Diabetes and liver disease risk: गेल्या अनेक दशकांपासून, ‘टाईप २’ मधुमेहाच्या (T2D) रुग्णांना हृदय, मूत्रपिंड (किडनी) आणि डोळ्यांची काळजी घेण्याचा इशारा दिला जात आहे. मात्र, आता मधुमेहाच्या उपचारांमधील एक नवीन आणि धोकादायक ‘सायलेंट’ (लक्षात न येणारा) धोका समोर आला आहे. भारतातील वैद्यकीय तज्ज्ञ आता यकृताच्या आजाराबाबत धोक्याचा इशारा देत आहेत. तज्ज्ञांनी याला मधुमेहाचे Fourth major complication असे संबोधले आहे. ही अशी स्थिती आहे, जिथे कोणतेही लक्षण दिसण्यापूर्वीच यकृताचे कायमस्वरूपी (अपरिवर्तनीय) नुकसान झालेले असते.

चरबी साठण्यापासून ते सिरोसिसपर्यंत

मधुमेहामध्ये यकृताचा सहभाग असण्याचा प्राथमिक धोका म्हणजे त्याचे ‘छुपे’ स्वरूप. इतर आजारांप्रमाणे यामध्ये वेदना किंवा कोणतीही दृश्य लक्षणे दिसत नाहीत; यकृताचे नुकसान अनेकदा ‘उत्तम आरोग्याच्या’ मुखवट्यामागे लपलेले असते.

मधुमेह आणि यकृताचे आजार: तज्ज्ञांचा इशारा

फोर्टिस हॉस्पिटल (बेंगळुरू) येथील कन्सल्टंट हेपॅटोलॉजिस्ट डॉ. विनय कुमार बी. आर. सांगतात, ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (NAFLD) ज्याला आता ‘मेटाबॉलिक डिस्फंक्शन-असोसिएटेड स्टीटोटिक लिव्हर डिसीज’ (MASLD) असेही म्हटले जाते. हा कोणत्याही उघड लक्षणांशिवाय बळावू शकतो.

डॉ. कुमार यांनी इशारा देतात, “जेव्हा थकवा येणे, पोटात अस्वस्थ वाटणे किंवा लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये (LFT) दोष आढळणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा हा आजार आधीच गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो. यामध्ये यकृताला सूज येणे (Steatohepatitis), फायब्रोसिस किंवा लिव्हर सिरोसिस यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश असू शकतो.”

याच विषयावर अपोलो हॉस्पिटल (बेंगळुरू) येथील लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. प्रदीप कृष्ण यांनी अधिक माहिती दिली. त्यांच्या मते, आता व्हायरल हिपॅटायटीसपेक्षा मधुमेह आणि लठ्ठपणा ही यकृताच्या आजारांची प्रमुख कारणे ठरत आहेत.

ते सांगतात, “इन्सुलिन रेझिस्टन्समुळे (Insulin resistance) यकृतात चरबी साठते, ज्यामुळे सूज येते आणि यकृताला इजा पोहचते. यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर त्याचे रूपांतर ‘फायब्रोसिस’मध्ये होते.” त्यांनी यावर भर दिला की, उच्च जोखीम असलेल्या गटांमध्ये (High-risk groups) लवकर स्क्रिनिंग करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जीवनशैलीतील बदल आणि चयापचय (Metabolic) नियंत्रण याद्वारे आजाराची दिशा बदलता येऊ शकते.

इन्सुलिन रेझिस्टन्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस

पेशींच्या स्तरावर पाहिले तर, रक्तातील वाढलेली साखर आणि यकृताचे होणारे नुकसान यांचा थेट संबंध आहे. ग्लेनीगल्स हॉस्पिटल (फोर्टिस नेटवर्क) येथील कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. सोमा श्रीनिवास यांच्या मते, दीर्घकाळ रक्तातील वाढलेली साखर राहिल्यामुळे (Chronic Hyperglycemia) शरीरात ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ निर्माण होतो. ही प्रक्रिया यकृताच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला खिळखिळी करते, ज्यामुळे यकृताच्या पेशी मरू लागतात आणि तिथे सूज (Inflammation) येते.

डॉ. श्रीनिवास यांनी ९००० हून अधिक ‘टाईप २’ मधुमेहाच्या रुग्णांशी संबंधित एका धक्कादायक भारतीय संशोधनांचा दाखला दिला. या अभ्यासानुसार:

दर चारपैकी एका रुग्णामध्ये 'फायब्रोसिस'ची (यकृतावर जखमा होणे) लक्षणे दिसून आली.
दर २० पैकी एका रुग्णामध्ये 'सिरोसिस' (यकृताचे गंभीर नुकसान) होण्याची चिन्हे दिसली.
विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांमध्ये आजाराचे एकही लक्षण (Asymptomatic) दिसत नव्हते.

डॉ. विनय कुमार यांनी या प्रक्रियेचे अधिक स्पष्टीकरण दिले: “इन्स्युलिन रेझिस्टन्समुळे शरीर बाहेरील ऊतींमधील (Peripheral tissues) चरबी जाळण्याऐवजी ती अतिरिक्त चरबी यकृताकडे पाठवते.” यामुळे एक असे चक्र तयार होते जिथे यकृत हे चरबी साठवण्याचे कोठार बनते आणि त्यातून यकृताला कायमस्वरूपी सूज येते.

एका मोठ्या संकटाचा इशारा

भारत सध्या ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’च्या (NAFLD) एका “सायलेंट एपिडेमिक”चा (गुप्त महामारी) सामना करत आहे. याचा परिणाम देशातील ९% ते ३२% लोकसंख्येवर होत असून, एकूण मृत्यूंपैकी ६६% पेक्षा अधिक मृत्यूंना हा आजार कारणीभूत ठरत आहेत. या आजारांमुळे उपचारांचा खर्चही गगनाला भिडत आहे.

‘केअर हेल्थ इन्शुरन्स’चे मुख्य परिचालन अधिकारी (COO) मनिष डोडेजा सांगतात, “यकृताचे आजार आता केवळ एका मर्यादित जोखीम गटापुरते राहिलेले नाहीत, तर ते चिंताजनक पद्धतीने विस्तारत आहेत. रुग्णांच्या प्रकारात आणि आजाराच्या तीव्रतेत आम्हाला स्पष्ट बदल दिसून येत आहेत. अशा केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत असून, तरुण पिढीला याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी, सामान्य कुटुंबांना याचा खूप मोठा आर्थिक फटका बसतो आहे.”

ते पुढे सांगतात की, “हा केवळ वैद्यकीय प्रश्न नसून, तो आता एक गंभीर आर्थिक प्रश्न होत चालला आहे. त्यामुळे, व्यक्तींनी वेळोवेळी आपल्या आरोग्य विम्याचा (Health Coverage) आढावा घेणे आणि या वाढत्या जोखमींनुसार आपली विम्याची रक्कम (Sum Insured) वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत जागरूकता, रोगाचे लवकर निदान आणि आर्थिक नियोजन या तिन्ही गोष्टी हातात हात घालून चालणार नाहीत, तोपर्यंत जोखीम आणि नियोजन यांमधील दरी वाढतच राहील.”

प्रजनन क्षमता आणि यकृत: स्त्री-पुरुषांसाठी चिंतेचा विषय

यकृताचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता (Reproductive success) यांचा असलेला संबंध कदाचित सर्वांत आश्चर्यकारक आहे. विशेषतः ‘पीसीओएस’ (PCOS) असलेल्या महिलांमध्ये, फॅटी लिव्हरमुळे संप्रेरकांचे (Hormones) संतुलन बिघडू शकते. लिलावती हॉस्पिटल (मुंबई) आणि फोर्टिस हॉस्पिटल (दिल्ली) येथील कन्सल्टंट गायनॅकॉलॉजिस्ट आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश पै सांगतात, “महिलांमध्ये फॅटी लिव्हरचा संबंध थेट संप्रेरकांच्या संतुलनाशी असतो. ज्या महिलांना ‘पीसीओएस’ आणि अनियमित पाळीचा त्रास आहे, अशा रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. याचा परिणाम ओव्हुलेशनवर (अंडनिर्मिती) होतो आणि गर्भधारणेत अडचणी येतात.”

तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हरमुळे शरीरातील इन्सुलिन आणि नियमित मासिक पाळी आणि गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या हार्मोन्सच्या हाताळणीच्या क्षमतेवर परिणाम होतो. बैठे काम आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे ‘पीसीओएस’ आणि फॅटी लिव्हर ही एक सामायिक समस्या ठरत चालली आहे.

पुरुषांवरील परिणाम

हा धोका केवळ महिलांपुरता मर्यादित नाही. व्हीएनए (VNA) हॉस्पिटलचे युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. विनीत मल्होत्रा सांगतात की, यकृताच्या आरोग्याचा थेट परिणाम टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या पुरुषांमधील मुख्य संप्रेरकाच्या पातळीवर होतो. “फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणामुळे शुक्रजंतूंची संख्या (Sperm count) कमी होत आहे आणि त्यांची गुणवत्ताही खालावत आहे,”. संपूर्ण भारतात पुरुष प्रजनन क्षमतेत होणारी मोठी घट ही चिंतेची बाब आहे.

तरुण पिढीला मोठा धोका

ही “सायलेंट एपिडेमिक” (लक्षणे नसणारी महामारी) आता केवळ वृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ‘सेंटर फॉर लिव्हर-जीआय डिसीजेस अँड ट्रान्सप्लांटेशन’चे संचालक डॉ. सौरभ सिंघल सांगतात, “त्यांच्याकडे २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये फॅटी लिव्हरच्या केसेसमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. पूर्वी फॅटी लिव्हर प्रामुख्याने ज्येष्ठ रुग्णांमध्ये दिसायचे. पण आता बैठे काम आणि बिघडलेल्या आहार पद्धतीमुळे विशी-तिशीतील तरुणांमध्येही हे प्रमाण खूप वाढले आहे. भारतीय तरुणांमध्ये ही समस्या आता नेहमीचीच होत चालली आहे.”

‘सायलेंट डिसीज’ कडून रिकव्हरीकडे (सावरण्याकडे) वाटचाल

एशियन हॉस्पिटल (फरीदाबाद) येथील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे संचालक आणि विभाग प्रमुख डॉ. अमित मिगलानी सांगतात, “आमच्याकडे येणाऱ्या साधारण दर दुसऱ्या रुग्णाला कोणत्या ना कोणत्या स्तरावरील फॅटी लिव्हरचा त्रास असतो. अनेक लोकांना आपल्याला हा आजार आहे हे माहितीही नसते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची फार कमी लक्षणे दिसतात. म्हणूनच याला ‘सायलेंट डिसीज’ (लक्षणांविना आजार) म्हटले जाते.”

मधुमेहाच्या व्यवस्थापनात यकृताची तपासणी

तज्ज्ञांचे आता यावर एकमत झाले आहे की, मधुमेहाच्या नियमित उपचारांमध्ये यकृताच्या आरोग्याचा समावेश करणे अनिवार्य आहे. ज्युपिटर हॉस्पिटल (पुणे) येथील हेपॅटोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. पवन हंचनाळे यांनी सक्रिय तपासणीचे आवाहन केले आहे, “यकृताचा आजार ही एक जीवनशैलीशी संबंधित महामारी आहे. जर याचे निदान उशिरा झाले, तर त्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर आणि इतर अवयवांवरही होतो. ज्यांना लठ्ठपणा, मधुमेह आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात यकृताच्या आजाराचा इतिहास आहे, अशा जोखमीच्या गटातील लोकांनी दरवर्षी तज्ज्ञांकडून यकृताचे मूल्यमापन करून घेणे गरजेचे आहे.”

ग्लेनीगल्स बीजीएस हॉस्पिटल (बेंगळुरू) येथील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. निशचिता के. यांच्या मते, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये आता व्हायरल हिपॅटायटीसपेक्षा फॅटी लिव्हरचे प्रमाण अधिक आहे, ज्याचे निदान अनेकदा शेवटच्या टप्प्यात होते. “रक्तातील वाढलेली साखर आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे यकृताला सूज येते आणि तिथे जखमा (Scarring) होतात. त्यामुळे लठ्ठपणा असलेल्या रुग्णांच्या बाबतीत फॅटी लिव्हरच्या निदानासाठी ‘फायब्रोसिस स्कॅन’ आणि इमेजिंग चाचण्या मधुमेहाच्या उपचारांमध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत,” असा सल्ला त्या देतात.

या आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले, तर थोडे वजन कमी करणे, नियमित व्यायाम आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण (Glycemic control) मिळवून हा आजार पूर्णपणे बरा करता येतो.

तज्ज्ञांचे एकमत: प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय

सर्व तज्ज्ञांनी आता एकाच सूत्रावर भर दिला आहे: नियमित तपासणी, वजनावर नियंत्रण, रक्तातील साखरेचे व्यवस्थापन आणि शारीरिक चलनवलन.

यासाठी खालील तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत:

१. वजन व्यवस्थापन: योग्य आहार आणि वजनावर नियंत्रण.
२. साखरेवर नियंत्रण (Glycemic Control): रक्तातील साखरेची पातळी मर्यादेत ठेवणे.
३. शारीरिक हालचाल: नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली.

थोडक्यात संदेश स्पष्ट आहे; यकृताचा आजार स्वतःहून लक्षणे दाखवत नाही, त्यामुळे लक्षणांची वाट न पाहता आजच सावध व्हा आणि प्रतिबंधात्मक पावले उचला.