Delhi Turkman Gate Tension: गेल्या काही दिवसांपासून जुन्या दिल्लीतल्या तुर्कमान गेट परिसरात पुन्हा एकदा अस्वस्थता आणि तणाव जाणवू लागला आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान झालेल्या संघर्षामुळे हा भाग पुन्हा चर्चेत आला. दगडफेक, अश्रुधूर आणि स्थानिक नागरिकांमधील भीतीचे वातावरण पाहता अनेकांना इतिहासातील एक वेदनादायक काळ आठवला. कारण तुर्कमान गेट हे केवळ जुन्या दिल्लीतले एक प्रवेशद्वार नाही, तर सत्तेच्या दडपशाहीचे आणि सामान्य माणसांच्या असहाय्यतेचे ते प्रतीक मानले जाते. आज इथे घडते आहे, ते पाहताना “इतिहास पुन्हा तर घडत नाही ना?” हा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो. कारण जवळपास पाच दशकांपूर्वी, याच ठिकाणी, आणीबाणीच्या काळात घडलेली भीषण घटना आजही दिल्लीच्या सामूहिक स्मृतीत कोरलेली आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

तुर्कमान गेटचा इतिहास आणीबाणीपुरताच मर्यादित नाही. या दरवाजाचे मूळ १७ व्या शतकात, मुघल सम्राट शाहजहान यांच्या काळात आढळते. शाहजहान यांनी शाहजहानाबाद ही राजधानी उभारताना आधीपासून अस्तित्वात असलेल्या वसाहती, धार्मिक स्थळे आणि रस्ते यांचा समावेश शहररचनेत केला. तुर्कमान गेट परिसर याचे उत्तम उदाहरण आहे.

या भागात शाह तुर्कमान बयाबानी नावाचे सूफी संत राहत होते. त्यांचा दर्गा आजही इथे आहे. त्यांच्या दर्ग्याजवळच दिल्ली सल्तनतवर राज्य करणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला शासक रझिया सुलतान यांची कबर असल्याचे मानले जाते. त्यामुळे हा परिसर केवळ धार्मिक नव्हे, तर ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरतो.

काळाच्या कसोटीवर उभा राहिलेला दरवाजा

तुर्कमान गेटने अनेक ऐतिहासिक उलथापालथी पाहिल्या. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी जुन्या दिल्लीतल्या शहराच्या भिंतींचे काही भाग पाडले. देशाच्या फाळणीच्या वेळी दिल्लीने भयानक हिंसाचार अनुभवला. वसाहतवादी काळात आणि नंतरच्या शहरीकरणातही अनेक जुन्या वास्तू नाहीशा झाल्या. मात्र तुर्कमान गेट उभे राहिले ते मूक साक्षीदार म्हणून… पण १९७० च्या दशकात जे घडले, त्याने या दरवाजाला इतिहासातील सर्वात वेदनादायक ओळख मिळवून दिली.

आणीबाणी आणि विकास नावाची दहशत

१९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू झाली. लोकशाहीतील अधिकार नावापुरता राहिले आणि सत्तेचा वापर दडपशाहीसाठी होऊ लागला. दिल्लीमध्ये ‘सौंदर्यीकरण’ आणि ‘शहरी पुनरुज्जीवन’ या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या हटवण्याची मोहीम सुरू झाली. या मोहिमेचा सर्वाधिक फटका गरीब, कष्टकरी आणि अल्पसंख्याक समाजाला बसला.

एप्रिल १९७६ मध्ये तुर्कमान गेट परिसर या कारवाईचे केंद्र बनले. घरे पाडली जाऊ लागली. त्याच वेळी सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा दबाव वाढवण्यात आला. नसबंदीच्या बदल्यात पैसे, अन्नधान्य किंवा घर वाचवण्याचे आश्वासन दिले जाऊ लागले. हळूहळू हा दबाव सक्तीमध्ये बदलला.

भीतीतून झालेला प्रतिकार

  • पुढच घर आपलं असेल या भीतीने संपूर्ण परिसरात दहशत पसरली. लोक असहाय्य होते, पण गप्प नव्हते. काहींनी मदतीसाठी सत्ताधाऱ्यांकडे धाव घेतली, तर काहींनी संघटित होण्याचा मार्ग स्वीकारला. जवळच्या कारखान्यांतील कामगार आणि स्थानिक रहिवासी एकत्र येऊ लागले.
  • १९ एप्रिल १९७६ रोजी संघर्ष टोकाला गेला. हजारो लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर गोळीबार करण्यात आला. महिला, मुले आणि निष्पाप नागरिक या हिंसाचारात फसले.

अमानुष पाडकाम आणि न संपणारी वेदना

त्या रात्री जे घडले, ते मानवी मूल्यांना काळीमा फासणारे होते. बुलडोझर आणून संपूर्ण परिसर जमिनदोस्त करण्यात आला. ढिगाऱ्याखाली अडकलेले जखमी, मृतदेह आणि उद्ध्वस्त घरे असे चित्र होते. पुढील काही दिवस पाडकाम सुरूच राहिले.

नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला आणि हजाराहून अधिक लोक जखमी झाले. मात्र या आकड्यांपलीकडे गेलेली वेदना कधीच मोजली गेली नाही.

न्यायाविना बंद झालेला अध्याय

१९७७ मध्ये शाह आयोगाने या घटनेची चौकशी केली. सत्य समोर आले, पण जबाबदारी निश्चित झाली नाही. कोणालाही शिक्षा झाली नाही. तुर्कमान गेटवरील हत्याकांड इतिहासाच्या पानांत दडपले गेले, पण पीडितांच्या जखमा भरल्या नाहीत.

आजचा संदर्भ : इतिहासाचा इशारा

  • आज पुन्हा एकदा तुर्कमान गेट परिसरात अतिक्रमण हटाव, पोलीस कारवाई आणि जनतेचा असंतोष दिसतो आहे. परिस्थिती तीच आणि तशीच नसली तरी, आठवणी जाग्या होत आहेत. विकास आवश्यक आहे, शहर बदलणारच आहेत. मात्र विकासाच्या नावाखाली माणुसकी हरवली, तर तो विकास नसून विनाश ठरतो.
  • तुर्कमान गेट आपल्याला हेच शिकवते की, इतिहास विसरला, तर तो पुन्हा घडतो. म्हणूनच आजच्या घडामोडींकडे केवळ वर्तमानातील एक बातमी म्हणून पाहणे धोकादायक ठरते.

विकास कोणासाठी? सत्ता कोणाच्या हितासाठी?

तुर्कमान गेट आजही उभे आहे… शांत, पण अबोल निश्चितच नाही. ते आपल्याला प्रश्न विचारते: विकास कोणासाठी? सत्ता कोणाच्या हितासाठी? आणि लोकशाहीचे मूल्य किती जपले जाते? हे ठिकाण एक स्मारक नाही, तर एक इशारा आहे. भूतकाळ समजून घेतला, तरच वर्तमान सुधारता येते. अन्यथा इतिहास दगडात नाही, तर माणसांच्या आयुष्यात पुन्हा कोरला जातो.