Why Dhurandhar Is Missing From National Film Awards: २०२५ मध्ये आदित्य धर दिग्दर्शित स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ने केवळ भारतातच नव्हे, जिथे जिथे भारतीय आहेत, त्या त्या देशांमध्ये आपला डंका वाजवला. प्रेक्षक म्हणू नका, समीक्षक म्हणू नका ‘धुरंधर’ने एकजात सगळ्यांना झपाटून टाकलं. त्यामुळे तुफान लोकाश्रय मिळालेल्या या चित्रपटाला पुढच्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात पक्कं स्थान मिळणार अशी अनेकांची मनोमन खात्री झाली. पण अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले, त्यात ‘धुरंधर’ नसल्याने चाहते गोंधळले. चित्रपट व्यवसायातले जाणकार चक्रावले. सोशल मीडियावर तर जणू नाराजीचा पूरच आला. असं घडलं तरी कसं ? कोण होतं याला जबाबदार ?
परीक्षक समितीने का नाकारलं?
आपण सारे जाणताच २०२० साली आलेल्या कोविड-१९ च्या महासाथीनं अवघं जग उलटंपालटं करून टाकलं. दळणवळण ठप्प झालं. व्यवहार मंदावले. देशोदेशी भयासोबत एकप्रकारचं जखडलेपण येत गेलं. याचा परिणाम नित्याच्या व्यवहारांवर झाला. आयोजन-नियोजन कोलमडलं. निर्णय फिरवले गेले, बदलले गेले. असेच काही निर्णय राष्ट्रीय पुरस्कारांच्या बाबतीतही भारत सरकारकडून अपरिहार्यपणे घेतले गेले. म्हणजे, घडलं असं की, २०२० सालापूर्वी, राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फक्त असे चित्रपट विचारात घेतले जात होते, जे मागील एका कॅलेंडर वर्षात ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडून (सीबीएफसी) प्रमाणित झालेले होते.मात्र कोविडनंतरच्या काळात देशभरात लॉकडाउन लागू झाला, चित्रपटगृहं बंद पडली आणि सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यासही खूप विलंब होत गेला. यामुळे परीक्षक समितीकडे चित्रपटांचा प्रचंड मोठा ‘बॅकलॉग’ जमा होत गेला.
धुरंधर नसण्याचं कारण काय ?
आता आधीचाच डोंगर शिल्लक आहे, त्यात नवीन भर पडत गेली. मग अशा प्रसंगी पुरस्कारांचं गाडं पुढे सरकणं शक्यच नव्हतं. म्हणून मग हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं पुरस्कार चक्राचं वेळापत्रक पूर्णपणे बदलून टाकलं. म्हणूनच यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्षात २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट नाही तर, २०२४ चे म्हणजेच दोन वर्षांपूर्वी प्रमाणित झालेले चित्रपट पुरस्कारांसाठी निवडले गेले. याचा अर्थ असा आहे, की कोविड-१९ च्या महासाथीमुळे आता संपूर्ण निवड प्रक्रिया ही दोन वर्षे मागे सरकली आहे. परिणामी, ‘धुरंधर’सारखे डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित चित्रपट किंवा अलीकडेच प्रमाणित झालेले चित्रपट या निवड प्रक्रियेत सहभागी करून घेणं शक्य झालेलं नाही.
कशी ठरते पात्रता?
कोणताही चित्रपट केवळ चित्रपटगृहांत किंवा ओटीटीवर कधी प्रदर्शित झाला, की राष्ट्रीय पुरस्कारांसाठी पात्रता ठरतो असा अनेकांचा गैरसमज असतो. प्रत्यक्षात,ही पात्रता चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेवर वा लोकप्रियतेवर नव्हे, तर सीबीएफसी प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या अधिकृत तारखेवर ठरत असते. म्हणजेच एखादा चित्रपट कितीही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला, समीक्षकांकडून त्याचं कितीही कौतुक झालं, तरी त्याला मिळालेल्या प्रमाणपत्राच्या वर्षासाठी नेमलेल्या नामांकन चक्राची वाट पाहावी लागते.
कोणतं वेळापत्रक, का रोखलं ?
कोणी असंही म्हणेल की, हे अन्याय्य आहे. तर यात काही तथ्य नाही. खरं तर याबाबतचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा म्हणजे, प्रमाणपत्राच्या तारखेला प्राधान्य दिलं गेलं आहे. वर्षाच्या उत्तरार्धात प्रमाणित झालेला चित्रपट आपोआप त्याच वर्षाच्या मूल्यांकन गटात समाविष्ट होत आहे. हा क्रम मोडणं शक्य नाही. दुसरं म्हणजे, प्रेक्षकांची मागणी कितीही असो किंवा समीक्षकांचं कौतुक कितीही असो, परीक्षक समिती चित्रपटांचं मूल्यांकन ठरलेलं वेळापत्रक मोडून करू शकत नाही. यामुळेच ‘धुरंधर’ यंदाच्या पुरस्कारांच्या यादीत नसणं, हे पक्षपातीपणाचं किंवा गुणवत्तेच्या कमतरतेचे लक्षण नाही, तर हा केवळ नव्याने लागू झालेल्या प्रशासकीय वेळापत्रकाचा परिणाम आहे.
‘धुरंधर’ इतका लोकप्रिय का ?
५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने प्रदर्शनानंतर अवघ्या काही आठवड्यांतच नव्हे काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. या चित्रपटाने कंतारा चॅप्टर १ आणि छावा यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत जवळपास १३५० कोटींहून अधिक कमाई करण्याचा मान मिळवला होता. दिग्दर्शक आदित्य धर यांनी दिग्दर्शिक केलेल्या या स्पाय-अॅक्शन थ्रिलरमध्ये रणवीर सिंह,अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांसारखे एकापेक्षा एक वजनदार कलाकार होते. त्यात रणवीर सिंहने जबरदस्त काम केलं होतच, पण अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतने चित्रपटात जान आणली. या भूमिकेत त्याने दाखवलेला आब, रुबाब आयकॉनिक बनला. मुळात, कराचीमधल्या गुन्हेगारी जगतात घुसून आयएसआय आणि अंडरवर्ल्डचं जाळं आतून उद्ध्वस्त करणाऱ्या एका थरारक प्रवासाची कहाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरली.निर्माती ज्योती देशपांडे यांच्या मते, प्रेक्षकांनी हा चित्रपट वारंवार पाहिलाच, पण इतरांनाही बघण्याची शिफारस केली. या माऊथ पब्लिसिटीनेच ‘धुरंधर’ला ब्लॉकबस्टर बनवलं. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दशकांनंतर अशी घटना घडली.
सातासमुद्रापार झेंडा रोवला
बरं ‘धुरंधर’ने केवळ हिंदी पट्ट्यातल्या प्रेक्षकांना वेड लावलं नाही, दक्षिणेतही ही जादू चालली. जाणकारांच्या म्हणण्यानुसार इतर हिंदी चित्रपटांच्या तुलनेत हा प्रतिसाद तिप्पट अधिक होता. तर विदेशात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने जवळपास ३०० कोटींची कमाई केली. थिएटरमध्ये जोरदार प्रतिसाद मिळालेला ‘धुरंधर’ ओटीटीवरही धमाका करणार हे उघडच होतं. घडलंही तसंच. ३० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर झाला आणि अवघ्या एका आठवड्यात या चित्रपटाला तब्बल ७६ लाख व्ह्यूज मिळाले. हा प्रतिसाद इतका दणकेबाज होता, त्याने ‘अॅनिमल’ व ‘फायटर’ सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं. या शिवाय चित्रपटाच्या संगीतानेही स्पॉटिफायच्या जागतिक चार्टवर वर्चस्व गाजवलं.
धुरंधर का टाइम आयेगा
इतका मोठा प्रभाव राखून असलेला चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराच्या स्पर्धेत नसणं ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्यामुळे सांगणं इतकंच आहे, प्रेक्षकांनो थोडा धीर धरा, जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार समिती चित्रपटाच्या प्रमाणपत्र वर्षासाठीचं मूल्यांकन अधिकृतपणे सुरू करेल, तेव्हा ‘धुरंधर’ आपोआप त्या निवड प्रक्रियेत सामील होईल. या सगळ्याचा निचोड हाच आहे की, ‘धुरंधर’ राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेत उतरून इतर चित्रपटांकडून हरलेला नाही. तर कोविड काळामुळे झालेल्या वेळापत्रकातील बदलांमुळे तो पुढील वर्षाच्या चक्रामध्ये स्पर्धेत उतरून इतरांना जोरदार टक्कर देणार आहे.
