डेंग्यू, हिवताप (मलेरिया), झायका, चिकुनगुन्या यांसारख्या कीटकजन्य साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने घरोघरी आणि परिसरातल्या डासांची उत्पत्तिस्थाने शोधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ३२ लाख घरांची तपासणी करण्यात आली आणि सुमारे ३० लाख घरांच्या परिसरात धूरफवारणी करण्यात आली. तसेच २२ हजारांहून अधिक परिसरांना भेट देऊन, तेथील ४२,३२९ डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली. पावसाळा सुरू होण्याआधी या प्रकल्पाची पूर्तता होण्याची गरज असल्यामुळे त्याप्रमाणे या प्रकल्पाचे नियोजन पालिकेच्या कीटकनाशक विभागाने केले आहे.   

पण या सगळ्या आजारांचं मूळ औषध हे डास आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? 

पूर्वी अनेक वर्षांपासून या कीटकजन्य आजारांचे निर्मूलन हे कीटकनाशकांची फवारणी करणे, दलदलीचे भाग सुकवणे व मच्छरदाण्यांचा वापर करणे अशा प्राथमिक उपाययोजना वापरल्या जात असत. मात्र, १९२४ मध्ये या डासांमधून परावर्तित होणाऱ्या आजारांवर एक जालीम उपाय प्रसिद्ध झाला तो म्हणजे ‘वर्ल्ड मॉक्युटो प्रोग्रॅम’ (WMP). 

‘एडीस अएजिप्ती’ प्रजातीच्या डासांमध्ये ‘वोल्बाकिया’ (Wolbachia) या नैसर्गिक जीवाणूचा (जीवाणू) संसर्ग करून शास्त्रज्ञांनी डेंग्यू, झिका व चिकुनगुनिया यांसारख्या विषाणूंना रोखण्यासाठी एक जैविक ढाल तयार केली. हा जिवाणू ५०% कीटकांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळतो; परंतु तो ‘एडीस अएजिप्ती’ डासांमध्ये नैसर्गिकरीत्या नसतो. ‘वोल्बाकिया’ असलेल्या डासाच्या शरीरात हे विषाणू वाढू शकत नाहीत, याचा अर्थ ते मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाहीत. 

एका सूक्ष्म शोधापासून ते जागतिक सार्वजनिक आरोग्य उपक्रमापर्यंतचा हा प्रवास जवळपास १०० वर्षांचा आहे.

हा शोध कसा लागला?

१९२४ मध्ये शास्त्रज्ञ मार्शल हर्टिग आणि एस. बर्ट वोल्बाच यांना सामान्य घरगुती डासांमध्ये (Culex pipiens) एक रहस्यमय जीवाणू आढळला. नंतर १९३६ मध्ये याला ‘Wolbachia pipientis’ असे नाव देण्यात आले. अनेक दशके याकडे निसर्गाचा एक सामान्य आणि निरुपद्रवी घटक म्हणून दुर्लक्ष केले गेले. 

१९७० च्या दशकात संशोधकांच्या लक्षात आले की, ‘वोल्बाकिया’ काहीतरी अविश्वसनीय करीत आहे : तो स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी कीटकांच्या प्रजननात बदल घडवून आणतो. त्याला ‘सायटोप्लाज्मिक इनकंपॅटिबिलिटी’ (Cytoplasmic Incompatibility) म्हणतात. ‘वोल्बाकिया’ असलेल्या नर डासाने साध्या मादीशी मिलन केले, तर तिची अंडी खराब होतात आणि त्यातून डासांची पैदास होत नाही. पण जर मादीला संसर्ग झाला असेल, तर ती हा जीवाणू तिच्या सर्व पिल्लांमध्ये संक्रमित करते. 

१९८० ते ९० च्या दशकात प्राध्यापक स्कॉट ओ’नील (ज्यांनी नंतर वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्रामची स्थापना केली) यांनी ‘वोल्बाकिया’वर संशोधन सुरू केले. १९९० च्या दशकाअखेरीस शास्त्रज्ञांना एक मोठे यश मिळाले.  त्यांनी अत्यंत बारीक सुईचा (इंजेक्शनचा) वापर करून, एका कीटकातील ‘वोल्बाकिया’ जिवाणू काढून तो पूर्णपणे वेगळ्या जातीच्या कीटकाच्या अंड्यांमध्ये यशस्वीपणे टाकला. 

२०११ मध्ये प्रयोगशाळेत ‘एडीस अएजिप्ती’ डासांना यशस्वीरीत्या संक्रमित केल्यानंतर ‘वोल्बाकिया’ असलेल्या डासांना निसर्गात मुक्त करण्याची पहिली क्षेत्रीय चाचणी ऑस्ट्रेलियामध्ये झाली. त्यातून हे सिद्ध झाले की, हे जीवाणू नैसर्गिक डासांच्या लोकसंख्येमध्ये प्रजननाद्वारे यशस्वीपणे पसरतात.

२०१७ मध्ये या उपक्रमाला ‘वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्राम’ असे नवीन नाव देण्यात आले आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार सुरू झाला. लाखो डासांची निर्मिती करण्यासाठी ‘बायो-फॅक्टरीज’ (जैविक-कारखाने) उभारण्यात आले, ज्यामुळे हा प्रकल्प एका स्थानिक विज्ञान प्रयोगातून जागतिक ‘लॉजिस्टिक ऑपरेशन’मध्ये रूपांतरित झाला. 

भारतात हा प्रयोग पहिल्यांदा कधी झाला?

२०१७ मध्ये भारतामध्ये डासांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी जालना शहराजवळील दावलवाडी येथे ‘जीबीआयटी’ (महिको कंपनीशी संबंधित) आणि अमेरिकन ‘ऑक्सिटेक’ कंपनीने संयुक्तपणे एक महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. या प्रयोगांतर्गत जनुकीय बदल करून, ‘एडीस अएजिप्ती’ प्रजातीच्या नर डासांची निर्मिती करण्यात आली होती. हे डास माणसांना चावत नसत; मात्र त्यांचा स्थानिक मादी डासांशी संबंध आल्यास निर्माण होणारी पुढील पैदास उपजण्याआधीच मृत्युमुखी पडत असे. या जनुकीय तंत्रज्ञानामुळे रोग पसरवणाऱ्या डासांची संख्या कमी होण्यास मोठी मदत होणार होती. सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन हे प्रयोग सुरुवातीला बाह्य वातावरणातील बंदिस्त पिंजऱ्यात करण्यात आले होते आणि त्यानंतर त्याचे निष्कर्ष केंद्र सरकारच्या ‘जेनेटिक इंजिनियरिंग अप्रूव्हल कमिटी’ (GEAC) व इतर नियामक मंडळांसमोर मांडून खुल्या क्षेत्रात चाचणीसाठी परवानगी मिळविण्याचे नियोजन त्यावेळी करण्यात आले होते. 

हा उपाय संपूर्ण जगाने कसा अमलात आणला?

मात्र, हा प्रकल्प अमलात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘वोल्बाकिया’ जीवाणू असलेले डास कसे पसरावायचे ही आवाहनात्मक बाब होती. सध्या देशात या डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात कोलंबियातील मेडेलिन (Medellín) येथे होत असते, जेथे आठवड्याला तीन कोटींहून अधिक ‘वोल्बाकिया’ डास तयार केले जातात. 

लाखो जिवंत, नाजूक आणि पूर्ण वाढ झालेल्या डासांची उष्ण कटिबंधातील कठीण भौगोलिक परिस्थितीत वाहतूक करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. कॅप्सूल पद्धतीमुळे वितरणातील हा मोठा अडथळा दूर झाला. 

‘वोल्बाकिया’ संक्रमित डासांची एक मुख्य वसाहत (master colony) असते. एका मोठ्या जैविक कारखान्यात त्यांची पैदास केली जाते. हे प्रौढ डास मिलन करतात आणि लाखो अंडी घालतात. 

या अंड्यांना प्रयोगशाळेत उबवण्याऐवजी वाळवले जाते. त्यानंतर ती अंडी पाण्यात विरघळणाऱ्या जिलेटिन कॅप्सूलमध्ये (औषधाच्या गोळीच्या आवरणासारखी) भरली जातात. प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे ३०० अंडी आणि अळ्यांसाठी (larvae) पोषक आहाराची थोडी पावडर (मत्स्य-आहारासारखी) असते. 

ही अंडी कोरड्या अवस्थेत महिनोन महिने जिवंत राहू शकत असल्यामुळे त्यांची जगभर सहजपणे वाहतूक केली जाते. स्थानिक स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी यांना या कॅप्सूल्स वितरणासाठी (TO DEPLOY) दिल्या जातात. 

एखाद्या परिसरातील सावलीच्या ठिकाणी ठेवलेल्या पाण्याच्या कपांमध्ये किंवा डब्यांमध्ये या कॅप्सूल्स टाकल्या जातात. पाण्यात कॅप्सूल विरघळते, आतील आहार अळ्यांना पोषण देतो आणि दोन आठवड्यांच्या आत प्रौढ ‘वोल्बाकिया’ डास स्थानिक डासांसोबत मिलन करण्यासाठी बाहेर उडून जातात. 

२०२४ चे संकट!

२०२४ हे वर्ष डेंग्युने ग्रासलेले होते. जगभरात डेंग्यूचे १.४ कोटींहून अधिक रुग्ण आढळले आणि २०२५ मध्येही याचा मोठा प्रादुर्भाव सुरूच आहे. या वाढत्या रुग्णसंख्येने हे सिद्ध केले आहे की, हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या या धोक्यासमोर आपल्या पारंपरिक बचाव पद्धती आता पूर्णपणे अपयशी ठरत आहे.   

त्यामुळे ‘वोल्बाकिया’कडे केवळ एक रंजक प्रयोग म्हणून न पाहता, ती तातडीची गरज म्हणून पहिली गेली कारण डासांमुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढत होते:

अनेक दशकांपासून केवळ धूरफवारणी आणि कीटकनाशकांवर अवलंबून असलेल्या देशांनी मोठ्या प्रमाणात या संकटावर उपाय करण्याची गरज होती. डासांची पिढी ही अत्यंत वेगाने वाढते. त्यामुळे केवळ प्रगत उपाय करून चालणार नव्हते; तर त्यासोबत १० पटींनी गतिशील असणे गरजेचे होते. त्याशिवाय हवामान बदलामुळे येणाऱ्या अतिवृष्टीच्या वेळी (मुसळधार पावसात) ही रासायनिक फवारणी वाहून जाते. 

डेंग्यूच्या उद्रेकामुळे रुग्णालयीन यंत्रणांवर वेगाने ताण पडतो. २०२४ मध्ये रुग्णांची प्रचंड संख्या हाताळण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील शहरांना आपत्कालीन ‘फील्ड हॉस्पिटल्स’ (तात्पुरती रुग्णालये) उभी करावी लागली. ‘वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्राम’च्या वोल्बाचिया वापरामुळे ७०,००० रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापासून वाचवण्यात आले आहे, ज्यामुळे आरोग्य सेवेतील अंदाजे ३३.१ कोटी डॉलर्सची बचत झाली आहे. हवामान बदलामुळे या आजाराचा विळखा वाढत असताना, आरोग्य यंत्रणा कोसळण्यापासून वाचवण्यासाठी अशा प्रकारची पूर्वनियोजित जैविक-हस्तक्षेप (bio-interventions) पद्धत हाच एकमेव आर्थिकदृष्ट्या परवडणारा मार्ग आहे. 

आजवर डासांचा नायनाट करण्यासाठी आपण धूर आणि रसायनांचा मारा करत आलो. पण, यातला सर्वांत मोठा आणि रंजक विरोधाभास म्हणजे आता हेच डास आपल्याला डासांच्या आजारांपासून वाचवणार आहेत.