बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आक्रमक भूमिका घेत धीरेंद्र शास्त्री यांच्या देशभरातील सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच काही सनातनविरोधी घटक आपल्या राजकीय आकांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला राजकीय वळण लागले. धीरेंद्र शास्त्री यांना त्यांचे अनुयायी ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखतात. त्यांच्या वक्तव्यावरून समाजवादी पार्टीने थेट भाजपालाच लक्ष्य केले. त्यामुळे या प्रकरणात सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचे दिसून येते.
भगवान राम आणि श्रीकृष्णांच्या तुलनेवरून वाद
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा येथे आयोजित रामकथा कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हा वाद उफाळून आला. या चित्रफितीत ते भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या देहबोलीची आणि वागण्याच्या पद्धतीची तुलना करताना दिसून आले. या वक्तव्यांमधून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. तसेच अशा प्रकारचे वर्तन आपला पक्ष कधीही खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. संबंधित चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होण्याआधीही अखिलेश यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. धार्मिक भावना दुखावणाऱ्या व्यक्तींच्या कार्यक्रमांवर तातडीने बंदी घालायला हवी, अशी मागणी त्यांनी केली होती.
धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावर अखिलेश यादव संतापले
“माणसांकडून होणाऱ्या चुका माफ केल्या जाऊ शकतात; पण धर्मनिंदेचा गुन्हा कधीही माफ केला जाऊ शकत नाही. अशा द्वेषपूर्ण व्यक्तींवर आजीवन बंदी घालणे समाजाच्या हिताचे ठरेल. देशभरातील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, त्यांना नव्याने कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये. तसेच खऱ्या सनाती व्यक्तींनी त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकावा. त्यांच्या अक्षम्य कृत्याची हीच शिक्षा असली पाहिजे. अन्यथा, अशा कृत्यांना पाठिंबा देणारेही धर्मनिंदेच्या पापात सहभागी होतील आणि आपले इहलोक व परलोक दोन्ही बिघडवून घेतील,” असे अखिलेश म्हणाले होते. यादरम्यान वादग्रस्त वक्तव्यावरून धीरेंद्र शास्त्री यांनी दिलगीरी व्यक्त करीत स्पष्टीकरण दिले. भक्तीपर काव्यातील एका ओळीचा अर्थ स्पष्ट करताना आपण हे वक्तव्य केले; पण आपल्या बोलण्याचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने घेतला गेल्याचे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणानंतरही समाजवादी पार्टीने भाजपावरील हल्लाबोल कायम ठेवला आहे.
राम मंदिरातील गैरव्यवहाराचा मुद्दाही केला उपस्थित
भाजपाच्या लोकांनी आधीच अयोध्येतील राम मंदिराची लूट केली असून आता सत्ताधाऱ्यांचे समर्थक धीरेंद्र शास्त्री हेदेखील भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल अपशब्द वापरत असल्याची टीकाही समाजवादी पार्टीने केली. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनीही धीरेंद्र शास्त्री यांना लक्ष्य केले. आतापर्यंत हे द्वेष पसरवणारे लोक समाजात फूट पाडत होते. आता त्यांनी देवतांमध्येही फूट पाडण्यास सुरुवात केली आहे. राजकीय फायद्यासाठी हे लोक आणखी किती खालच्या थराला जाणार? सामाजिक सलोखा आणि सनातनी एकतेला धक्का पोहोचवणाऱ्या या व्यक्तीला संरक्षण देणारे पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या सर्व नेत्यांनी देशाची, समाजाची आणि सनातन धर्मियांची साष्टांग दंडवत घालून जाहीर माफी मागितली पाहिजे, असे तेजस्वी म्हणाले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका करताना त्यांना मूर्ख असे संबोधले.
उत्तर प्रदेशात भाजपासमोर नवे राजकीय आव्हान?
अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. निवडणुका जवळ आल्यामुळे या दोन्ही नेत्यांना अचानक श्रीरामांची आठवण झाली. अखिलेश यादव अद्यापही अयोध्येला दर्शनासाठी गेले नाहीत, उलट त्यांनी आतापर्यंत भगवान राम यांच्या अस्तित्वावर वारंवार प्रश्न उपस्थित केले. अखिलेश मथुरेतील कृष्ण जन्मभूमीला कधी भेट देणार हे सांगतील का? कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे की नाही? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते नवीन श्रीवास्तव यांनी उपस्थित केला. भाजपाच्या या प्रतिक्रियेमागे उत्तर प्रदेशातील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुद्द्याचे असलेले राजकीय महत्त्व दिसून येते. उत्तर प्रदेशात धार्मिक अस्मिता आणि जातीय राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. भगवान श्रीकृष्ण हे यादव समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. यादव समाज स्वतःचा वंश यदुवंशाशी जोडला जातो आणि भगवान श्रीकृष्णांना आपल्या सांस्कृतिक व धार्मिक अस्मितेचा केंद्रबिंदू मानतो. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये या समाजाचे मोठे राजकीय महत्त्व असून, गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर त्यांचा प्रभाव राहिला आहे.
उत्तर प्रदेशातील यादव मतांचे गणित काय?
उत्तर प्रदेश सामाजिक न्याय समितीच्या अंदाजानुसार, इतर मागासवर्गीय (OBC) समाजातील यादवांची लोकसंख्या सुमारे १९.४ टक्के आहे. मुलायम सिंह यादव यांच्या राजकीय उदयानंतर समाजवादी पार्टीची ओळख यादव समाजाशी घट्ट जोडली गेली. मुस्लीम आणि यादव या दोन समाजांच्या पारंपरिक एकजुटीमुळे समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात एक मजबूत राजकीय शक्ती म्हणून उदयास आला. मात्र, आपल्या पारंपरिक मतदारवर्गाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण राज्यात बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करताना पक्षासमोर आव्हानेही निर्माण झाली. दुसरीकडे, यादव मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपाने सातत्याने प्रयत्न केले. त्यामध्ये यादव समाजातील नेत्यांना प्रोत्साहन देणे आणि भगवान श्रीकृष्णांच्या यदुवंशीय वारशाचा उल्लेख करणे यांचा समावेश आहे. समाजवादी पार्टीचा पारंपरिक सामाजिक आणि राजकीय जनाधार कमकुवत करण्याच्या भाजपाच्या व्यापक रणनीतीचा हा एक भाग आहे. भाजपाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना यादव समाजातील प्रमुख नेते म्हणून पुढे आणले आहे. मार्च २०२४ मध्ये लखनऊ येथे आयोजित यादव महाकुंभ मेळाव्यात मोहन यादव यांनी समाजाला आपल्या वंशपरंपरेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले होते.
दोन निवडणुकांमध्ये यादव मतांचे महत्त्व अधोरेखित
उत्तर प्रदेशातील २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या राजकीय समीकरणांचे महत्त्व स्पष्ट झाले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल ३१२ जागा जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला अवघ्या ४७ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने पुन्हा जोरदार मुसंडी मारली. पक्षाने १११ जागा जिंकल्या. त्याचबरोबर पक्षाची मतांची टक्केवारी २१.८२ टक्क्यांवरून वाढून ३२.७६ टक्क्यांवर पोहोचली. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी ४३ जागांवर समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने विजय मिळवला. या निकालामुळे यादव आणि इतर मागासवर्गीय समाजातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले.
बागेश्वर धामचा विस्तार आणि धीरेंद्र शास्त्रींचा वाढता प्रभाव
धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यांमुळे भाजपासमोर एका महत्त्वाच्या टप्प्यावर राजकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे या वादाला आणखीनच फोडणी दिली जात आहे. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड भागातील छतरपूर येथे बागेश्वर धाम आहे. गेल्या काही वर्षांत या ठिकाणाचा विस्तार एका मोठ्या धार्मिक संकुलात झाला असून, येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. २०२५ मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धामला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पायाभरणीचे उद्घाटन केले होते. या भेटीदरम्यान मोदी यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा उल्लेख ‘छोटा भाऊ’ असा केला होता. यावरून धीरेंद्र शास्त्री यांचे वाढते राजकीय वजनही अधोरेखित झाले.
भक्तीच्या प्रवचनांपासून हिंदू राष्ट्राच्या मागणीपर्यंत
धीरेंद्र शास्त्री यांची राजकीय भूमिका काळानुसार बदलत गेली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रवचनांमध्ये हनुमानभक्ती आणि लोकांच्या वैयक्तिक समस्यांवर उपाय सांगण्यावर अधिक भर असायचा. त्यांच्या प्रवचनांमध्ये थेट राजकीय संदेश नसायचा. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यांनी आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली आहे. स्वतःचा उल्लेख ‘हिंदू राष्ट्र योद्धा’ असा करत त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच, धर्मांतराच्या विरोधात हिंदूंनी एकजूट होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यंदा पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या आधी त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करणाऱ्यांना त्यांनी ‘पाखंडी’ म्हणजेच ढोंगी संबोधले होते. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांतील नेते धीरेंद्र शास्त्री यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न करताना दिसून येतात. बुंदेलखंडसह बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. काँग्रेसची राजकीय स्थिती कमकुवत होत असताना धीरेंद्र शास्त्री यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न भाजपासाठी अधिक फायदेशीर ठरल्याचे या घडामोडींवरून दिसून येते.
