Understand how modern diabetes drugs protect kidney functions and maintain creatinine levels: “डॉक्टर, माझं creatinine फार वाढलंय हो! तो डायाबिटीसचा किडनीचा आजार झाला का हो मला? म्हणजे संपलं ना सगळं?” तात्याकाकांनी काळजीने विचारले. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढलेले क्रिएटिनिन (Creatinine) आणि BUN नेहमीच चिंतेचा विषय ठरतात. मात्र, सध्या वैद्यकीय क्षेत्रात अशी आधुनिक औषधं उपलब्ध आहेत, जी केवळ साखरेवर नियंत्रण ठेवत नाहीत तर थेट तुमच्या मूत्रपिंडाची म्हणजेच किडनीची विशेष काळजी घेतात.
Creatinine फार वाढलंय
“डॉक्टर, माझं creatinine फार वाढलंय हो! तो डायाबिटीसचा किडनीचा आजार झाला का हो मला? म्हणजे संपलं ना सगळं? की हा खूप औषधं घेतल्याचा परिणाम आहे?” तात्याकाकांनी काळजीने विचारलं.
“थांबा. आधी मी नीट तपासतो तुम्हाला. मग रिपोर्ट बघूया,” डॉक्टर नेहमीच्याच धीरगंभीरपणाने म्हणाले.
“तुम्ही कधी पडलात? सगळं अंग ठेचाळलंय, काळंनिळं झालंय,” तात्याकाकांना तपासून डॉक्टरांनी विचारलं.
“परवा पडलो. बँकेच्या भोवती सगळं खोदून ठेवलंय. गेलो खड्ड्यात, न काय?”
मूत्रपिंडांची खुशाली जपणारी औषध
“ते वाढलेलं BUN आणि creatinine त्याच्यामुळेच आहे. एरवी तसं होऊ नये. तुमच्या गोळ्यांपैकी काही गोळ्या खास किडनीची काळजी घेणाऱ्याच आहेत.”
“तशाही गोळ्या असतात? ऐकावं ते नवलच !”
आपण INCRETINs कसं काम करतात ते बघितलं. त्यांच्या आतडं-मेंदू-पँक्रियास गप्पांचा मूत्रपिंडांना फायदा होतोच. पण खास मूत्रपिंडांची खुशाली विचारणारी, त्यांचं क्षेमकुशल जपणारी खास औषधंही आहेत.

मधुमेहात तसं कसं चालेल?
सुसंवाद साधताना कुणीतरी मूत्रपिंडांशीही बोलायला हवं. शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी empagliflozin (Oboravo, Vicra, Jardiance, इत्यादी), dapagliflozin (Oxra, Forxiga, Dapanum), canagliflozin (Sulicent, Canasmart, Glicana) वगैरे नावांची नवी औषधं मिळवली आहेत. मूत्रपिंडांतले SGLT2 नावाचे काटकसरी कामगार लघवीतून बाहेर जाणाऱ्या सोडियमला आणि साखरेला रोखतात. बाहेर जाऊ देत नाहीत. मधुमेहात तसं कसं चालेल?
रक्तातली साखर आपसूक कमी होते
Empagliflozinचे भाऊबंद त्या SGLT2 कामगारांचं काम बंद पाडतात. पँक्रियासला कुणकुणही लागू न देता रक्तातली साखर आपसूक कमी होते. साखर गेल्यामुळे वजन घटायला मदत होते. शिवाय सोडियमही कमी झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयावरचा भार घटतो. मूत्रपिंडांतल्या रक्तवाहिन्यांतला दाबही कमी झाल्यामुळे त्यांचीही निगा राखली जाते. मधुमेहासोबत जेव्हा मूत्रपिंडांचे आजार असतात, हृदय थकलेलं असतं तेव्हा या SGLT2 inhibitors गटाची औषधं मदत करतात. Empagliflozinचे भाऊबंद त्या SGLT2 कामगारांचं काम बंद पाडतात. पँक्रियासला कुणकुणही लागू न देता रक्तातली साखर आपसूक कमी होते. साखर गेल्यामुळे वजन घटायला मदत होते. शिवाय सोडियमही कमी झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयावरचा भार घटतो. मूत्रपिंडांतल्या रक्तवाहिन्यांतला दाबही कमी झाल्यामुळे त्यांचीही निगा राखली जाते. मधुमेहासोबत जेव्हा मूत्रपिंडांचे आजार असतात, हृदय थकलेलं असतं तेव्हा या SGLT2 inhibitors गटाची औषधं मदत करतात.
डीहायड्रेशन टाळण्यासाठी पाणी प्यायला हवं
या औषधांनाही दुर्गुण आहेतच. लघवीतून साखर जात राहिली तर त्या भागाला बुरशीची लागण(fungal infection) होऊ शकते. साखरमिठासोबत पाणीही जातं. डीहायड्रेशन टाळण्यासाठी पाणी प्यायला हवं. उपवास, आजार, शस्त्रक्रिया वगैरे आणीबाणीच्या वेळी ही औषधं बंद ठेवायला हवीत. ती डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज घेऊ नयेत.
सर्वात मोठा आघात रक्तवाहिन्यांवर…
मधुमेहात प्रतिकारशक्तीही खवळते. आपल्याच अवयवांशी झुंजते. त्याचा मूत्रपिंडांना मोठा त्रास होतो. Finerenone (Lyvelsa, Kerendia) हे औषध मूत्रपिंडांतली ती झुंज कमी करतं. मधुमेहाचा सर्वात मोठा आघात रक्तवाहिन्यांवर होतो. रक्तवाहिन्या विकृत झाल्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी कामातून जाणं, पायाला चिघळणाऱ्या जखमा किंवा गँग्रीन होणं, रेटीना (डोळ्यांतल्या मागच्या पटला)चे आजार हे सारं होतं. मूत्रपिंडातल्या गाळण्या रक्तवाहिन्यांच्याच बनलेल्या असतात. त्यांच्यातला दाब वाढला की त्या कायमच्या जायबंदी होऊ शकतात. Enalapril(Envas, Enpril, Myoace), telmisartan(Telma, Telsartan, Telista) यांच्यासारखी रक्तदाबावरची औषधं रक्तातला सोडियम कमी करून रक्तवाहिन्यांतला दाब कमी करतात. मूत्रपिंडातल्या गाळण्यांची, हृदयाची, मेंदूची, डोळ्यांची काळजी घेतात.
हृदय आणि मेंदूलाही फायदा होतो
मेंदूमधल्या केंद्रांकडून येणारे संदेश रक्तदाब वाढवतात. Moxonidine(Moxcent, Moxovas, Moxodip) मेंदूशी बोलून ते संदेश घटवतं. Statins(Atvas, Lipvas, Rosubest, Rosucor) सारखी कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं रक्तवाहिन्यांच्या भिंतीत कोलेस्टेरॉलचा साका बसू देत नाहीत आणि रक्ताच्या गुठळ्या टाळणाऱ्या clopidogrel(Clopivas, Anticlot, Aclotil) सारख्या औषधांमुळे वाहिन्यांत खपली धरत नाही. वाहिन्या अरुंद, घट्ट होणं टळतं. या सगळ्याचा मूत्रपिंडांना तर फायदा होतोच पण हृदयाला, मेंदूलाही होतो.
पेशंटच्या गरजा आणि प्रत्येक औषधाच्या खोडी
काही लोकांच्या शरीरात इन्सुलिनविरोधी चळवळ फारच जोरात चालते. तशा लोकांत चरबीची, लिव्हरची आणि स्नायूंची समजूत घालून त्यांना इन्सुलिनशी सलोखा करायला लावायचं काम करतात pioglitazone (Diavista, Euglim) सारखे thiozolidinedione गटाचे प्रतिनिधी. या औषधांमुळे काही लोकांचं वजन वाढतं, सूज येते आणि हृदयाचा थकवा (heart failure) वाढतो. म्हणून प्रत्येक पेशंटच्या गरजा आणि प्रत्येक औषधाच्या खोडी अशा सगळ्याचा विचार करून ज्याची औषधं त्याच्यासाठीच बेतावी लागतात.
भात-पोहे-इडली, चपाती-पाव-डोसा, गोडधोड असं खाल्लं की आतड्यातला Alpha-glucosidase हा कामगार त्या अन्नातली साखर रक्तात पोचवतो. मग रक्तातली साखर एकदम एव्हरेस्टच्या शिखरावर पोचते आणि पुढचं दुष्टचक्र सुरू होतं. Acarbose (Glucobay, Asucrose, Gludase) आणि voglibose(Cetapin -V, Vogo) ही औषधं आतड्यातल्या Alpha-glucosidaseला निकामी करतात. रक्ताकडे पोचायला घाईघाईने निघालेल्या साखरेच्या Formula One ला स्पीडब्रेकर लागतो. जेवल्यानंतरची साखरेची पातळी ताळ्यावर राहते तीसुद्धा पँक्रियासला तसदी न देता.
…अशा वेळी इन्सुलिन घ्यावं लागतं
… पण ती साखर आतड्यातच राहते. पोटात वारा धरतो, पोट फुगतं, दुखतं. कुठल्याही तणावपूर्ण स्थितीत रक्तातली स्टेरॉइडची पातळी वाढते. कधी इन्फेक्शन होतं. कधी काही ऑपरेशन करायचं असतं. कधी दुसऱ्याच एखाद्या दुखण्यासाठी स्टेरॉईड दिलं जातं. स्टेरॉइडमुळे रक्तातली साखर वाढते. तशावेळी सगळ्या गोळ्या व्यवस्थित चालू असतानाही इन्सुलिन घ्यावं लागतं.
इन्सुलिन घ्यावं लागलं म्हणजे मधुमेह बळावला, असं नाही
इन्सुलिनमुळे रक्तातली साखर स्नायूंमध्ये किंवा चरबीत वापरली जाते. दृष्टी, मूत्रपिंड, नसा, हृदय यांच्यावरचे मधुमेहाचे दुष्परिणाम इन्सुलिनमुळे आटोक्यात ठेवता येतात. रोजच्या जगण्यावरही इन्सुलिनचा चांगला प्रभाव पडतो. थकलेल्या पँक्रियासला थोडा हातभार लावायला कधीतरी इन्सुलिन घेण्यात वाईट काहीच नाही. ‘इन्सुलिन घ्यावं लागलं म्हणजे मधुमेह बळावला! माझं पथ्य सांभाळण्यात, औषधं घेण्यात कुठेतरी काहीतरी चुकलं असणार,’ अशी अपराधी वृत्ती बाळगू नये.
… तर मनस्ताप टळेल
गर्भवती स्त्रियांवर नव्या औषधांचा कसा परिणाम होईल याचा सांगोपांग अभ्यास अजून झालेला नाही. त्यांना इन्सुलिन देणं केव्हाही चांगलं. खलनायिकेच्या विसंवादी कारस्थानाला हाणून पाडायला शालूआत्यांच्या डॉक्टरांना एका दमात अनेक आघाड्यांवर चातुर्याने लढावं लागतं. ते डावपेच शालूआत्यांनी समजून, शिकून घेतले तर भलत्या काळज्या दूर होतील. मनस्ताप टळेल; मुलुखगिरी फत्ते होईल. मग शालूआत्या आपला आहार, जीवनशैली बदलून त्या औषधांच्या कामाला मजबूत हातभार लावतील. मधुमेहाला मुठीत ठेवतील.
