Discover the complete Diabetes Test List and why tracking HbA1c Creatinine Levels is critical for long-term health: “डॉक्टर, माझ्या पायांना सूज येते आणि सहज केलेल्या रक्ततपासणीत creatinine वाढलंय असा रिपोर्ट आहे,” मधुराताई काळजीच्या स्वरात डॉक्टरांना सांगत होत्या. अनेक मधुमेही रुग्णांचा असा गैरसमज असतो की, एकदा गोळ्या सुरू झाल्या आणि घरच्या ग्लुकोमीटरवर साखर सामान्य दिसली की मधुमेह नियंत्रणात आहे. परंतु, हा शत्रू एकाच वेळी शरीराच्या अनेक अवयवांवर छुपा हल्ला करत असतो.
…तरच मधुमेह आपल्या कह्यात राहाणार!
“डॉक्टर, माझ्या पायांना सूज येते आणि सहज केलेल्या रक्ततपासणीत creatinine वाढलंय असा रिपोर्ट आहे,” मधुराताई काळजीत होत्या.
“तुम्हाला मधुमेह आहे का?”
“हो. दहा वर्षांपूर्वी मालाडचे पाटील डॉक्टर म्हणाले होते. त्यांनी त्यावेळी गोळ्या लिहून दिल्या होत्या. त्या तेव्हापासून नेमाने घेतेय मी,” आदर्श आज्ञाधारक पेशंट म्हणून मधुराताईंनी स्वतःचीच पाठ थोपटली.
“दहा वर्षांत अधेमधे तपासण्या केल्याच असतील ना? डॉक्टरांनी औषधं बदलली नाहीत का?” आता डॉक्टरांनी काळजीने विचारलं.
“नाही त्या डॉक्टरांकडे परत गेलेच नाही. काही त्रासच नव्हता. मुलुंडला आल्यापासून साधी सर्दीतापाची औषधं तेवढी घ्यावी लागली.”
“रक्तातली साखर सुध्दा तपासली नाही का?”
“घरी ग्लुकोमीटर आहे. त्याच्यावर ११०-१२० असायची साखर. म्हणजे कंट्रोलमध्येच होता ना?”
अनेक मधुमेही रुग्णांचा तसा गैरसमज असतो, ‘एकदा निदान झालं आणि गोळ्या ठरल्या की त्या इमानेइतबारे जन्मभर घ्यायच्या! घरच्याघरी ग्लुकोमीटरवर साखर चेक करायची. ती व्यवस्थित राहावी म्हणून पथ्य सांभाळायचं. तेवढं केलं की मधुमेह आपल्या कह्यात राहाणार.’

योग्य रुग्णाला, योग्य वेळी, योग्य प्रमाणात औषधं
मधुमेहाला काबूत ठेवणं तेवढं सोपं नाही. तो शत्रू एकाच वेळी शरीराच्या अनेक वेगवेगळ्या आघाड्यांवर हल्ला करतो, सातत्याने करत राहतो. त्या सगळ्या आघाड्यांवर त्याच्याशी झुंजणारी औषधं आता डॉक्टरांकडे आहेत. पण ती औषधं योग्य रुग्णाला, योग्य वेळी, योग्य प्रमाणात देण्यासाठी त्या सगळ्या आघाड्यांची खबर नियमितपणे घेत राहणं आणि त्या खबरीनुसार, वेळोवेळी, उपाययोजना बदलत राहणं गरजेचं असतं.
रुग्णाने सदैव दक्ष राहणं महत्त्वाचं…
म्हणजेच, एकदा मधुमेहाचा सुगावा लागला की, रुग्णाने सदैव दक्ष राहणं महत्त्वाचं असतं. त्याने स्वतःच स्वतःच्या प्रकृतीवर, काही महत्त्वाच्या गोष्टींवर जागरूकपणे लक्ष ठेवायला हवं. कसलाही त्रास जाणवत नसला तरीसुद्धा काही तपासण्या न चुकता, पुन्हा पुन्हा, वेळच्या वेळी करायला हव्या. जे काही निदर्शनाला येईल ते डॉक्टरांच्या कानावर घालून त्यांनी दिलेला नवा सल्ला आचरणात आणायला हवा.
कुठल्या महत्त्वाच्या आघाड्यांवर नियमितपणे लक्ष ठेवायला हवं?
१. वजन आणि पोटाचा घेर
लठ्ठपणा आणि पोटचरबी हे मधुमेहाचं मूळ आहे. वजन आणि पोटाचा घेर दर दोन आठवड्यांनी पाहावा. त्या मोजमापांची कॅलेंडरवर नोंद करावी. दोन्ही मोजमापांचा आलेख चढता असला तर मनात धोक्याची घंटा वाजायला हवी.
२. रिकाम्या पोटी, भरल्या पोटी रक्तातल्या साखरेचं मोजमाप
इन्सुलिनचं योग्य प्रमाण ठरेपर्यंत दिवशी चार वेळासुद्धा रक्तातली साखर तपासावी लागते. काही दिवस घरच्या ग्लुकोमीटरवर तसं रोज मोजमाप केलं तर याने आपण काय आणि किती प्रमाणात खाल्लं की साखर बरोब्बर आटोक्यात राहते त्याचा अंदाज येतो.
इन्सुलिन किंवा Daonil, Euglucon, Diamicron यांच्यासारखी रक्तातलं इन्सुलिनचं प्रमाण वाढवणारी औषधं चालू असली तर ग्लूकोमीटरवर सगळं आलबेल असतानाही निदान सहा महिन्यातून एकदा तरी तो तपास लॅबोरेटरीतून करून घ्यावा. त्यावरून घरच्या ग्लूकोमीटरचं काम व्यवस्थित चालल्याचीही खात्री होईल.
Gluconorm, Okamet, Mounjaro, Ozempic यांच्यासारखी औषधं इन्सुलिनचं प्रमाण वाढवत नाहीत. त्यांनी रक्तातली साखर कोसळत नाही. ती चालू असताना ग्लुकोमीटरवर साखर दिवसातून एकदा पण रोज वेगवेगळ्या वेळी तपासली की बस्स झालं.
३. HbA1c
पथ्य पाळताना अधेमधे केलेली टंगळमंगळ अचूक पकडणारा हा जासूस. उपचारांत काहीही फेरफार होत असले तर याला दर तीन महिन्यांनी कामाला लावावा. सारं काही आलबेल असलं तर सहा महिन्यांतून एकदा पुरे. पण HbA1c रक्तातल्या हिमोग्लोबीनच्या पातळीवर अवलंबून असतं. गर्भारपणात, अॅनिमियात, कधी नुकतं ब्लड ट्रान्सफ्यूजन दिलेलं असलं तर त्याची जासूसी निष्फळ ठरते. शिवाय गेल्या तीन आठवड्यातलंच कुपथ्य शोधायचं असलं तर ते त्याला जमत नाही. म्हणून तीनच आठवड्यांतली गडबड शोधायची असली तर Serum fructosamine नावाची वेगळी तपासणी करता येते.
४. रक्तदाब(Blood pressure)
मधुमेही लोकांमध्ये उच्च रक्तदाब (High blood pressure)चं प्रमाण मोठं असतं. त्याचा हृदय, मेंदू, मूत्राशय, डोळे या सगळ्यांवर दुष्परिणाम होतो. म्हणून घरच्या यंत्रावर रक्तदाब रोजच तपासावा आणि सहा महिन्यांतून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासून घ्यावा आणि घरच्या यंत्राच्या कामाचा ताळा करावा.
५. चरबी(Lipids)
रक्तातल्या कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्स आणि HDL यांची तपासणी साधारण ६ महिन्यांतून एकदा करावी. त्यांची पातळी योग्य सांभाळली तर हृदयविकार, स्ट्रोक्स वगैरेंची शक्यता कमी होते.
हृदय, मेंदू , हातापायांच्या रक्तवाहिन्या, हातापायांच्या नसा, पावलं, त्वचा, मूत्रपिंड, डोळे, दात आणि हिरड्या या गोष्टींसाठी निदान ६ महिन्यांतून एकदा डॉक्टरांकडून तपासून घ्यावं.
पण अधेमधे स्वतःवर सतत बारीक लक्ष ठेवावं.
- १. छातीत दुखणं, धडधडणं, धाप लागणं, अकारण थकवा येणं वगैरेंकडे दुर्लक्ष करू नये.
- २. एकाएकी हाता-पायातली ताकद कमी होणं, बोबडी वळणं, तोल जाणं, दृष्टिदोष होणं ही सगळी आणीबाणीची लक्षणं असतात. शिवाय स्मरणशक्ती, एकाग्रता, चित्तवृत्ती आणि झोप यांच्यातल्या फेरफारांकडेही दुर्लक्ष होता नये.
- ३. चालताना पायांत पेटके येणं, पाय थंडगार पडणं, जखमा चिघळणं ही रोहिण्या आक्रसल्याची लक्षणं. तशा स्थितीत हातापायांची नाडी लागत नाही. त्यासाठी डॉक्टरांचं मत तर घ्यावंच पण त्या रुग्णांनी चालणं थांबवू नये. जमेल तेवढं चालत राहिलं तर पायात नव्या रोहिण्या तयार व्हायला मदत होते.
- ४. बोटांना मुंग्या, झिणझिण्या येणं, ती बधिर होणं, जखमेने वेदना न होणं ही गंभीर लक्षणं आहेत.
- ५. एरवी आपण चेहऱ्याची जेवढी आणि जशी काळजी घेतो तेवढी आणि तशी काळजी मधुमेहात पावलांची घ्यावी. घरातल्या घरातसुद्धा अनवाणी चालू नये. नेहमी आरामदायी, सैलसर जोडे घालावे. मधुमेहात तळपाय भेगाळतात, त्यांना घट्टे पडतात, फोड येतात, चिखल्या होतात, नखं जाड, पिवळी, ठिसूळ होतात; त्यांच्याभोवताली लालसर सूज येते. त्याच्यावर तत्काळ इलाज व्हायला हवा.
- ६. मधुमेहात त्वचेला गजकर्ण, नायटा, गळवं, यांच्यासारख्या व्याधी होतात. खाज येते. इन्सुलिनशी असहकार पुकारल्यामुळे काखेत-जांघेत जाड काळे चट्टे(acanthosis nigricans) येतात. गळवं, चिघळून पिकलेली जखम वगैरे कुठल्याही जंतुलागणीवर तत्परतेने उपचार झाले नाहीत तर ते दुखणं झपाट्याने विकोपाला जाऊ शकतं. त्याच्यावर इलाज करायला दिरंगाई करू नये.
- ७. मधुमेहात मूत्रपिंडांवर झालेला दुष्परिणाम कित्येक वर्षं लक्षात येत नाही. मूत्रपिंडाच्या कामावर अवलंबून असलेले रक्तातले creatinine सारखे घटक आणि मूत्रपिंडांच्या कामाचा आवाका जोखणारे GFR सारखे निदर्शक वेळोवेळी तपासत राहायला हवं.
- ८. डोळ्यांवरचा मधुमेहाचा परिणामही बिनबोभाट वाढत जातो. म्हणून बुबुळं मोठी करून डोळ्यांच्या मागल्या पटलाचं काळजीपूर्वक निरीक्षण वरचेवर होणं गरजेचं असतं. डोळ्यात नाचरे काळे डाग दिसणं, अंधुक दिसणं, समोरच्या वस्तू किंवा अक्षरं वेडीवाकडी दिसणं किंवा एकाएकी दृष्टी जाणं अशी लक्षणं दिसली तर डोळ्यांच्या डॉक्टरांना तातडीने दाखवून घ्यावं.
- ९. हिरड्या सुजणं, त्यांच्यात पू होणं हे मधुमेहात बऱ्याचवेळा बघायला मिळतं आणि त्या आजारांमुळे मधुमेहाला आटोक्यात ठेवणं कठीण होतं. नित्यनेमाने दातांची तपासणी करून घेऊन त्या आजारांना दूर ठेवणं उत्तम.
अनेक आघाड्यांवर कडक पहारा
चांदबीबी एकाच आघाडीवर लढली. मधुमेहाशी लढताना अनेक आघाड्यांवर सतत कडक पहारा ठेवावा लागतो. आता आपल्याकडे त्या वेगवेगळ्या आघाड्यांवर विशेष कुरघोडी करणारी Ozempic, Mounjaro, Oboravo यांच्यासारखी अतिरथी, महारथी औषधं आहेत. त्यांच्या मदतीने मधुमेहाचा प्रत्येक उठाव वेळीच नेस्तनाबूत करणं आता शक्य वाटतं आहे. पण आधीपासून काळजी घेऊन तो उठावच मुळात टाळणं हा मधुमेहावरच्या उपायांचा नवा मूलमंत्र आहे.
