हल्ली तरुणांमध्ये डेटिंग अॅप्सचा वापर वाढताना दिसत आहे. डेटिंग अॅप्सचा वापर करून लोक आपल्या जोडीदाराचा शोध घेतात. मात्र, या डेटिंग अॅप्सद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूकही केली जात आहे. भारतासह इतर शेजारी देशांमध्ये फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत; ज्यात लोकांना लाखोंचा गंडा घातला गेला आहे. हाँगकाँगमधील पोलिसांनी एका डीपफेक घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे; ज्यातून ठगांनी त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या पुरुषांकडून ४६ दशलक्ष डॉलर्स लुटले, अशी माहिती आहे.

हाँगकाँग, तैवान, चीन, सिंगापूर आणि भारतातील पीडितांना रोमान्स घोटाळ्यात अडकवण्यासाठी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयीन पदवीधर आणि संशयित सदस्यांसह २७ जणांना अटक केली आहे. प्रत्यक्ष व्हिडीओ, फोटोमध्ये दुसर्‍याचा चेहरा, हावभाव अगदी तंतोतंत दाखवले जातात; त्याला डीपफेक व्हिडीओ म्हणतात. कृत्रिम तंत्रज्ञान म्हणजेच एआयचा वापर करून असे व्हिडीओ तयार केले जातात. रोमान्स स्कॅम नक्की काय आहे? याचा वापर करून पुरुषांची फसवणूक कशी केली जाते? पोलिसांनी फसवणूक करणार्‍या टोळीला कसे पकडले? जाणून घेऊ.

हेही वाचा : मदरशांना निधी देणे थांबवावे, बाल आयोगाची इच्छा; कारण काय? केरळची व्यवस्था इतर राज्यांपेक्षा वेगळी कशी?

रोमान्स स्कॅम काय आहे?

ज्यामध्ये श्रीमंत लोकांबरोबर प्रेमसंबंध तयार करून, त्यांची फसवणूक केली जाते, त्यालाच रोमान्स स्कॅम म्हणतात. डेटिंग सोशल साईट्सचा वापर करून लोक विशेषतः पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात फसवतात. एखाद्याला लक्ष्य करून त्याच्याशी लवकरात लवकर जवळीक वाढवणे, त्याचा विश्वास जिंकणे, हा घोटाळेबाजांच्या योजनेचा भाग असतो. त्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या जातात. मग घोटाळेबाजांच्या युक्त्यांमुळे पीडित गृहस्थ त्यांच्या जाळ्यात अशा प्रकारे अडकतात की, त्या कथित मुलींना भेटून, त्यांच्याशी लग्न करण्याचाही विचार करू लागतात.

हाँगकाँग, तैवान, चीन, सिंगापूर आणि भारतातील पीडितांना रोमान्स घोटाळ्यात अडकवण्यासाठी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

प्रकरण काय?

‘एससीएमपी’नुसार, रिंग या कंपनीने ऑक्टोबर २०२३ मध्ये हाँगकाँगच्या हंग होममध्ये चार हजार स्क्वेअर फूट औद्योगिक युनिटमध्ये आपला पाया तयार केला. त्यानंतर कंपनीकडून अनेकांना नोकऱ्या देण्यात आल्या. कंपनीच्या या योजनेत किमान २१ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी बहुतेक सुशिक्षित आणि डिजिटल मीडिया व तंत्रज्ञानामधील पदवीधर आहेत. न्यू टेरिटरीज दक्षिण प्रादेशिक गुन्हे युनिटचे प्रमुख असलेले वरिष्ठ अधीक्षक फँग ची-किन यांनी सांगितले की, या योजनेसाठी नेमण्यात आलेल्या सर्वांचा या घोटाळ्यात सहभाग होता. या घोटाळ्यासाठी संशयितांनी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून आकर्षक महिलांच्या फोटोसह स्वतःचे चेहरे बदलले.

त्यानंतर घोटाळेबाजांनी पीडितांशी संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. लोकांची फसवणूक करण्यासाठी योजना आखण्यात आली. त्यासाठी सहभागींना एक मॅन्युअलदेखील जारी करण्यात आले होते; ज्यात त्यांना पीडित व्यक्तीची प्रामाणिकता व भावना त्यांच्या फायद्यासाठी कशी वापरायची याबाबतचे आणि पीडित व्यक्तीचे विचार जाणून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. “सिंडिकेटच्या ऑपरेशनची सुरुवात ऑनलाइन रोमान्सने झाली,” असे फँग यांनी स्पष्ट केले. “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला पीडितांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्यांचे विचार जाणून घेतल्यानंतर व्यक्तिमत्त्व, व्यवसाय, शिक्षण आणि इतर पैलूंच्या बाबतीत आकर्षक व्यक्ती तयार करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या तयार केलेले फोटो, व्हिडीओ त्यांना पाठविण्यात आले. प्रेमसंबंध निर्माण होत असल्याचा विश्वास पीडितांमध्ये तयार करण्यात आला,” असे ते पुढे म्हणाले.

या घोटाळ्यात बहुतेक पुरुषांना क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या घोटाळ्यात बहुतेक पुरुषांना क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. या घोटाळ्याला ‘पिग बुचरिंग’ म्हणूनही ओळखले जाते. त्यात मैत्री किंवा प्रेम असल्याचे दाखवून बोगस नोकरी, नोकरीच्या संधी इत्यादी गोष्टींसाठी पीडितांकडून पैसे घेतले जातात आणि त्यांची फसवणूक केली जाते. “फसवणूककर्त्यांनी पीडितांसमोर बनावट नफा व्यवहाराचे पुरावे सादर करून, त्यांचा विश्वास जिंकला,” असेही फँग म्हणाले. “त्यांनी पीडितांबरोबर भविष्यातील योजनांबद्दलही चर्चा केली आणि भविष्यासाठी गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी पीडितांना प्रोत्साहित केले,” असे फँग पुढे म्हणाले.

हेही वाचा : भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ऑस्ट्रेलियाने लाँच केला वर्किंग हॉलिडे व्हिसा, याचा अर्थ काय? कसा होणार फायदा?

‘सीएनएन’नुसार, पोलिसांचे हे ऑपरेशन एक वर्षापासून सुरू होते, जे ऑगस्टमध्ये यशस्वी झाले. पोलिसांनी छापेमारीतून १०० हून अधिक मोबाईल फोन, २६,००० डॉलर्सची रोकड आणि लक्झरी घड्याळे जप्त केली. पोलिसांनी ‘क्रिप्टो न्यूज’ला सांगितले की, या प्रकरणाचा तपास चालू आहे आणि भविष्यात अधिक लोकांना अटक केली जाऊ शकते. ‘क्रिप्टो न्यूज’ने टेक्सास युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासाचादेखील उल्लेख केला; ज्यात असे दिसून आले आहे की, जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत झालेल्या घोटाळ्यांमध्ये पीडितांनी ७५ अब्ज डॉलर्स गमावले आहेत.

Story img Loader