भारतीय संस्कृतीत महाभारत, रामायण या महाकाव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतांश भारतीयांच्या श्रद्धास्थानी ही महाकाव्ये आहेत. प्रचलित भारतीय राजकारणात याच महाकाव्यांच्या आधारे राजकारण होताना आपण अनुभवत आहोत. एकूणच भारतीय संस्कृती, इतिहास, व राजकारण यांच्या केंद्रस्थानी असलेल्या महाकाव्यांच्या ऐतिहासिकतेवरून नेहमीच अनेक प्रश्नचिन्हे निर्माण केली जातात. हे केवळ भारतातच घडते असे नाही. जगाच्या इतिहासात इतर महाकाव्यांच्या बाबतीतही कमी अधिक फरकाने अशाच स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात.
आज राममंदिर हा खूप संवेदनशील विषय असला तरी याच महाकाव्यांच्या आधारे या रामजन्मभूमीची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, हे येथे आपल्याला विसरून चालणार नाही. या संशोधनात प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ बी बी लाल हे अग्रेसर होते. बी बी लाल यांची १९६८ साली भारतीय पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकपदी निवड झाली होती. नुबिया, आफ्रिका या देशांमध्ये केलेल्या पुरातत्त्वीय क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. असे असले तरी लाल हे रामायण व महाभारत या काव्यांमध्ये नमूद केलेल्या स्थळांच्या शोधाकरीता व त्या ठिकाणी केलेल्या उत्खननासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २०२१ साली पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. पद्मविभूषण बी बी लाल यांचा जन्म २ मे १९२१ साली झाशी येथे झाला होता. याच निमित्ताने लाल यांनी महाभारताशी संबंधित केलेल्या संशोधनाचा आढावा घेणे आज समयोचित ठरावे. बीबी लाल हे पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे महाकाव्यांची सत्यता पाडताळणारे भारतीय वंशाचे पहिलेच अभ्यासक होते.
प्रा. बी बी लाल नक्की कोण होते?
बी बी लाल यांचे पूर्ण नाव ब्रज बासी लाल असे होते. ते भारतीय लेखक आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. त्यांनी १९६८ ते १९७२ या काळात भारतीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालक म्हणून कार्यभार सांभाळला. लाल हे मूलतः संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदव्युत्तरपदवी प्राप्त केली होती. १९४३ साली प्रसिद्ध ब्रिटीश पुरातत्त्वशास्त्रज्ञ मॉर्टिमर व्हीलर यांच्या मार्गदर्शनाखाली तक्षशिला उत्खननात प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर मात्र लाल यांनी हडप्पासारख्या अनेक प्राचीन स्थळांवर पन्नास वर्षांहून अधिक काळ आपली कारकीर्द गाजवली.
आणखी वाचा: विश्लेषण: हुतात्मा स्मारकावर साम्यवादी प्रभावामागचे कारण काय?
प्रा. बी बी लाल आणि भारतीय महाकाव्य:
लाल यांनी महाभारतात नमूद केलेल्या स्थळांच्या यादीनुसार पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले. त्यांनी पन्नासच्या दशकात महाभारतात नमूद केलेली पांडव-कौरव यांची राजधानी हस्तिनापूर येथे उत्खननास सुरुवात केली. याच काळात त्यांनी इंडो-गँजेटिक डिव्हाइड आणि अप्पर यमुना-गंगा दोआबमध्ये वसलेल्या अनेक पुरात्त्वीय स्थळांचा शोध लावला. विशेष म्हणजे लाल यांनी या सर्व स्थळांवर पेंटेड ग्रे वेअर (करड्या रंगाची मातीची भांडी) या मृदभांड्याच्या सार्वत्रिक अस्तित्वाचे पुरावे जगासमोर आणले. या मृदभांड्यांचा संबंध महाभारत कालीन संस्कृतीशी जोडण्याचे श्रेय बी बी लाल यांच्याकडेच जाते. १९७५ -७६ सालामध्ये लाल यांनी रामायणात नमूद केलेल्या पुरातत्त्वीय स्थळांवर संशोधन केले होते. या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी अयोध्या, भारद्वाज आश्रम, नंदीग्राम, चित्रकूट आणि शृंगवेरपूर या रामायणात नमूद केलेल्या पाच स्थळांवर उत्खनन केले. याच विषयांशी संबंधित त्यांचे १५० हून अधिक शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्याशिवाय ते अनेक पुस्तकांचे लेखकही आहेत. प्राथमिक कालखंडात लाल यांचे कार्य शास्त्रीयदृष्ट्या प्रामाणिक मानले गेले तरी नंतरच्या काळात त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अयोध्या येथील उत्खननात त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला व त्यांचे या स्थळाचे कार्य सदोष असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती.
बी बी लाल यांच्यावर नेमका आरोप कोणता ?
बी बी लाल यांचा संबंध हा रास्वसंघाशी जोडला गेला. लाल यांनी अयोध्येविषयी घेतलेली भूमिका ही धार्मिक व एकतर्फी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. लाल हे १९८९ साली निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी रास्वसंघाशी संलग्न एका मासिकात अयोध्येतील बाबरी मशिदीच्या खाली स्तंभ असलेल्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत असा उल्लेख केला होता. वास्तविक अयोध्या येथे उत्खनन आधीच करण्यात आले होते त्यावेळी लाल यांनी सात पृष्ठांच्या प्राथमिक अहवालात अयोध्येतील बाबरी मशिदीच्या दक्षिणेला “स्तंभाचे तळ” सापडले इतकाच उल्लेख केला होता त्यात मंदिराचा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांच्या नंतरच्या लेखावर अनेक वाद निर्माण झाले.
महाभारत घडले होते का ? लाल यांचे संशोधन काय सांगते?
महाभारत हे देखील भारतातील प्रसिद्ध महाकाव्य आहे. कुठलेही महाकाव्य असले तरी साधारण दोन मतप्रवाह त्या महाकाव्याची सत्यता सांगण्याचा प्रयत्न करत असतात. यात एक गट जो महाभारत ही कथा नसून ते घडले आहे असा विश्वास व्यक्त करतो. तर दुसरा गट महाभारत ही केवळ कथा आहे असेच मानतो. त्यामुळे अनेकदा त्या गोष्टीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा आपला पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असतो. असेच काहीसे महाकाव्यांच्या बाबतीत होताना दिसते.
बी बी लाल यांनी कोणत्या धार्मिक दृष्टिकोनातून संशोधन केले हे काही काळ बाजूला ठेवून त्यांनी नेमके काय संशोधन केले हे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहणेदेखील आवश्यक आहे. भारतासारख्या देशाचा इतिहास हा अनेक स्थित्यंतरातून गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कालखंडाचा आपल्याकडे लिखित स्वरूपात इतिहास उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्याला अशा वेळी पुरातत्त्व अवशेषांवर अवलंबून राहावे लागते. असे असले तरी बऱ्याच वेळा तत्कालीन काव्य, कथा, नाटके यांच्यातून त्या समाजाचे दर्शन होत असते. हे साहित्य १०० टक्के अचूक नसले तरी त्यात किमान काही अंश सत्यता असल्याचे संशोधनाअंती उघड झाले आहे. त्यामुळे भारतीय महाकाव्य देखील यासाठी अपवाद नाहीत. म्हणूनच पुरातत्त्वज्ञ तत्कालीन वस्तूनिष्ठ पुराव्यांसोबत तत्कालीन साहित्याचा आधार घेतात. तेच लाल यांनी महाभारत या काव्याचा आधार घेऊन केले आहे.
आणखी वाचा:विश्लेषण : Defamation Law आहे तरी काय? अब्रुनुकसानी नेमकी केव्हा होते?
महाभारत आणि लाल यांचे संशोधन
महाभारत या काव्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. जय, भारत ते महाभारत असा या काव्याच्या प्रवास अनेक कालखंडांचा आहे. बी बी लाल यांनी महाभारतात नमूद केलेल्या स्थळांचे प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांना अनेक पुरातत्वीय स्थळांचा शोध लागला होता. येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की या सर्व स्थळांवर महाभारत खरंच घडले का ? हा प्रश्न मुख्य असला तरी यातील प्रत्येक स्थळ मोठ्या प्रमाणात पुरातत्त्वीय पुरावे सादर करते. त्या स्थळांवर नक्की कोणती संस्कृती होती हा मुद्दा नंतर येतो. म्हणजेच महाभारताच्या कथेच्या माध्यमातून प्राचीन संस्कृती असलेल्या स्थळांचा येथे शोध लागला आहे. लाल यांच्या सर्वेक्षणात हस्तिनापूर, पुराना किला, कुरुक्षेत्र, पानिपत, सोनिपत यासारख्या स्थळांचा समावेश आहे. लाल यांच्या मार्गदर्शनाखाली १९५१-५२ साली हस्तिनापूर येथे उत्खनन करण्यात आले होते. या स्थळाच्या सर्वात प्राचीन कालखंडात पेंटेड ग्रे वेअर ही मृदभांडी सापडली. या भांड्यांचा आढळ लाल यांनी सर्वेक्षण केलेल्या सर्वच स्थळांवर आहे. त्यामुळे लाल यांनी या मृदभांड्यांचा संबंध महाभारत काळाशी जोडला होता. महाभारतात निचक्षु राजाची कथा येते. निचक्षु राजा राज्य करत असताना कौशाम्बी ही हस्तिनापूरची राजधानी होती. महाभारताच्या युद्धानंतर परीक्षित राजानंतरचा पाचवा राजा ‘निचक्षु’ हा होता. याच्या काळात गंगेला पूर आला होता. या पुराचे अवशेष पुरातत्वीय उत्खननात आढळतात हे विशेष. नंतरच्या काळात याच ठिकाणी राज्य करत असलेला उदयन हा राजा निचक्षु नंतरचा १९ वा राजा असून तो गौतम बुद्ध यांना समकालीन होता. म्हणजेच हा राजा इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेला. याचाच अर्थ जर महाभारताचे युद्ध झाले असे मानले तर ते इसवी सन पूर्व १००० ते ८०० या काळात झालेले असावे असा तर्क लाल यांनी मांडला. याविषयी अभ्यासकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. नवीन अभ्यासाअंती महाभारताचा काळ आणखी मागे जात आहे. त्यामुळे लाल यांचा सिद्धांत कालबाह्य ठरण्याची शक्यता असली तरी त्यांचे संशोधन गौण ठरत नाही.
बी बी लाल हे अशा स्वरूपाचे भारतीय महाकाव्यांच्या आधारे इतिहास शोधणारे भारतीय वंशाचे पहिले अभ्यासक होते. त्यामुळेच जरी त्यांचे संशोधन भविष्यात कालबाह्य ठरले तरी त्यांचे कार्य हे नवीन संशोधनाचे मूळ प्रेरणास्थान असल्याने त्यांच्या संशोधनाचे महत्त्व कमी होत नाही.