देशातील स्मार्टफोनचा वाढलेला वापर, क्लाऊड व कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि व्यवसायांचे वेगाने होणारे डिजिटायझेशन यामुळे देशातील डेटा सेंटर म्हणजेच विदा केंद्र क्षमतेत मोठी वाढ होत आहे. मुंबईनंतर राज्यात पुण्यातही विदा केंद्र क्षमतेत झपाट्याने वाढ होत आहे.

नेमकी वाढ कशामुळे?

भारतात गेल्या काही वर्षांत मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यातून व्हिडिओ स्ट्रिमिंग, गेमिंग, समाज माध्यमे अशा सर्वच पातळ्यांवर विदेवर प्रक्रिया करण्याची मोठी गरज दिवसेंदिवस निर्माण होत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी विदा केंद्रांची संख्या पर्यायाने वाढत आहे. देशातील स्मार्टफोन वापरणारा नागरिक दरमहा सरासरी ३१ जीबी इंटरनेट डेटा वापरतो. जागतिक पातळीवर पाहिल्यास हे प्रमाण खूप अधिक असूनही विदा केंद्रांची संख्या कमी आहे. यामुळे आगामी काळात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल. सध्या कंपन्यांकडून विदा केंद्रासाठी मुंबईला सर्वाधिक पसंती दिली जात असून, देशातील निम्मी विदा केंद्र क्षमता एकट्या मुंबईत आहे. या वर्षी पहिल्या सहामाहीत मुंबईतील विदा केंद्र क्षमतेत अनुक्रमे ८९० मेगावॉटवर पोहोचली आहे. त्यात २०३०पर्यंत दुपटीहून अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे.

देशभरातील चित्र काय?

देशातील विदा केंद्रांचा जानेवारी ते जून या सहामाहीचा अहवाल ‘कुशमॅन अँड वेकफिल्ड’ संस्थेने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात सध्या एकूण १४७ विदा केंद्रे असून, ती चालविणाऱ्या ३३ सेवा पुरवठादार कंपन्या आहेत. देशातील एकूण विदा केंद्र क्षमता पहिल्या सहामाहीत १ हजार ७८९ मेगावॉटवर पोहोचली आहे. या सहामाहीत क्षमतेत एकूण १७८ मेगावॉट क्षमतेची भर पडली आहे. देशात २०३०पर्यंत आणखी ३ हजार ८६० मेगावॉट क्षमतेच्या विदा केंद्रांचा पुरवठा होणार आहे. त्यातील ५०९ मेगावॉट क्षमतेच्या विदा केंद्रांची उभारणी सुरू असून, ३ हजार ३५१ मेगावॉट क्षमतेची विदा केंद्रे नियोजनाच्या टप्प्यावर आहेत.

महाराष्ट्रात काय स्थिती?

देशात सर्वाधिक विदा केंद्र क्षमता मुंबईत आहे. मुंबईत सध्या कार्यान्वित विदा केंद्र क्षमता ८९० मेगावॉट आहे. आगामी काळात त्यात आणखी १ हजार ७२६ मेगावॉटची भर पडणार आहे. भक्कम डिजिटल पायाभूत सुविधा, ऊर्जेची उपलब्धता आणि दळणवळणाच्या व्यापक सुविधा यामुळे कंपन्यांकडून मुंबईला पसंती मिळत आहे. मुंबईत पवई, ठाणे-बेलापूर रस्ता आणि पनवेल परिसरात विदा केंद्रे अधिक आहेत. पुण्याचा विचार करता पहिल्या सहामाहीत विदा केंद्र क्षमता १३३ मेगावॉटवर पोहोचली आहे. याच वेळी २५८ मेगावॉट क्षमतेच्या नवीन विदा केंद्रांचा पुरवठा होणार आहे. जागतिक पातळीवरील कंपन्यांचा झालेला व्यवसाय विस्तार आणि इतर महानगरांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असलेली जागा यामुळे कंपन्यांचा पुण्याकडे कल वाढत आहे. पुण्यात हिंजवडी, खराडी आणि आळंदी रस्त्यावर दिघी परिसरात विदा केंद्रे अधिक आहेत. राज्यात मुंबई आणि पुण्याकडे प्रामुख्याने विदा केंद्रांचा ओढा असल्याचे दिसून येते.

अर्थव्यवस्थेला काय फायदा?

देशातील विदा केंद्र परिसंस्था अतिशय वेगाने विस्तारत आहे. विविध कंपन्या या क्षेत्रात कार्यरत असून, देशातील सर्वच महानगरांमध्ये विदा केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. क्लाऊडच्या स्वीकारातील पुढील टप्प्यावर विदा केंद्र परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याच वेळी अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर आणि विदा आधारित विकास या गोष्टी महत्त्वाच्या असून, त्यातही ही परिसंस्था कळीची भूमिका बजावेल, असे कुशमॅन अँड वेकफिल्डचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक गौतम सराफ यांनी सांगितले.

भविष्यात विरोध होऊ शकतो?

संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात विदा केंद्रांमुळे होत असलेल्या गंभीर दुष्परिणांमावर भाष्य करण्यात आले होते. त्यात कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाला पाठबळ देणाऱ्या विदा केंद्रांचा वीज वापर २०३० पर्यंत ९४५ टेरावॉट-तासांवर जाईल. हा विजेचा वापर पाकिस्तान, बांगलादेश आणि नाजयेरियाच्या एकत्रित वार्षिक वीज वापराएवढा आहे. या तीन देशांची लोकसंख्या ६५ कोटी आहे. म्हणजेच एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आवश्यक असलेली वीज विदा केंद्रांना लागेल. याचबरोबर विदा केंद्रांसाठी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे १.३ अब्ज लोकसंख्येची वार्षिक गरज भागविणारे पाणी या विदा केंद्रांसाठी लागेल. यामुळे आगामी काळात इतर देशांप्रमाणे भारतातही विदा केंद्रांना विरोध करणारी चळवळ सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

sanjay.jadhav@expressindia.com