कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन पुकारण्यात आले होते. पण, दिल्लीच्या पोलीस प्रशासनाने आंदोलनापूर्वीच आंदोलकांचे सर्व मार्ग रोखले आहेत. त्यातच यूट्यूबर ध्रुव राठीला सीजेपीच्या आंदोलनापूर्वी ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्याच्या गुरुग्राममधील घरातून त्याला ताब्यात घेतले. तो सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जर्मनीहून भारतात आला होता. या घडामोडीमुळे एक महत्वाचा प्रश्न समोर आला आहे. भारतात एखाद्या परदेशी नागरिकाला आंदोलनात सहभागी होता येते का?

दरम्यान, ध्रुव राठीने ८ ऑक्टोबरला एसआयआर प्रक्रियेविरोधातील बंगळुरूमधील एका आंदोलनातही सहभाग घेतला होता. त्यानंतर बंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त व भाजपा नेते भास्कर राव यांनी ध्रुव राठीच्या विरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे धाव घेतली. राठीचे नागरिकत्व, पासपोर्ट, व्हिसाच्या अटींचे पालन यांची पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

सीजेपीने १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी एसआयआर प्रक्रियेत एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते; पण पोलीस प्रशासनाने त्याआधीच कडक निर्बंध लावले आहेत.

या घटनेमुळे परदेशी नागरिकांच्या भारतातील राजकीय आंदोलनांमधील सहभागाबाबतचे कायदे आणि नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. परदेशी नागरिकांना भारतात आंदोलन करण्याचा अधिकार आहे का आणि त्यांच्या सहभागावर कोणते कायदेशीर निर्बंध लागू होतात? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

परदेशी नागरिकांना भारतात आंदोलन करता येते का?

भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांच्या बाबतीत भारतीय नागरिक आणि देशात राहणाऱ्या परदेशी व्यक्तींना वेगळ्या तरतुदी लागू केल्या आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ)नुसार, भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तसेच, अनुच्छेद १९(१)(ब)नुसार त्यांना शस्त्रांशिवाय शांततेत एकत्र येण्याचा मुलभूत अधिकार आहे. मात्र, परदेशी नागरिकांना हे विशेष अधिकार आपोआप मिळत नाहीत. म्हणजेच एखादा परदेशी नागरिक भारतात आला म्हणून त्याला भारतीय नागरिकांप्रमाणे आंदोलनात सहभागी होण्याचा थेट मूलभूत अधिकार प्राप्त होत नाही.

मात्र, याचा अर्थ परदेशी नागरिकांना राज्यघटनेचे संरक्षण मिळत नाही, असा नाही. अनुच्छेद १४ नुसार, भारतातील प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. तर अनुच्छेद २१ प्रत्येक व्यक्तीला जीवनाचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण बहाल करतो. त्यामुळे परदेशी नागरिकांनाही परिस्थितीनुसार या घटनात्मक संरक्षणांचा आधार घेता येतो. भारतात असताना त्यांच्यावर लागू होणाऱ्या कायद्यांनुसारच त्यांच्यावरील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जातो.

मात्र, भारतीय नागरिकांप्रमाणे परदेशी नागरिकांना आंदोलनाचा समान घटनात्मक अधिकार नाही. सार्वजनिक आंदोलनात सहभागी होताना त्यांना देशातील कायद्यांचे पालन करावे लागते. त्यांनी केलेल्या कृतींचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईचा विचार लागू असलेल्या कायद्यांच्या आधारेच केला जातो.

आंदोलनात सहभागी झाल्यास परदेशी नागरिकांवर कारवाई होऊ शकते का?

जेव्हा एखादा परदेशी नागरिक सार्वजनिक आंदोलनात उतरतो, तेव्हा त्याच्या व्हिसामध्ये नमूद असलेल्या अटींचे तिच्याकडून उल्लंघन तर होत नाहीये ना, हा प्रश्न तपासून पाहिला जातो. भारतात राहण्याची परवानगी देताना काही अटी घातलेल्या असू शकतात. १ सप्टेंबर २०२५ पासून लागू झालेला ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायदा’च्या माध्यमातून भारतातील परदेशी नागरिकांच्या अधिकारांचे नियमन केले जाते. या नवीन कायद्यानुसार आणि व्हिसाच्या नियमांनुसार, भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या कार्यांवर निर्बंध घालता येऊ शकतात. त्यामुळे व्हिसाच्या अटींचा भंग करून राजकीय किंवा सार्वजनिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेणे परदेशी नागरिकांसाठी कायदेशीररीत्या अडचणीचे ठरू शकते.

एखाद्या परदेशी नागरिकाचा आंदोलनातील सहभाग कायदेशीर आहे की नाही, हे काही तथ्यात्मक गोष्टींवर अवलंबून असते. त्याचा भारतातील वास्तव्याचा दर्जा, देशात प्रवेश करण्यासाठी किंवा राहण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी आणि आंदोलनाचे स्वरूप या बाबी तपासल्या जातात. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक परदेशी नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे सरसकट म्हणता येत नाही.

व्हिसा किंवा स्थलांतरविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय आल्यास, संबंधित यंत्रणा चौकशी करू शकतात. चौकशीत नियमभंग झाल्याचे आढळले की, कायद्यानुसार परदेशी व्यक्तीची भारतात राहण्याची परवानगी रद्द केली जाऊ शकते किंवा संबंधित व्यक्तीला देशाबाहेर पाठवले जाऊ शकते. मात्र, ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली जाते.

मग, जर्मन नागरिकाला भारतात आंदोलन करता येते का?

जर्मन नागरिकाला भारतीय नागरिकांप्रमाणे राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अंतर्गत भाषण स्वातंत्र्य आणि शांततेत एकत्र येण्याचा मूलभूत अधिकार मिळत नाही. भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांनाही व्हिसा आणि वास्तव्याशी संबंधित नियम पाळावे लागतात. मात्र, याचा अर्थ परदेशी नागरिकांना भारतात कोणत्याही आंदोलनात सहभागीच होता येत नाही, असा नियम नाही; परंतु त्याने परदेशी नागरिकांसाठी लागू करण्यात आलेल्या कायदेशीर अटींचे पालन करणे गरजेचे आहे.

ध्रुव राठीला सध्या दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनापूर्वी ताब्यात घेण्यात आले. भाजपा नेते भास्कर राव यांनी त्याचे नागरिकत्व व व्हिसा यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, राठीने कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. संबंधित यंत्रणांची चौकशी आणि त्यातून समोर येणाऱ्या तथ्यांनंतरच पुढील चित्र स्पष्ट होऊ शकेल.