Galwan clash China-India ५ फेब्रुवारीला अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेला अखेरचा अण्वस्त्र करार म्हणजेच ‘न्यू स्टार्ट’ कराराची मुदत संपली. त्यामुळे जगात पुन्हा एकदा अण्वस्त्र स्पर्धेची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेने केलेल्या दाव्यांनुसार अण्वस्त्रांचा प्रसार आधीच सुरू झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनवर गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या केल्याचा आरोप केला आहे. गलवान संघर्षानंतर चीनने एका आठवड्यात अण्वस्त्र चाचणी केल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे. या आरोपाने खळबळ उडाली आहे. अमेरिकेने चीनवर नेमके काय आरोप केले? या दाव्यांमध्ये किती तथ्य? यावर तज्ज्ञांचे मत काय? जाणून घेऊयात…
चीनच्या अण्वस्त्र चाचणीबाबत अमेरिकेचा दावा काय आहे?
‘न्यू स्टार्ट’ करार संपुष्टात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गेल्या शुक्रवारी अमेरिकेचे ‘आर्म्स कंट्रोल अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी’चे अंडर सेक्रेटरी थॉमस डिनॅनो यांनी जीनिव्हा येथील एका परिषदेत चीनवर २०२० मध्ये गुप्त अण्वस्त्र चाचणी केल्याचा आरोप केला.
जीनिव्हा परिषदेत बोलताना थॉमस डिनॅनो म्हणाले, “आज मी हे उघडपणे सांगू शकतो की, चीनने अण्वस्त्र स्फोटकांच्या चाचण्या केल्याची माहिती अमेरिकन सरकारला आहे. त्यामध्ये शेकडो टन क्षमतेच्या पल्ल्याच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) हे मान्य केले होते की, या चाचण्यांमुळे चाचणी बंदीच्या नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळेच त्यांनी अण्वस्त्र स्फोटांची माहिती लपवून या चाचण्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला.”
ते पुढे म्हणाले की, जगापासून आपल्या हालचाली लपवण्यासाठी चीनने ‘डिकपलिंग’ पद्धतीचा वापर केला. या पद्धतीमुळे सिस्मिक मॉनिटरिंगची (भूकंपमापक यंत्रणा) परिणामकारकता कमी होते. त्यांनी पुढे आपल्या भाषणात नमूद केले की, चीनने २२ जून २०२० रोजी अशीच एक चाचणी केली होती. भारत आणि चीनचे सैनिक पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात आमने-सामने आल्याच्या अवघ्या एक आठवड्यानंतर ही चाचणी करण्यात आली होती. या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते; तर चीनचे ३० हून अधिक सैनिक मारले गेल्याचे वृत्त होते. मात्र, चीनने अधिकृतपणे आपल्या केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.
‘फर्स्टपोस्ट’ने आपल्या एका व्हिडीओ रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर हा आरोप खरा असेल, तर याचा अर्थ असा होतो की, भारत-चीन सीमा वाद सर्वांत धोकादायक टप्प्यावर असताना चीन आपली अण्वस्त्र क्षमता तपासून पाहत होता. अमेरिकेने चीनवर अशा प्रकारचे आरोप केल्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही असेच आरोप केले होते. ट्रम्प तेव्हा पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, “ते (चीन आणि रशिया) सर्व जण अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. आम्ही चाचण्या करत नाही, आम्ही चाचण्या कित्येक वर्षांपूर्वीच थांबवल्या आहेत; पण जर इतर देश चाचण्या करत असतील, तर आम्हीही तसे करणे योग्य ठरेल.”
अमेरिकेच्या दाव्यांवर चीनची प्रतिक्रिया काय?
चीनने अण्वस्त्र चाचणीचे अमेरिकेचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत आणि या दाव्यांना काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. अमेरिका स्वतःच्या चाचण्या पुन्हा सुरू करण्यासाठी अशी कारणे शोधत असल्याचा आरोपही चीनने केला आहे. सोमवारी (९ फेब्रुवारी) चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एएफपीला सांगितले, “अमेरिकेचे आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे आहेत. स्वतःच्या अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्यासाठी ही कारणे दिली जात आहेत.”
चीनचे शेन जियान यांनी ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’चा उल्लेख करत म्हटले आहे की, चीन अण्वस्त्र मुद्द्यांवर सावधगिरीने वागते. चीन अशा खोट्या कथनांना तीव्र विरोध करतो. शस्त्रस्पर्धा वाढवण्यास अमेरिकाच जबाबदार आहे, असे ते म्हणाले. नंतर सोशल मीडियावर शेन यांनी असेही म्हटले, “चीनने अण्वस्त्र चाचण्यांवरील स्थगितीच्या आपल्या वचनबद्धतेचा आदर केला आहे.” अमेरिकेमधील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यानेही सीएनएनशी बोलताना अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, चीनने सर्व नियमांचे पालन केले होते.
अमेरिकेकडे पुरावे आहेत का?
अमेरिकेच्या आरोपांनंतर अण्वस्त्र चाचण्यांची पडताळणी करणाऱ्या ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह न्यूक्लियर-टेस्ट-बॅन ट्रीटी ऑर्गनायझेशन’ने (सीटीबीटीओ) नमूद केले की, त्यांच्या मॉनिटरिंग सिस्टीममध्ये चीनच्या अण्वस्त्र चाचणीचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. संस्थेचे कार्यकारी सचिव रॉबर्ट फ्लॉयड यांनी सांगितले की, ज्यावेळी ही कथित चाचणी झाल्याचे म्हटले जात आहे, त्या काळात त्यांच्या यंत्रणेला अण्वस्त्र चाचणीच्या वैशिष्ट्यांशी सुसंगत अशी कोणतीही घटना आढळली नाही. ते म्हणाले, “२२ जून २०२० रोजी शेकडो टन क्षमतेच्या संभाव्य अण्वस्त्र चाचण्यांच्या अहवालांबाबत, सीटीबीटीओच्या यंत्रणेला अण्वस्त्र स्फोटाशी संबंधित कोणतीही घटना आढळली नाही. कोणत्याही देशाकडून होणारा कोणताही अण्वस्त्र स्फोट ही अत्यंत चिंतेची बाब असते.”
मात्र, ‘आर्म्स कंट्रोल असोसिएशन’चे कार्यकारी संचालक डॅरिल किमबॉल यांनी स्पष्ट केले की, काही अण्वस्त्र चाचण्या शोध यंत्रणेतून सुटू शकतात. त्यांनी सीएनएनला स्पष्ट केले, “जर हा अत्यंत कमी क्षमतेचा चाचणी स्फोट असेल, तर तो सीटीबीटीओ मॉनिटरिंग स्टेशनपासून लपवून ठेवणे शक्य आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने २०२५ मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रण अहवालात चीनमधील कोणत्याही चाचणीचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे अमेरिकेच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पेंटागॉनने डिसेंबर २०२५ मध्ये चीनच्या लष्करी घडामोडींवर सादर केलेल्या वार्षिक अहवालातही असा कोणताही दावा केला नव्हता.
तज्ज्ञांचे मत काय?
अनेक तज्ज्ञ सांगतात की, चीनने आपल्या अण्वस्त्रांचा आणि क्षेपणास्त्र प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. त्यामध्ये ‘इंटरकाँटिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स’साठी (आयसीबीएम) मोठ्या नवीन सायलो फील्ड्सच्या बांधकामाचाही समावेश आहे. अमेरिकेच्या अंदाजानुसार, चीनच्या ताफ्यात सध्या सुमारे ६०० अण्वस्त्रे आहेत. अण्वस्त्रांची ही संख्या २०३० पर्यंत १,००० आणि २०३५ पर्यंत १,५०० होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे अनिश्चित असले तरी एका नवीन अण्वस्त्र करारावर स्वाक्षरी होईल, अशी आशा अनेकांना आहे.

