेटने त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. भारतात बौद्ध धम्माच्या ऱ्हासानंतरही, तिबेटमध्ये बौद्ध धम्माची तांत्रिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अखंड जपली गेली. हजारो वर्षांच्या इतिहासात तिबेटी बौद्ध धम्म हा केवळ एक धार्मिक प्रवाह राहिला नाही, तर तो तिबेटी अस्मितेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज जेव्हा तिबेटी बौद्ध धम्माच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न चीन करत आहे, तेव्हा दलाई लामांनी सुरु केलेला वैचारिक लढा आणि त्यांचे शांततामूलक नेतृत्व जगासाठी आदर्श ठरले आहे. दलाई लामांच्या लढ्यामुळे बौद्ध धम्माची ज्योत तिबेटमध्ये अजूनही तेवत आहे. भारतासाठीही ही परंपरा केवळ ऐतिहासिक नाही, तर सांस्कृतिक नात्यांची सजीव साक्ष आहे. तिचा आदर करणं, हे आपल्या संस्कृतीचं आणि समजुतीचं प्रतीक ठरणारं आहे.