Violence in Pakistan’s Balochistan पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमुळे हा संघर्ष आणखीनच चिघळल्याचे चित्र आहे. या कारवाईला उत्तर म्हणून दहशतवाद्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान हादरला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अलीकडच्या काळात बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी ४० तासांच्या कालावधीत १४५ अतिरेक्यांना ठार मारले. यापूर्वी असोसिएटेड प्रेसने वृत्त दिले होते की, बलुचिस्तानमध्ये अनेक आत्मघाती बॉम्बस्फोट आणि बंदुकीच्या हल्ल्यांमध्ये किमान ३३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी ९२ हल्लेखोरांना ठार मारले.
सुमारे ४० तास चाललेल्या या गोळीबार आणि बॉम्बस्फोटांच्या सत्रात अनेक नागरिक आणि सुरक्षा दलाचे जवान हुतात्मा झाले; तर पाकिस्तानी लष्कराने किमान १४५ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. या चिघळत असलेल्या संघर्षामुळे बलुचिस्तानमधील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बंडाकडे जगाचे लक्ष पुन्हा वेधले गेले आहे. मुख्य म्हणजे या हिंसाचारात इतर देशांचा, विशेषतः भारताचा हात असल्याच्या वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे पुन्हा एकदा तीव्र राजनैतिक पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानात नक्की काय घडतंय? जाणून घेऊयात…
बलुचिस्तानमध्ये ४० तासांत नक्की काय घडले?
बलुचिस्तानच्या क्वेटा, ग्वादर, मस्तुंग, नोशकी, दलबंदीन, खारन, पंजगुर, तुमप व पासनी या शहरांमध्ये एकापाठोपाठ एक हल्ले झाले. दहशतवाद्यांनी पोलीस ठाणे, सुरक्षा चौक्या, प्रशिक्षण केंद्रे, बँका, बाजारपेठ आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले केले. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या तळांमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. अनेक ठिकाणी हल्लेखोर नागरी वस्त्यांमधून फिरत होते, रस्ते अडवत होते आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करत होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कर, पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी रविवारी सांगितले की, सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी दहशतवाद्यांचा पाठलाग केल्यामुळे बलुचिस्तानमध्ये सलग ४० तास चकमकी सुरू होत्या. प्रांतीय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात १७ सरकारी अधिकारी आणि ३१ नागरिक मारले गेले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ९२ आणि शुक्रवारी ४१ दहशतवाद्यांचे निर्दालन करण्यात आले. बुगती यांनी पुढे सांगितले की, हे हल्ले होण्यापूर्वीच गुप्तचर संस्थांना विश्वसनीय माहिती मिळाली होती. “अशा प्रकारच्या कारवाईचा कट रचला जात असल्याची माहिती आमच्याकडे होती. त्यामुळे आम्ही एक दिवस आधीच याला रोखण्याचे प्रयत्न सुरू केले होते,” असे त्यांनी नमूद केले.
बलुचिस्तानच्या क्वेटा येथील अनेक भागांत हिंसाचाराचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस ठाण्याबाहेर जळलेली वाहने, भिंतींवरील गोळ्यांच्या खुणा आणि नाकाबंदी केलेले रस्ते यांमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. दहशतवाद्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि ‘रेड झोन’मधील ठिकाणांना लक्ष्य केले. एका बँकेसह पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. ग्वादरसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात दहशतवाद्यांनी खुजदार येथील एका मजूर कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या केली. चीनच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे बंडखोरांनी या शहराला बऱ्याच काळापासून ‘लक्ष्य’ केले आहे.
पासनीमध्येही एका सागरी सुरक्षा तळावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यात एक जवान हुतात्मा झाला. मस्तुंग, कलात व पासनीमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी इमारतींचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मस्तुंगमधील हल्ल्यात अनेक जण जखमी झाले; तर मध्यवर्ती कारागृहातून ३० हून अधिक कैद्यांना पळवून नेल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नोशकीमध्ये डेप्युटी कमिशनर हुसेन हजारा यांचे त्यांच्या कुटुंबासह अपहरण करण्यात आले होते; मात्र नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
‘बीएलए’च्या आक्रमकतेचे कारण काय?
२०२२ पासून ‘बीएलए’ने लष्करी आणि नौदल तळांवर थेट हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये महामार्गावर बस थांबवून प्रवाशांची ओळख तपासून, त्यांची हत्या करण्यात आली. मार्च २०२५ मध्ये रेल्वे रुळांचे नुकसान करून ‘जाफर एक्स्प्रेस’वर गोळीबार करण्यात आला. या गटाने आता महिला आत्मघाती हल्लेखोरांचाही वापर सुरू केला आहे. याचेच उदाहरण कराचीतील चिनी नागरिकांवरील हल्ल्यात पाहायला मिळाले.
गेल्या वर्षी इराण आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यांच्या केंद्रस्थानीदेखील हाच गट होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला होता. पाकिस्तान सातत्याने भारत आणि अफगाणिस्तानवर या बंडखोरांना पाठबळ दिल्याचा आरोप करत असतो. मात्र, हा आरोप दोन्ही देश सातत्याने फेटाळत आले आहेत. अमेरिकेनेही ‘विदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून ‘बीएलए’ला घोषित केले आहे.
बलुचिस्तान पाकिस्तानसाठी का महत्त्वाचे?
पाकिस्तानातील चिनी हितसंबंध हे ‘बीएलए’चे मुख्य लक्ष्य राहिले आहेत. चीन बलुचिस्तानमधील संसाधनांचे शोषण करण्यात पाकिस्तानला मदत करीत असल्याचा आरोप या गटाकडून करण्यात आला आहे. बलुचिस्तान हा चीनच्या ६५ अब्ज डॉलर्सच्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) प्रकल्पाचा कणा आहे.
बलुचिस्तानमध्ये ग्वादरसारखे खोल पाण्याचे बंदर आणि रेको डिकसारखे जगातील सोने व तांब्याचे सर्वांत मोठे साठे आहेत. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती असूनही, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत गरीब प्रांत आहे. राजकीय प्रतिनिधित्व, संसाधनांचे वाटप व सुरक्षा दलांकडून होणारे अत्याचार यांमुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
पाकिस्तानने या परिस्थितीसाठी कोणाला जबाबदार धरले?
या हिंसाचारानंतर पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा इतर देशांचा हात असल्याचा जुनाच दावा केला आहे. शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात लष्कराने या हल्ल्यांना ‘भारताने पुरस्कृत केलेले दहशतवादी’ असे म्हटले आणि त्यांना ‘फितना अल-हिंदुस्थान’ असे नाव दिले. स्थानिक समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत आला आहे.
यावर भारताची प्रतिक्रिया काय?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही पाकिस्तानचे बिनबुडाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावतो. आपल्या अंतर्गत अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच अशा भाषेचा वापर करत आला आहे.” ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करावे. “प्रत्येक वेळी हिंसाचार झाल्यावर बिनबुडाचे दावे करण्यापेक्षा, त्या प्रदेशातील लोकांच्या मागण्यांकडे लक्ष देणे योग्य ठरेल. तिथली दडपशाही आणि मानवी हक्कांचे उल्लंघन जगाला ठाऊक आहे,” असे जयस्वाल यांनी म्हटले. दुसरीकडे, अमेरिकेने या हल्ल्यांचा निषेध केला असून पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला आहे.

