Air India crash गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघाले होते. या अपघातानंतर काही दिवसांतच नक्की काय चूक झाली असावी याबद्दल एका नवीन सिद्धांताची मोठ्या प्रमाणात ऑनलाइन चर्चा होताना दिसत आहे. फ्लाइट एआय-१७१ म्हणून कार्यरत असलेले बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात असताना टेकऑफ झाल्यानंतर लगेचच एका निवासी वसतिगृहात कोसळले. या घटनेत प्रवासी, कर्मचारी आणि कोसळलेल्या ठिकाणी असणाऱ्या किमान २७४ लोकांचा मृत्यू झाला होता.
आता, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक तज्ज्ञ कॅप्टन स्टीव्ह यांचा एक व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर व्हायरल होत आहे, त्यामध्ये ते या दुर्घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. त्यांनी कॉकपिटमधील एका गंभीर चुकीमुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला आहे. विमानात दोन अत्यंत अनुभवी वैमानिक होते. कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर अशी या वैमानिकांची नावे आहेत. त्यांना ९,००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता. कॅप्टन स्टीव्ह यांच्या मते, सुरुवातीच्या चढाईदरम्यान वैमानिकांनी चुकून लँडिंग गियरऐवजी फ्लॅप मागे घेतले असावेत आणि यामुळेच हा अपघात झाला असावा. नेमकं विमान वाहतूक तज्ज्ञाने काय शक्यता दर्शवली? विमानातील फ्लॅप्स म्हणजे काय? खरंच अपघात वैमानिकांच्या चुकीने झाला का? त्याविषयी जाणून घेऊयात.
फ्लॅप्स म्हणजे काय? त्यामुळे नक्की काय होतं?

- पाते (फ्लॅप्स) हे विमानाच्या पंखांच्या मागच्या काठावर असलेले पॅनेल असतात, जे हलतात.
- विमानाचे फ्लॅप्स आणि स्लॅट्स म्हणजेच पंखांच्या मागे आणि समोर हलणारे पातेदेखील लिफ्ट निर्माण करण्यास मदत करतात.
- जिथे रनवे लहान असतात, त्यांच्या मदतीने विमानाला अधिक लिफ्ट मिळते.
- टेकऑफ किंवा लँडिंगसारख्या कमी वेगाच्या उड्डाणादरम्यान ही अतिरिक्त लिफ्ट महत्त्वाची असते.
- परिस्थितीनुसार, दोन्हीपैकी कोणत्याही वैमानिकाद्वारे फ्लॅप्स मॅन्युअली हाताळले जातात.
- कॅप्टन स्टीव्ह यांनी हेदेखील म्हटले की, बोईंग ७८७ एका इंजिनवरदेखील उडू शकते, त्यामुळे एक इंजिन निकामी झाले असते तरी विमान लवकर कोसळले नसते.
- दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी होणे फार दुर्मीळ आहे, असे ते म्हणाले.
कॅप्टन स्टीव्हनुसार नक्की काय चुकले?
‘सीएनएन-न्यूज १८ शी’ बोलताना त्यांनी सांगितले, कॅप्टन स्टीव्हने टेकऑफनंतर कॉकपिटमध्ये काय घडले त्याबाबत सांगितले. विमान वर जाऊ लागताच नेहमी आदेश दिला जातो, तो म्हणजे ‘गियर अप.’ परंतु त्यांनी विचारले, जर सह-वैमानिकाने चुकून गियर लिव्हरऐवजी फ्लॅप लिव्हर ओढला तर? असे केल्यास विमानाचे उड्डाण थांबेल. या प्रकरणातही सह-वैमानिकाने चुकून फ्लॅप्स वर केले, ज्यामुळे विमानाची लिफ्ट अचानक कमी झाली, ” असे स्टीव्ह यांनी सांगितले. टेकऑफच्या कमी वेगात फ्लॅप्स खूप लवकर मागे घेतल्याने लिफ्ट त्वरित कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांनी सांगितले, फ्लॅप्स मागे घेतल्यास पंखांमध्ये तुम्ही निर्माण करत असलेली सर्व लिफ्ट निघून जाते. विमानाचा वेग आधीच मंद होता आणि टेकऑफनंतरही लँडिंग गियर खालीच दिसत होते. ते सामान्य नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये कॅप्टन स्टीव्ह यांनी दाखवले की, विमानाचे नोज सुरुवातीला सुमारे २.५ अंशांपर्यंत वर गेले, परंतु ते जास्त वर राहिले नाही. या प्रकरणात लँडिंग गियरऐवजी अचानक फ्लॅप्स वाढल्याने विमानाचा वेग कमी झाला असावा आणि त्याचा तोल गेला असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, वैमानिकाने नोज वर खेचून लिफ्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु तोवर उशीर झाला होता. “त्यांना १,५०० फूट, कदाचित १,००० फूट उंचीवरही सावरण्याची संधी मिळाली असती, परंतु ते तिथवर पोहोचूच शकले नाही,” असे त्यांनी सांगितले.
इंजिन बंद होण्याच्या शक्यतेविषयी त्यांनी काय सांगितले?
काहींनी हा अपघात इंजिन बंद पडल्याने किंवा पक्षी धडकल्याने झाल्याचा दावा केला, मात्र कॅप्टन स्टीव्ह यांनी ऑनलाइन व्हायरल होणारे इतर सामान्य सिद्धांत फेटाळून लावले. उपलब्ध फुटेजमध्ये दोन्ही इंजिन सामान्यपणे काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, फुटेजमध्ये कोणतीही आग नाही, ठिणग्या नाहीत किंवा वीज बिघाड झाल्याचे सूचित करणारे संकेत नव्हते.” त्यांनी पुढे म्हटले, दोन्ही इंजिन पक्ष्यांच्या कळपाने खराब होणे शक्य आहे, त्यामुळे धूर, आग किंवा कचरा दिसतो. परंतु, व्हिडीओमध्ये तसे काहीही नाही.”
कॅप्टन स्टीव्हनुसार हा अपघात यांत्रिक बिघाडामुळे झाला नाही. विमान कार्यरत इंजिन असतानाही त्याची उंची कमी होऊ शकते, विशेषतः जर फ्लॅप्स चुकून मागे घेतले गेले तर. हे हृदयद्रावक असल्याचे त्यांनी म्हटले. “या वैमानिकांनी शक्य तितके सर्व काही केले असेल. एका चुकीमुळे २४१ जणांचे प्राण गेले असतील,” असेही त्यांनी म्हटले. ही केवळ एक शक्यता असली तरी तपासकर्ते आता विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण करत आहेत आणि खरोखर त्या दिवशी काय घडले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.