Did Anarkali really exist?: इतिहास केवळ घडलेल्या घटनांची नोंद नसतो, तर तो अनेकदा न घडलेल्या गोष्टींनाही अमर करून ठेवतो. राजे, युद्धे आणि सत्ता यांविषयी इतिहास मोठ्या अधिकाराने सांगतो, पण लोकांच्या भावविश्वात जन्मलेल्या कथांविषयी तो बहुतेकदा शांत राहतो. तरीसुद्धा काही कथा अशा असतात की, त्या अधिकृत नोंदींशिवायही शतकानुशतके टिकून राहतात. अनारकली ही त्यापैकीच एक. तिचं नाव मुघल इतिहासाच्या दस्तऐवजांत सापडत नाही, पण भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक स्मृतीत ती खोलवर रुजलेली आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की जी स्त्री इतिहासात नाही, ती इतकी अमर कशी झाली?
अनारकलीची कथा ऐकताना ती जवळजवळ पुराणकथेप्रमाणे भासते. मुघल दरबारातील एक सुंदर नर्तकी, युवराज सलीमवर प्रेम करणारी आणि त्या प्रेमासाठी सम्राट अकबराच्या रोषाला सामोरी जाणारी. सत्ता, शिस्त आणि साम्राज्याच्या नियमांविरुद्ध उभं राहिलेलं प्रेम, आणि त्याची किंमत म्हणून भिंतीत जिवंत चिणून मारण्यात आलेली तरुणी… ही कथा ऐकणाऱ्याला सहज मोहात पाडते. पण या कथेमागे उभा राहणारा इतिहास मात्र अस्वस्थ करणारा आहे. कारण अकबर किंवा सलीम, म्हणजेच पुढील काळातील जहांगीर, यांच्यापैकी कुणीही आपल्या लिखाणात अनारकलीचा उल्लेख केलेला नाही.
अकबराच्या कारकिर्दीचं अधिकृत चित्रण ‘अकबरनामा’मध्ये आढळतं, अकबरनामाची निर्मिती अबुल फजलसारख्या विश्वासू इतिहासकाराच्या लेखणीतून झाली आहे. त्याचप्रमाणे जहांगीरचं आत्मचरित्र ‘तुजुक-ए-जहांगीरी’ हे मुघल सत्ताधीशांच्या आत्मकथनांपैकी सर्वात विश्वसनीय मानलं जातं. या ग्रंथात जहांगीरने आपल्या व्यसनांपासून राजकीय शत्रुत्वापर्यंत, बंडांपासून वैयक्तिक दु:खांपर्यंत अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत. इतकं सविस्तर लिहिणारा सम्राट जर एखाद्या प्रेमप्रकरणामुळे बंडखोरीला प्रवृत्त झाला असता, तर त्याचा उल्लेख नक्कीच झाला असता. पण अनारकलीचा उल्लेख त्यात कुठेच नाही. इतिहासकारांसाठी तिची अनुपस्थितीच सर्वात मोठा महत्त्वाचा पुरावा ठरते.
तरीसुद्धा अनारकली पूर्णपणे काल्पनिक वाटत नाही, कारण लाहोर शहरात तिचं अस्तित्व भौतिक स्वरूपात उभं आहे. जुन्या लाहोरच्या मध्यभागी, आजच्या अनारकली बाजारात एक मुघलकालीन थडगं आहे, या थडग्याला स्थानिक लोक अनारकलीचा मकबरा म्हणतात. त्या थडग्यातील संगमरवरी समाधीवर कोरलेला फारसी शेर अत्यंत भावनिक आहे. “काश, मला पुन्हा एकदा माझ्या प्रियकराचं दर्शन झालं असतं, तर कयामतपर्यंत मी देवाचे आभार मानले असते.” या ओळींखाली ‘मजनूँ सलीम अकबर’ अशी सही दिसते. ही कविता प्रेमकथेचा संकेत देते, पण तरीही इतिहास थांबतो. कारण या थडग्यात नेमकं कोण दफन आहे, याची खात्री देणारा एकही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नाही.
इतिहासकार अब्दुल्ला चगताई आणि मुहम्मद बाकिर यांनी या थडग्याबाबत वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. त्यांच्या मते, ‘अनारकली’ हे नाव मूळतः एखाद्या स्त्रीचं नसून, त्या परिसरातील ‘बाग-ए-अनारकली’ म्हणजे डाळिंबांच्या बागेचं नाव असण्याची शक्यता आहे. त्या बागेत असलेलं थडगं एखाद्या सामान्य सरदार स्त्रीचं असावं आणि पुढे लोककथांनी त्या थडग्याभोवती प्रेमकथा गुंफली असावी. म्हणजेच, आधी जागा होती, मग नाव आलं, आणि शेवटी कथा जन्माला आली.
अनारकलीचा पहिला लिखित उल्लेख मुघल कागदपत्रांत नव्हे, तर युरोपीय प्रवाशांच्या प्रवासवर्णनांत आढळतो. इंग्लिश व्यापारी विल्यम फिंच सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लाहोरमध्ये वास्तव्यास होता, त्याने स्थानिकांकडून ऐकलेल्या अफवांवर आधारित अनारकलीची कथा नोंदवली. एडवर्ड टेरी आणि बिशप हर्बर्ट यांच्या लिखाणातही अशाच स्वरूपाच्या कथांचा उल्लेख सापडतो. महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्या कथा प्रत्यक्षदर्शी अनुभवांवर आधारित नसून, बाजारात फिरणाऱ्या गोष्टींचं पुनर्कथन आहेत.
युरोपीय लेखकांच्या ओरिएंटल कल्पनाविश्वाने या कथांना अधिक रंग दिला. फ्रेंच इतिहासकार अॅलन देसुलिएर यांच्या मते, अनारकलीसारख्या कथा वसाहतवादी काळात विशेष लोकप्रिय झाल्या कारण त्या ‘पूर्वेकडील निर्दयी सम्राट’ ही प्रतिमा मजबूत करतात. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश सत्तेला अशा कथांचा नैतिक फायदा झाला, कारण या कथा अप्रत्यक्षपणे पाश्चिमात्य सत्तेला अधिक सुसंस्कृत दाखवतात.
अनारकलीच्या कथेला निर्णायक वळण दिलं, ते विसाव्या शतकात लेखक इम्तियाज अली ताज यांनी. १९२२ साली त्यांनी ‘अनारकली’ हे नाटक लिहिलं. या नाटकात त्यांनी ऐतिहासिक अफवांना कलात्मक शिस्त दिली आणि एका असहाय स्त्री व सत्ताधारी युवराजाच्या प्रेमाला केंद्रस्थानी ठेवलं. नाटकाच्या सुरुवातीला ही कथा काल्पनिक असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं, पण प्रेक्षकांनी त्या सूचनेचा विसर पडला आणि भावनांना सत्याचा दर्जा दिला. १९३१ साली प्रसिद्ध चित्रकार ए. आर. चुगताई यांनी अनारकलीचं चित्र रंगवलं आणि पहिल्यांदाच या अदृश्य स्त्रीला एक चेहरा मिळाला. त्या क्षणापासून अनारकली ही केवळ शब्दांतली कथा न राहाता दृश्य स्मृतीचा भाग झाली.
यानंतर चित्रपटसृष्टीने या कथेला अमरत्व दिलं. अनेक चित्रपटांनंतर १९६० साली आलेला मुघल-ए-आझम हा चित्रपट निर्णायक ठरला. मधुबालाची अनारकली, दिलीप कुमारचा सलीम आणि पृथ्वीराज कपूरचा अकबर यांनी या कथेला ऐतिहासिक सत्यासारखं रूप दिलं. विशेष म्हणजे, चित्रपटाने मूळ कथेत बदल करून अनारकलीला मृत्यूपासून वाचवलं. कथेतील ही करुणा तिला अधिक मानवी बनवते आणि त्यामुळे ती अधिक खोलवर रुजते. अनारकली आजही जिवंत आहे कारण तिची कथा प्रेम, बंडखोरी आणि सत्तेच्या मर्यादा यांचं प्रतीक ठरली. ती अकबर आणि सलीम यांच्यातील खऱ्या संघर्षाशी साधर्म्य साधते आणि एका स्त्रीला भावनेच्या बळावर साम्राज्याला आव्हान देणारी म्हणून उभी करते. ती अस्तित्वात होती की नाही, हा प्रश्न कदाचित कधीच सुटणार नाही. पण इतिहासाला तिची गरज नव्हती; संस्कृतीला मात्र होती.
म्हणूनच, मुघल नोंदींमध्ये नसतानाही अनारकली आजही श्वास घेते… लाहोरमधील एका थडग्यात, थडग्यावरील शेरी तिचा उल्लेख करतो, उर्दू साहित्यात आणि रुपेरी पडद्यावर… सर्वत्र तिचं अस्तित्व आहे. कधी कधी अमरत्व सत्यातून जन्म घेत नाही; ते लोकांच्या विश्वासातून आणि सामूहिक स्मृतीतून घडतं असतं.

