-डॉ. देवदत्त पोखरकर
मुघल या शब्दाची व्युत्पत्ती मंगोल या शब्दावरून झाल्याचे मानले जाते. मुघल साम्राज्य स्थापन करणारा बाबर हा देखील चंगेज खान व तैमूर यांच्या वंशातील होता. मुघलांचे उगम स्थान मध्य आशियात असल्यामुळे ते घोडेस्वारी आणि घोडदळ या युद्धकलेत पारंगत होते. भारतात त्यांच्या साम्राज्यविस्ताराचे हे एकमेव कारण नसले तरी घोडदळामुळे भारतावर राज्य करण्याचा त्यांचा मार्ग सोपा झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर घोड्याचं रक्त पिऊन जगणार्या मंगोल साम्राज्याने घोड्यांच्या मदतीने इतिहास कसा घडवला याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
Intercontinental Ballistic Missiles
१३ व्या शतकात मंगोल सैन्याने आशियापासून युरोपपर्यंत आपले अवाढव्य साम्राज्य उभे केले होते. त्यांच्या या अद्वितीय यशामागे केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती, मनगटातील बळ आणि तलवारीचे पाते नव्हते; तर त्यांच्या घोड्यांच्या वेगवान टापांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा होता. इतिहासकार मॉरिस रोसाबी यांनी मंगोल घोडदळाचे वर्णन त्या काळातील ‘Intercontinental Ballistic Missiles’ असे केले आहे. हे वर्णन मंगोल सैन्याच्या अफाट गती, अचूकता आणि विध्वंसक क्षमतेचे महत्त्व विशद करते.
सैन्याची खरी ताकद त्यांच्या गतिशीलतेत
चंगेज खान हा केवळ पराक्रमी योद्धा नव्हता, तर तो दूरदृष्टी असलेला महान सेनापती होता. त्याच्या सैन्याची खरी ताकद त्यांच्या गतिशीलतेत (Mobility) आहे, याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच मंगोल सैन्यातील प्रत्येक सैनिकाकडे सहसा तीन ते चार घोडे असत. यामागील प्रमुख कारण म्हणजे दीर्घ मोहिमांदरम्यान एक घोडा थकला की, सैनिक तत्काळ दुसऱ्या घोड्यावर स्वार होत असे. यामुळे घोड्यांना आवश्यक ती विश्रांती मिळत असे आणि सैन्याचा वेग कधीही मंदावत नसे. अशा प्रकारे मंगोल सैन्य एका दिवसात १०० मैलांपेक्षा अधिक अंतर पार करू शकत असे. हे त्या काळातील इतर कोणत्याही सैन्यासाठी अशक्यप्राय होते.
घोड्याशिवायचा मंगोल म्हणजे पंखांशिवाय पक्षी
‘घोड्याशिवायचा मंगोल म्हणजे पंखांशिवायचा पक्षी’, ही म्हण केवळ काव्यात्मक नाही; ती मंगोल जीवनशैलीचे अचूक वर्णन करते. मंगोल लोकांचा जन्म, बालपण, जीवन आणि युद्ध हे सर्व काही घोड्यांभोवती फिरत असते. चंगेज खानने वापरलेले घोडे हे प्रत्यक्षात मंगोलियन तट्टू (Mongolian Pony) या प्राचीन आणि मूळ जातीचे होते. मंगोलियाच्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात (Steppes) विकसित झालेल्या या घोड्यांमध्ये विलक्षण सहनशक्ती (Endurance) आढळते. हे घोडे उणे ४० (-40) अंश सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या थंडीत तसेच तीव्र उन्हातही सहज तग धरू शकतात. कोणत्याही दर्जाचे गवत खाऊन ते जगू शकतात. हिवाळ्यात बर्फाखाली गाडलेले गवतही ते आपल्या खुरांनी उकरून काढतात. त्यामुळेच कोणत्याही विशेष रसदपुरवठ्याविना लांबवर मोहिमा करणे मंगोल सैन्याला शक्य झाले.
मंगोल घोडे उंचीने कमी पण अत्यंत मजबूत बांध्याचे तसेच काटक शरीरयष्टी आणि भक्कम हाडांचे असतात. त्यांच्यात ‘ॲम्बल’ नावाची विशेष चाल आढळते. ॲम्बलमध्ये घोडा वेगात असूनही स्वाराचे शरीर कमी हलते. यामुळे धावत्या घोड्यावरून अचूक बाण मारणे (Mounted Archery) सहज शक्य होत असे. म्हणूनच मंगोलियात आजही एक प्रसिद्ध म्हण आहे, घोडा हा मंगोल माणसाचे अर्धे शरीर आहे.
मंगोल घोडदळाची युद्धनीती
मंगोल सैन्याची सर्वात मोठी ताकद केवळ वेग नव्हती; तर त्यांची अत्यंत शिस्तबद्ध युद्धनीति होती. मंगोल घोडदळ दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागलेले असे; हलके घोडदळ (Light Cavalry) आणि चिलखती घोडदळ (Armoured Cavalry). हलके घोडदळ प्रामुख्याने धनुर्धारींचे असे. ते वेगाने शत्रूभोवती फेऱ्या मारत सतत बाणांचा वर्षाव करत. चिलखती घोडदळ तलवारी, भाले आणि कवचांनी सज्ज असे व निर्णायक हल्ल्यासाठी वापरले जाई. मंगोल सैनिकांची एक प्रसिद्ध रणनीति होती ती म्हणजे ‘तात्पुरती माघार’ (Feigned Retreat). ते जाणीवपूर्वक पळून जात असल्याचे भासवत आणि शत्रूला पाठलाग करण्यास भाग पाडत (उदा. कॅल्का नदीची लढाई). शत्रू विस्कळीत झाला की, अचानक मागे वळून मंगोल घोडदळ त्यांच्यावर प्रचंड वेगाने तुटून पडत असे. ही रणनीती अनेक वेळा चीन, मध्य आशिया आणि युरोपमध्ये वापरली गेली होती.
घोडे आणि मंगोल सैनिकांचे नाते
युद्धात उतरण्यापूर्वी मंगोल सैनिक आपल्या घोड्यांची विशेष काळजी घेत. घोड्यांच्या डोक्यावर चामड्याचे आवरण आणि शरीरावर चामड्याचे चिलखत (Leather Armor) चढवले जाई. १७व्या शतकातील History of the Mughals या ग्रंथातील चित्रांमध्ये १२१४ मधील चीन मोहिमेदरम्यान वापरलेल्या अशा चिलखती घोड्यांचे स्पष्ट पुरावे आढळतात. ‘राशीद-अल-दिन’ याने लिहिलेल्या ‘जामी-अल-तवारीख’मध्ये (Jami’ al-tawarikh) (इ.स. १३०७-१३१०) मंगोल चिलखती घोडदळाचे सर्वात जुने आणि अस्सल पुरावे मिळतात. मंगोल सैन्य अत्यंत कठोर, भटक्या (Nomadic) जीवनशैलीतून आलेले होते. त्यांच्या दैनंदिन जीवनात घोड्याला केवळ वाहन म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्यासारखे स्थान होते.
अत्यंत कठोर परिस्थितीत टिकणारी जीवनपद्धती
युद्ध मोहिमेत अन्नाची कमतरता भासल्यास मंगोल सैनिक घोड्याच्या मानेतील शिरेतून थोडे रक्त काढून ते पित असत. या प्रक्रियेत घोडा मारला जात नसे; केवळ मर्यादित प्रमाणात रक्त घेतले जाई. १३ व्या शतकातील इटालियन प्रवासी मार्को पोलो याने त्याच्या प्रवासवर्णनात याचा उल्लेख केला आहे. हे रक्त प्रथिने, क्षार आणि ऊर्जा पुरवणारे असल्याने सैनिक अत्यंत कठोर परिस्थितीतही दीर्घकाळ तग धरू शकत होते. घोड्याला झालेल्या जखमेवर राख लावली जाई. राख रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करत असे आणि तिच्यात काही प्रमाणात जंतुनाशक (antiseptic) गुणधर्म असल्याने संसर्गाचा धोका कमी होत असे. मंगोल सैनिक घोड्याच्या दुधापासून कुमिस (Kumis) नावाचे आंबवलेले पेय तयार करत. हे पेय ऊर्जा देणारे आणि पौष्टिक मानले जाई.
मंगोल साम्राज्याच्या विस्तारातील घोड्यांचे योगदान
मंगोल घोडदळामुळेच चंगेज खानने इतिहासातील सर्वात मोठ्या भू-साम्राज्यांपैकी एक साम्राज्य निर्माण केले. त्याचे सैन्य चीनपासून रशिया, मध्य आशिया, पर्शिया आणि पूर्व युरोपपर्यंत पोहोचले. इतिहासकारांच्या मते, मंगोल सैन्याच्या अफाट गतिमानतेमुळे शत्रूंना त्यांची हालचाल समजण्याआधीच ते हल्ला करत होते. यामुळे अनेक राजांनी लढाई न करता शरणागती पत्करली.
घोड्यांविषयी आदर
चंगेज खानने आपल्या सैनिकांना नेहमीच घोड्यांशी प्रेमाने आणि काळजीने वागण्याची ताकीद दिली होती. घोड्याचा सन्मान करा, तो तुम्हाला सातासमुद्रापार नेईल अशी एक मंगोल म्हणही आहे. युद्ध संपल्यानंतरही हे घोडे खडबडीत प्रदेशातून सहज प्रवास करत आणि अत्यंत कमी चाऱ्यावरही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवत. त्यांच्या या शिस्तीमुळेच मंगोल सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य बनू शकले.
मंगोल संस्कृतीतील घोड्याचे स्थान
मंगोल साम्राज्याच्या विस्ताराला मानवी पराक्रमाबरोबर लाभलेली घोड्यांची साथ महत्त्वाची होती. हे घोडे केवळ युद्धाचे साधन नव्हते, तर मंगोल सत्तेचे अविभाज्य अंग होते. आजही मंगोल संस्कृतीत घोड्याला देवासमान स्थान आहे. मंगोल मूल जमिनीवर चालण्याआधी घोड्याच्या पाठीवर बसायला शिकते, असे म्हटले जाते. दरवर्षी मंगोलियातील नादाम उत्सवामध्ये (Naadam Festival) घोडदौड ही सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. यामध्ये लहान मुलंही शेकडो किलोमीटरची घोडदौड करतात, हे मंगोल परंपरेतील घोडेस्वारीचे जिवंत उदाहरण आहे.
