Debunking sugar rush myth fatigue meta analysis: गणपतीची आरती झाली की, मोदक, लाडू आणि थंडगार सरबत हातात येते; पण थोड्याच वेळात डोळे जड होतात आणि थकवा जाणवायला लागतो. “गोड खाल्ल्यामुळे आधी उत्साह आला आणि मग अचानक थकवा जाणवतो,” असे आपण नेहमी म्हणतो; याला ‘शुगर क्रॅश’ म्हणतात. सणासुदीला गोड खाल्ल्याने मूड खरंच सुधारतो, की हा ‘शुगर रश’ निव्वळ एक गैरसमज आहे? याबाबत झालेल्या एका संशोधनात या समजुतीला छेद देणारे निष्कर्ष समोर आले आहेत.
शुगर रश आणि शुगर क्रॅश म्हणजे काय?
साखर खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात नेमकं काय घडतं, हे समजून घेण्यासाठी आधी ‘शुगर रश’ आणि ‘शुगर क्रॅश’ यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढते – याला ‘शुगर रश’, असे म्हणतात. या टप्प्यात अचानक ऊर्जा वाढल्यासारखं वाटतं, मन उत्साही होतं आणि क्षणभर छान वाटतं; पण शरीर ही वाढलेली साखर लगेच नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतं – त्यासाठी स्वादुपिंडातून इन्सुलिन मोठ्या प्रमाणात स्रवतं. हे इन्सुलिन रक्तातली साखर झपाट्यानं कमी करतं आणि कधी कधी ती गरजेपेक्षाही खाली जाते. साखरेची पातळी अशी अचानक घसरली, की थकवा, चिडचिड, आळस आणि एकाग्रता कमी होणं जाणवायला लागतं – यालाच ‘शुगर क्रॅश’ म्हणतात. शुगर रश म्हणजे साखरेमुळे मिळणारा ऊर्जेचा तात्पुरता झटका; तर शुगर क्रॅश म्हणजे त्यानंतर येणारा थकवा आणि सुस्ती. ही दोन्ही एकाच प्रक्रियेची दोन टोकं आहेत .
संशोधनात नेमकं काय आढळलं?
‘न्यूरोसायन्स अँड बायोबिहेव्हिअरल रिव्ह्युज’ या नियतकालिकात २०१९ मध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला, ज्यात अनेक जुन्या संशोधनांचा एकत्रित आढावा घेण्यात आला होता. संशोधक कॉन्स्टान्टिनोस मानटान्झिस, फ्रीडरिके श्लागहेकेन, सांद्रा आय. सुन्राम-लिया व एलिझाबेथ ए. मेलर यांनी ३१ अभ्यासांतील १,२५९ लोकांच्या माहितीचं विश्लेषण केलं. त्यात एकूण १७६ निष्कर्ष तपासले गेले. अनेक वेगवेगळ्या अभ्यासांचे निष्कर्ष एकत्र करून, मोठं चित्र समजून घेण्याच्या या पद्धतीला मेटा-अॅनालिसिस म्हणतात.
या संशोधनाचा मुख्य प्रश्न होता – कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर मूडमध्ये काय बदल होतो? इथे एक गोष्ट लक्षात घ्या – अभ्यासात केवळ गोड पदार्थांतील साखरेचाच विचार केला गेला नव्हता, तर ग्लुकोज, सुक्रोज, फ्रक्टोज, गॅलॅक्टोज यांसारखे विविध प्रकारचे कार्बोहायड्रेट आणि वेगवेगळं प्रमाण तपासण्यात आलं. लोकांच्या मनःस्थितीतील उत्साह, सतर्कता, थकवा, राग व गोंधळ यांसारखे पैलू तपासले गेले. तसेच, हे बदल कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत, ३१ ते ६० मिनिटांत आणि त्यानंतर अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर मोजले गेले
‘शुगर रश’ खरी असते का?
गोड पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला लगेच उत्साह येतो, ऊर्जा वाढते आणि मूड चांगला होतो, अशी समजूत आहे. विशेषतः लहान मुले गोड खाल्ल्यावर अधिक अतिउत्साही किंवा चंचल (हायपर) होतात, असे निरीक्षण अनेकदा पालक नोंदवतात. सणासुदीला तर मिठाई, मोदक किंवा जिलेबीचा पहिला घास घेताना ‘आता कुठे शरीरात एनर्जी आल्यासारखी वाटते आहे’ असं सहज म्हटलं जातं.
गोड पदार्थांचा मूडवर परिणाम होतो, यामागे मेंदूतील काही रासायनिक प्रक्रिया असू शकतात, अशी चर्चा पूर्वीच्या काही संशोधनांमध्ये आढळते. कार्बोहायड्रेटच्या सेवनामुळे ट्रिप्टोफॅनच्या उपलब्धतेत बदल होऊन सेरोटोनिनशी संबंधित यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो, असा एक विचार मांडला गेला होता. त्यामुळे गोड खाल्ल्यावर मूड सुधारेल, अशी अपेक्षा निर्माण झाली. पण एखादी जैवरासायनिक प्रक्रिया घडते आणि त्याचा परिणाम आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतो. तेव्हा या दोन गोष्टी एकच नसतात.
मात्र, या मेटा-अॅनालिसिसमध्ये कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर मूडच्या कोणत्याही मोजलेल्या घटकात सकारात्मक परिणाम आढळला नाही. म्हणजे गोड खाल्ल्याने आनंद, उत्साह किंवा एकंदर मूड सुधारतो, याला या अभ्यासात आधार मिळाला नाही. उलट, पहिल्याच तासात थकवा वाढल्याचा आणि सतर्कता घटल्याचं दिसून आलं.
संशोधनाचे प्रमुख लेखक कॉन्स्टान्टिनोस मानटान्झिस यांनी याबद्दल मत मांडले आहे: साखरेमुळे मूड सुधारतो’ ही कल्पना लोकांमध्ये खोलवर रुजली आहे. अधिक सतर्क राहण्यासाठी किंवा थकवा दूर करण्यासाठी लोक साखरयुक्त पदार्थ किंवा पेय घेतात. मात्र, आमचे निष्कर्ष या दाव्यांना पाठिंबा देत नाहीत; उलट साखरेमुळे तुम्हाला अधिक थकवा जाणवतो. अर्थात, प्रत्येक व्यक्तीला गोड खाल्ल्यानंतर तसाच अनुभव येईल, असा अर्थ मात्र या निष्कर्षातून काढता कामा नये.”
मग गोडधोड खाणं सोडायचं का?
याचा अर्थ सणाला मोदक, लाडू किंवा पुरणपोळी खाऊच नये, असा या अभ्यासाचा निष्कर्ष नाही. हा अभ्यास दीर्घकालीन आरोग्यावरील परिणाम पाहणारा नव्हता. त्याचा प्रश्नही साधा होता – कार्बोहायड्रेट सेवनानंतर तात्पुरता मूड बदलतो का?
त्यामुळे सणासुदीला गोडधोड खाणं सोडायची गरज नाही. मात्र, ‘थकवा आल म्हणून एक चमचा साखर तोंडात टाकली की, लगेच मूड आणि ऊर्जा सुधारेल’ ही कल्पना मात्र या निष्कर्षांशी जुळत नाही. विशेषतः साखरयुक्त पेये किंवा गोड पदार्थ हे थकवा घालवण्याचे खात्रीशीर मार्ग आहेत, असे मानण्यास या अभ्यासातून कोणताही आधार मिळत नाही.
याचा अर्थ असा नव्हे, की हा अभ्यास गोडधोड आणि आनंद यांच्यातील संबंध पूर्णपणे नाकारतो. सणाच्या प्रसंगी एखादा पदार्थ आवडीचा असणं, घरच्या मिठाईची चव, आठवणी, कुटुंबातील वातावरण आणि एकत्र जेवण्याचा अनुभव यांमुळे मूडवर परिणाम होऊ शकतो. या सामाजिक आणि भावनिक घटकांना या मेटा-अॅनालिसिसनं मोजलेलं नाही. त्यामुळे ‘मिठाई खाल्ल्यामुळे आपल्याला आनंद होतो आहे’ हा अनुभव खोटा आहे, असेही ठामपणे म्हणता येणार नाही. साखर किंवा इतर कार्बोहायड्रेट्सच्या सेवनामुळे तत्काळ सकारात्मक ‘मूड बूस्ट’ होतो, या समजुतीला कोणताही ठोस पुरावा नाही – एवढेच या संशोधनानं स्पष्ट केलं आहे. म्हणून सणाचा गोडवा आणि साखरेचा जैविक परिणाम हे वेगवेगळे विषय आहेत.
संशोधनाच्या मर्यादा काय?
या मेटा-अॅनालिसिसची व्याप्ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. इथे ‘मूड’वरील तात्कालिक परिणाम तपासले गेले; दीर्घकाळ साखर खाल्ल्यानं नैराश्य येतं किंवा मानसिक आरोग्य बिघडतं, असं यातून सिद्ध होत नाही. या संशोधनात प्रामुख्यानं सक्षम प्रौढ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये कार्बोहायड्रेटचा प्रकार, प्रमाण, आधीचा उपवास आणि मोजण्याची पद्धत बदलली जात होती. तरीही ३१ अभ्यासांमधून मिळालेल्या १७६ परिणामांचं एकत्रित चित्र एकाच दिशेनं गेलं, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
सणांच्या आठवणींमध्ये गोड पदार्थांचा वाटा मोठा असतो. मोदकाचा स्वाद, पुरणपोळीचा घास किंवा दिवाळीतील मिठाई यांचा आनंद फक्त साखरेच्या रासायनिक परिणामामुळेच मिळतो, असं विज्ञान सांगत नाही. उलट, या मेटा-अॅनालिसीसनुसार गोड खाल्ल्यानंतर तात्पुरत्या मूड-बूस्टचा ठोस पुरावा मिळालेला नाही; काही वेळात थकवा आणि कमी सतर्कताही दिसू शकते. त्यामुळे सणासुदीला गोड खा; पण ‘शुगर रश’च्या कल्पनेपेक्षा त्या गोडधोडाचा आस्वाद, सोबतची माणसं आणि तो क्षण महत्त्वाचा आहे.
