IRS Officer Daughter Murder Case in Delhi involving rape, murder, and robbery by ex-servant: दिल्लीतील कैलास भागातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. साऊथईस्ट दिल्लीतील राहत्या घरात मुलीचा मृतदेह आढळून आला. मोबाईल चार्जरने तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी घरकाम करणाऱ्या २३ वर्षीय आरोपी राहुल मीना याला पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार व हत्या केल्यानंतर त्याने घरात दरोडा टाकला. बलात्कार, हत्या आणि चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. आरोपी राहुल मीना याला द्वारका येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा केल्यानंतर राहुल हॉटेलमध्ये लपून बसला होता. तो वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात घरकाम करत होता. परंतु, आर्थिक गैरव्यवहार केल्याने त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. नेमके काय घडले? ते सविस्तर जाणून घेऊयात.

नेमके काय घडलं?

आरोपी राहुल मीना ह्याने बुधवारी (२२ एप्रिल) सकाळी आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला व तिची हत्या केली. त्यावेळी पीडितेचे पालक घरात नव्हते. ते नियमितपणे जातात तसे जीममध्ये गेले होते. पालकांना घरी आल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या आजूबाजूला घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने आरोपी राहुल मीनाचा जोरदार प्रतिकार केला होता. परंतु, आरोपीने तिच्या डोक्यात काठीने मारले. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याने मोबाईलचे चार्जरचा वापर करून तिची गळा आवळून हत्या केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसले?

दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. पहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी राहुल मीना सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी घरात प्रवेश करताना दिसतोय. तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी घरातून बाहेर पडताना दिसतोय. साधारण एक तासानंतर राहुल मीना घरातून बाहेर पडला. आरोपीने गुन्हा केल्यानंतर कपडे बदलले आणि घटनास्थळावरून पळ काढला, असे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. एका व्हिडिओत त्याने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत घरातून बाहेर पडताना त्याने पांढऱ्या रंगाची पँट आणि फुल स्लीव्हज असलेला पिवळा टी-शर्ट घातल्याचे दिसते.

आयआरएस अधिकाऱ्याच्या घरातून बाहेर पडताना आरोपीच्या पाठीवर काळ्या रंगाची एक बॅग देखील व्हिडिओतून दिसून आली. दरम्यान, आयआरएस अधिकाऱ्याचे घर अत्यंत सुरक्षित (High Security) होते. पीडिता घरात ज्या ठिकाणी बसली होती तिथे पोहोचण्यासाठी चार दरवाजे उघडावे लागत होते. त्यातील तीन दरवाजे हे पासकोडने उघडले जात होते. घरकाम करत असल्याने घराबाबत तसेच कोड्सबाबत आरोपीला भरपूर गोष्टी माहिती होत्या. घरातील नोकरांना घरात प्रवेश करण्यासाठी चाव्या कुठे ठेवल्या आहेत, याबाबत त्याला माहिती होते.

तपासात आरोपीबाबत कोणती माहिती समोर आली?

दिल्ली पोलिसांच्या मते, आरोपी राहुल मीना याला ड्रग्जचे व्यसन आहे. तो सट्टेबाजी करतो. तसेच चौकशी दरम्यान त्याचा स्वभाव खोटे बोलणारा असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. तो राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रहिवासी आहे. १८ महिन्यांपूर्वी त्याने आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात काम करणे सुरू केले होते.

“आरोपी राहुल मीना याला ड्रग्जचे व्यसन असून तो बेटिंग अॅप्सचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्याचे वडील शेतकरी असून ते राजगड येथे मजुरीचे काम करतात. मीनाला चार भावंड आहेत. त्याला एक बहीण आहे”, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

पोलिस अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “अलवर मधील एका जीएसटी अधिकाऱ्याने आयआरएस अधिकाऱ्याला कॉल केला होता. राहुल मीना हा त्यावेळी जीएसटी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्यामुळे तो आयआरएस अधिकाऱ्याच्या दिल्लीतील घरात घरकाम करू शकतो, त्याला काम द्यावे अशी विनंती जीएसटी अधिकाऱ्याने केली होती. त्यामुळे आयआरएस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी त्याला कामावर ठेवले. कुटुंबाने आरोपी राहुल मीनाच्या पार्श्वभूमीची पडताळणी न करताच त्याला काम दिले.” घराच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोलीत आरोपी राहुल मीना राहत होता.

काही महिने काम केल्यानंतर आरोपीने आयआरएस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मीना हा घरात रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये जायचा. तिथून खरेदी करायचा. दुकानदारांना पैसे देण्यासाठी तो कुटुंबाकडून महिन्याच्या शेवटच्या दिवशी पैसे घ्यायचा. परंतु, ते पैसे तो स्वत:कडेच ठेवायचा.

आरोपीकडून आर्थिक गैरव्यवहार, दुकानदारांच्या कुटुंबियांकडे तक्रार

स्थानिक औषध विक्रेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, “तो एकदाच ४०० ते ५०० रूपयांची औषधे घेऊन जायचा. त्याच्या मालकाकडून पैसे घ्या, असे तो सांगायचा. तो एक सभ्य मुलगा वाटत होता. तसेच मृदूभाषी होता. त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवायचो. पण, पैसे न घेता त्याला औषधे देऊ नये, असे मुलीच्या वडिलांनी एकदा मला सांगितले.” दरम्यान, वस्तू खरेदी करतो पण पैसे देत नाही, अशा बऱ्याच तक्रारी आरोपी राहुल मीनाबाबत कुटुंबाकडे येत होत्या. तसेच राहुल मीनाने आयआरएस अधिकाऱ्याच्या शेजारी राहणाऱ्यांकडून दीड लाख रूपये उधार घेतल्याचे कुटुंबाला कळले होते.

“घरकाम करणारे बरेच येतात आणि जातात. कामचुकारपणा केल्यास त्यांना अनेकदा काढावे लागते. त्याला नम्रपणे काम सोडण्यास सांगितले होते”, अशी माहिती पीडितेच्या एका नातेवाईकाने दिली. दरम्यान, आरोपीला हीच गोष्ट खटकली. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे २१ एप्रिलच्या रात्री मीनाने अलवर जिल्ह्यातील त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर तो दिल्लीला रवाना झाला व २२ एप्रिल रोजी त्याने आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली.

पीडितेने आयआयटी दिल्लीतून घेतली होती पदवी, सुरू होती यूपीएससीची तयारी

२२ वर्षीय पीडितेने तिचे शालेय शिक्षण डीपीएस आरके पुरम येथून पूर्ण केले होते. त्यानंतर तिने आयआयटी दिल्लीतून पदवी घेतली होती. ती सध्या यूपीएससीची तयारी करत होती. ती एक डान्सर देखील होती. तिने डान्स स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली होती, एनडीटीव्हीने याबाबत माहिती दिली. तिचा मोठा भाऊ हा एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. तर तिची आई डॉक्टर आहे.