देशात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस तसेच अमली पदार्थविरोधी विभागाकडून अथक प्रयत्न केले जातात. मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांत या सरकारी यंत्रणांनी मोठ्या कारवायादेखील केलेल्या आहेत. मात्र तरीदेखील ड्रग्ज, गांजा यासारख्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लोकांना अद्याप पूर्णपणे थोपवता आलेले नाही. दरम्यान, एनसीबीने आतापर्यंतची सर्वांत मोठी एलएसडी (लायसर्जिक अॅसिड डायइथालमाईड) या ड्रग्जची तस्करी करणारे मोठे रॅकेट समोर आणले आहे. या प्रकरणात एनसीबीने सहा तरुणांना अटक केली असून ड्रग्ज तस्करीसाठी ते डार्कवेब, इन्स्टाग्राम, क्रिप्टोकरन्सी अशा आधुनिक तंत्रांचा वापर करत होते. याच पार्श्वभूमीवर ड्रग्ज तस्करीसाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातोय? एनसीबीने एलएसडीची तस्करी कशी रोखली? हे जाणून घेऊ या. मिळालेल्या माहितीनुसार एलएसडी तस्करी प्रकरणात एनसीबीने २५ ते २८ या वयोगटातील सहा तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. हे तरुण देशभरात एलएसडीची तस्करी करायचे. एनसीबीची मागील दोन वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. हेही वाचा >> विश्लेषण : ‘बॉल गर्ल’ला इजा पोहोचवल्याबद्दल अपात्र? फ्रेंच टेनिस स्पर्धेत नेमके काय घडले? ड्रग्जची विक्री कशी केली जायची? एलएसडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी ड्रग्ज तस्करांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात होती. यामध्ये प्रामुख्याने इन्स्टाग्रामचा वापर केला जात होता. ड्रग्ज तस्कर इन्स्टाग्रामवरून लोकांना ड्रग्जबाबत विचारायचे. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढे ते 'विकर मी' या मेसेजिंग अॅपवरून पुढील चर्चा करायचे. विशेष म्हणजे ड्रग्ज विकल्यानंतर ते क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे स्वीकारायचे. मिळालेल्या माहितीनुसार एलएसडी हा ड्रग नेदरलँड, पोलंड या देशांतून आणला जायचा. या ड्रग्जला कोणतीही चव नसते. हा ड्रग्ज गंधहीन, रंगहीन असतो. एनसीबीने ड्रग्ज तस्करांना कशा बेड्या ठोकल्या? एनसीबीला एलएसडी ड्रग्ज तस्करीबाबत गुप्त सूचना मिळाली होती. त्यानंतर दिल्लीतील विभागीय पथकाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला. गोव्यातील एक तरुण नोएडा येथील एका खासगी विद्यापीठात शिकत होता. त्याने एलएसडी ड्रग्ज मागवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विकर या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून ड्रग्ज मागवण्यात आला होता. त्यानंतर याच मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून एनसीबीने ड्रग्जची विक्री करण्याला शोधले होते. पुढे एनसीबीने २९ मे रोजी दिल्लीमध्ये एलएसडीच्या १५ ब्लॉट्ससह एका आरोपीला अटक केली. हा ड्रग्ज तस्कर एलएसडी काश्मीरमधील एका ग्राहला विकणार होता. या ड्रग्ज तस्कराच्या घरावर छापेमारी केल्यानंतर एनसीबीला येथे एलएसडी ड्रग्जचे ६५० ब्लॉट्स सापडले. हेही वाचा >> देशांतर्गत विमान प्रवास महागला, दिल्ली-मुंबई प्रवासासाठी मोजावे लागले १८ हजार रुपये; नेमके कारण काय? ९ हजार ६ एलएसडी ब्लॉट्स, २.२३ किलो गांजा, ४.६५ लाख रुपये जप्त याच प्रकरणाचा तपास करताना दिल्लीतील एक महिला एनसीबीच्या रडारवर आली. एनसीबीने तिच्या घरावर छापेमारी केली. मात्र या कारवाईत त्यांना काहीही मिळाले नाही. मात्र या महिलेने तिच्या अन्य साथीदारांना पकडण्यास मदत केली. महिलेने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने राजस्थानमधील जयपूर येथील ड्रग्ज तस्कराला ३० मे रोजी ताब्यात घेतले. एनसीबीने या तस्कराकडून साधारण ९ हजार ६ एलएसडी ब्लॉट्स, २.२३ किलो गांजा, ४.६५ लाख रुपये जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार या ड्रग्ज तस्कराने डार्कवेब, डार्कनेट तसेच विकर या माध्यमांतून ड्रग्ज मागवला होता. या ड्रग्ज तस्कराची चौकशी केल्यानंतर पुढे एनसीबीने पुण्यातील भोसरी येथील भारतीय पोस्ट ऑफिसमधून साधारण ५ हजार ६ एलएसडी ब्लॉट्स जप्त केले आहेत. ड्रग्ज तस्करी कशी केली जायची? एनसीबीने या प्रकरणात नोएडा आणि केरळ येथून आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईबाबत एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे. "ड्रग्जची तस्करी आणि खरेदी करणाऱ्यांमध्ये तसा थेट संबंध नाही. ते डार्कनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधायचे," असे सिंह यांनी सांगितले. तसेच "सध्याची तरुण पिढी ही नवे तंत्रज्ञान लवकर आत्मसाद करते. तरुण आता ड्रग्ज तस्करीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करत आहेत. यासाठी क्रिप्टोकरन्सीचाही उपयोग केला जात आहे. यामध्ये प्रत्येकजण आभासी माध्यमातून संवाद साधत असतो. हे फार धोकादायक आहे," असेदेखील एका अधिकाऱ्याने सांगितले. डार्कनेट हे इनक्रप्टेड इंटरनेट माध्यम आहे. या माध्यमाचा उपयोग ड्रग्ज तस्करी, पॉर्नोग्राफिक कन्टेंट शेअर करण्यासाठी तसेच अन्य बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी केला जातो. हेही वाचा >> विश्लेषण : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक कशी होते? नोकरीपायी चार महिन्यांत साडेपाच कोटी गमावले? एनसीबीने या कारवाईत किती एलएसडी जप्त केले? एनीसीबीने या प्रकरणात एकूण १५ हजार एलएसडी बॉट्स, २.२३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा ड्रग्ज अमेरिका, नेदरलँड, पोलंड, ब्रिटन, कॅनडा येथून मागवण्यात आला होता. "एकाच कारवाईत सर्वाधिक एलएसडी बॉट्स पकडण्याची ही एनसीबीची पहिलीच कारवाई आहे. या कारवाईत सहा तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आम्ही या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध घेत आहोत," असे एनसीबीचे उपमहासंचालक सिंह यांनी सांगितले आहे. २०२१ साली एनसीबीने केली होती अशीच कारवाई "ड्रग्ज तस्करीचे हे एक मोठे जाळे होते. पोलंड, नेदरलँड, ब्रिटन, अमेरिका, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेशपर्यंत हे जाळे पसरलेले आहे. ते डार्कनेट तसेच क्रिप्टोकरन्सीचा अपयोग करायचे," असेही सिंह यांनी सांगितले आहे. या कारवाईत २.२३ किलो गांजासह ४.६५ लाख रोख रक्कम, तसेच बँकेच्या खात्यातून २० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. याआधी २०२१ साली कर्नाटकमध्ये सर्वाधिक ५ हजार एलएसडी बॉट्स पकडण्यात आले होते. त्यानंतर कोलकातामध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. २०२१ साली एनसीबीने डार्कवेबचा उपयोग करणाऱ्या अशाच ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश केला होता. तेव्हा पोलिसांनी एकूण ४० जणांना बेड्या ठोकल्या होत्या.