Jaswant Singh Khalra Satluj Movie OTT Removed : मानवाधिकार कार्यकर्ते दिवंगत जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सतलुज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. रविवारी ‘ZEE5’ या प्लॅटफॉर्मने समाजमाध्यमांवर एक प्रसिद्धीपत्रक जारी करून त्या संदर्भातील माहिती दिली. सध्याच्या घडामोडी लक्षात घेता ‘सतलुज’ चित्रपट पुढील आदेशापर्यंत भारतातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध नसेल; मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो लवकरच प्लॅटफॉर्मवर पुन्हा प्रदर्शित केला जाईल, असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले. भारतातून हा चित्रपट हटवण्यात आला असला, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांसाठी तो अद्यापही उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर जसवंत सिंग खालरा कोण होते? त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटामुळे वादंग का उठला? त्याविषयीचा हा आढावा…
‘सतलुज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हनी त्रेहान यांनी केले असून त्याची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी आणि मॅकगफिन पिक्चर्सने केली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता दिलजीत दोसांज याने जसवंत सिंग खालरा यांची भूमिका साकारलेली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या (CBFC) प्रमाणपत्राशी संबंधित वाद आणि विविध अडचणींमुळे जवळपास तीन वर्षांपासून या चित्रपटाचे प्रदर्शन रडखडले होते. अखेर रविवारी (३ जुलै) ‘ZEE5’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला; मात्र प्रदर्शनानंतर अवघ्या ४८ तासांतच तो भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवण्यात आला. त्यामुळे दिवंगत जसवंत सिंग खालरा यांच्याबाबत सगळीकडे चर्चा सुरू झाली.
कोण होते जसवंत सिंग खालरा?
जसवंत सिंह खालरा हे पंजाबमधील अमृतसरचे रहिवासी होते. १९८० ते १९९० दरम्यान पंजाबमधील दहशतवादाच्या काळात हजारो शीख तरुण अचानक बेपत्ता झाले होते. त्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी खालरा सातत्याने आवाज उठवला होता. त्यापैकी अनेक तरुणांचा बनावट चकमकींत मृत्यू झाल्याचे नंतर उघड झाले होते. खालरा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून केली होती. पुढे त्यांनी मानवी हक्क कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाच्या मानवी हक्क विभागाचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील कथित बेकायदेशीर हत्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आला होता. दुर्दैवाने खालराही अशाच एका बेपत्ता प्रकरणाचे बळी ठरले. ६ सप्टेंबर १९९५ रोजी राहत्या घरातून त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यामागे तत्कालीन पंजाब पोलिसांतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. झाबल पोलीस ठाण्यात अमानुष छळ करण्यात आल्यानंतर खालरा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह सतलज नदीवरील हरिके पुलाजवळ फेकून पुरावा नष्ट करण्यात आल्याचा आरोप झाला.
जसवंत सिंग यांच्या पत्नीचा कायदेशीर लढा
जसवंत सिंग खलाडा यांच्या पत्नी परमजीत कौर यांनी कायदेशीर लढा देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर १९९६ मध्ये न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे आदेश दिले. २००५ मध्ये पाटियाला येथील न्यायालयाने खालरा यांच्या हत्येप्रकरणी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले. २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवला. त्याच वर्षी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दहशतवादाच्या काळात सरकारी यंत्रणांनी वारसाविना मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्कारांच्या ६५७ प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय राज्य समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या गंभीर विषयाकडे देशाचे लक्ष वेधण्यात खालरा यांच्या तपासाचा मोठा वाटा होता. आज जसवंत सिंग खालरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची पत्नी परमजीत कौर या ‘खालरा मिशन ऑर्गनायझेशन’ ही स्वयंसेवी संस्था चालवत आहेत. खालरा यांच्या या लढ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून २०२५ मध्ये अमेरिकेतील फ्रेस्नो येथे एका प्राथमिक शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेत एखाद्या शाळेला भारतीयांचे नाव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सतलज चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब का झाला?
जसवंत सिंह खलरा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती त्यांच्या कुटुंबीयांची संमती घेतल्यानंतरच करण्यात आली होती. चित्रपटाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी निर्मात्यांनी खलरा कुटुंबीयांची अधिकृत परवानगी घेतली होती. या चित्रपटाचे मूळ नाव ‘पंजाब ९५’ असे होते. २०२२ मध्ये चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सादर करण्यात आल्यानंतर त्याला अडथळ्यांचा सामना करावा लागला. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने त्यात तब्बल १२७ बदल सुचवले आणि चित्रपटाचे नाव बदलण्याचे निर्देशही दिले. या निर्णयाविरोधात चित्रपट निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, नंतर त्यांनी ही याचिका मागे घेतली. २०२३ मध्ये टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येथे होणारे चित्रपटाचे नियोजित प्रदर्शनही रद्द करण्यात आले. सुमारे तीन वर्षे अनिश्चिततेत अडकून पडल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय रद्द केला आणि थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा मार्ग स्वीकारला. ‘सतलुज’ या नव्या नावाने हा चित्रपट ‘ZEE5’वर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांना हा चित्रपट भारतातील आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवावा लागला.
दिलजीत दोसांजने कोणती भीती व्यक्त केली होती?
“रविवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता ‘सतलुज’ भारतातील ‘ZEE5’ वरून हटविण्यात आल्याचे मला समजले. या घडामोडीवर कशी प्रतिक्रिया द्यावी, हेच मला सध्या कळत नाही,” असे दिग्दर्शक हनी त्रेहान दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. दरम्यान, ZEE5 ने जारी केलेल्या निवेदनात चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या ‘उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल’ आभार मानले. तसेच सतलजमागील सर्जनशील दृष्टीकोनावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. प्रभावी कथा लोकांना प्रेरणा देऊ शकतात, दीर्घकाळ स्मरणात राहतात आणि समाजावर कायमस्वरूपी प्रभाव टाकतात, असेही कंपनीने नमूद केले. यादरम्यान चित्रपट हटविण्यापूर्वीच दिलजीत दोसांजने समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये तशी शक्यता बोलून दाखवली होती. यापूर्वीही अभिनेत्याने पंजाबमधील दहशतवादाच्या काळावर आधारित चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पंजाब १९८४’ हा चित्रपट मानवी हक्कांच्या प्रश्नांवर आधारित होता आणि त्याला अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नव्हता. त्यानंतर १९८८ मध्ये दोसांजने हत्या झालेल्या गायक अमर सिंह यांच्या जीवनावर आधारित चमकीला या चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती.
