The Nawab Who Made History With a Dog Wedding: ‘जाने तू… या जाने ना’ फेम अभिनेत्री मंजरी फडणीसने सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईतील तिच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या ‘मायकी’ नावाच्या एका भटक्या कुत्र्याची काही लोकांनी लाठ्या-काठ्यांनी मारून क्रूर हत्या केल्याचा आरोप तिने केला आहे. मंजरीने सांगितले की, मायकी २०१९-२०२० पासून त्यांच्या सोसायटीत राहत होता आणि तो अचानक बेपत्ता झाला. शोध घेतल्यानंतर समजलं की, तो बेसमेंटमध्ये झोपलेला असताना काही लोकांनी त्याच्या डोक्यावर रॉड किंवा काठीने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एका गोणीत भरून फेकून देण्यात आले. मंजरीच्या या भावूक व्हिडिओमुळे अनेक श्वानप्रेमींनी या प्रसंगाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर इतिहासातील एका नवाबाने आपल्या कुत्रीच्या लग्नासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च केल्याची वदंता नक्की काय होती याचाच घेतलेला हा आढावा.

भारतीय संस्थानिकांच्या इतिहासात काही शासक त्यांच्या शौर्यासाठी, काही स्थापत्यकलेमुळे, तर काही त्यांच्या विलासी जीवनशैलीमुळे लक्षात राहिले,तर काही त्यांच्या क्रूरतेसाठी. गुजरातमधील जुनागढ संस्थानचा शेवटचा नवाब मुहम्मद महाबत खानजी तिसरा हा अशाच प्रकारे त्याच्या विलासी आयुष्यासाठी ओळखला गेला. त्याच्या आयुष्याभोवती अनेक कथा गुंफल्या गेल्या आहेत. त्यात सर्वाधिक प्रसिद्ध कथा म्हणजे त्याच्या लाडक्या कुत्री रोशन आराच्या लग्नाची. लोकप्रिय कथेनुसार त्याने आपल्या लाडक्या कुत्रीच्या लग्नावर तब्बल २ कोटी खर्च केले होते. मात्र, महाबत खानजी तिसऱ्याची ओळख फक्त “कुत्र्यांच्या लग्नावर कोट्यवधी खर्च करणारा नवाब” अशी करून देणे हा इतिहासावर अन्याय ठरू शकतो. कारण त्याच्या आत्मकथेला जुनागढच्या संस्थानाचे वैभव, प्राण्यांवरील प्रेम, गिरच्या सिंहांच्या संरक्षणाची पार्श्वभूमी आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील एक महत्त्वाचा राजकीय वाद असे अनेक स्तर आहेत.

Tomb of Mahabat Khan
Tomb of Mahabat Khan

मुहम्मद महाबत खानजी तिसरा याचा जन्म २ ऑगस्ट १८९८ रोजी जुनागढ संस्थानात झाला. तो जुनागढचा नवाब रसूल खानजी याचा उत्तराधिकारी होता. १९११ साली वडिलांच्या मृत्यूनंतर मुहम्मद महाबत खानजी अल्पवयातच गादीवर बसला. त्या काळात जुनागढ हे ब्रिटिश भारतातील एक महत्त्वाचे संस्थान होते. काठियावाडातील या संस्थानाला १३ तोफांची सलामी मिळत असे. जुनागढची भौगोलिक ओळखही महत्त्वाची होती. पश्चिमेला अरबी समुद्र, जवळच गिरनारचा डोंगर आणि गीरचे जंगल यामुळे जुनागढला व्यापारी, सांस्कृतिक आणि वन्यजीवदृष्ट्या वेगळे स्थान होते.

Junagarh Nawabs and state officials, 19th century

महाबत खानजी तिसरा हा त्याच्या कुत्र्यांवरील प्रेमामुळे प्रसिद्ध होता. त्याने ३०० ते ८०० जातीवंत कुत्रे पाळले होते, असा उल्लेख अनेक लेखांमध्ये येतो. या कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवास, सेवक, देखभाल करणारे कर्मचारी, पशुवैद्यकीय सुविधा आणि काही वर्णनांनुसार टेलिफोनपर्यंतची व्यवस्था होती. या वर्णनांमध्ये अतिशयोक्तीचा अंश असू शकतो; पण एक गोष्ट निर्विवाद दिसते, ती म्हणजे नवाबाला प्राण्यांविषयी, विशेषतः कुत्र्यांविषयी, विलक्षण जिव्हाळा होता. त्या काळातील संस्थानिक शासकांसाठी पाळीव प्राणी हे केवळ छंद नव्हते, तर प्रतिष्ठा, संपत्ती आणि राजेशाही जीवनशैलीचे प्रतीकही होते.

या संदर्भात रोशन आरा-बॉबीच्या लग्नाची कथा नेहमी सांगितली जाते. नवाबाची लाडकी कुत्री रोशन आरा हिचे लग्न बॉबी नावाच्या गोल्डन रिट्रिव्हरशी लावण्यात आले होते. बॉबी हा मंगरोलच्या नवाबाचा कुत्रा असल्याचेही म्हटले जाते. या लग्नासाठी राजेशाही मिरवणूक, संगीत, नृत्य, पाहुणचार आणि तीन दिवसांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती, असा उल्लेख अनेक माध्यमांत आढळतो. काही वर्णनांनुसार रोशन आराला चांदीच्या पालखीत आणण्यात आले, तर बॉबीची वरात इतर शृंगारलेल्या कुत्र्यांसह काढण्यात आली होती. या प्रसंगाचे वर्णन करताना २ कोटी खर्च आला होता हे वारंवार संगितले जाते. मात्र, तो त्या काळातील प्रत्यक्ष खर्च होता की, नंतरच्या काळात वाढवून सांगितलेला अंदाज, याबाबत स्पष्टता नाही.

महाबत खानजी तिसऱ्याचे प्राणिप्रेम केवळ कुत्र्यांपुरते मर्यादित नव्हते. जुनागढच्या नवाबी सत्तेखाली गीरच्या आशियाई सिंहांच्या संरक्षणाला महत्त्व मिळाले. मात्र, गीर येथील सिंहांच्या संरक्षणाची सुरुवात महाबत खानजी पूर्वीच्या जुनागढच्या नवाबी काळात झालेली दिसते. १९व्या शतकारच्या उत्तरार्धात आशियाई सिंहांची संख्या अत्यंत कमी झाली होती. वाढत्या शिकारीमुळे गंभीर संकट ओढावले होते. जुनागढच्या नवाबांनी सिंहांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

परंतु महाबत खानजी तिसऱ्याचे नाव भारतीय इतिहासात सर्वाधिक वादग्रस्त ठरले ते १९४७ मधील जुनागढच्या पाकिस्तानात विलिनीकरणाच्या निर्णयामुळे. सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही. पी. मेनन यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने संस्थानांचे भारतात विलीनीकरण घडवून आणले. बहुतांश संस्थानांनी भौगोलिक सलगता, लोकसंख्येची रचना आणि प्रशासकीय व्यवहार्यता लक्षात घेऊन भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.

जुनागढचा प्रश्न मात्र गुंतागुंतीचा ठरला. जुनागढची लोकसंख्या बहुसंख्य हिंदू होती; पण शासक मुस्लिम नवाब होते. जुनागढला पाकिस्तानशी जमिनीचा थेट संपर्क नव्हता. तरीही महाबत खानजी तिसऱ्याने १९४७ साली सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारतासाठी हा निर्णय राजकीय आणि धोरणात्मकदृष्ट्या धोकादायक होता. कारण गुजरातच्या किनाऱ्यावर असलेले, भारताने वेढलेले संस्थान पाकिस्तानात गेले, तर भारताची चहुबाजुने कोंडी झाली असती.

या निर्णयाविरोधात जुनागढमध्ये असंतोष वाढला. बाबरियावाड आणि मंगरोल या अधीन प्रदेशांनी भारतात सामील होण्याची भूमिका घेतली. परिस्थिती गंभीर होत गेली. अखेरीस नवाब पाकिस्तानात गेला. काही कथांनकांनुसार त्याने आपल्या कुत्र्यांना बरोबर नेले, पण या गोंधळात कुटुंबातील काही सदस्य मागे राहिले अशी लोकप्रिय कथा सांगितली जाते. नंतर भारत सरकारने जुनागढवर नियंत्रण मिळवले. १९४८ साली झालेल्या जनमत चाचणीत मोठ्या बहुमताने जुनागढ भारतात सामील होण्याच्या बाजूने मत नोंदवले गेले.

महाबत खानजी तिसरा पुढील आयुष्य पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाला. १७ नोव्हेंबर १९५९ रोजी त्याचे निधन झाले.