भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये अलीकडच्या काही महिन्यांमध्ये वा वर्षांमध्ये अनेक शहरांची, गावांची नावं बदलण्यात आली आहेत. दरम्यान, अलिगढ शहराचं नाव आता हरीगढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अलिगढ महापालिकेतील एका भाजपा सदस्यानं यासंबंधीचा ठेवलेला प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. अलाहाबादचं प्रयागराज, मुगलसरायचं दीनदयाळ उपाध्याय नगर व फैजाबादचं अयोध्या, असं नामांतर करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडे हा प्रस्ताव आला आहे. योगी सरकार हा प्रस्ताव मान्य करून अलिगढचं हरीगढ, असं नामांतर करू शकतं.

बीबीसीच्या वृत्तानुसार एका भाजपा नेत्यानं म्हटलं आहे, “हरीच्या मुलाला हरीगढ मिळणार नाही, तर मग सौदी अरबमधल्या मुलांना मिळणार का? की कझाकिस्तान, पाकिस्तानमधल्या मुलांना हरीगढ मिळणार?” अलिगढचे महापौर व भाजपा नेते प्रशांत सिंह म्हणाले, “अलिगढचं नाव बदलून हरीगढ करायला हवं. आपण आपल्या हिंदू धर्माच्या परंपराच पुढे नेल्या पाहिजेत.” एकीकडे भाजपा नेते दावा करीत आहेत की, अलिगढचं पूर्वी हरीगढ, असं नाव होतं. दुसऱ्या बाजूला अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक मोहम्मद सज्जाद यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही काळात अलिगढचं नाव हरीगढ नव्हतं.

ajit pawar sharad pawar (4)
“२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले “मी पहाटे पाच वाजता…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Shahu Maharaj Asaduddin Owaisi
मोठी बातमी : कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली, एमआयएमचा पाठिंबा; इम्तियाज जलील म्हणाले, “मी ओवैसींना…”
Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट

भाजपा नेते अलिगढ या नावाचा मुस्लीम आक्रमणं आणि गुलामीशी संबंध जोडत असतानाच काही वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्यांनी काही इतिहासकारांचे दाखले देत दावा केला आहे की, अलिगढचं पूर्वी रामगढ, असं नाव होतं. मात्र, मराठ्यांनी या शहराचं आणि येथील किल्ल्याचं अलिगढ, असं नामांतर केलं. परंतु, प्रख्यात इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी यांनी काही ऐतिहासिक दस्तऐवज सादर करून, या इतिहासकारांचे आणि वृत्तपत्रांचे दावे खोडून काढले आहेत.

अलिगढ हे नाव नजफ अली खानाचा सन्मान करण्यासाठी मराठ्यांनी दिल्याचा दावा काही इतिहासकारांनी केला आहे. याप्रकरणी प्रख्यात इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी यांनी मराठीत उपलब्ध असलेल्या काही ऐतिहासिक दस्तऐवजांवर प्रकाश टाकला असून, त्या आधारे अलिगढचं नामांतर मराठ्यांनी नाही, तर आफ्राशायब खानानं केल्याचं दाखविलं आहे.

काही इतिहासकार दावा करतात की, १८ व्या शतकात साबित खान हा येथील किल्ल्याचा किल्लेदार व शहराचा गव्हर्नर होता. त्याच्या नावाने या शहराला साबितगढ, असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर १७५३ मध्ये सूरजमल जाट यांनी जयपूरच्या जयसिंह यांच्या मदतीनं साबितगढ जिंकला. सूरजमल जाट यांनी या शहराला रामगढ, असं नाव दिलं. त्यानंतर मराठ्यांनी हे शहर जिंकलं. मराठा सैन्याचा तत्कालीन गव्हर्नर नजफ अली खान याच्या नावानं या किल्ल्याला अलिगढ, असं नाव देण्यात आलं. तसेच मराठ्यांनी या किल्ल्याची डागडुजीदेखील केली. किल्ल्याची पुनर्निर्मिती करताना मराठ्यांनी दगडांऐवजी माती आणि फ्रेंच तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यानंतर १८०३ साली हा किल्ला इंग्रजांनी मराठ्यांकडून आपल्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी या किल्ल्याचं अलिगढ हे नाव कायम ठेवलं.

इतिहासकार उदय कुलकर्णींचा दावा काय?

दरम्यान, डॉ. उदय कुलकर्णी यांनी हे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. कुलकर्णी यांनी ३० मार्च १७८५ रोजी नाना फडणीसांचे वकील सदाशिव दिनकर यांनी महादजी शिंदे यांना पाठविलेल्या पत्राचा दाखला दिला आहे. या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे की, आफ्राशायब खानानं रामगढचं अलिगढ असं नामांतर केलं होतं.

डॉ. कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, बिगरमराठी इतिहासकारांकडे त्या काळातील हे मराठी दस्तऐवज नसल्यामुळे त्यांनी त्या काळातला इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला आहे. १८ व्या शतकात देशातील सर्वात शक्तिशाली असलेल्या मराठा साम्राज्याची भाषा आणि लिपी त्यांना वाचता येत नसल्यामुळे त्यांच्याकडून अशी चुकीची वक्तव्ये आणि चुकीचा इतिहास मांडला गेल्याचे समोर येते. आफ्राशायब खानाच्या तीन बायकांची एक वेगळी आणि रंजक गोष्ट आहे. त्याबद्दल भविष्यात एखाद्या पुस्तकात लिहीन.

हे ही वाचा >> स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?

सदाशिव दिनकर यांनी पत्रात काय म्हटलंय?

छ विज्ञापना ऐसीजे :- नारायणदास व अनूपगीर गोसावी यांजवर बादशाहाची मर्जी फार कडवी. बहु वेळ बावांस सांगितलें जे, या दोघांचा विश्वास न धरणें. कामांत न घालणं. हे कोठें नाश करितील, दगा करितील, भरवसा नाहीं. एकंदर यांस कामांत न आणणे, असें बादशाहा वारंवार म्हणतात. त्याचें उत्तर करितात, यांस कामांतून काढितों. आपले डेऱ्यास आल्यावर ते विसरून दिवसरात्र त्यांबरोबर क्रमणूक आहे. राजे दयाराम, बादशाहाचा खाजगी दिवाण, खाजगी महालाचे कामकाज तो करीत होता. त्याजविसीं बादशाहांनी समक्ष बावांसी बोलले, कामकाज याचे हातें घेत जावें. तेथे मान्य केले. डेऱ्यास आल्यावर गोसाव्यानें ती खाजगी दिवाणी नारायणदासास सांगिविली. बादशाहास न विचारितां बावांनीं आपले घरीं वस्त्रे खाजगी दिवाणीची नारायण- दासास दिली. नारायणदास व गोसावी यांनी बावांस सांगोन बादशाहाचे खाजगी महालांची जप्ती करविली. जुने आमील उठून नवे आमील बावांचे मुले आहेत. हें बादशाहास विषम जालें म्हणोन ऐकतों. बादशाही मुलूख तों पुष्कळच आहे. त्याचा आक्रम शक्तिवांचून कळतच आहे! कुंजपुऱ्यापासोन पश्चम सरहद्द लाहोर काश्मीर शिखांनी दाबून, दिल्लीचे तलहेटीत, अंतरवेदींत खुर्जा व मेरट वगैरे महाल पावेतों, महालोंमहालीं रखी घेत असतात. ते महाल झाडून देश चमेलपावेतों नजफखानाकडे आगऱ्यासुद्धां होता. गोसावी, नारायण-दास यांनी बावांचे आर्जव संपादिकें, यामुळे डिगेचा किल्ला नावांस दिला. सध्या सर्वांचा मुक्काम डिगेवरच आहे. डिगेचे ठाणे पाटिलबावांस हस्तगत झालें. संरक्षणास श्रमच आहेत. असो. हस्तगत जालें. आगऱ्याचा किल्ला अफराशाब खानाचे सासऱ्यास सुजाउलखान म्हणून किल्लेदाराचे स्वाधीन आहे. त्यासी गोसावी यानें राजकारण करून, तो किल्ला पाटिलवावांस द्यावयाचे ठराऊन, फिल्पांत ठाणे बसवावयास राजश्री रायाजी पाटील यांची रवानगी केली आहे. तो आगन्याचा किल्ला हस्तगत जाला म्हणजे कुटुंबें आगऱ्यास ठेऊन, बादशाहा व बावांनी दिल्लीस जावें, असा मनसवा ऐकतों. आगन्याचा किल्ला हस्तगत जाला म्हणिजे पुढे विचार काय ठरेल ती विनंती करीन. रायाजी पाटील आगऱ्यास गेले. शहरांत मात्र माणसें जातात येतात. किल्ला हातास येत नाहीं. याचें कारण आफराशाबखानास तीन स्त्रिया. त्यांत एकीस पुत्र आहे. चौ वर्षांचं मूल. ते स्त्रीपासीं तितका मूलच ऐवज आहे. वरकड मायापुंजी, वित्तविषय, गडकोटकिल्ले दुसरीचे स्वाधीन, पाटिलबाबांनी अफराचा पुत्र येथे आणविला. त्याजला घेऊन त्याची आई येथे आली. ती निर्माल्यवत् आहे. स्त्रियांचा सवतमत्सर. दुसरी स्त्री जबरदस्त. तिचा बाप आगऱ्याचा किल्लेदार. चुलता बजीदखान, त्याजवळ अफराशाबाचा झाडून तोफखाना. तो तोफखाना घेऊन येथेच आहे. अंतरवेदीत रामगड आहे त्याचे नांव अफरा-शाबखानानें अलीगड ठेविले आहे. तोही किल्ला त्याच स्त्रीचे हाती आहे. वित्तविषय औषा रामगडावरच आहे. याप्रमाणे अगदी बंदोबस्त ज्या स्त्रीचा आहे ती म्हणती, मजला दत्तकपुत्र घेऊन देऊन, सारी दौलत माझे पुत्राचे नांवें बहाल करावी.

नामांतराची मागणी जुनीच

१९६० ते ७० च्या दशकात काही हिंदू संघटनांनी अलिगढचं नाव बदलून हरीगढ करावं, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील प्राध्यापक नदीम रजावी यांनी फ्रंटलाइनमध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटलं होतं की, १९७० च्या दशकात जनसंघाच्या नेत्यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती. अलिगढचं नामांतर केलं जावं यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली होती. तेव्हा विश्व हिंदू परिषदेचे नेते देव सुमन गोयल यांनी दावा केला होता की, हरीगढ नावाचा पौराणिक हिंदू कथांमध्येदेखील उल्लेख आहे. तेव्हापासून हिंदू संघटना आणि भाजपा नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे.

हे ही वाचा >> नेहरूंसमोर होता आव्हानांचा डोंगर, तरीही झाले तिसऱ्यांदा पंतप्रधान; हे कसे घडले?

अलिगढ शहराचा इतिहास

अलिगढ शहराचा लिखित स्वरूपातला इतिहास १२ व्या शतकाच्या शेवटी सुरू होतो. असं म्हटलं जातं की, महावीर जैन यांच्या अनुयायांनी हे शहर वसवलं होतं. या परिसरात मोठ्या प्रमाणात जैन मूर्ती आहेत. या भागात पूर्वी अनेक जैन मंदिरंदेखील होती. १२ व्या शतकात दिल्लीच्या सुलतानानं हे शहर काबीज केलं. तत्पूर्वी हे शहर राजपूतांच्या ताब्यात होतं. १३ व्या शतकात या शहराला व्यावसायिक ओळख मिळाली.

दिल्ली सल्तनतच्या दस्तऐवजांनुसार या शहराचं ‘कोल’ किंवा कोइल, असं नाव होतं. या कोल नावाची उत्पत्ती कशी झाली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. काही प्राचीन ग्रंथांमध्ये कोल नावाच्या एका जमातीचा उल्लेख आढळतो. त्या काळात या शहरात मद्य तयार केलं जायचं. १३ व्या शतकात हे शहर लोकप्रिय झालं. १२५२ मध्ये दिल्ली सल्तनतचा भावी सुलतान बलबन यानं उत्तर भारताचा गव्हर्नर असताना येथे एक मीनार उभारला होता. त्यावर एक शिलालेखदेखील होता. हा मीनार १९ व्या शतकात इंग्रजांनी पाडला; मात्र तेथील शिलालेख आजही अलिगढ मुस्लीम विद्यापीठात आहे.

अलाउद्दीन खिलजीच्या काळात या शहराला इक्ता कोल, असं नाव मिळालं. तुघलकांच्या काळातही या शहराला इक्ता कोल या नावानंच ओळखलं जात होतं. १४ व्या शतकात इब्न बतूता यानं मोहम्मद बिन तुघलकाच्या शासनकाळात भारताचा दौरा केला. तेव्हादेखील या शहराचं तेच नाव होतं. त्यानं या शहरात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडं पाहिल्याचं त्याच्या प्रवासवर्णनात नमूद केलं आहे. या शहरात खूप हिरवळ होती. १४ व्या शतकाच्या अखेरीस या शहराला सब्जाबाद (हरा भरा शहर) या नावानंदेखील ओळखलं जात होतं.

मुघल बादशाह अकबराच्या काळात या शहराला कोल हेच नाव होतं. अकबर आणि त्याचा मुलगा जहांगीर येथे शिकारीला यायचे. जहांगीरनं त्याच्या ‘तुजुक ए जहांगीर’ या आत्मचरित्रात कोलमधील घनदाट जंगलाचं वर्णन केलं आहे. त्यानं या जंगलात अनेक लांडग्यांची शिकार केली होती. पुढे १८ व्या शतकापर्यंत या शहराचं नाव कोल, असंच होतं.