Learn how to control blood sugar and prevent diabetes naturally with this Marathi guide: “माझं वजन आटोक्यात आहे, मग मला मधुमेहाची भीती कशाला?” असा विचार तुम्हीही करत असाल, तर सावधान! वैद्यकीय भाषेत याला ‘वादळापूर्वीची शांतता’ म्हणतात. रक्तातील साखर वाढल्याचे रिपोर्ट येण्यापूर्वीच शरीरात मधुमेहाची मुळं घट्ट झालेली असू शकतात.

वादळापूर्वीची शांतता

“हो, पोटाचा घेर वाढलाय खरा पण मला मधुमेह, रक्तदाब काही नाही. माझं वजनही अगदी आटोक्यात आहे. मग वडे-गुळवणी चापायला काय हरकत आहे?” म्हणत केशवरावांनी जेवणावर आडवा हात मारला.  त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. पण ती वादळापूर्वीची शांतता (pre-diabetes) होती. रक्तात साखर वाढल्याची घोषणा करणारा पहिला रिपोर्ट येण्याच्या आधीच देहद्रोही कटाची पाळंमुळं शरीरभर पसरलेली असतात. 

…तपासणीत साखर वाढलेली दिसते

त्या घेर वाढलेल्या पोटातल्या गलेलठ्ठ झालेल्या चरबी-पेशी आतंकवादी होतात. त्या आपल्या दुष्ट निरोप्यांना शरीरभर पाठवतात. ते निरोप्ये लिव्हर, मूत्रपिंड, स्नायू वगैरेंच्या पेशींचे कान फुंकतात आणि त्यांना इन्सुलिनशी असहकार पुकारायला लावतात. रक्तातली साखर पेशींमध्ये शिरू शकत नाही; रक्तातच वाढत राहते. त्याच्यावर मात करायला पॅन्क्रियास जीव तोडून अधिकाधिक इन्सुलिन तयार करतो. साखर नॉर्मल ठेवायला झटतो. शेवटी बापडा त्या चढाओढीत थकतो. तेव्हा कुठे तपासणीत साखर वाढलेली दिसते.

ADVANCED GLYCATION ENDPRODUCTS - AGEs
ADVANCED GLYCATION ENDPRODUCTS – AGEs

रक्तवाहिन्या कायमच्या अरुंद होतात

“शेखर, ही सहावी वाटी बासुंदीची! शिवाय जिलब्याही खाल्ल्यास! साखर वाढेल ना!”
“त्यात काय? डॉक्टरांच्याकडे पुढच्या आठवड्यात जायचंय. उद्यापासून कडक पथ्य पाळणार मी. एकदम नॉर्मल येणार साखर.”
गोडधोडावर ताव मारल्यावर वाढलेली साखर डॉक्टरांना कळली नाही तरी शरीराला कळते. आपल्या शरीरातली सगळी कामं करणारे कामगार म्हणजे आपली प्रथिनं (प्रोटीन्स). काही काळापुरती वाढली तरी ती साखर, गोड-घोड-नवरी त्या प्रथिन-कामगारांच्या गळ्यात पडते. त्या गळामिठीने ते कामगार कामातून जातात. शरीराची कामं बिनसतात. प्रथिनांची घडी बिघडते, ती वेडीवाकडी होतात. रक्तवाहिन्यांच्या भिंतींतली प्रथिनं तशी बिघडली की त्या भिंती जाड, घट्ट होतात. रक्तवाहिन्या कायमच्या अरुंद होतात.  त्यांच्यातल्या रक्ताचा दाब वाढतो. अवयवांच्या गरजेनुसार त्या प्रसरण पावू शकत नाहीत. अधिकची गरज भागवली जात नाही. 

SUGAR EMBRACING A PROTEIN
SUGAR EMBRACING A PROTEIN

रक्तवाहिन्यांचा छुपा आजार

साखरबाधा म्हणून चारचौघांत मिरवणारा मधुमेह हा साखरेचा आजार नसून रक्तवाहिन्यांचा छुपा आजार आहे. वजन आटोक्यात आहे असं वाटत असतानाही तो होऊ शकतो. 
रक्ताच्या तपासणीत वाढलेल्या साखरेची कुणकुण लागण्याच्या आधीच तशा सगळ्या देहव्यापी घातपातांची जय्यत पूर्वतयारी झालेली असते. सडपातळ वाटणाऱ्या भारतीयांमध्येही 

  • १. इन्सुलिनविरुध्द असहकार(insulin resistance), 
  • २. प्रौढपणीचा मधुमेह(T2DM), 
  • ३. रक्तात वाढलेली दुष्ट चरबी(dyslipidaemia), 
  • ४. घट्ट, अरुंद रक्तवाहिन्या (atherosclerosis) आणि 
  • ५. लिव्हरमध्ये ठासून भरलेली चरबी(fatty liver)
  • ही पापी पंचायत सर्रास हजेरी लावते.

मग अवयवांची ताकद घटते!

आतंकवादी निरोप्ये शरीराच्या प्रतिकारशक्तीला भडकावतात. ती जिथे तिथे मारामाऱ्या करते (inflammation). रक्तवाहिन्यांत जखमा होतात, खपल्या धरतात, त्या निघतात. रक्तस्राव होतो. तिथे मोठ्या खपल्या धरतात. रक्तवाहिन्या चिंबतात. तसं हृदयात, मेंदूत झालं की त्या अवयवांची ताकद घटते. पाय सुजतात, धाप लागते, बुद्धिमांद्य येतं. मोठीशी वाहिनी चिंबली तर हार्ट ॲटॅक येतो, स्ट्रोक होतो. कधी मोठी खपली उचकटून मेंदूत रक्तस्राव होतो. मूत्रपिंडातल्या, लघवी तयार करणाऱ्या गाळण्या रक्तवाहिन्यांच्याच बनलेल्या असतात. असल्या हाणामारीने त्यांचं काम बिनसतं. 

DIABETIC RETINOPATHY
DIABETIC RETINOPATHY

डोळ्यासमोर काळे डाग येतात

डोळ्याच्या मागच्या पटलातल्या रक्तवाहिन्या आकसल्या की आतंकवादी निरोप्ये तिथे नव्या वाहिन्या बनवायचे हुकूम देतात. त्या नव्या वाहिन्या विकृत, कमकुवत असतात. त्यांच्यातून पाणी बाहेर झिरपतं; सूज येते. त्या वाहिन्या सहज फुटतात, रक्तस्राव होतो. डोळ्यासमोर काळे डाग दिसायला लागतात. तिथे वण झाले की ते नेत्रपटलाला खेचतात. नेत्रपटल मागून निसटतं (Retinal detachment). आणीबाणीची वेळ येते.

ATHEROSCLEROSIS PATHOPHYSIOLOGY
ATHEROSCLEROSIS PATHOPHYSIOLOGY

नसांभोवती सूज येते

“माझ्या तळपायांची आगआग होते”, “”माझे पाय रात्री फार दुखतात”, “माझ्या पायात काटा रुतला, रक्त आलं. पण मला जाणवलंच नाही”.  या तिघां तक्रारकर्त्यांमध्ये एकच गोष्ट समान होती. तिघांनाही मधुमेह होता. 
नसांनाही रक्तपुरवठ्याची गरज असतेच. त्यांच्याकडच्या रक्तवाहिन्या चिंबल्या की त्याही घुसमटतात. ती खलनायिका साखर जशी प्रथिनांच्या गळ्यात पडते तशीच मायावी रूप घेऊन (sorbitol) नसांना बिलगते; नसांभोवती सूज येते. नसा आवळल्या जातात. तो दाब आणि घुसमट यांनी नसांना इजा होते. हातापायांच्या बोटांपर्यंत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या नसांना सर्वात जास्त त्रास होतो. त्या घुसमटणाऱ्या, दबलेल्या नसा तक्रार करतात. ती तक्रार म्हणजेच आग होणं, वेदना. तसंच चालू राहिलं तर नसा जायबंदी होतात. संवेदना नाहीशा होतात.

वेदना न जाणवता, जीवाशी खेळ

मग पायांना झालेल्या जखमा समजतही नाहीत. रक्तपुरवठा कमी असल्याने जखमा बऱ्या होत नाहीत, वाढतात, चिघळतात. तिथलं इन्फेक्शन आणि कमी रक्तपुरवठा यामुळे तो भाग मरतो. गँग्रीन होतो. कधी कधी पाय कापावा लागतो. हृदयाच्या संवेदनावाहक नसाही तशा जायबंदी होतात. मग हार्ट ॲटॅक आला तरी गपगुमान येतो; वेदना न जाणवता जिवाशी खेळ होतो.

भारतीयांची गणितं वेगळी

शिवाय आपण भारतीय शिडशिडीत दिसतो. पण पाश्चात्यांच्या तुलनेत आपल्या अंगावर चरबी अधिक आणि स्नायू कमी असतात. बाकीचं शरीर शिडशिडीत असतानाही पोटात चरबीचा साठा करणं ही तर आपली भारतीयांची खासियत आहे (Thin Fat Indian किंवा Thin Outside Fat Inside). म्हणूनच आपली वजनाची गणितं पाश्चात्यांहून वेगळी असतात. 

bloating-and-Belly-fat
Belly Fat

तयारी पंचविशीतच सुरू करायची

त्यामुळेच आपल्याला, भारतीयांना चाळीशीची वाट न बघता आधीपासूनच सावध राहणं गरजेचं असतं.
आपली पूर्वतयारी आतंकवाद्यांच्या आधीच, वयाच्या पंचविशीतच सुरू करायची. १. जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असला, २. पोट पुढे आलेलं असलं, ३. जीवनशैली बैठी असली आणि ४. आपलं जन्मतःचं वजन फार कमी असल्याचं ऐकिवात असलं तर मात्र अठराव्या वर्षापासूनच सावध राहायचं. 

म्हणजे काय करायचं?

क. प्राथमिक पाहणी  
१. पोटाचा घेर मोजायचा.

सर्वात खालची फासळी आणि कमरेचं हाड यांच्या मधोमध पोटाचा घेर मोजायचा. तो पुरुषांच्यात ९० सें. मी.पेक्षा आणि बायकांच्यात ८० सें.मी.पेक्षा कमी असायला हवा.

 २. शरीराच्या वस्तुमानाचा निर्देशांक(BMI) मोजायचा 
बीएमआय = (किलोमध्ये मोजलेलं वजन) भागिले (मीटरमध्ये मोजलेल्या उंचीचा वर्ग) {BMI = [Wt in Kg] / [(Ht in Meters)2]}.  भारतीयांचा BMI तेवीसच्या खाली असायला हवा. 

३. जीवनशैलीचा अंदाज घ्यायचा.

  • आपण बराचसा काळ बसून असतो का? गोडधोड, पिष्टमय पदार्थ अधिक खातो का? रात्री टीव्ही, मोबाईलच्या नादात कमी झोपतो का? मद्य, धूम्रपान यांच्याशी आपल्याला काही देणंघेणं आहे का? या प्रश्नांचं उत्तर होकारार्थी असलं तर ती चूक दुरुस्त करायचे आटोकाट प्रयत्न करायचे. 
  • ‘क’ गटात काहीही आक्षेपार्ह आढळलं तर पापी पंचायतीचा वेध घेणाऱ्या तपासण्या करून घ्यायच्या: 
  • ख. सुरुवातीच्या तपासण्या 
  • १. FBS रिकाम्या पोटी रक्तातली साखर 
  • २. HbA1C गेल्या तीन महिन्यांतल्या साखरेचा आढावा 
  • ३. Lipid profile रक्तातल्या चरबीचं, तैलगटांचं प्रमाण  

या तीन तपासांअंती काही गडबड जाणवली तर 

ग. तपासण्यांची, लिव्हर आणि मूत्रपिंडाचे हालहवाल जाणून घेणारी पुढची पायरी गाठायची 
१. Liver enzymes लिव्हरच्या स्रावांचा अभ्यास
२. Liver ultrasound लिव्हरचा स्वनातीत तपास 
३. Microalbuminuria लघवीतल्या प्रथिनांचा सुगावा घेणं 
४. रक्तदाब मोजणं 

लिव्हरवर, मूत्रपिंडांवर होणाऱ्या दुष्परिणामांची चाहूल या तपासण्यांनी लागते. आतंकवादी कारस्थानाचा जम बसण्यापूर्वीच त्याच्या मोर्चेबांधणीचा सुगावा लागतो.

या सगळ्या तपासांत काही धोक्याची सूचना मिळाली तर प्रामाणिकपणे जीवनशैली सुधारायची, वजन खाली आणायचं, नियमितपणे पुरेसा व्यायाम करायचं कठोर व्रत स्वीकारायचं आणि दर वर्षी सगळे तपास नव्याने करायचे. आणि फक्त पोटाचा घेर मर्यादेच्या बाहेर वाढलेला असला तर? तर ‘माझं सगळं नॉर्मल आहे,’ या भ्रमात राहायचं नाही. वजन वाढायची, रक्तदाब वाढायची वाट बघत थांबायचं नाही. बाकी सगळं आलबेल असलं, वजन व्यवस्थित आटोक्यात असलं तरीसुध्दा पापी पंचायतीपासून दूर राहाणं अत्यावश्यक आहे. म्हणून  सगळ्या लंबोदरांनी पोट कमी करायला झटायचं आणि दर दोन वर्षांनी तपासण्या करून घ्यायच्याच. 

पोट कमी करायला झटायचं

मधुमेह टाळायचे सावधगिरीचे उपाय समजले. पण मधुमेह झाला असला तर काय? सगळं आयुष्य फुकट गेलं का? मुळीच नाही. तेच तर आपण पुढच्या लेखात बघणार आहोत.