दिल्ली-डेहरादून द्रृतगती मार्गावर वन्यप्राण्यांच्या १४ किलोमीटर लांबीची सुरक्षित मार्गिका (कॉरिडॉर) तयार करण्यात आली. आशियातील ही सर्वात लांब वन्यजीव मार्गिका ठरली. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘लँडस्केप्स रीकनेक्टेड’ या नुकत्याच केलेल्या संयुक्त अभ्यासात हत्तींसह सुमारे १८ विविध प्रजातीच्या वन्यप्राण्यांनी या मार्गिकेचा वापर केल्याची नोंद आहे.
वन्यजीवांना दिलासा मिळणार का?
सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सहा पदरी मार्गामुळे दिल्ली ते डेहराडून प्रवासाचा कालावधी सहा तासांवरून अडीच तासांपर्यंत कमी होणार आहे. तत्पूर्वीच या मार्गावर वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गिकांचा वापर मात्र वन्यप्राण्यांनी सुरू केला आहे. या २१३ किलोमीटर लांबीच्या द्रुतगती मार्गातील सुमारे १२ किलोमीटरचा उन्नत पट्टा वन्यजीवांसाठी तयार करण्यात आला आहे. हा भाग राजाजी व्याघ्रप्रकल्प आणि शिवालिक पर्वत रांगेतून जात असल्याने याठिकाणी वन्यप्राण्यांची हालचाल मोठ्या प्रमाणावर आहे.
सात मीटर उंचीवर उभारलेल्या मार्गाखाली मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वन्यजीवांना अडथळ्याविना मार्ग उपलब्ध झाला आहे. काही प्रजातींनी वाहतुकीच्या आवाजाशी जुळवून घेतले असले तरी हत्ती आणि चितळ यांसारख्या प्रजाती कमी आवाज असलेल्या भागांचा अधिक वापर करत असल्याचे या अभ्यासात दिसून आले. त्यामुळे भविष्यात ध्वनिरोधक भिंती उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी ही रचना करण्यात आली असून, रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वन्यप्राण्यांचा नियमित सुरक्षित वावर शक्य?
गणेशपूर ते अशारोडी या १८ किलोमीटरच्या पट्ट्यात १५० कॅमेरे आणि २९ ध्वनिरोधक बसवण्यात आले. ४० दिवसांच्या निरीक्षणात सुमारे एक लाखाहून अधिक छायाचित्रे नोंदवण्यात आली. त्यातील ४० हजारातून अधिक छायाचित्रे वन्यजीवांची होती. यात सुवर्ण कोल्हा सर्वाधिक वेळा कॅमेऱ्यात दिसला. तर नीलगाय, सांबर आणि चितळ यांचीही मोठ्या प्रमाणात नोंद झाली. विशेष म्हणजे, या कालावधीत हत्तींच्या ६० सुरक्षित हालचाली भुयारी मार्गातून झाल्याचे आढळले.
१४ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेत भुयारी मार्ग, बोगदे आणि उंच रस्ते उभारण्यात आले आहे. हत्तींसारख्या मोठ्या वन्यप्राण्यांसाठी रुंद भुयारी मार्ग तर लहान प्राण्यांसाठी स्वतंत्र बोगद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कमी तीव्रतेचा पिवळा प्रकाश व ध्वनिरोधक भिंती उभारण्यात आल्या आहे. या पट्ट्यात १०.९७ किलोमीटर लांबीचा विशेष वन्यजीव भुयारी मार्ग उभारण्यात आला असून, वन्यप्राण्यांच्या मुक्त हालचालीसाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे.
वृक्षतोडीची भरपाई वृक्षारोपणातून कशी?
प्रकल्पाचा अंतिम २० किलोमीटरचा टप्पा उत्तर प्रदेशातील शिवालिक वनविभाग आणि उत्तराखंडमधील राजाजी व्याघ्रप्रकल्प व डेहराडून वनविभागाच्या घनदाट जंगल भागातून जातो. प्रकल्पासाठी वळवण्यात आलेल्या वनजमिनीची भरपाई करण्यासाठी उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आहे. एकूण १६५.५ हेक्टर क्षेत्रावर १,९५,००० झाडे लावून वनीकरण करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेख समितीच्या निर्देशानुसार, वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी ४० कोटी रुपयांची अतिरिक्त पर्यावरण-पुनर्स्थापना कामेही हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी ११,१६० झाडे तोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, या प्रकल्पासाठी १७,९१३ झाडे तोडण्यात आली आहेत. पर्यावरणीय उपशमन उपाय म्हणून, संबंधित वनविभागांमार्फत १५७.२ हेक्टर जमिनीवर भरपाई म्हणून वृक्षारोपण केले जात आहे. त्याव्यतिरिक्त, महामार्गाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५०,६०० झाडांची वृक्षारोपण मोहीमही हाती घेतली आहे.
हत्तींसाठी कॉरिडॉर किती सुरक्षित?
हत्तींसारखे मोठे प्राणीसुद्धा या हरित कॉरिडॉरचा सुरक्षितपणे वापर करत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. संबंधित भागात हत्तींनी सुमारे ६० वेळा हा मार्ग ओलांडल्याची नोंद करण्यात आली आहे. हे विशेष महत्त्वाचे मानले जाते, कारण हत्ती अधिवासातील बदलांप्रती अत्यंत संवेदनशील असतात. हा हरित कॉरिडॉर सुरक्षित स्थलांतर मार्ग म्हणून कार्य करतो. यामुळे वाहनांशी होणाऱ्या टक्करांचा धोका कमी होतो, तणावामुळे प्राणी अधिवास टाळण्याची प्रवृत्ती घटते आणि जवळील वस्त्यांमधील मानव–वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होते.
परिणामी, रस्त्यावरील अपघातांमधील वन्यजीव मृत्यूदर कमी करण्यास मदत होत आहे. या कॉरिडॉरचा मुख्य पर्यावरणीय उद्देश वन्यजीवांचा मृत्यूदर कमी करणे आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे नमुने पुन्हा प्रस्थापित करणे हा आहे. वेगवान महामार्गांमुळे अधिवासांचे तुकडे होतात, ज्यामुळे प्राण्यांना धोकादायक रस्ते ओलांडण्यास किंवा पारंपरिक स्थलांतर मार्ग सोडून देण्यास भाग पडते. जमिनीवरील हालचालींसाठी भुयारी मार्ग, जंगलावरून जाणारे उन्नत रस्ते आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये नियंत्रित प्रवेश व कुंपण उपलब्ध करून दिल्यामुळे, हा द्रुतगती मार्ग प्राण्यांना वाहतुकीच्या थेट आड न येता सुरक्षितपणे प्रवास करण्याची संधी देत आहे.
rakhi.chavhan@expressindia.com
