पॉलिश्ड हिरे तयार करणार्या जगातील हिरे उत्पादकांपैकी एक असलेल्या किरण जेम्स या कंपनीने आपल्या ५० हजार कर्मचाऱ्यांना १० दिवसांची पगारी सुट्टी जाहीर केली आहे. १७ ते २७ ऑगस्टपर्यंत गुजरातमधील कर्मचार्यांना ही सुट्टी मिळणार आहे. नामांकित कंपनीच्या या निर्णयाची चर्चा सर्वदूर केली जात आहे. 'किरण जेम्स'चे अध्यक्ष वल्लभभाई लखानी यांनी सांगितले की, असा निर्णय कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. हा निर्णय घेण्याचे कारण काय? याविषयी जाणून घेऊ. जागतिक हिरे बाजारातील मंदीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. “आम्ही ही सुट्टी हिऱ्यांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी घोषित केली आहे,” असे लखानी यांनी 'दी इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितले आहे. त्यांनी हिरे व्यापारात ओढवलेल्या संकटाविषयीही सांगितले. ही रजा कर्मचार्यांसाठी सक्तीची असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब असणार आहे. हेही वाचा : इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा नवा प्रमुख; कोण आहे याह्या सिनवार? हिरे व्यापारावर संकट 'किरण जेम्स'चे अध्यक्ष वल्लभभाई लखानी यांच्या मते, हिरे उद्योगावर सध्या मोठे संकट ओढवले आहे. “जागतिक स्तरावर पॉलिश्ड हिऱ्यांची किंमत कमी झाली आहे; ज्यामुळे हिरे उत्पादकांना त्यांचा व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे. जर पुरवठा नियंत्रित राहिला, तर मागणी वाढेल आणि उद्योगाला फायदा होईल,” असे त्यांनी 'दी इंडियन एक्स्प्रेस'कडे स्पष्ट केले. लखानी यांनी पुढे नमूद केले की, सध्या सुरू असलेल्या मंदीमुळे कंपनीला ही सुट्टी जाहीर करणे भाग पडले आहे. कठीण काळ असूनही त्यांनी आश्वासन दिले की, या काळात सर्व कामगारांना त्यांचे पगार मिळतील; मात्र काही रक्कम रोखली जाईल, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले. हिरे उद्योगावर सध्या मोठे संकट ओढवले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स) या कंपनीत ५० हजारहून अधिक पॉलिशर्स काम करतात. त्यातील ४० हजार कर्मचारी नैसर्गिक हिऱ्यांसाठी आणि १० हजार कर्मचारी प्रयोगशाळेत हिरे विकसित करण्याचे काम करतात. किरण जेम्स कंपनीचे अधिकृत खरेदीदार असणार्या दक्षिण आफ्रिकन-ब्रिटिश कॉर्पोरेशन डी बियर्सकडून वार्षिक उलाढाल १७ हजार कोटी रुपये आहे. परंतु, डी बियर्सने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत हिरे खरेदीत १५ टक्क्यांची घट केली. त्यामुळे कंपनीला कठीण काळाचा सामना करावा लागला आहे. सुरत डायमंड असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश खुंट यांनीदेखील अशीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मंदीचा स्थानिक हिरे उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे. “किरण जेम्सद्वारे कर्मचाऱ्यांसाठी अशी सुट्टी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतर कोणत्याही फर्मने असे पाऊल उचलले नसले तरी मंदीमुळे पॉलिश्ड हिऱ्यांची विक्री कमी झाल्याचे वास्तव यामुळे समोर आले आहे,” असे जगदीश खुंट म्हणाले. ते पुढे म्हणाले, “२०२२ मध्ये आमच्या हिरे उद्योगाची उलाढाल जवळपास २,२५,००० कोटी रुपये होती, जी आता जवळपास १,५०,००० कोटींवर आली आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून हिरे व्यापारावर संकट आले आहे. सुरतमधील अंदाजे चार हजार मोठे आणि छोटे हिरे पॉलिशिंग आणि प्रोसेसिंग युनिट्स सुमारे १० लाख लोकांना थेट रोजगार देतात. कारण काय आहे? सुरत डायमंड असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश खुंट यांनी स्पष्ट केले की, भारतातील ९५ टक्के पॉलिश्ड हिर्यांची निर्यात होत असल्याने जागतिक घडामोडींचा या व्यापारावर थेट परिणाम होतो. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष हे जागतिक मागणीतील घसरणीचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. रशियाची अलरोसा कंपनी जगातील ३० टक्के हिऱ्यांचे उत्पादन करते. सुरतमध्ये येणाऱ्या हिऱ्यांपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त हिऱ्यांचा वाटा रशियाचा आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर बायडन सरकारने अलरोसा वर निर्बंध लादले आणि एकूण हिर्यांचा पुरवठा खंडित केला. भारतात प्रक्रिया केलेल्या हिऱ्यांसाठी अमेरिका सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अनेक मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी रशियन वस्तू खरेदी करण्यास नकार दिला, असे वृत्त डीडब्ल्यूने दिले. परिणामी, मागणी कमी झाल्यामुळे सुरतच्या हिरे उद्योगांना कामकाजही कमी करावे लागले. हिरे व्यापारातील या संकटामुळे हजारो नोकऱ्या गेल्या आहेत, असे 'दी इकॉनॉमिक टाइम्स'ने आपल्या वृत्तात दिले आहे. त्याव्यतिरिक्त गेल्या वर्षी जगातील ७० टक्के हिरे खरेदी करणार्या युरोपीय युनियन आणि जी७ देशांनी रशियन-मूळच्या हिऱ्यांवर बंदी आणली; ज्याचा पहिला टप्पा मार्चच्या सुरुवातीला सुरू झाला. हेही वाचा : भारतीय वंशाच्या न्यायमूर्तींनी गूगल विरोधात दिला महत्त्वाचा निकाल; कोण आहेत अमित मेहता? नेमकं प्रकरण काय? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरदेखील या समस्येविषयी बोलले. ते म्हणाले, “आमच्यासाठी हा एक प्राधान्याचा मुद्दा आहे आणि आम्ही येत्या काही दिवसांत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू." जगदीश खुंट यांनी यावर जोर दिला की, या आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि संघर्षांमुळे सुरतच्या उद्योगाला या जागतिक आव्हानांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेणे आणि संघर्ष करणे भाग पडत आहे.