Delhi Road Dust Air Pollution Cancer Risk: दिल्ली व मुंबई या देशातील प्रमुख शहरांना रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे प्रदुषणाचा विळखा पडला आहे. रस्त्यावरील धूळ हवेत मिसळते. नाकावाटे ती फुफ्फुसात जाते. तसेच शरीरातील रक्तात मिसळते. तिच्यात विषारी धातूंचे कण असतात. ते विविध आजारांना आमंत्रण देतात. फुफ्फुसांना निकामी करतात. हीच धूळ कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारासाठीही जबाबदार असते. याचा सर्वाधिक धोका विशेषत: लहान मुलांना असतो. मुंबई व दिल्लीत रस्त्यांवर उडणाऱ्या धुळीने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यावरील धुळीचे कारण काय?

हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने जानेवारी २०२६ मध्ये एक अहवाल सादर केला. रस्त्यांवरील धूळ ही वायू प्रदुषणास कारणीभूत ठरणारा महत्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यावरील धूळ दीर्घकाळ वातावरणात राहते. रस्त्यावरील व रस्त्याच्या बाजूला असलेली धूळ, वाहनांची ये-जा, कोरडी माती यांमुळे वायू प्रदूषणात भर पडते. खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, टायरचे रस्त्यावरील कण, बांधकाम तसेच पाडकामाच्या राडारोड्याची रस्त्यांवरून होणारी वाहतूक यांमुळे हवा प्रदूषणात भर पडते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. रस्त्याच्या पृष्ठभागावर जमा झालेली धूळ वाहनांच्या वर्दळीमुळे हवेत मिसळते. त्यामुळे कधीकधी प्रदूषण वाढण्याचे इतर कोणतेही कारण नसताना प्रदूषणाची पातळी वाढलेली राहते.

पाणी मारूनही रस्त्यावरील धूळ आटोक्यात का नाही?

ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेचे प्रोग्राम लिड मोहम्मद रफिउद्दीन म्हणाले, “रस्त्यावरील धूळ ही बांधकाम किंवा पाडकामामुळे हवेत मिसळणाऱ्या धुळीपेक्षा वेगळी असते. ती मोठ्या प्रमाणात हवेत मिसळते. खराब रस्ते व त्यांची देखभाल दुरूस्ती न झाल्यास ही धूळ आणखी वाढते.” समितीने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे की, रस्त्यावर पाणी मारून रस्ते स्वच्छ ठेवल्यानेही ही समस्या सुटत नाही. दुभाजकावर किंवा रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी अनेकदा मोठ्या पाइपने पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याचा फोर्स अधिक असल्याने माती रस्त्यावर पडते. ती सुकल्यानंतर वाहनांच्या वर्दळीमुळे हवेत मिसळते. तसेच अनधिकृतपणे पार्किंगला वाहने लावली जातात. त्यामुळे रस्त्यावरील स्वच्छता जरी करायची असेल तरी ती पूर्णपणे करता येत नाही. स्थानिक पातळीवरील तसेच दुय्यम रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यांची देखभाल केली जात नाही. रस्ता खूप खराब होतो तेव्हा त्याचे काम हाती घेतले जाते. त्यामुळे दीर्घकाळ रस्त्यावरील धूळ हवेत मिसळत राहते.

सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) आणि सीएसआयआर-केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CRRI) यांच्या संयुक्त अभ्यासाचा अहवाल ७ फेब्रुवारी २०२५ रोजी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाकडे सुपूर्द करण्यात आला होता. “रस्त्यांवरील दुभाजकांवर सातत्याने जमा होणारी धूळ, रस्त्यांची खराब रचना, दुरवस्था आणि त्यांची योग्य निगा न राखणे, तसेच धूळ व्यवस्थापनाच्या मर्यादित पद्धती यांमुळे रस्त्यावरील धूळ पुन्हा हवेत उडण्याच्या प्रक्रियेला खतपाणी मिळते”, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरवर्षी १० हजार २०७ हून अधिक लोकांचा अकाली मृत्यू

आयआयटी दिल्लीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये विविध शहरांमध्ये धूळी संदर्भात अभ्यास करण्यात आला. स्वच्छ इंधनाचा वापर केल्याने वाहनांमधून निघणाऱ्या धुराचे प्रमाण कमी होत असले, तरी धुराव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यात हवेत उडणारी रस्त्यावरील धूळ, टायरची झीज आणि ब्रेकची झीज झाल्याने हवेत असणारे त्यांचे सूक्ष्म कण यांचे प्रमाण वाढत चालले आहे. संशोधकांनी याकडेही लक्ष वेधले आहे की, अरवली पर्वतरांगांच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे वाऱ्यासोबत उडणारी धूळ दिल्लीत प्रवेश करत आहे. रस्त्यावरील धुळीमुळे दरवर्षी देशात १० हजार २०७ हून अधिक लोकांचा अकाली मृत्यू होतो, असेही अहवालातून समोर आले आहे. मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीन्सद्वारे धूळ साफ करण्यासोबतच दिल्ली महानगरपालिकेचे एकूण ५७ हजार स्वच्छता कर्मचारी आहेत. मशीन जाऊ शकत नाहीत अशा भागांमध्ये जाऊन हे स्वच्छता कर्मचारी झाडलोट करतात.

पीएम २.५ आणि पीएम १० प्रदूषणात रस्त्यावरील धुळीचे प्रमाण अधिक

२०१६ मध्ये आयआयटी कानपूरने एक अहवाल प्रकाशित केला होता. दिल्लीच्या पीएम १० (पीएम- पार्टिक्युलेट मॅटर) प्रदूषणातील ५६ टक्के, तर पीएम २.५ प्रदूषणातील ३८ टक्के भाग हा फक्त रस्त्यावरील धुळीचा आहे. पीएम २.५ हे हवेत तरंगणारे धूळ, माती आणि धूराचे अत्यंत सूक्ष्म कण असतात. ते डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत. त्याचा आकार मानवी केसाहून ३० पट पातळ असतो. हे कण श्वासातून थेट फुफ्फुसांत जातात. वाहन, कारखान्यांतून निघणार धूर आणि शेतातील टाकाऊ पदार्थ जाळल्याने निघणाऱ्या धूरात पीएम २.५ हे घटक असतात. तर पीएम १० हे पीएम २.५ पेक्षा आकाराने मोठे असतात. या कणांना शरीरात सहजपणे प्रवेश करू शकत नाहीत. हे कणही उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत.

अहवालातून कोणता इशारा देण्यात आला?

NEERI व CRRI या संस्थांच्या अहवालातून एक इशारा देण्यात आला आहे. यांत्रिक पद्धतीने केली जाणारी स्वच्छता केवळ वारंवार न करता ती अधिक वैज्ञानिक पद्धतीने करणे गरजेचे आहे. अहवालात म्हटले आहे की, “वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे विशिष्ट प्रकारच्या रस्त्यांवर स्वच्छता यंत्रांच्या वापरासाठी एक ‘प्रमाणित कार्यप्रणाली’ तयार करण्याची आवश्यकता आहे.” या यंत्रांच्या वापराची वारंवारता व कार्यक्षमता, आणि वापरादरम्यान व वापरानंतर उडालेल्या धुळीच्या कणांच्या आकाराचे विश्लेषण केले पाहिजे, असेही त्यात नमूद केले आहे. इतर उपायांमध्ये पाण्याचे कारंजे (वॉटर स्प्रिंकलर्स), फिरत्या अँटी-स्मॉग गन्स (ASGs), आणि रस्ते व खड्ड्यांची दुरुस्ती यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, दिल्ली महानगरपालिकेने रस्त्यांवर एकूण १६७ वॉटर स्प्रिंकलर्स आणि ६३ अँटी-स्मॉग गन्स लावल्या आहेत. याशिवाय, बांधकाम आणि तोडफोडीच्या कामातून निर्माण होणाऱ्या धुळयुक्त राडारोड्याचे नियोजन केले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून ऊर्जा निर्मिती करण्याचे प्रकल्प उभारले आहेत.

रस्त्यावरील धुळीमुळे कर्करोग होऊ शकतो?

रस्त्यावर उडणाऱ्या धुळीचे कण हे अतिसूक्ष्म असतात. ते फुफ्फुसात खोलवर जाऊ शकतात. ते रक्तात मिसळून रक्ताभिसरणाद्वारे शरीरात पसरतात. हे कण श्वासावाटे शरीरात गेल्याने फुफ्फुसांमध्ये जळजळ आणि सूज येऊ शकते, तसेच दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) यांसारखे आधीपासून असलेले आजार अधिक बळावू शकतात. यामुळे बऱ्याचदा सतत खोकला आणि धाप लागण्याची समस्या निर्माण होते. रस्त्यावरील धुळीच्या कणांच्या दीर्घकालीन संपर्कात राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका वाढतो. फुफ्फुसांची कार्यक्षमताही मंदावते. दिल्लीतील रस्त्यावरील धुळीचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठामार्फत २०२५ मध्ये अभ्यास करण्यात आला. त्यावेळी त्यात कर्करोगाला कारण ठरू शकतील, असे घटक आढळून आले.