प्रत्येक सेकंदाला तयार होतोय एक स्मार्टफोन. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय सर्व काही यंत्र-सहाय्याने अतिशय वेगाने तयार होत आहे. इथे माणूस नाही तर यंत्राला यंत्रच जन्माला घालत आहे. बीजिंगमधील या मानवरहित कारखान्यांमुळे भविष्यातील मानवाची गरज संपुष्टात येईल का असा प्रश्न उपस्थित होतो…

अतिशय कमी दिव्यांच्या उजेडात कारखान्यांमध्ये रोबोट शांतपणे असेंब्लिंगचं काम पूर्ण करत आहेत. एआययुक्त कॅमेरे या कामावर सतत पहारा ठेऊन आहेत. त्या कॅमेऱ्यांची दृष्टी इतकी सूक्ष्म आहे की, छोट्यातील छोटी गोष्टही ते शिताफीने टिपत आहेत. स्वयंचलित पद्धतीने बसवला जाणारा प्रत्येक पार्ट न् पार्ट त्यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय रहात नाही. या कारखान्यात माणसांची गरज औषधालासुद्धा नाही. याच ‘हायली ऑटोमॅटिक’ म्हणजेच पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन केंद्रांना सध्या ‘डार्क फॅक्टरीज’ ही संज्ञा वापरली जात आहे.

मोबाईल मॅनुफॅक्चरिंगचं जवळपास सगळं काम मानवाच्या अतिशय कमीत कमी सहाय्याने रोबोट, एआय यंत्रणा आणि स्वयंचलित यंत्र पूर्ण करतात. हा नवा बदल चीनमधील तंत्रज्ञानाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांत पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन आणि इव्ही वाहनांच्या निर्मितीपासून ते अगदी बॅटरीनिर्मितीपर्यंत सगळीकडे स्वयंचलित यंत्र काम करताना दिसत आहेत.

‘डार्क फॅक्टरीज्’ची गरजच काय?

पूर्णपणे स्वयंचलितता येण्यासाठी आणि काम अधिक वेगाने व अचूक होऊन उत्पादनात वाढ होण्यासाठी ‘डार्क फॅक्टरीज्’ची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. कामगारांच्या मोठमोठ्या रांगांऐवजी हे कारखाने पूर्णपणे रोबोटिक यंत्रांवर विसंबून काम करत आहेत. इथे कृत्रिम बुद्धिमत्ता, कामाची गुणवत्ता तपासते, यंत्रांची पाहाणीदेखील यांत्रिक पद्धतीने होते आणि लॉजिस्टिक्स ते सॉफ्टवेअरपर्यंत सर्वच गोष्टी मानवी हस्तक्षेपाविना यंत्र-सहाय्याने पूर्ण होतात.

ही यंत्र वर्षाचे १२ महिने, ३६५ दिवस, २४ तास अगदी कमीत कमी मानवी गरजेवर काम पूर्ण करतात. त्यांना ना विश्रांती लागते, ना तहानभूक लागते. मानवी गरजा नसल्यामुळे त्या अधिक वेगाने काम करतात आणि मुख्य म्हणजे तक्रार करत नाहीत.

चीनमधील कोणत्या कंपन्या या ‘डार्क फॅक्टरीज्’ चालवत आहेत?

बीजीआरनुसार, शाओमी या कंपनीचे चांगपिंग येथील केंद्र एका सेकंदाला एक स्मार्टफोन शून्य-मानवी उपस्थितीत तयार करत आहे. फॉक्सकॉनने अनेक ठिकाणी अशा ‘डार्क फॅक्टरीज्’ उघडून ठेवल्या आहेत. इंडस्ट्रीयल इक्वेपमेंट न्यूजच्या वृत्तानुसार कुन्शन येथील ६० हजार कामागारांना या ‘डार्क फॅक्टरीज्’नी घरी बसवलं आहे. जगातील सर्वात जास्त इव्ही बॅटरी बनवणाऱ्या बीवायडी आणि सीएटीएल या कंपन्यांनी कधीच त्यांच्या उत्पादन केंद्रांवर रोबोट्सची नियुक्ती केली आहे.

डाँगग्युआन येथील, चँगयिंग प्रिसिजन टेक्नोलॉजी, जी विविध यांत्रिक वस्तूंचे उत्पादन करते; तिने कामगारांची संख्या ६५० वरून ६० इतकी घटविली आहे. ऑप्रेशन्सचे मुख्य सर्व काम केवळ यंत्र पाहतात.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका अहवालानुसार, अमेरिकेच्या ‘एफ-२२ रॅप्टर’ला तोडीस तोड असलेले चीनचे ‘जे-२०’ किंवा ‘मायटी ड्रॅगन’ या अत्याधुनिक लढाऊ विमानाचे पार्ट्ससुद्धा ‘डार्क फॅक्टरी’तच तयार केले जातात.

पाचव्या जनरेशनचे जे-२० हे लढाऊ विमानदेखील चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले होते. चेंगदू कॉर्पोरेशन, चीनच्या सरकारी मालकीच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनची सहकारी कंपनी आहे. २०१८ मध्येच त्यांनी जे-२० चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची घोषणा केली आणि दोन वर्षांनी उत्पादनाला सुरुवातदेखील केली.

सॉन्ग-गे हे चेंगदू फॅक्टरीच्या डिजिटल उत्पादन केंद्राचे प्रमुख आहेत. सायन्स अँड टेक्नोलॉजी डेलीला सांगताना ते म्हणाले, “हा प्लांट उत्पादनांची तपासणी करून त्वरित अहवाल तयार करू शकणाऱ्या बुद्धिमान स्कॅनिंग प्रणाली आणि रोबोट्सने सुसज्ज केला आहे. या नवीन व्यवस्थेमुळे आमची उत्पादन क्षमता जवळपास १५० टक्क्यांनी वाढली आहे. ही यंत्रणा प्रतिदिन सुमारे २१ तास न थांबता काम करू शकते.”

स्वयंचलित यंत्रांसाठी चीन इतका आक्रमक, पण का?

चीनमधील रोबोट्सची वाढ ही केवळ यांत्रिक भव्यता किंवा भविष्यासाठीची ब्रँडिंग नाही. भूराजकीय स्पर्धेत तग धरून राहणे आणि आर्थिक अस्तित्वासाठीचा संघर्षदेखील या आक्रमकपणामागील महत्त्वाची कारणं आहेत.

राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या २०२५ च्या धोरणांमुळे आणि इतर उपक्रमांमुळे देशामध्ये रोबोटिक्समधील गुंतवणुकीला आणि उत्पादनाला चालना मिळाली आहे. वर्षाला जवळपास २ लाख ८० हजार नवीन रोबोट्सचे इन्स्टॉलेशन चीन करत आहे. जागतिक उत्पादनाच्या सुमारे ५०% उत्पादन चीन करत आहे. इंटरनॅशनल रोबोटिक्स फेडरेशननुसार रोबोट-टू-वर्कर डेन्सिटीत चीनने जर्मनी व दक्षिण कोरीयालादेखील मागे टाकले आहे.

दी फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार एमआयआर हा चिनी संशोधकांचा समूहदेखील हेच अधोरेखित करतो की अर्ध्याहून अधिक रोबोट्सची निर्मिती चेंगदू सीआरपी रोबोट टेक्नॉलॉजी ही कंपनी करते. किमतीच्या बाबतीत जपानच्या यास्कावा आणि फानुक या दोन्ही कंपन्यांना या कंपनीने मागे सारलं आहे.

एफटीचा अहवाल पुढे म्हणतो, गेल्या दोन दशकांत चीनमध्ये कामगारांच्या वेतनात लक्षणीय वाढ झाली आहे आणि अर्थशास्त्रज्ञांच्या मते, स्वयंलित यंत्रांच्या आक्रमक वापरामुळे ‘कमी उत्पन्न देणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील घसरणीला’ चीनने झुगारून टाकले आहे.

हार्वर्डच्या ग्रोथ लॅबने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार चीनने २०१९ ते २०२३ या काळात अनेक उद्योगांमध्ये निर्यातीचा वाटा वाढवला आहे. गेल्या ४ वर्षांत अगदी झाडू, मॉप आणि पेनसारख्या छोट्या वस्तूंच्या निर्यातीतदेखील चीनचा निर्यात दर जागतिक स्तरावर ९% पासून ५२.३% पर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर खेळण्यांची निर्यातदेखील चीन ५४.३% ते ५६.९% पर्यंत करत आहे.

हे सर्व काही चालू असतानाच चीनमध्ये लोकसंख्यादेखील कमी होत चालली आहे. काम करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होऊन वयोवृद्धांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे. वॉन्ग चॅन सी या संशोधकाने ‘चीनमधील लोकसंख्या संरचनेच्या समस्येवरील निरीक्षणे’ या लेखात नमूद केले आहे की, मागच्या वर्षी केवळ ७९.२ लाख मुले जन्माला आली. २०१६ च्या तुलनेत हा जन्मदर केवळ ४४% इतका आहे. पूर्वी जन्माला येणाऱ्या ९० लाख आणि ८० लाखांच्या तुलनेत ही आकडेवारी १९४९ पासूनच्या म्हणजेच चीनच्या स्थापनेपासूनच्या जन्मदरातील सर्वात कमी गणली गेलेली आकडेवारी आहे.

चीनची एकूण लोखसंख्यादेखील कमी होत चालली असून गेल्या चार वर्षात १४० कोटींवर चीनची लोकसंख्या येऊन ठेपली आहे.
(वॉन्ग चॅन सी हे राष्ट्रीय संरक्षण व सुरक्षा संशोधन संस्थेत सहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

चीनमधील मानवी कार्यशक्ती कितपत सशक्त आहे?

भविष्यातील आर्थिक विकासाला चालना मिळावी म्हणून रोबोटिक्स आणि एआयसंबंधित उद्योगांवर, चीन सरकार अब्जावधी डॉलर्सची तरतूद वारंवार करत असल्याचे वृत्त मिळाले आहे. ब्लूमबर्गनुसार, चीनने २०२० पासून प्रगत उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत, पुनर्प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये १५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, त्यामुळे माणसाच्या जागी यंत्र येण्याऐवजी ‘डार्क फॅक्टरीज्’मधील कामाचे स्वरूप तेवढे बदलणार आहे. यंत्र आणि माणूस एकत्र काम करणार आहे. बेरोजगारी हे केवळ आर्थिक संकट नाही. यामुळे चीनला सामाजिक आणि राजकीय धोकादेखील आहे, हे चीन सरकारला चांगलेच ठाऊक आहे.

ग्राहकांचा आत्मविश्वास आधीच कमकुवत असताना तरुणांमधील बेरोजगारी हा आता चिंतेचा विषय बनला आहे, अशा वेळी मोठ्या प्रमाणावर कामगारांचे विस्थापन केल्यास व्यवस्थेत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच चिनी अधिकारी आणि सरकारी माध्यमे रोबोट्सना माणसांची जागा घेणारे साधने म्हणून वापरण्याऐवजी, माणसांची कामे सुलभ करणारी साधने म्हणून समोर आणत आहेत.

चीनमधील सर्वात मोठ्या टेक हबपैकी एक असलेल्या बीजिंग इकॉनॉमिक-टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट एरियाचे उपसंचालक लियांग लियांग यांनी गेल्या वर्षीच एका मुलाखतीत सांगितले की, ह्युमनॉईड रोबोट्स मानवी निर्मात्यांची जागा घेतील असे त्यांना वाटत नाही, याउलट ते उत्पादकता वाढवतील आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही काम करण्यासाठी तयार असतील असे म्हटले आहे.

हा केवळ वरवरचा संदेश आहे. चीनला लोकांच्या पोटावर पाय आला आहे हे न सांगता उत्पादन सुरू ठेवायचे आहे. त्यांना हे ठाऊक आहे की यंत्रे रातोरात मानवांच्या कार्याला पूर्णपणे बदलून टाकू शकतात.

“रोबोट्समुळे लोक बेरोजगार होतील असे आम्हाला वाटत नाही, याउलट ते कार्यक्षमता वाढवतील किंवा अशी कामे करतील जी माणसे करू शकत नाहीत. उदाहरणार्थ अंतराळात शोधमोहिमा करणे किंवा समुद्राच्या खोल तळाचा शोध घेणे, जिथपर्यंत माणूस पोहोचू शकलेला नाही अशा दुर्मीळ ठिकाणांपर्यंत पोहोचणं. अशा प्रकारच्या कामांमध्ये यंत्रे आम्हाला मदत करू शकतात,” असे लियांग म्हणाले.
त्यामुळे अनेक कारखाने कामगारांची जागा घेण्याऐवजी, मानव आणि यंत्रे एकत्र काम करू शकतील अशा उत्पादन प्रणालीकडे वळत आहेत.

चीनसाठी जागतिक स्पर्धा महत्त्वाची

आयएफआरच्या ‘वर्ल्ड रोबोटिक्स २०२५’च्या अहवालानुसार, चीनने २०२४ मध्ये कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या २० लाखांहून अधिक रोबोट्सचा जागतिक विक्रम नोंदवला, हा आकडा जागतिक मागणीच्या ५४% इतका आहे. तिथल्या रोबोट्सची डेन्सिटी दर १०,००० कामगारांमागे ३९२ इतकी आहे, याउलट जागतिक सरासरी १४१ आहे. इतक्या वेगात इतर कोणत्याही देशात रोबोट्सची डेन्सिटी नाही. पूर्वी याच कंपन्या बाहेरून कामगार आणून उत्पादन करायच्या. आता ‘डार्क फॅक्टरीज्’मुळे मानवी मजुरीवर विसंबून राहावे लागत नाही, यामुळे मजुरी खर्च फार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

या रोबोटचलित सुविधा व्यत्ययरहित आहेत. यांना कधी थकवा येत नाही की कसला त्रास उद्भवत नाही. सतत कार्यरत असल्यामुळे प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणावर, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर उत्पादने एकत्रितपणे बाजारात आणता येणे शक्य होते.

उत्पादन आणि कार्यक्षमता जरी खूप असली तरी, ‘डार्क फॅक्टरीज्’चे धोके आणि परिणाम गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे उत्पादन आणि असेंब्लिंग क्षेत्रातील लाखो कामगारांच्या नोकऱ्यांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो आणि येत्या काळात कर्मचाऱ्यांमधील कौशल्य कमी होऊन त्यांना पुनर्प्रशिक्षित करण्याचीही गरज भासू शकते.

असे प्लांट्स उभारण्यासाठी भरपूर वित्तपुरवठा आणि सरकारचे प्रोत्साहन लागते. यामुळे जागतिक उत्पादन काही मोजक्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रांच्या हातात जाण्याचाही धोका आहे. भविष्यात माणसांसाठी काम उरणार आहे का हा तर सर्वांत महत्त्वाचा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. याचे उत्तर मानवाची जागा भविष्यात यंत्र घेतील यात नसून भविष्यातील यंत्र-मनुष्याच्या सहअस्तित्वात दडलेले आहे.