Digital arrest in Cambodia targeting Indians सायबर गुन्हेगार आता नवीन पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. याविषयी कल्पना नसल्यामुळे आतापर्यंत अनेक जण या फसवणुकीला बळी पडले आहेत. सायबर गुन्हेगार कायदा आणि नियमांची जरब दाखवत लोकांची फसवणूक करत आहेत, यालाच ‘डिजिटल अरेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे कंबोडियातून भारतीयांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. कंबोडियातील अधिकाऱ्यांनी भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी गेल्या काही आठवड्यांत अशा सुमारे २०० स्कॅम सेंटर्सवर कारवाई केली आहे. कंबोडियाच्या ‘ऑनलाइन स्कॅमविरोधी आयोगा’चे अध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री छाय सिनारिथ यांनी सांगितले की, “आम्ही आतापर्यंत सुमारे १९० ठिकाणे सील केली आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, अधिकाऱ्यांनी या केंद्रांशी संबंधित १७३ वरिष्ठ गुन्हेगारांना अटक केली आहे. चीनने केलेल्या प्रत्यार्पणानंतर मूळचा चीनचा असलेला ली कुओंग याच्यावर कारवाई झाल्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली. भारतीयांची फसवणूक कशी केली जात होती? कंबोडियातील या प्रकरणाचे पाकिस्तानी कनेक्शन काय? जाणून घेऊयात…

नेमके प्रकरण काय?

कंबोडियातील अधिकाऱ्यांना कॅम्पोट येथे स्कॅमर्सनी वापरलेला एक पडका अड्डा सापडला. या ठिकाणी मुंबई पोलिस आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) लोगो असलेले बनावट साइनबोर्ड सापडले. त्यांना तपासादरम्यान महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे आणि तिरंगाही आढळला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अड्ड्याचा वापर भारतीय नागरिकांना लक्ष्य करून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यासाठी केला जात होता. या संपूर्ण प्रकरणामागे चीनमधील एका बड्या उद्योगपतीचा हात असावा असा संशय आहे.

कॅम्पोटमधील या अड्ड्यावर पत्रकारांना मोठे वर्कशॉप्स दाखवण्यात आले. तिथे कॉम्प्युटर स्टेशन्स होते, फसवणूक कशी केली जावी याची माहिती देणारी कागदपत्रे विखुरलेली होती, फोन कॉलसाठी स्टुडिओ बूथ आणि बनावट भारतीय पोलिस ठाणे तयार करण्यात आले होते. ‘माय कॅसिनो’ नावाच्या या ठिकाणी कोणतीही अटक झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणचा कथित बॉस ली कुओंगला ताब्यात घेतल्यावर तिथले कामगार पळून गेल्याचे समजते.

पोलिसांनीही हे मान्य केले की, त्यांना रोखण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते. शासकीय दौऱ्यादरम्यान कॅम्पोटचे पोलिसप्रमुख माओ चनमथुरिथ म्हणाले, “आमच्याकडे संपूर्ण प्रांतात केवळ १,००० पोलिस आणि सुमारे ३०० लष्करी पोलिस आहेत. दोन्ही दले एकत्र केली तरी आम्ही त्यांना रोखू शकलो नसतो, कारण ते इथून बाहेर पडले तेव्हा त्यांची संख्या ६,००० ते ७,००० च्या आसपास होती.”

स्कॅमचे पाकिस्तानी कनेक्शन काय?

गेल्या काही वर्षांत दक्षिण पूर्व आशिया जागतिक सायबर-फसवणूक उद्योगाचे केंद्र ठरत आहे. चिनी गुन्हेगारी टोळ्यांद्वारे चालवले जाणारे हे अड्डे कंबोडिया, लाओस, फिलीपिन्स आणि म्यानमार-थायलंड सीमेवरील भागांत पसरले आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी ही बाब समोर आली होती की, ५,००० भारतीय कंबोडियात अडकले आहेत. त्यांना टोळ्यांनी मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवले होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने जानेवारीत दिलेल्या वृत्तानुसार, या तपासादरम्यान एक पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे.

नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांना परदेशात आकर्षित करणारे नेटवर्क पाकिस्तानमधून चालवले जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पीडितांनी सांगितले की, त्यांची भरती सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सद्वारे करण्यात आली होती आणि फॉरेन्सिक तपासात पाकिस्तानातील हँडलर्सशी संबंधित आयपी ॲड्रेस सापडले आहेत. सीबीआय आणि एनआयएने आता या तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर’ने संशयित नोंदणीत पाकिस्तानशी संबंधित आयपी ॲड्रेस समाविष्ट केले आहेत, त्यामुळे फसवणूक करणारी खाती आणि व्यवहार रोखण्यास मदत होईल. डेटावरून असे दिसून येते की, गेल्या सहा वर्षांत फसवणुकीमुळे भारतीयांचे ५२,९७६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या स्कॅम नेटवर्कमध्ये फसव्या नोकऱ्या, सक्तीची मजुरी, धमक्या आणि आर्थिक खंडणीचा समावेश होता. एका सूत्राने सांगितले की, उत्तर प्रदेश, पंजाब, मुंबई, तेलंगणा आणि केरळमधील लोकांना लक्ष्य करणारे हे एक संघटित नेटवर्क आहे.

७,००० भारतीयांची सुटका

‘स्क्रोल’च्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने सांगितले आहे की २०२२ पासून कंबोडिया, म्यानमार आणि लाओसमधील सायबर क्राईम अड्ड्यांमधून सुमारे ७,००० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. यात कंबोडियातील २,५३३, लाओस मधील २,२९७ आणि म्यानमारमधील २,१६८ नागरिकांचा समावेश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही आकडेवारी दिली.

ते म्हणाले की, बनावट नोकऱ्यांचे आमिष दाखवून भारतीयांना कंबोडिया, म्यानमार आणि लाओसमध्ये सायबर गुन्हे करण्यासाठी नेणाऱ्या संशयास्पद कंपन्यांबद्दल सरकार जागरूक आहे. सिंह यांनी संसदेत सांगितले की, “या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची नेमकी संख्या माहीत नाही, कारण अनेक जण फसव्या एजंट्स आणि बेकायदा मार्गांनी तिथे पोहोचतात.” भारताने वारंवार आपल्या नागरिकांना परदेशात उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवणाऱ्या अशा योजनांना बळी पडू नये, असा इशारा दिला आहे.