Diabetic Insulin in India : रोजचे इन्सुलिन इंजेक्शन, त्याचे वेळापत्रक आणि त्याचा मानसिक ताण… या सगळ्यांपासून दिलासा देणारी नवी उपचारपद्धती आता भारतात उपलब्ध झाली आहे. आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावे लागणारे जगातील पहिले दीर्घकालीन इन्सुलिन इंजेक्शन भारतात सादर करण्यात आले आहे. भारतीय मधुमेहींसाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे आणि सोईस्कर होणार आहे.

डॅनिश औषधनिर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘नोवो नॉर्डिस्क’ने गुरुवार, ९ जुलै रोजी भारतात साप्ताहिक इन्सुलिन इंजेक्शन सादर केले. आयकोडेक नावाचे हे औषध ‘अविकली’ या ब्रँडच्या माध्यमातून प्रति आठवडा फक्त २६१ रुपयांना विकले जाणार आहे. या इंजेक्शनचा प्रभाव संपूर्ण आठवडा टिकत असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना दररोजच्या इंजेक्शनऐवजी आठवड्यातून फक्त एकच इंजेक्शन घ्यावे लागणार आहे.

‘नोवो नॉर्डिस्क इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिया यांच्या मते, इन्सुलिनच्या उपचारपद्धतीत गेल्या शतकभरात सातत्याने मोठे बदल होत गेले आहेत. सुमारे १०० वर्षांपूर्वी इन्सुलिनचा शोध लागण्यापूर्वी मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील कॅलरीजचे सेवन कमी करावे लागत होते. त्यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती अधिक खालावत असे. त्यानंतर अल्प काळासाठी प्रभावी ठरणाऱ्या इन्सुलिनपासून १२ तास परिणाम करणाऱ्या इन्सुलिनपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास ४० वर्षे लागली. पुढे दिवसातून एकदाच घेता येणारे इन्सुलिन विकसित झाले. आता त्यानंतर सुमारे दोन दशकांनी आठवड्यातून केवळ एकदाच घ्यावे लागणारे इन्सुलिन उपलब्ध झाले आहे.

श्रोत्रिया यांनी सांगितले की, या नव्या उपचारपद्धतीमुळे वर्षभरात घ्याव्या लागणाऱ्या इन्सुलिनच्या इंजेक्शनची संख्या ३६५ वरून केवळ ५२ वर येणार आहे. त्यामुळे रुग्णांसाठी उपचार अधिक सोपे होण्याची अपेक्षा आहे.

इंजेक्शन कसे काम करते?

आठवडाभर प्रभावी राहणारे हे आयोडेक इन्सुलिन विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मानवी इन्सुलिनमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.

पहिला बदल म्हणजे इन्सुलिनच्या रेणूला फॅटी अॅसिडची साखळी जोडण्यात आली. त्यामुळे ते रक्तातील अल्ब्युमिन नावाच्या प्रथिनाशी जोडले जाते. इंजेक्शन दिल्यानंतर इन्सुलिन लगेच पूर्णपणे रक्तात मिसळत नाही. अल्ब्युमिनशी जोडले गेल्यामुळे शरीरात त्याचा एक प्रकारचा निष्क्रिय साठा तयार होतो आणि तेथून इन्सुलिन संपूर्ण आठवडाभर हळूहळू रक्तात सोडले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो.

दुसरा बदल म्हणजे इन्सुलिनच्या रचनेतील तीन अमिनो आम्लांमध्ये (Amino Acids) बदल करण्यात आले. त्यामुळे इन्सुलिन शरीरातील पेशींवरील रिसेप्टर्सशी तुलनेने हळूहळू जोडले जाते. परिणामी, शरीर इन्सुलिनचा वापरही टप्प्याटप्प्याने करते आणि त्याची परिणामकारकता टिकून राहते.

दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील एंडोक्रिनोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. व्ही. मधू यांच्या मते, “या नव्या औषधाचा रक्तातील साखर नियंत्रणावर होणारा परिणाम इतर इन्सुलिनप्रमाणेच आहे. मात्र, याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे रुग्णांना वारंवार इंजेक्शन घ्यावे लागणार नाही. त्यामुळे उपचार नियमितपणे सुरू ठेवणे रुग्णांसाठी अधिक सोपे होईल.”

दरम्यान, ‘नोवो नॉर्डिस्क इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिया नमूद केले की, अधिक प्रभावी मधुमेह व्यवस्थापनासाठी नवीन उत्पादने उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे. भारतातील मधुमेही रुग्णांचा HbA1c (मागील सुमारे तीन महिन्यांतील रक्तातील साखरेच्या सरासरी पातळीचा निर्देशांक) हा सरासरी स्तर ८.९ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

सामान्य इन्सुलिनपेक्षा ‘आयकोडेक’ वेगळे कसे?

आयकोडेक हे मानवी इन्सुलिनवर आधारित जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे विकसित (Genetically Engineered) करण्यात आलेले इन्सुलिन आहे. शरीरात ते अधिक काळ सक्रिय राहावे यासाठी त्याच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज इंजेक्शन घेण्याऐवजी आठवड्यातून फक्त एकदाच ते घेणे शक्य होते.

इन्सुलिनचा शोध १९२१ मध्ये लागण्यापूर्वी टाईप-१ मधुमेह हा जीवघेणा आजार मानला जात होता. त्यावेळी रुग्णांना कमी कॅलरीजचा आहार आणि उपवास यांवरच अवलंबून राहावे लागे. सुरुवातीच्या काळात डुक्कर आणि गाईच्या स्वादुपिंडातून (Pancreas) मिळणाऱ्या अर्कापासून इन्सुलिन तयार केले जात असे. मात्र, पुनर्संयोजित तंत्रज्ञान (recombinant technology) विकसित झाल्यानंतर अधिक व्यापकपणे इन्सुलिन उपलब्ध झाले. प्रथिनांच्या जनुकीय संकेतामध्ये बदल करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो.

आज बाजारात उपलब्ध असलेली बहुतांश इन्सुलिन शरीरात जास्त काळ परिणामकारक राहतील किंवा अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातील, अशा पद्धतीने विकसित केली जात आहेत. आयकोडेक हे त्याच प्रगत तंत्रज्ञानाचे नवीन उत्पादन आहे.

टाईप-१ मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिन घेणे अनिवार्य असते. कारण- त्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. तर टाईप-२ मधुमेहाच्या अनेक रुग्णांचे सुरुवातीला गोळ्यांनी उपचार होऊ शकतात. मात्र, कालांतराने सुमारे २५ ते ३० टक्के रुग्णांना इन्सुलिनची गरज भासते.

हे औषध कोण घेऊ शकणार?

हे आठवड्यातून एकदा घ्यावे लागणारे इन्सुलिन प्रामुख्याने अशा मधुमेही रुग्णांसाठी आहे, ज्यांची रक्तातील साखर अनेक औषधे घेतल्यानंतरही नियंत्रणात राहत नाही आणि ज्यांना इन्सुलिन उपचारांची गरज भासते.

दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील एंडोक्रिनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. वांगनू यांच्या मते, अनेक रुग्ण ८ ते १० वर्षे मधुमेहावर गोळ्या घेत असतात. मात्र, त्यानंतरही रक्तातील साखर नियंत्रणात न आल्यास इन्सुलिन सुरू करणे आवश्यक असते. तरीही अनेक रुग्ण इंजेक्शनची भीती किंवा संकोचामुळे इन्सुलिन घेण्यास टाळाटाळ करतात; पण ही विचारपद्धती बदलली पाहिजे. योग्य वेळी इन्सुलिन उपचार सुरू केल्यास हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मज्जातंतूंवरील (नर्व्ह) ताण टाळण्यास मदत होऊ शकते.

डॉ. एस. व्ही. मधू पुढे म्हणाले, “तोंडावाटे घेण्याची औषधे आणि त्यांचा जास्तीत जास्त डोस दिल्यानंतरही रक्तातील साखर अपेक्षित पातळीवर येत नसेल, तर इन्सुलिन उपचार सुरू करावेत. सुरुवातीला गोळ्यांसोबत कमी मात्रेत इन्सुलिन दिले जाऊ शकते आणि नंतर आवश्यकतेनुसार पूर्णपणे इन्सुलिनवर उपचार सुरू ठेवता येतात.”

दरम्यान, ‘नोवो नॉर्डिस्क इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिया यांनी सांगितले की, सध्या भारतात सुमारे ६० लाख रुग्ण इन्सुलिन वापरत असले तरी ही संख्या किमान दुप्पट असायला हवी. इन्सुलिन हे मधुमेहाच्या उपचारासाठी अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित औषध आहे. आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे इन्सुलिन उपचारांची गरज असलेल्या अधिकाधिक रुग्णांना ते स्वीकारणे सोपे जाईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

या औषधाचे दुष्परिणाम कोणते?

या इन्सुलिनचा सामान्य दुष्परिणाम म्हणजे हायपोग्लायसेमिया (Hypoglycemia). या स्थितीत रक्तातील साखरेची पातळी गरजेपेक्षा खूप कमी होते. उपलब्ध माहितीनुसार, हा दुष्परिणाम सुमारे १० पैकी एका रुग्णामध्ये दिसू शकतो.

मात्र, डॉ. एस. के. वांगनू यांच्या मते, हे प्रमाण इतर दैनंदिन इन्सुलिनच्या इंजेक्शन्समध्ये दिसणाऱ्या प्रमाणाएवढेच आहे.

डॉ. एस. व्ही. मधू यांनी पुढे म्हटले की, इन्सुलिन सुरू केल्यानंतर काही रुग्णांमध्ये रक्तातील साखर प्रथमच प्रभावीपणे नियंत्रणात येते. त्यामुळे काही वेळा हायपोग्लायसेमियाचे प्रसंग जाणवू शकतात. गोळ्यांमुळेसुद्धा हायपोग्लायसेमियाची लक्षणे जाणवतात पण जेव्हा रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त असते, तेव्हा हायपोग्लायसेमियाचा प्रश्नच उद्भवत नाही.

इन्सुलिनची किंमत किती?

त्या औषधाचा खर्च दर आठवड्याला २६१ रुपये असणार आहे. हे प्री-फिल्ड पेनच्या दोन डोसमध्ये उपलब्ध असणार आहे. एक डोस ७०० युनिट्स/मिली क्षमतेचा असून, त्याची किंमत २,६११ रुपये आहे, तर २,१०० युनिट्स/मिली क्षमतेच्या पॅकची किंमत ७,८८३ रुपये आहे. साधारणपणे एका रुग्णाला आठवड्याला सुमारे ७० युनिट्स इन्सुलिनची गरज भासते. मात्र, ही मात्रा रुग्णाच्या प्रकृती आणि गरजेनुसार कमी-अधिक असू शकते.