संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘घरबसल्या हजारो रुपये कमवा!..’ अशा प्रकारच्या जाहिराती सार्वजनिक ठिकाणी किंवा इंटरनेटवर पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आमिषाला सुशिक्षित बेरोजगार भूलतात आणि त्यांची फसवणूक होते. अशाच प्रकारचा २०० कोटी रुपयांचा ‘वर्क फ्रॉम होम’ घोटाळा उघडकीस आला आहे. ‘घरबसल्या कमवा’ अशा प्रकारची आमिषे देऊन दिल्लीतील ठगांनी ३०० जणांची फसवणूक केली आहे.

घोटाळा काय आहे?

दिल्लीतील एका टोळीने ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि काही ॲपवर ‘वर्क फ्रॉम होम’ची जाहिरात दिली. या जाहिरातींना भुलून काही बेरोजगार तरुणांनी अर्ज केले. या टोळीने त्यांना काम देऊन आधी काही पैसे गुंतवायला सांगितले. मात्र त्याचा कोणताचा फायदा या तरुणांना मिळाला नाही आणि त्यांच्या खात्यात वेतनाचे काहीही पैसे आले नाही. या ठगांच्या टाेळीने ३० हजार जणांना फसविल्याचे उघडकीस आले असून सुमारे २०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून या प्रकरणात अजूनही काही ठग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यासाठी जे संकेतस्थळ वापरले, ते चीनमधील आहे, तर दुबईमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

घोटाळ्याची व्याप्ती किती?

गेल्या वर्षी २६ सप्टेंबर रोजी एका महिलेने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर तपास करताना पोलिसांनी हा २०० कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. या महिलेने ‘इन्स्टाग्राम’वर एक जाहिरात पाहिली. ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे घरबसल्या दिवसाला १५ हजार रुपये कमवा, असे या जाहिरातीत सांगण्यात आले होते. या महिलेने या कामासाठी एका संकेतस्थळावर नोंदणी केली. या संकेतस्थळावर तिला एका ऑनलाइन स्टोअरचा सेल वाढविण्याचे काम देण्यात आले. या संकेतस्थळावर तिच्या वॉलेटमध्ये पैसे जमा होत असल्याचे दिसत होते, परंतु काही वस्तू सवलतील विकत मिळत असल्याने त्या तिने खरेदी कराव्यात, अशी अट तिला घालण्यात आली. त्या महिलेने त्यासाठी चार विविध ट्रांक्झशनद्वारे एक लाख २० हजार रुपये खर्च केले. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात आले की तिच्या वॉलेटमध्ये काहीच शिल्लक नाही, मात्र खात्यातून एक लाख २० हजार रुपये मात्र कमी झाले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

विश्लेषण: साधी फुलबाग ते आता QR कोडची झाडे, राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाचं रूप कसं पालटलं?

पोलिसांनी तपास कसा केला?

या महिलेच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या बाह्य उत्तर जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साहाय्यक पोलीस आयुक्त (कृती) यशपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात असे समोर आले की, या ठगांनी वापरलेला टेलिग्राम आयडी चीनमधील बिजिंग येथील असून व्हॉट्सॲप क्रमांकही परदेशातील आहे, पोलिसांनी या प्रकरणी बँकेला आर्थिक व्यवहारांची छाननी करण्याचे आणि त्यासंबंधी माहिती देण्याच्या सूचना केल्या. हे आर्थिक व्यवहार तपासले असता या महिलेने भरलेले पैसे शेल किंवा बनावट कंपनीमध्ये गुंतवल्याचे उघडकीस आले, तर या संकेतस्थळाच्या ट्रांक्झशन अकाऊंटला दररोज पाच कोटी २० लाख रुपये जमा होत असल्याचेही दिसून आले.

आधुनिक तंत्राचा आधार?

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दिल्लीतून अभिषेक गर्ग, संदीप महाला आणि सतीश यादव या तिघांना अटक केली. या टोळीचे धागेदोरे मुंबई, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये असून आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जॉर्जियातील असून अभिषेक गर्ग हा या मुख्य सूत्रधाराला तांत्रिक मदत करत होता. सतीश यादव हा दिल्ली विद्यापीठातील पदवीधर असून अनेक मोबाइल कंपन्यांमध्ये त्याने काम केलेले आहे. मुख्य आरोपीचा मोबाइल फोन मिररिंग ॲप वापरून लिंक करणे आणि परदेशातील मुख्य सूत्रधाराद्वारे ओटीपीमध्ये प्रवेश करणे हे त्याचे काम होते. संदीप महाला हा पेटीएम कंपनीचा माजी उपव्यवस्थापक असून ई-वॉलेटच्या माध्यमातून परदेशात पैसा वळवण्याचे काम तो करत होता.

विश्लेषण : ९० वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द कुणी उच्चारला होता ठाऊक आहे?

काय काळजी घेणे आवश्यक?

घरबसल्या काम किंवा अर्धवेळ काम अशा जाहिरातींपासून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. इंटरनेट, विविध ॲप किंवा समाजमाध्यमांवर येणाऱ्या या जाहिरातींची सत्यता आणि विश्वासार्हता तपासणे आवश्यक आहे. संशयास्पद परिस्थितीत कधीही पैसे हस्तांतरित करू नयेत. घरबसल्या काम देणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करणे गैर असून ते सांगतील त्या खात्यात पैसे हस्तांतरित करणे चुकीचेच आहे. अशा अनोळखी व्यक्ती, समाजमाध्यम आणि इंटरनेटवर ओटीपी, बँक खात्याची माहिती आणि खासगी माहिती देऊ नये. सत्यता आणि विश्वासार्हता तपासल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi crime gang cheat people work from home offer print exp pmw
First published on: 30-01-2023 at 10:00 IST