Learn about NEFT RTGS IMPS Limit Difference to optimize your Digital Banking Money Transfer India experience: भारतात भीम, गूगलपे, फोनपे यांसारख्या युपीआय (UPI) अॅप्समुळे डिजिटल पेमेंटमध्ये मोठी क्रांती झालेली असली, तरी मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी या अॅप्सवर मर्यादा येतात. व्यावसायिक किंवा वैयक्तिक कामासाठी जेव्हा लाखो रुपयांचा व्यवहार करायचा असतो, तेव्हा एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS) आणि आयएमपीएस (IMPS) हे तीन पर्याय उपलब्ध असतात. नेमका कोणता पर्याय कधी वापरावा, याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे.

डिजिटल आर्थिक व्यवहार वाढले

भारतात डिजिटल पेमेंटमध्ये सातत्याने वाढ होत आहे, याचे एक प्रमुख कारण म्हणजे भीम/ गूगलपे / फोनपे यासारख्या युपीआय मोबाईल अॅपचा सहज करता येणार वापर. यामुळे अशिक्षित/ अर्धशिक्षित नागरिकसुद्धा आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करू लागले आहेत. असे असले तरी यासारख्या युपीआय अॅपच्या वापरासाठी काही मर्यादा आहेत. कारण याद्वारे केवळ लहानसहान रकमेची पेमेंट्सच करता येतात.

पेमेंटसाठीचे तीन पर्याय

एका दिवसात किती व्यवहार करावयाचे याची मर्यादा ठरलेली असते. शिवाय एका वेळी कमाल रु.१ लाख इतकेच पेमेंट करता येते. वैयक्तिक कारणासाठी ही रक्मम दरवेळी पुरेशी असेलच, असे नाही तर व्यावसायिक कारणासाठी ही कमाल रक्कम बऱ्याचदा खूपच अपुरी असते. अशावेळी डिजिटल पेमेंट करण्यासाठी एनईएफटी/ आरटीजीएस/ आयएमपीएस हे तीन पर्याय सहज वापरता येतात. तथापि, नेमका कोणता पर्याय कधी व कसा वापरता येतो याची बहुतेकांना माहिती नसते आणि म्हणून आज आपण या तिन्ही पर्यायांची प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती घेऊ.

NEFT RTGS IMPS Limit Difference chart | Digital Banking Money Transfer India methods | नेट बँकिंग पैशांचे व्यवहार नियम | एनईएफटी आरटीजीएस आयएमपीएस फरक
डिजिटल बँकिंग: एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस नियम (Image- Gemini)

१) एनईएफटी म्हणजे काय व ही सुविधा कशी वापरता येते ?

एनईएफटी म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड टान्सफर सुविधा असून याद्वारे आपण एका बँक खात्यातून आपल्या देशातील दुसऱ्या बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर करू शकतो. ही इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग द्वारा वापरता येते. यासाठी लॉग इन करून एनइएफटी हा पर्याय निवडावा लागतो. ही सुविधा वापरून एका दिवसात रु.१० लाख पर्यंत रक्कम ट्रान्सफर करता येते. (काही बँकांची ही मर्यादा रु.२० लाखांपर्यंत आहे.)

सुविधा २४ तास उपलब्ध

ही सुविधा २४ तास उपलब्ध असते. यात सुमारे अर्ध्या तासाने रक्कम ट्रान्सफर होते कारण एक बॅच अर्ध्या तासाची असते. प्रथमच रक्कम ट्रान्सफर करताना लाभार्थीची नोंद (रेजिस्ट्रेटशन )करावे लागते यासाठी व्यक्तीचे नाव, बँक, खाते क्रमांक व आयएफएससी कोड टाकून रजिस्ट्रेशन करावे लागते व रजिस्ट्रेशन झाल्यापासून ३० मिनिटांनी प्रत्यक्ष रक्कम ट्रान्सफर करता येते. यासाठी कुठलेही चार्जेस आकारले जात नाहीत.

… तर चुकून पेमेंट होण्याची शक्यता नाही

एकदा लाभार्थीचे रजिस्टेशन झाले की, पुढील पेमेंट करताना फक्त रजिस्टर्ड पेयीमधून लाभार्थी निवडून लगेचच पेमेंट करता येते .अशा रितीने नवीन पेयी आपल्या लाभार्थीच्या यादीत नव्याने घेता येतो किंवा नको असल्यास काढूनही टाकता येतो. ज्यांना वरचेवर पेमेंट करावयाचे असते त्यांना यादीत समाविष्ट करणे योग्य ठरते. ज्यांना फक्त एकदाच पेमेंट करावयाचे आहे, अशा लाभार्थीचे नाव पेमेंट झाल्यानंतर लगेचच यादीतून काढून टाकावे म्हणजे चूकून पेमेंट होण्याची शक्यता राहात नाही. किरकोळ पेमेंटस्साठी ही सुविधा वापरणे सोयीस्कर असते.

२) आरटीजीएस म्हणजे काय व सुविधा कशी वापरता येते?

आरटीजीएस म्हणजे रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट होय. ही सुविधा वापरून तत्काळ रक्कम ट्रान्सफर करता येते. एनईफटीप्रमाणे अर्धा तास वेळ लागत नाही. रु.२ लाखापुढील रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी ही सुविधा वापरता येते. यासाठी लॉग इन करून आरटीजीएस हा पर्याय निवडावा ज्याला प्रथमच रक्कम ट्रान्सफर करावयाची आहे, त्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाव, बँकेचे नाव ,खाते क्रमांक व आयएफएससी कोड भरावा लागतो.

लगेचच रक्कम ट्रान्सफर करता येते

ही सुविधा वापरताना रिजिस्ट्रेशन नंतर काही बँकात लगेचच रक्कम ट्रान्सफर करता येते. तर काही बँकात ३० मिनिटे थांबावे लागते. कमाल रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही. ही सुविधा वापरताना रु.१० ते २५ इतके शुल्क आकारले जाऊ शकते. मोठ्या रकमा त्वरित ट्रान्सफर करण्यासाठी ही अत्यंत सुलभ व सुरक्षित सुविधा आहे. ही सुविधा प्रामुख्याने मोठी पेमेंटस् उदाः घर खरेदी, वाहन खरेदी , मोठी मशिनरी खरेदी तसेच व्यवसायिक मोठी पेमेंटस् यासाठी वापरणे सोयीस्कर असते.

३) आयएमपीएस म्हणजे काय व ही सुविधा कशी वापरता येते?

आयएमपीएस ही इमिजिएट पेमेंट सर्व्हिस असून ती सुद्धा मोबाईल अॅप तसेच नेट बँकिंगच्याद्वारे वापरता येते. यासाठी लॉग इन करून आयएमपीएस हा पर्याय निवडावा इथे बँक खातेक्रमांक किंवा आयएफएससी कोडची गरज लागत नाही. कारण हे पेमेंट युपीआय सारखेच होत असते. खरे तर युपीआय हे आयएमपीएस प्रणालीवरच आधारित आहे. यातून रु.५ ते १० लाखापर्यंत रक्कम ट्रान्सफर करता येते. मात्र आरटीजीएस प्रमाणे कितीही रक्कम ट्रान्सफर करता येत नाही. ही सुविधा फारशी वापरली जात नसल्याचे दिसून येते.
या सर्व पेमेंट सुविधा नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ॲाफ इंडीया यांचे मार्फत नियंत्रित असून यात काळानुसार आवश्यक ते बदल वेळोवेळी केले जातात.

सवड आणि गरजेनुसार वापरावयाच्या सुविधा

या तिन्हीही सुविधा आपल्या सवडीनुसार व गरजेनुसार घर बसल्या वापरता येतात. यामुळे भारतातील पेमेंट सिस्टीम जलद , विश्वासार्ह व सुरक्षित झाली आहे. वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, या तिन्हीही पेमेंट सुविधा आपल्याला नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपल्या गरजेनुसार कधीही वापरता येतात व यामुळे सुट्टीच्या दिवसी सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात, हे महत्त्वाचे.