तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही पश्चिम आशियातील संघर्षावर अद्याप कोणत्याही ठोस तोडगा निघालेला नाही. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तात्पुरता युद्धविराम असला तरी दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांत इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही आखातातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर एकापाठोपाठ एक हल्ले करण्यास सुरुवात केली होती. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. यादरम्यान अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ विमाने पाडण्यासाठी इराणने चिनी बनावटीच्या खांद्यावर डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे वृत्त समोर आले. त्याविषयी…

इराण युद्धात अमेरिकेचे मोठे नुकसान?

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत इराणविरोधात लष्करी कारवाईला सुरुवात केली होती. या कारवाईसाठी त्यांनी अत्याधुनिक दर्जाच्या लढाऊ विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही चोख प्रत्यु्त्तर दिले जात होते. जवळपास दीड महिन्याच्या रक्तरंजित संघर्षानंतर मार्चच्या अखेरीस दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली होती, पण या कारवाईत अमेरिकेने जवळपास ४२ निरनिराळी अत्यंत महागडी विमाने गमावल्याचा दावा इराणने केला. त्याशिवाय युद्धात अमेरिकेच्या २९०० कोटी डॉलरचा चुराडा झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली.

युद्धात इराणला चीनकडून मोठी मदत?

इराणबरोबरच्या संघर्षात अमेरिकेची अत्याधुनिक विमाने नेमकी कोणत्या कारणांमुळे कोसळली, याचा तपास अमेरिकन यंत्रणांकडून केला जात आहे. ३ एप्रिल रोजी इराण आणि कुवेतमध्ये अमेरिकेची ‘एफ-१५ ई स्ट्राईक ईगल’ आणि ‘ए-१० थंडरबोल्ट २’ ही लढाऊ विमाने पाडण्यात आली होती. या हल्ल्यांसाठी इराणने चिनी बनावटीच्या शस्त्रांचा वापर केल्याचा दावा एनबीसी न्यूजच्या वृत्तातून करण्यात आला आहे. गेल्या काही दशकांमध्ये शत्रूच्या हल्ल्यात अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले जाण्याची ही पहिलीच घटना आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, इराणने ‘एफ-१५ ई’ विमानाला लक्ष्य केल्यानंतर त्याचा मुख्य वैमानिक पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडला होता. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या वैमानिकाला शोधून सुखरुप अमेरिकेत आणण्यात आले. हा इराणच्या तावडीत सापडू नये म्हणून हा वैमानिक एका पर्वताच्या पायथ्याशी लपून बसला होता.

इराणकडून चिनी क्षेपणास्त्रांचा वापर?

एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे ‘एफ-१५’ विमान पाडण्यासाठी इराणने चीन बनावटीच्या क्षेपणास्त्राचा वापर केला. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी आणि एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असतानाच चीनने इराणला दूरवरून येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना देणारी रडार यंत्रणा पुरवली होती. रडारला चकवा देणाऱ्या अत्याधुनिक विमानांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत सक्षम मानली जाते. या युद्धात चीनने उपग्रह सेवांद्वारे इराणला मदत केल्याचा आरोपही ट्रम्प प्रशासनाने केला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या तीन सॅटेलाइट कंपन्यांवर निर्बंध लादले होते. या कंपन्यांनी इराणला उपग्रह चित्रे आणि माहिती पुरवून पश्चिम आशियातील अमेरिकी सैन्याला लक्ष्य करण्यात मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, चीनने हे सर्व आरोप त्यावेळीच फेटाळून लावले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय दावा केला होता?

अमेरिकेन लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘एनबीसी न्यूज’ला सांगितले की, चीनने इराणला केलेल्या कोणत्याही मदतीचा युद्धाच्या मैदानावर फारसा प्रभाव पडला नाही. चीनकडून इराणला मिळालेली लष्करी मदत मोठी नव्हती. त्यामुळेच या मदतीमुळे युद्धाच्या धोरणात्मक निकालावर कोणताही निर्णायक परिणाम झाला नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यादरम्यान चीनकडून इराणला कोणतेही लष्करी साहित्य पुरवले जाणार नसल्याचे आश्वासन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्याला दिले असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. गेल्या आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी या दाव्याचा पुरुच्चार केला. “शी जिनपिंग यांनी मला वचन दिले आहे की ते इराणला कोणतीही शस्त्रे पाठवणार नाहीत. हे एक अत्यंत चांगले आश्वासन आहे. मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि त्याचे आभार मानतो, असे ट्रम्प म्हणाले होते. गेल्या महिन्यात शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीपूर्वी ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत युद्धविराम घडवून आणला होता. इराणकडून खनिज तेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाऱ्या चीनने हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केल्यानंतरच त्यांनी हा युद्धविराम घडवून आणल्याचा अंदाज बांधला जात आहे.

अमेरिकेचा आरोप चीनने पुन्हा फेटाळला

अमेरिकेचे एफ-15 ई लढाऊ विमान चिनी क्षेपणास्त्रामुळे पाडले गेल्याच्या आरोप चीनने फेटाळून लावला आहे. लष्करी उत्पादनांच्या निर्यातीबाबत चीन नेहमीच जबाबदार आणि सावध भूमिका घेतो. चीनच्या निर्यात नियंत्रण कायद्यांनुसार आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांनुसार कठोर नियंत्रण ठेवले जाते. कोणताही आधार नसलेल्या आरोपांचा आणि जाणीवपूर्वक चीनला या प्रकरणाशी जोडण्याच्या प्रयत्नांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. यादरम्यान चीनने यापूर्वीही इराणला युद्धात अनेकदा मदत केलेली आहे. तज्ज्ञांच्या मते, १९८० आणि १९९० च्या दशकात चीन हा इराणला लष्करी साहित्याचा पुरवठा करणारा एक प्रमुख देश होता. या काळात चीनने इराणला बॅलिस्टिक आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, रणगाडे, तोफखाना आणि लढाऊ विमाने पुरवली होती. मात्र, २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) इराणवर शस्त्रास्त्रांची बंदी घातल्यानंतर, चीनने थेट शस्त्रविक्री कमी केली. त्यानंतर त्यांनी नागरी आणि लष्करी अशा दोन्ही प्रकारच्या वापरासाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञान, सुटे भाग आणि उपकरणांच्या पुरवठ्यावर अधिक भर दिला होता. मात्र, सध्याच्या संघर्षात चीनकडून इराणला मिळालेल्या मदतीचा प्रत्यक्ष युद्धाच्या घडामोडींवर किती परिणाम झाला, याबाबत अद्याप स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही.