Heart Attack Risk डायबिटीज म्हणजेच मधुमेह ही समस्या केवळ रक्तातील साखरेशी संबंधित नसते, याचा शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होतो. बरेच लोक याबद्दल जागृत नसतात की, मधुमेह त्या रक्तवाहिन्या आणि नसांनाही इजा पोहोचवू शकतो ज्या हृदय आणि मेंदूला निरोगी ठेवतात. जेव्हा रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली असते, तेव्हा रक्तवाहिन्या कडक किंवा अरुंद होऊ शकतात आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
मात्र, रक्तातील साखरेवर सातत्यपूर्ण नियंत्रण, सकस आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी तपासणी याद्वारे हे धोके कमी केले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचे हृदय आणि मधुमेह दोन्ही नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि धूम्रपान सोडणे हीदेखील महत्त्वाची पावले आहेत. त्यामुळे कालांतराने तुमच्या हृदयाचे आरोग्य मजबूत होते आणि मधुमेहाशी संबंधित हृदयाच्या समस्यांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी करतात. मधुमेहाचा हृदयावर काय परिणाम होतो? कोणत्या पदार्थांचे सेवन घातक ठरू शकते? त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात…
हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर मधुमेहाचा होणारा परिणाम
तुमचे शरीर अन्नातील साखरेचे (ग्लुकोज) ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी इन्सुलिनचा वापर करते. ज्या व्यक्तींना मधुमेह असतो, त्यांचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा त्याचा योग्य वापर करू शकत नाही. यामुळे रक्तातील साखर वाढते आणि हळूहळू तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींना खराब करते. कालांतराने रक्तवाहिन्या अरुंद किंवा कडक होतात, परिणामी सुरळीत रक्तप्रवाह आणि महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन पोहोचवणे कठीण होते.
रक्तवाहिन्यांच्या आत चरबीचे थर (प्लाक) हळूहळू जमा होऊ शकतात, त्यामुळे अडथळे निर्माण होतात आणि सामान्य रक्ताभिसरणात व्यत्यय येतो. मर्यादित रक्तवाहिन्यांमधून रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागतात आणि त्यामुळे कालांतराने उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. मधुमेह असलेल्यांमध्ये उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि मूत्रपिंडाच्या समस्यांसारखी इतर लक्षणे असण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.
मधुमेह आणि हृदयविकार
मधुमेह असल्यास हृदयविकार किंवा स्ट्रोकची शक्यता जास्त असते, पण याचा अर्थ असा नाही की ते टाळता येत नाही. ‘एनआयएच’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मुख्य जोखीम घटकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- उच्च रक्तदाब: रक्तवाहिन्यांवर दबाव आणतो आणि कालांतराने त्यांना इजा पोहोचवतो.
- उच्च कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरतात.
- जास्त वजन (पोटाभोवतीची चरबी) : तुमच्या हृदयावर ताण वाढवते.
- धूम्रपान : रक्तवाहिन्यांना नुकसान करते आणि रक्तातील ऑक्सिजन कमी करते.
- व्यायामाचा अभाव : हृदयाची ताकद कमी करतो आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर परिणाम करतो.
- कौटुंबिक इतिहास : जर जवळच्या नातेवाईकांना हृदयरोग असेल, तर तुम्हाला जोखीमदेखील जास्त असते. यापैकी प्रत्येक घटक एकमेकांशी जोडलेला असू शकतो.
खाण्याच्या चुका वाढवतात हार्ट अटॅकचा धोका
नवी दिल्लीतील द्वारका येथे सराव करणारे आणि २४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले मधुमेह तज्ज्ञ डॉ. ब्रिजमोहन अरोरा यांनी अशा पाच मुख्य खाद्यपदार्थांची माहिती दिली आहे. हे खाद्यपदार्थ हृदयविकाराच्या झटक्यासाठी कारणीभूत ठरतात. २८ फेब्रुवारी रोजी शेअर केलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका कधीही येऊ नये असे वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारातून या पाच चुका टाळल्या पाहिजेत. या पाच चुका तुमच्या हृदयाला आतून हानी पोहोचवतात आणि लक्षणे सहसा हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळीच दिसतात. या पाच खाद्यपदार्थांच्या निवडीमुळे इंफ्लेमेशन आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि परिणामी हृदय आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.”
१. सीड ऑईल्स
डॉ. अरोरा मोहरी आणि सूर्यफूल तेलासारख्या रिफाइंड सीड ऑईल्सचा वापर मर्यादित करण्याचा सल्ला देतात. ते नमूद करतात की, याचे जास्त सेवन ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ वाढवू शकते आणि हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर ताण निर्माण करू शकते. ते रोजच्या स्वयंपाकासाठी लोणी, तूप आणि खोबरेल तेलासारख्या पारंपारिक स्निग्ध पदार्थांचा पर्याय सुचवतात.
२. पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ
पॅकेज्ड फूडमध्ये सामान्यतः आढळणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड कर्बोदके रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी अचानक वाढवण्यास कारणीभूत ठरतात. मधुमेह तज्ज्ञांच्या मते, वारंवार होणारी ही वाढ इंफ्लेमेशन निर्माण करू शकते आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतींच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकते. याव्यतिरिक्त, अतिरिक्त रिफाइंड कर्बोदके व्हिसेरल फॅट (पोटाची चरबी) साठवू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
३. साखरयुक्त पेये
कार्बोनेटेड आणि गोड पेयांमध्ये आढळणारी लिक्विड शुगर रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढवते आणि रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल (एचडीएल) कमी करते. डॉ. अरोरा यांच्या मते, यामुळे ट्रायग्लिसराइडची पातळीदेखील वाढते आणि हृदयाचे नुकसान होऊ शकते. ते स्पष्ट करतात, “मी अनेकदा मुलांना कोल्ड ड्रिंक्स, साखरयुक्त पेये, ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्स पिताना पाहतो. लिक्विड शुगर रक्तप्रवाहात अतिशय वेगाने प्रवेश करते आणि त्यामुळे साखर व इन्सुलिनमध्ये तीव्र वाढ होते. परिणामीचांगल्या कोलेस्टेरॉलमध्ये घट होते आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये वाढ होते व हृदयाला इजा पोहोचते.”
४. रिफाइंड ग्रेन्स
पास्ता, नूडल्स आणि ब्रेड यांसारखी प्रक्रिया केलेली कर्बोदके रिफाइंड धान्यांपासून तयार केलेली असतात. हे रिफाइंड ग्रेन्स पचनासंबंधित आरोग्यास लक्षणीयरीत्या हानी पोहोचवू शकतात. तज्ज्ञ स्पष्ट करतात की, नियमित सेवनामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि शरीरातील जळजळ वाढू शकते. या दोन्ही गोष्टी हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात. डॉ. अरोरा सांगतात, “चौथी चूक म्हणजे पास्ता, नूडल्स आणि ब्रेड यांसारख्या रिफाइंड धान्यांचे सेवन करणे. हे अत्यंत हानिकारक आहेत,” असे ते सांगतात,
५. प्रोसेस्ड मीट
डॉ. अरोरा सांगतात करतात की, सॉसेजसारखे प्रक्रिया केलेले मांस चयापचय आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. त्यामध्ये नायट्रेट्स, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचे प्रमाण जास्त असते. हे घटक हळूहळू हृदयविकाराच्या कार्यात अडथळा आणू शकतात आणि हृदयाचे एकूण आरोग्य बिघडवू शकतात. “पाचवी चूक म्हणजे प्रक्रिया केलेले मांस किंवा चिकन. यामध्ये नायट्रेट्स, सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचे प्रमाण जास्त असते.” मधुमेह तज्ज्ञ सांगतात, की अनेक मोठ्या अभ्यासांनी हे सातत्याने सिद्ध केले आहे की हे पाच खाद्यपदार्थ हृदयविकाराच्या झटक्यासाठी प्रमुख जोखीम घटक आहेत. त्यामुळे तुम्ही हृदयाच्या आरोग्यासाठी कितीही पूरक औषधे घेतली तरी, तुम्ही चुकीच्या आहाराचे दुष्परिणाम औषधांनी भरून काढू शकत नाही.
