गेल्या वर्षभरात नाही म्हटले तरी डझनावारी बॉलिवूड कलाकारांनी आणि प्रसिद्धीच्या वलयात असलेल्या सेलिब्रिटींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे सुरू केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक अरिजित सिंग, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता ह्रतिक रोशन अशा नामी मंडळींनी डीपफेक आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आपले नाव, छायाचित्र, चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेले नाव, संवाद, आवाज कुठल्याही गोष्टीच्या गैरवापरापासून संरक्षण मिळावे, यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली.
२०२५ संपता संपता व्यक्तिमत्त्व किंवा प्रसिद्धी अधिकारांतर्गत अभिनेता अजय देवगण संदर्भात त्याची डीपफेक प्रतिमा, व्हिडिओ वा अन्य आशय ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय चर्चेत आला. एकापाठोपाठ एक सगळ्याच सेलिब्रिटी वा बॉलिवूड कलाकारांना एआय किंवा डीपफेक तंत्रज्ञानापासून वाचण्यासाठी व्यक्तिमत्त्व हक्क कायद्यांतर्गत संरक्षण घेणे अचानक महत्त्वाचे का वाटू लागले आहे? एआय वा डीपफेक तंत्रज्ञानाचा सहज प्रसार आणि त्याला आळा घालणारा थेट कायदा नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे फसवणूक होण्याआधी खबरदारीचे पाऊल म्हणून अशापद्धतीचे कायदेशीर कवच कलाकारांना गरजेचे वाटू लागले आहे.
अजय देवगण
चाहत्यांमध्ये बाजीराव ‘सिंघम’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अभिनेता अजय देवगणने गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका केली होती. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची प्रतिमा, आवाज यांची हुबेहूब नक्कल करत अयोग्य पद्धतीने त्याची छायाचित्रे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित केली जात आहेत. शिवाय, त्याच्या छायाचित्रांचा वापर करून टोपी, स्टिकर्स, पोस्टर्स अशा वस्तूंची विक्री केली जाते आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आणि भविष्यात आपल्या कुठल्याही गोष्टींचा गैरवापर होऊ नये, यासाठी व्यक्तिमत्त्व किंवा प्रसिद्धी अधिकारांतर्गत संरक्षण मागणारी याचिका अजय देवगणने केली होती.
त्यासंदर्भात निकाल देताना अजय देवगणची परवानगी न घेता डीपफेक किंवा कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून बनवण्यात आलेली त्याची प्रतिमा किंवा व्हिडिओ असलेला आशय सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकण्यात यावेत. तसेच, अभिनेत्याची परवानगी न घेता त्याची प्रतिमा, आवाज, नाव कशाचाही वापर करता येणार नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. मात्र, ते करत असताना यापुढे कुठल्याही कलाकाराने युट्यूब किंवा अन्य ऑनलाईन माध्यमावर डीपफेक वा एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आशय प्रसारित केला जात असेल तर न्यायालयात याचिका करण्यापूर्वी संबंधित ऑनलाईन प्लॉटफॉर्म्सविरोधात तक्रार नोंदवणे अनिवार्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच, डीपफेक आशय काढून टाकता येईल, मात्र अभिनेत्याची जुनीच छायाचित्रे पुन्हा डिजिटल माध्यमांवर ठेवली जात असतील तर संबंधितांची बाजू ऐकल्याशिवाय ती काढून टाकता येणार नाहीत, असेही न्यायालयाने सांगितले. अभिनेता अजय देवगणला या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वाढलेला पसारा, इन्फ्लूएन्सर्स-फॅन पेजेस यांची भरमसाट संख्या यामुळे खऱ्याखोट्याची शहानिशा हा कलाकारांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे.
एआय, डीपफेक तंत्रज्ञानामुळे डोकेदुखी
हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांची लोकप्रियता ही त्यांच्या पडद्यावरच्या प्रतिमेवर बव्हंशी अवलंबून असते. एखाद्या कलाकाराचे दिसणे, पडद्यावर त्याच्या लोकप्रिय ठरलेल्या भूमिकेनुसार त्याला पडलेले नाव, त्यांचे प्रसिद्ध झालेले संवाद, त्यांनी एखाद्या यशस्वी व्यक्तिरेखेसाठी वापरलेले कपडे, त्यांचा आवाज, चेहरा, चालण्याबोलण्याची लकब अशा कितीतरी गोष्टींचा प्रभाव त्यांच्या चाहत्यांवर पडतो. त्यांची लोकप्रियता किंवा त्यांना मिळणारी प्रसिद्धी यावर त्यांचे व्यावसायिक मूल्य अवलंबून असते. एआय आधारित प्रतिमानिर्मिती किंवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत एखाद्या कलाकाराची आवाजनिर्मिती हे कमी खर्चिक असते. त्यामुळे अनेकदा मूळ कलाकाराला डावलून त्यांच्या वैशिष्ट्यांचा अनधिकृतपणे उपयोग करून इतरांकडून पैसे मिळवण्याचे नवनवे मार्ग शोधले जातात. यात कलाकारांचे व्यावसायिक, आर्थिक नुकसान होते, शिवाय समाजातील त्यांची प्रतिमा डागाळण्याचीही शक्यता असते.
‘बिग बी’, अनिल ‘झक्कास’ कपूर
पडद्यावरचा कलाकारांचा करिश्मा हा अनेकदा त्यांना मोठमोठ्या उत्पादनांच्या जाहिराती मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरतो. ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या शोमधून महानायक अमिताभ बच्चन यांचे ‘कम्प्यूटरजी लॉक किया जाए’सारखे संवादही लोकप्रिय ठरले. अमिताभ यांचा खर्जातला आवाजही लोकप्रिय आहे. शिवाय, ते अनेक सरकारी योजनांसाठी सदिच्छादूत म्हणून कार्यरत असल्याने अनेक संदेश त्यांच्या आवाजात प्रसारित झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या आवाजाची नक्कल केली जाते.
अनेकदा अनधिकृतपणे त्यांचा आवाज मोबाईल वा टेलिफोनवरून करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी वापरला जातो. कौन बनेगा करोडपती या नावाने निघणाऱ्या बनावट लॉटरीवरही त्यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. २०२२ मध्ये पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांनी अशा अनधिकृत पद्धतीने आपले नाव, छायाचित्रे, आवाज आणि अन्य व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांचा व्यावसायिक कारणांसाठी दुरुपयोग केला जाऊ नये, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराने मेहनतीने निर्माण केलेली त्यांची ओळख, प्रतिमा यांचे व्यावसायिक मूल्य मोठे आहे.
अनधिकृतपणे त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा गैरवापर झाल्यास त्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते हे लक्षात घेत न्यायालयाने प्रसिद्धी हक्कांतर्गत त्यांचा आवाज, छायाचित्रे वा तत्सम कुठल्याही गोष्टी अनधिकृतपणे वापरल्या जाऊ नयेत, असे आदेश दिले होते. त्यानंतर २०२३ मध्ये अभिनेता अनिल कपूर यांनीही याच व्यक्तिमत्त्व किंवा प्रसिद्धी हक्काचा आधार घेत त्यांच्या इतर गोष्टींप्रमाणेच ‘झक्कास’ या त्यांच्या लोकप्रिय संवादाच्या गैरवापरावरही रोख लावण्याची विनंती केली होती.
यासंदर्भात, निर्णय देताना ‘झक्कास’ हा शब्द दैनंदिन आयुष्यात सर्वसामान्यांकडून सर्रास वापरला जातो. त्यामुळे अनिल कपूर यांच्या शैलीत त्याचा उच्चार कोणी केला वा त्याच्या जोडीला त्यांच्या प्रतिमेचा गैरवापर केला तर त्यावर कारवाई केली जाईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
व्यक्तिमत्त्व हक्काचे संरक्षण कवच
डीपफेक तंत्रज्ञानाने निर्माण केलेली प्रतिमा, आवाज यांच्या आधारे अश्लील व्हिडिओची निर्मिती, बनावट पोस्टर्स, एखाद्या चुकीची उत्पादने वा सेवांशी नाव आणि चेहरा जोडले जाणे हे कलाकारांसमोरचे मोठे आव्हान ठरते आहे. अनेकदा कलाकारांच्या पडद्यावरील किंवा चित्रपटसृष्टीत रूढ असलेल्या इतर नावांचाही वापर बनावट संकेतस्थळ वा अन्य कारणांसाठी केला जातो. गेल्या वर्षी करण जोहरने त्याच्या ‘केजो’ या नावाच्या गैरवापरासंदर्भातही कायदेशीर संरक्षण मागितले होते. तर सलमान खाननेही ‘भाईजान’, ‘भाई’ वा ‘सलमान भाई’ या त्याच्या नावाच्या गैरवापराविषयी न्यायालयात याचिकेद्वारे काळजी व्यक्त केली होती.
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनीही गेल्या वर्षी व्यक्तिमत्त्व अधिकारांतर्गत आपल्या खासगी बाबींवर टाच येऊ नये म्हणून कायदेशीर संरक्षण घेतले आहे. भविष्यात कधी ना कधी अशा प्रकारच्या गैरप्रकारांचा सामना करावा लागू शकतो, हे लक्षात घेत त्याआधीच किमान व्यक्तिमत्त्व अधिकार जपण्याच्या उद्देशाने कायदेशीर संरक्षण घेण्याकडे कलाकारांचा कल वाढला असून नव्या वर्षात ही यादी अधिक वाढत जाणार आहे.
