(सदर लेख हा ‘देहभान’ या पॉडकास्टमधील संवादावर आधारित आहे. ‘देहभान’चे निरंजन मेढेकर यांनी डॉ. आरती रानडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा विषय ‘तारुण्य निरोगी कसं ठेवायचं? आणि म्हातारपणात सुखानं कसं जगायचं?’ असा होता. त्यात दीर्घायुष्य, आरोग्यदायी आहार, जीवनशैली, व्यायाम, सजग जीवन, मेंदूचे आरोग्य या विषयांवर डॉ. रानडे सखोल सखोल भाष्य केलेलं आहे.)

‘आरोग्यातील गुंतवणूक’ म्हणजे नेमकं काय?

आपल्या लहानपणापासूनच आपल्याला आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक करायला शिकवलेलं असतं. शेअर्स घेणं, घर घेणं, पैशांची योग्य ती साठवणूक करणं वगैरे; पण आपल्याला कधीतरी आरोग्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे हे सांगितलं जातं का? डॉ. रानडे सांगतात की, १९९९ साली मी महाराष्ट्रातील खेडोपाड्यांत जाऊन सर्वसामान्य आरोग्य केंद्रांचं सर्वेक्षण केलं. अन्न, वस्त्र, निवारा या जशा आपल्या प्राथमिक गरजा आहेत, त्याप्रमाणे आरोग्य ही आपली प्राथमिक गरज कधी बनणार, हा प्रश्न त्यावेळी मला पडला. पुढे या क्षेत्रात बरेच वर्षं काम केल्यावर आणि पेशीशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, आरोग्यावर गुंतवणूक कशी करावी हे एका ठरावीक वयानंतर आपण समजून घेणं गरजेचं आहे.

‘वयात येणं’ आणि ‘वय होणं’ या दोन्हीदरम्यानचा हा प्रवास आहे. आपण ज्या प्रकारे पैशातील गुंतवणूक ही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी करतो, त्याचप्रमाणे आपलं चालू आणि पुढील आयुष्य चांगलं असावं म्हणून या गुंतवणूकीची सुरुवात आतापासूनच आपण करायची आहे. पहिल्यांदा कशावर लक्ष द्यायचं? तर आपले मुख्य अवयव सुरक्षित असणं गरजेचं आहे, त्यामुळे पहिले ते. दुसरा भाग हा जीवनशैलीचा आहे.

‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या म्हणीप्रमाणे औषधं घ्यायची नसतील, तर जीवनशैली सांभाळणं खूप गरजेचं आहे. तिसरी बाब ‘ज्ञानात्मक गुंतवणुकी’ची आहे. या सर्व घटकांविषयीचं ज्ञान आणि भान असणं सर्वांत जास्त गरजेचं आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात माहितीचा महापूर आलेला असताना योग्य आणि समर्पक माहिती असणं फार गरजेचं झालंय. कोणत्याही गुंतवणुकीचे फायदे हे शेवटी जेव्हा परतावे मिळतात तेव्हा लक्षात येतात.

त्याचप्रमाणे आरोग्यातील गुंतवणुकीचे फायदे ‘निरोगी दीर्घायुष्या’तून मिळणार आहेत. निरोगी दीर्घायुष्य ही आजच्या काळाची गरज आहे. एखादा आजार जर आपल्याला तरुणपणात झाला, तर त्याच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत गोळ्या-औषधांवर बराच खर्च केलेला असतो. त्याऐवजी आपण वेळीच आरोग्यावर योग्य ती गुंतवणूक केल्यास आपण ते आजार होण्यापासून दूर राहू शकुत.

तरुणांनी त्यांच्या आरोग्यावरील गुंतवणुकीला कधी सुरुवात करावी आणि ७५ – ८० दरम्यानच्या वयोवृद्धांनी आता कोणत्या प्रकारची गुंतवणूक करावी?

बाळाला आपण जेव्हा पहिली लस टोचतो, खरं तर गुंतवणुकीची सुरुवात ही तिथूनच झालेली असते. शरीराची जडण-घडण ज्या काळात नुकतीच सुरू होते, त्या काळात म्हणजेच वयाच्या पहिल्या १० वर्षांमध्ये चांगल्या प्रकारचा सकस आहार आणि चांगल्या प्रकारचा व्यायाम हा खूप महत्त्वाचा असतो. हे वय अजिबात वजन उचलण्याचं किंवा वेट लिफ्टिंगचं नाही. त्या वयाचा व्यायाम जो त्या वयाला आवश्यक आहे, तो केला पाहिजे.

फार लहान वयात वजन उचलायला सुरुवात केली, तर हाडांची स्थिती, त्यांची जडणघडण यांवर त्याचा परिणाम होतो. पुढचा टप्पा हा २० वयानंतरचा आहे. जेव्हा तुम्ही पौगंडावस्थेतून तारुण्यात जाता, साधारण तुमचं वय २० असेल, तेव्हा आपले हार्मोन्स स्टॅबिलाईझ व्हायला लागतात. त्या वयात करायचे व्यायाम वेगळे, त्या वयातला आहार वेगळा, इतकेच नव्हे, तर शरीराला आवश्यक असणारी झोपसुद्धा वेगळी असते. ३०-३५ वयात या गोष्टी बदलतात, तशाच त्या पुढेसुद्धा बदलत राहतात. अगदी ८०-८५ वयाच्या व्यक्तीला धावणं जमणार नाही; पण काही पावलं चालणंसुद्धा पुढच्या दोन वर्षांसाठी केलेली गुंतवणूकच असते. या गुंतवणुकीचा कालावधी जसजसं वय वाढणार तसतसा कमी कमी होत जाणार हे ठरलेलं असतं.

समजा, एखाद्याला या गुंतवणुकीबाबत कळायला खूप उशीर झाला आहे, त्यांच्यासाठी काही उशीर झालेला नाही. कोणताही आजार काही अचानकपणे होत नाही. अगदी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीही काही संकेत मिळालेलेच असतात. कोणतीच गोष्ट अशी पटकन होत नसते, त्यासाठी शरीराला तसं ट्रेनिंग मिळावं लागतं. ते ट्रेनिंग मिळाल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. याच तंत्राचा आपण इथे चांगला वापर केला आहे. आपण चांगल्या सवयी हळूहळू लावायच्या म्हणजे आपल्या शरीराला तसं ट्रेनिंग मिळेल. त्यामुळे वाटचालीला कधीही सुरुवात करणं चांगलीच असणार आहे.

गुंतवणूक कशी करावी? कोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात?

या गुंतवणुकीचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत. आहार, विहार (विहारामध्ये व्यायाम नाही, शारीरिक हालचाल) आणि झोप. हा तर या गुंतवणुकीचा सीक्रेट फॉर्म्युला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे आपलं अगदीच दुर्लक्ष होतं.

आयुष्य दीर्घही हवं आणि चांगलंही म्हणूनच आयुष्याची गुणवत्ता कशी सांभाळायची?

दिवसेंदिवस आपल्याकडील जीवनमान वाढत चाललं आहे. लोक पंच्याहत्तरी सहज गाठत आहेत. हे दीर्घायुष्य जर आपल्याला स्वास्थ्यकर पद्धतीनं जगायचं असेल, तर आरोग्यासाठी गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. या सगळ्या अभ्यासाची सुरुवात कशी झाली? तर जगात पाच ब्ल्यू – झोन्स करण्यात आले आहेत. जगातली पाच अशी ठिकाणं निवडण्यात आली, जिथे कमीत कमी जीवनमान हे १०० वर्षं आहे. आणि ती माणसं नुसती दीर्घायुष्यी नव्हेत, तर १०० वर्षं निरोगी राहिलेली, वृद्धावस्थेतही कार्यरत असलेली, चांगलं आयुष्य जगलेली अशी आहेत. जपान, ग्रीस, इटली, अमेरिकेतील लोमालिंडा व कोस्टा रिका या पाच ठिकाणांची निवड करण्यात आली. १०० वर्षं निरोगी आयुष्य जगलेली व्यक्ती पाहायला गेलं, तर शास्त्रज्ञांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. साधारणतः १९९५ नंतर या विषयावर अभ्यास करायला शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. हे लोक अशा प्रकारचं आयुष्य कसं जगतात यातील काही घटक शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.

जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या या लोकांमधील नेमके साम्य काय?

ती साम्यस्थळं पुढीलप्रमाणे :
१) निद्रा चक्र ( वेकिंग अॅण्ड स्लीपिंग सायकल्स) : कधी उठतो आणि कधी झोपतो?
२) आहार
३) चालणं किती होतं?
४) यांना कोणते छंद आहेत? (बागकाम, वाचन इ.)
५) समूहात किती मिसळतात (कम्युनिटी इंटरॅक्शन)
शेवटचे दोन मानसिक आरोग्याशी निगडित आहेत. अखेर निष्कर्ष असा की, या पाच गोष्टी सांभाळल्या, तर आपण चांगलं स्वास्थ्यकर दीर्घायुष्य जगू शकतो.

‘होलिस्टिक’ ट्रीटमेंट मिळत नाही, असं का होतं ?

समजा, एखाद्याला डायबिटीस आहे, तर त्याला त्या आजारावरच लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं जातं. तो आरोग्याच्या सगळ्या बाबींचा विचार करू शकत नाही का? या बाबतीत होतं असं की, तुम्ही ज्या विषयाच्या तज्ज्ञाकडे जाल, तो तज्ज्ञ तुम्हाला त्या विषयासंबंधित पथ्यं पाळायला सांगेल. उदा. डाएटिशियनकडे गेल्यास, ते तुम्हाला डाएट सांभाळायला सांगतील. फिटनेस ट्रेनर हे फिटनेसविषयीच बोलतील, त्याऐवजी काही सांगणार नाहीत. हृदयाचे डॉक्टर हृदयविकारासंबंधीच बोलतील, तसंच डायबिटिसचे डॉक्टरही केवळ शर्करा नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला देतील.

पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी चर्चा एकाच शरीराबाबत होत आहे. आपण ज्या विषयाचे इतके निरनिराळे कंगोरे पाहत आहोत, ते सर्व काही एकाच शरीरात समाविष्ट असतात. आपण कोणतीही कृती केली, समजा खाणं-पिणं असेल, विचार करणं असेल, असं काहीही, ते करताना आपले बाकीचे अवयव काम करायचं थांबतात का?

एक उदाहरण पाहूयात, टीव्ही पाहताना आपण फक्त डोळे वापरतो का? तिथे मेंदूचाही वापर होत असतो. इतर अनेक गोष्टींचाही आपण simultaneously वापर करत असतो. त्यामुळे जरी मी शरीराच्या एका अवयवाचा विचार करत असलो तरी त्याचा विचार करताना मला संपूर्ण शरीराचादेखील विचार करावा लागतो.

‘मित आणि नियमित’ ही संकल्पना कुठून आली?

डॉ. रानडे सांगतात की, मी ‘अनुभव’ या मासिकासाठी जेव्हा वेगवेगळ्या अवयवांबद्दल आणि त्यांच्या आजार, उपचार यांविषयी लिहित होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपलं शरीर म्हणजे काही एक अवयव नाही. पेशीशास्त्राचा अभ्यास करत असल्यामुळे एका पेशीचा प्रवास कसा असतो हेही मला ठाऊक होते.

सगळ्या अवयवांनी मिळून आपलं शरीर तयार होतं. मी जे काही लिहित होते ते मलाही लागू होतं, त्यामुळे मी स्वतः त्या दृष्टीने काही प्रयोग केले. आपलं आयुष्य चालू झाल्यापासून तो प्रवास शेवटाच्या दिशेला सुरू असल्यामुळे मी त्याला वन-वे प्रवास म्हणते. या प्रवासात तुम्ही पुन्हा परतू शकत नाही. आयुष्यात एकदा घडलेली घटना पुन्हा परत तशीच घडत नाही. त्याचप्रमाणे जर कोणतीही वाईट सवय जर आपल्याला बदलायची असेल, तर लगेच काहीतरी केल्यानं तो बदल पटकन घडणार नाही. हळूहळू आपल्याला ती सवय बदलावी लागणार आहे. एकदम एका क्षणात काहीही बदलत नाही. आहार असो, कोणतीही कृती असो. आपल्याला थोडं थोडं शिकत प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे. मी जर रोज थोडं थोडं स्वत:ला ट्रेन केलं तर माझ्याकडे तो स्कीलसेट तयार होणार आहे. हाच ‘मित आणि नियमित’चा खरा मंत्र आहे.

एखादी गोष्ट का करायची याचं उत्तर माझ्याकडे असेल, तर मी ती गोष्ट कशी करायची त्याचं उत्तरही मिळवू शकते. जोपर्यंत एखादी गोष्ट मला पटत नाही तोपर्यंत मला कोणीतरी ते करायला सांगावं लागतं. जेव्हा ती गोष्ट मला पटते तेव्हा ती करण्याचे मार्गसुद्धा सापडतात. त्यामुळे ‘का’ करायचं याचं उत्तर आपल्याला माहीत हवं.

आहारबाबतही तसंच आहे. नियमांबाबतही असंच असलं पाहिजे. आज बाहेर इतकं प्रदूषण असतानाही आपलं शरीर आपल्याला सांभाळतं, हा तर खरंच एक चमत्कार म्हणावा लागेल आणि त्यावर इतकी बंधनं लादणं, म्हणजे एक प्रकारे शरीराला abuse केल्यासारखंच आहे. आपण जे अन्न खातो, आपल्या आजूबाजूला ज्या प्रकारची रसायनं हवेत आहेत, त्या मानानं आपण फारच कमी वेळा आजारी पडत असतो. आपलं शरीर नेहमी आपल्याला वाचवत असतं. संतुलन हा धागा आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. हे शरीराचं यंत्र मी किती चांगलं ठेवू शकेन याचा आपण विचार केला पाहिजे.

चांगल्या सवयी फार लवकर लागतात; वाईट सवयी लागायला मात्र जास्त उशीर लागत नाही… असं का होतं?

हा भाग बराचसा मेंदू आणि हॉर्मोन्सशी संबंधित आहे. आपल्या मेंदूला instant gratificationची सवय लागलेली असते. आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या गोष्टीचं भानच उरलेलं नाही की, आपण आपल्याला शरीराला किती abuse करत आहोत. आहार, विहार आणि निद्रा यांचं संतुलन एकदा राखलं की, मग उरतात ते हॉर्मोन्स. मायक्रोब्स, व्हिटॅमिन्स आणि सर्वांत शेवटी आपले अवयव. जे सर्वांत जास्त महत्त्वाचं काम करीत असतात. आपण जसं बॅंकेचं पासबुक ठेवतो तशी प्रत्येकानं स्वतःपाशी एक आरोग्यवही ठेवली पाहिजे.

मी हे आधीही केलेलं आहे; पण बऱ्याच जणांना ही संकल्पना नवीन वाटेल. आता या नोंदवहीत काय लिहायचं? गेले १० दिवस माझी पाठ दुखत आहे किंवा सध्या दिवसाला मी आठ सिगारेट ओढतो अशा गोष्टी लिहिता येतील. हल्ली कामाचा ताण वाढल्यामुळे आपल्या व्यसनांमध्येही वाढ होताना दिसते. एरव्ही साधी धूळ जरी डोळ्यात गेली तरी डोळ्यांत चटकन पाणी येतं आणि शरीर ती घाण बाहेर फेकून देतं.

आपण या शरीरामध्ये काय काय घालत असतो याची आपल्याला जाणीव तरी असते का? एखाद्या विशिष्ट परिस्थितीपर्यंत शरीर हे सगळं काही सांभाळायचा, यात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत असतं; पण एकदा तेही बिघडलं की, शरीर साथ सोडून देतं. त्यामुळे शरीराला आपण जितकी सांभाळायची संधी देऊ, तितकंच शरीरही आपल्याला सांभाळेल. औषधं खाणं हादेखील पर्याय असू शकत नाही. कारण- हा वन-वे आहे. एकदा औषधामुळे दुसरं काहीतरी बिघडू लागलं तर ते पुन्हा मागे जाऊन नीट करता येणार नाही. तसेच त्या औषधांचंही व्यसन लागेल आणि ते थांबवता येणार नाही.

समजा, आपल्याला एखादं व्यसन असेल, तर ते कसं ओळखाल?

मला फोनचं व्यसन आहे किंवा मला टीव्ही पाहण्याचं व्यसन आहे आणि मला जर असं वाटत असेल की, मला ते नाहीये. मी फक्त कामापुरती त्याचा वापर करतो, तर काही वेळ म्हणजे साधारण चार दिवस त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा कसा effect होतो, ते पाहिलं पाहिजे. जर आपल्याला त्यातून अस्वस्थता जाणवत असेल, तर समजायचं की, आपल्या या सवयीचं कुठेतरी व्यसनात रूपांतर झालेलं आहे. हा withdrawal symptoms चा भाग आहे. अशा प्रकारची चाचणी ड्रग्ज किंवा अल्कोहोलचं व्यसन थांबवण्यासाठी घेतली जाते.

अगदी खूप वाचणं किंवा व्यायाम करणं हाही व्यसनाचा भाग असू शकतो. याही व्यसनाचं बंदीवान होणं काही चांगलं नाही. मला जर कळतंय की, मला या गोष्टी न केल्यामुळे अस्वस्थता जाणवत आहे, तर हे लक्षात घेतलं पाहिजे की, याचं व्यसन मला लागलेलं आहे. कुठेतरी हे केल्यानं आपल्या मेंदूतून हॅप्पी हॉर्मोन म्हणजेच ‘डोपामिन’ रिलीज होतो. त्यामुळे सातत्यानं ती कृती केल्यामुळे आपण त्या कृतीलाच आपली ओळख समजायला लागतो, असं होता कामा नये.

माझ्या जेव्हा लक्षात आलं की, मला वाचनाचं व्यसन लागलेलं आहे, तेव्हा मी दोन-चार दिवस पुस्तकांना हातच लावला नाही. मी प्रचंड बेचैन झाले आणि अक्षरशः दुकानावरच्या पाट्यासुद्धा दोन-चार वेळा परत परत वाचायला लागले. एखादा दिवस न वाचताही तुम्हाला काढता आला पाहिजे. शरीराला वेगवेगळ्या गोष्टींची सवय लावली पाहिजे. असं केल्यानं शरीराला विविध परिस्थितींमध्ये वेगवेगळे पाथवेज् शोधण्याची सवय लागते.

माईंडफूलनेस किंवा हेल्दी असणं म्हणजे काय?

माईंडफूलनेस हा शब्द जरी आज सर्वत्र वापरात असला तरी तो शब्द काही केवळ फॅशन म्हणून वापरला जात नाही. हा शब्द म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य आहे. ही आपली जीवनशैली आहे आणि आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. हेल्दी असणं म्हणजे काय?आपण आपल्या दिसण्यावर फार मेहनत घेतो. प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असतं. असं समजा की, तुम्ही अॅमेझॉनवरून एखादी वस्तू मागवलीत.

वरून छान पॅक करून आलेला बॉक्स, आणि आत मात्र कचकडी किंवा तुटलेली, फुटलेली वस्तू असेल तर चालेल का? तुम्हाला आवडेल का? आपण वरच्या पॅकेजिंगला जसं महत्त्व देत नाही, आतल्या वस्तूला देतो त्याच प्रकारे आरोग्याचं आहे. त्वचा हे आवरण आहे आणि आतले अवयव ही त्यातली खरी संपत्ती. त्यातही जीवनावश्यक महत्त्वाचे अवयव ज्यांना vital organs असंही म्हणतात. जसं की, हृदय. हा अवयव आपल्या जन्मापासून सतत काम करत असतो. त्याचं काम संपूर्ण शरीराला रक्त पुरवणं. ते ज्या वाहिन्यांमधून जातं तोदेखील रक्ताभिसरण संस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. आता हृदयाची काळजी कशी घ्याल? स्नायू बळकट ठेवणे, व्यायाम करणे, हालचाल करणे, थोडक्यात काय तर रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यासाठी जे काही करावं लागतं, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला करावी लागेल.

दुसरा महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत. याची काळजी कशी घ्यायची तर परत तेच उत्तर येईल, आहार. तिसरा महत्त्वाचा अवयव म्हणजे फुप्फुस. रक्त आणि प्राणवायू इथे एकत्र येतात आणि रक्तशुद्धीकरण होतं. त्यामुळे रक्त शुद्ध करणारा अवयवच जर खराब असेल, म्हणजेच स्मोकिंग, रसायनांचे किंवा अगदी आजूबाजूला चालू असलेल्या कन्स्ट्रक्शनमुळे धुळीचे, अॅस्बॅस्टॉसचे कण याचा फुप्फुसावर फार वाईट परिणाम होतो. चौथा सर्वांत महत्त्वाचा अवयव म्हणजे मूत्रपिंड. तुमच्या शहरातील ड्रेनेज सिस्टीमच जर चांगली नसेल, तर काय होईल शहराचं किंवा घराचं?

त्याचप्रमाणे मूत्रपिंडाकडे बघितलं पाहिजे. मूत्रपिंड साधारणपणे १२० लि. रक्त शुद्ध करण्याचं काम करत असते. त्यामुळेच ड्रेनेज सिस्टीम जर चांगली नसेल, ब्लॉक झाली असेल, म्हणजेच शुद्धीकरण क्रियाच जर बंद झाली असेल, तर त्याचा बॅकफ्लो उलट हृदयावर येणार आणि हृदयविकाराचा त्रास उदभवणार. सरतेशेवटी आतडी, जी पुन्हा आहाराशी संबंधित आहेत. हे आपल्या आत लपलेले अवयव चांगले असणं, सौंदर्याच्या भाषेत सुंदर असणं फार गरजेचं आहे हेच महत्त्वाचं आहे.

जीवाणूंविषयी कोणते समज, गैरसमज असतात? आपण कोणत्या जीवाणूंमुळे आजारी पडतो आणि कोणते जीवाणू आपल्यासाठी चांगले असतात?

जीवाणू आपल्यासोबत राहतात ही चुकीची धारणा आहे. खरं तर आपण जीवाणूंबरोबर राहत असतो. आपल्या शरीरात तीन लाख कोटी (तीन ट्रिलियन) एवढ्या प्रमाणात जीवाणू असतात. त्यामुळे त्यांना सख्खे शेजारी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण, मानव या पृथ्वीवर जेव्हापासून आहेत तेव्हापासून जीवाणू आपल्यासोबत राहात आहेत. आज त्यांच्यावर चर्चा केली जाते. कारण- आज तशी साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. पूर्वी ती नसल्यामुळे आपल्याला त्यांच्या कार्याबद्दल तितकी पुरेशी माहिती नव्हती.

माणसाच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग हा जसा माणसाच्या पोटातून जातो, त्याचप्रमाणे माणसाच्या मेंदूकडे जाण्याचा मार्गही त्याच्या पोटातूनच जातो. त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजेच गटब्रेन इंटर-अॅक्शन. असं म्हटलं जातं की, ‘व्हॉट यू आर इज व्हॉट यू इट’. खालेल्लं अन्न त्यातले किडलेले भाग पचवण्याचं काम हे जीवाणू करत असतात.

लोक काय करतात, एखादा आजार घालवण्यासाठी अॅंटीबायोटिक्सचं सेवन करतात. अॅंटीबायोटिक्स खाल्ल्यामुळे वाईट जीवाणू तर मरतातच; पण चांगले जीवाणूसुद्धा मरतात. त्याचा विपरीत परिणाम मग पचनावर होतो. खाल्लेल्या गोष्टींचं नीट पचन होत नाही. कारण- पचन घडवून आणणारे जीवाणूच शरीरात राहिलेले नसतात. याचं एक महत्त्वाचं कारण सेल्फ-मेडिकेशन आणि अॅंटीबायोटिक औषधांचा मोठ्या प्रमाणातील वापर.

शरीराला हानिकारक असलेल्या जीवाणूंची संख्या खूप कमी आहे. यांना खराब जीवाणू (अग्ली बॅक्टेरिया) म्हणता येईल. अनेकदा असं होतं की, आपण एकाच प्रकारचं अन्न खातो त्यामुळे त्या प्रकारचं अन्न पचवणाऱ्या अगली जीवाणूंच्याच कॉलनीज् आपल्या शरीरात निर्माण होतात. अशा वेळी आपण जर काहीतरी वेगळं खाल्लं, तर आपल्याला त्याचा त्रास होतो. कारण- त्या जीवाणूंना ते अन्न पचवण्याची सवय नसते. त्यामुळे आपल्या खाण्यामध्येही वैविध्य असलं पाहिजे. असं केल्यानं आपल्या आतड्यांमध्ये असलेल्या विविध जीवाणूंना सातत्यानं संधी मिळत राहील.

शाकाहारी की मांसाहारी, चांगली प्रथिन मिळणारा की फायबरयुक्त? आहार कसा असला पाहिजे?

आहाराबाबत ज्याला जो पचेल, तो त्याचा आहार. ज्याच्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळू शकेल, तो आहार सर्वोत्तम. जे जे खाऊन आपल्याला ऊर्जा मिळेल आणि जे पचायला सोपं असेल असाच आहार आपण खायला हवा. जेव्हा मला भरपूर ऊर्जा हवी असेल तेव्हा माझ्यासाठी ऊर्जेचा त्वरित स्रोत हे कार्बोहायड्रेट्सच असू शकतात. मला जर स्नायूंवर काम करायचं असेल, तर मी प्रथिनयुक्त आहार खाईन.

आपल्या शरीरातील बिल्डिंग व्हेसल्स किंवा मोठ्या मशिनरी- त्यात हृदय, फुप्फुसे यांचा समावेश होतो, हे नीट चालावेत म्हणून मायक्रोन्यूट्रियंट्सची प्रचंड आवश्यकता असते. जसे की, व्हिटॅमिन्स – जे जीवनावश्यक असतात. व्हिटॅमिन्सना मी शरीराची मुळाक्षरं म्हणते. कारण- त्यांची नावंही तशीच आहेत, ए, बी, सी इत्यादी. चांगली अक्षरं गिरवण्यासाठी जशी बाराखडी गिरवावी लागते, त्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी मिनरल्स, क्षार, आणि पाणी यांची खूप गरज लागते.

पाणीदेखील आरोग्यासाठी फार महत्त्वाचा घटक आहे. डिहायड्रेशनचा शरीराला भरपूर त्रास होतो. पाण्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींचा बॅलन्स सांभाळला जातो. आहार घेतल्या घेतल्या चालावं म्हणजे शरीरातील ऊर्जा तयार करणारी यंत्रणा सुरू होते. सुमारे १५-२० मिनिटं नक्कीच चाललं पाहिजे.

ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी एकाच पद्धतीचं डाएट केलं पाहिजे का?

कुणीही एकाच पद्धतीचं डाएट कधीच करू नये. त्यात सातत्यानं बदल व्हायला हवा. तुम्ही असं समजा की, एका विशिष्ट ठिकाणी जाणारा एकच रस्ता तुम्हाला माहीत असेल आणि तिथे जाणारे दुसरे रस्ते ठाऊक नसतील, आणि एखाद्या वेळी तुम्हाला ठाऊक असलेला रस्ता जर बंद असेल, तर तुम्ही काय कराल? तसंच डाएटच्या बाबतीतही आहे. मानवी उत्क्रांतीतून हीच एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली आहे. अल्टर्नेटिव्ह पाथवे शरीराकडे आहेत ते सगळे डिस्कव्हर झालेले नाहीत. आहाराच्या बाबतीतही सर्व प्रकारच्या सवयी असणं गरजेचं आहे.

हिप्पोक्रेट्सनेसुद्धा ‘लेट बी युअर फूड बी युअर मेडिसीन’ असं म्हटलेलं आहे. आता वजन कमी करायचं असेल, तर ‘मित’ महत्त्वाचं आहे. कमी खाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा सर्व इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनचा खेळ आहे. इन्सुलिन म्हणतं बचत करा आणि ग्लुकॅगॉन म्हणतं बचत मोडा. हे दोन्ही केल्याशिवाय वजन कमी होणार आहे.

या सगळ्यांत झोपेचं महत्त्व काय?

आपण रात्री का झोपतो? जसं एका ग्रंथालयात पुस्तकांना विभागावं लागतं त्याच प्रकारे झोपेमध्ये आपले सगळे विचार ऑर्गनाईझ करायचं काम आपला मेंदू करीत असतो. कुठली स्मृती कोणत्या कप्प्यात ठेवायची कशा पद्धतीनं साठवायची हे सगळं आपण झोपेत असताना होतं. आपण झोपेच्या ९० मिनिटांच्या तीन – चार सायकल्समधून जात असतो.
त्यामुळे सात ते नऊ तास प्रौढांनी झोप घेणं गरजेचं आहे. पौगंडावस्थेतील मुलांनी किमान १० ते १२ तास झोप घेणं आवश्यक आहे. त्यामुळे कधी कधी १० तास झोप घेताना वाईट वाटण्याची काहीच गरज नाही.

सध्या कॅन्सर प्रचंड वाढत आहे, तो थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे?

कॅन्सर हा उशीरा डिटेक्ट होतो हीच या आजाराची खासियत आहे. त्यामुळे कॅन्सर हा फार लवकरच्या टप्प्यात जर लक्षात आला तर उत्तम. आपली अनेक सौंदर्यप्रसाधनं ही कार्सिनोजेनिक असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही अधिक असतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जीवनात केमिकल्सचा समावेश इतका आहे की, थॅलेट, पीफॅस अशा अनेक रसायनांवरील पर्यायी वस्तू आता बाजारात येऊ लागलेल्या आहेत. ज्या पद्धतीने आपण डायबिटिससाठी चाचणी करतो, कारण- डायबिटिस आनुवांशिकरीत्या पसरण्याचीही शक्यता असते. त्याचप्रमाणे कॅन्सरच्या बाबतही काळजी घेतली पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सर असेल, तर तो लवकर उघडकीस येतो आणि तो त्याचप्रमाणे सेल डेथ न होण्यामुळेही कॅन्सर होण्याची शक्यता असते. नुसत्या पेशी वाढणे हेदेखील कॅन्सर होण्यासाठी पुरेसे कारण आहे.

म्हणूनच आरोग्याची दैनंदिनी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या सवयी बदलायला हव्या आहेत ते पाहिलं पाहिजे आणि मग ते बदल ‘मित – नियमित’ पद्धतीनं वर सांगितल्याप्रमाणे हळूहळू केले पाहिजेत. कोणतीही चांगली सवय लावतानाही हाच नियम लक्षात घेणं फार आवश्यक आहे.
जन्म होण्यासाठीदेखील नऊ महिने लागतात, त्यामुळे या सवयी जरी पटकन बदलायला गेलं तरी ते बदल जास्त काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे ही आरोग्याची गुंतवणूक करायला आजपासूनच सुरुवात करा आणि दोन ते तीन महिन्यांनी स्वतःतील बदल आपल्याला स्वतःलाच जाणवायला लागतील.