English: How Digital Fatigue affects your body and mind due to prolonged screen exposure and poor posture: आजच्या धावपळीच्या युगात डिजिटल उपकरणांशिवाय आयुष्य जगणे अशक्य झाले आहे. मात्र, याच सोयीमुळे आता ‘डिजिटल थकवा’ (Digital Fatigue) नावाचे नवे संकट आपल्या दारात उभे राहिले आहे.
आरोग्यविषयक नवं आव्हान
स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्ही याशिवाय आजचं जीवन अपूर्ण वाटतं. काम, शिक्षण, संवाद, बँकिंग, खरेदी आणि मनोरंजन हे सगळं डिजिटल माध्यमांवर अवलंबून झालं आहे. तंत्रज्ञानाने जीवन सोपं केलेलं असलं, तरी त्याबरोबर एक नवं आरोग्यविषयक आव्हान निर्माण केलं आहे ते म्हणजे डिजिटल थकवा (Digital Fatigue). स्क्रीनचा दीर्घकाळ आणि अतिरेकी वापर केल्यामुळे शरीर आणि मनावर होणारा ताण म्हणजे डिजिटल थकवा.
मानदुखी, पाठदुखी, डोळ्यांचा ताण
करोना नंतर ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन शिक्षण आणि व्हर्चुअल बैठकींचं प्रमाण वाढलं. कामासाठी, शिक्षणासाठी, खरेदीसाठी किंवा बऱ्याच वेळा फक्त मनोरंजनासाठी स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ लक्षणीयरीत्या वाढला. याचा परिणाम म्हणून मानदुखी, पाठदुखी, डोळ्यांचा ताण, डोकेदुखी आणि झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या.

डिजिटल थकवा म्हणजे काय?
डिजिटल उपकरणांचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे डोळे, स्नायू, मज्जासंस्था आणि मेंदूवर पडणारा ताण म्हणजे डिजिटल थकवा. या थकव्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो, हा आधुनिक जीवनशैलीशी संबंधित विकार आहे.
डिजिटल थकव्याची प्रमुख लक्षणं
डिजिटल थकव्याची लक्षणं हळूहळू जाणवतात आणि दुर्लक्षित केल्यास ती गंभीर होऊ शकतात.
१. डोळ्यांशी संबंधित लक्षणं
- डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि खाज
- धूसर दिसणे
- डोकेदुखी
- पाणी येणे किंवा डोळे लाल होणे
- प्रकाशाची संवेदनशीलता
२. स्नायू व सांध्यांचे त्रास
- मानदुखी
- खांदेदुखी आणि पाठदुखी
- कंबरदुखी
- मनगट व बोटांमध्ये वेदना
- खांद्यांमध्ये स्टिफनेस
३. मानसिक आणि न्यूरोलॉजिकल परिणाम
- एकाग्रतेत घट
- चिडचिड आणि थकवा
- मानसिक ताण
- कार्यक्षमतेत घट
- झोपेच्या समस्या
याशिवाय शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवर देखील याचे परिणाम होतात, जसं की सतत एका जागी बसल्याने वाढणारं वजन, पचनाशी संबंधित समस्या, संप्रेरकांचं असंतुलन, टाइप २ डायबिटीज चा वाढणारा धोका, फुप्पुसांची कमी होणारी क्षमता.
डिजिटल थकवा का येतो?
१. दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणे
स्क्रीनकडे पाहताना पापण्यांची उघडझाप कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील आर्द्रता कमी होऊन कोरडेपणा आणि ताण निर्माण होतो.
२. चुकीचं पोश्चर
मोबाईल वापरताना डोकं पुढे झुकवलं जातं. त्यामुळे मानेवर अतिरिक्त ताण पडतो. संशोधनानुसार, डोकं ६० अंशांनी पुढे झुकवल्यास मानेवर सुमारे २५–२७ किलो वजनाचा ताण येतो.
३. निळ्या प्रकाशाचा (Blue Light) परिणाम
डिजिटल स्क्रीनमधून उत्सर्जित होणारा निळा प्रकाश झोपेचं नियमन करणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते.
४. हालचालींचा अभाव
दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे स्नायू निष्क्रिय होतात. यामुळे कडकपणा, वेदना आणि थकवा वाढतो.
५. पुनःपुन्हा होणाऱ्या हालचाली
कीबोर्ड आणि माऊसचा सतत वापर केल्यामुळे मनगट आणि बोटांवर ताण येतो. यामुळे Repetitive Strain Injuries (RSI) उद्भवू शकतात.
६. मानसिक ताण आणि माहितीचा अतिरेक
सतत ई-मेल्स, मेसेजेस आणि ऑनलाइन बैठका यांमुळे मानसिक थकवा निर्माण होतो. कामाव्यतिरिक्त मनोरंजनासाठी केल्या जाणाऱ्या माईंडलेस स्क्रोलिंगमुळे एकाग्रतेवर आणि सर्जनशीलतेवर गंभीर परिणाम होतात. प्रत्येक सेकंदाला मिळणाऱ्या नवीन महितीचं काय करायचं हे मेंदूला कळत नाही, मज्जासंस्था सतत स्टिमुलेट होत राहते परिणामी चिडचिडेपणा वाढतो, संवाद साधण्याची क्षमता कमी होते आणि मानसिक अस्वस्थता वाढते.
शरीरावर होणारे दीर्घकालीन परिणाम
डिजिटल थकवा दुर्लक्षित केल्यास पुढील समस्या उद्भवू शकतात:
- दीर्घकालीन मानदुखी आणि कंबरदुखी
• टेक्स्ट नेक सिंड्रोम
• सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा धोका
• डोळ्यांचे विकार
• मनगटातील कार्पल टनेल सिंड्रोम
• झोपेचे विकार
• मानसिक ताण आणि नैराश्य
• कार्यक्षमतेत घट
डिजिटल थकवा टाळण्यासाठी प्रभावी उपाय
१. 20-20-20 नियम पाळा
दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहा. यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते.
२. योग्य बसण्याची पद्धत अवलंबा
- स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर ठेवा.
- पाठ सरळ आणि खांदे सैल ठेवा.
- पाय जमिनीवर सपाट ठेवा.
- लॅपटॉप मांडीवर ठेवून काम टाळा.
३. नियमित हालचाल करा
प्रत्येक ३०–४५ मिनिटांनी उठून चालणे किंवा हलके स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.
४. स्क्रीनची ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट योग्य ठेवा
अतिप्रकाश किंवा अंधुक स्क्रीन डोळ्यांवर ताण वाढवते.
५. ब्लू लाईटचा प्रभाव कमी करा
रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास स्क्रीन वापर टाळा किंवा ब्लू लाईट फिल्टर वापरा.
६. डोळ्यांची काळजी घ्या
नियमितपणे पापण्यांची उघडझाप करा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृत्रिम अश्रूंचा वापर करा.
७. डिजिटल डिटॉक्सचा अवलंब करा
दररोज काही वेळ स्क्रीनपासून दूर राहण्याची सवय लावा.
फिजिओथेरपीची भूमिका
डिजिटल थकवा कमी करण्यासाठी फिजिओथेरेपी अत्यंत प्रभावी ठरते. फिजिओथेरेपिस्ट खालील बाबींमध्ये मार्गदर्शन करतात:
- योग्य पोश्चर आणि एर्गोनॉमिक्स
- मान, खांदे आणि पाठीसाठी व्यायाम
- स्नायू बळकट करण्याचे कार्यक्रम
- स्ट्रेचिंग आणि मोबिलिटी प्रशिक्षण
- वेदना व्यवस्थापन तंत्र
- कामाच्या ठिकाणचे नियोजन (अर्गोनॉमिक मोडीफिकेशन्स)
यामुळे वेदना कमी होतात, शरीराची कार्यक्षमता सुधारते आणि भविष्यातील त्रास टाळता येतो.
डिजिटल तंत्रज्ञान हे आधुनिक जीवनाचं अविभाज्य अंग आहे. परंतु त्याचा अतिरेक शरीर आणि मनासाठी हानिकारक ठरू शकतो. डिजिटल थकवा हा आधुनिक जीवनशैलीशी निगडित असला, तरी योग्य सवयी अंगीकारल्यास तो सहज टाळता येतो.
लक्षात ठेवा:
- स्क्रीनचा वापर करा, पण सजगपणे.
• बसून काम करा, पण नियमित हालचाल करा.
तंत्रज्ञानाचा स्वीकार नक्की करा, त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका
