सिद्धार्थ खांडेकर

१४ पारंपरिक डाव आणि ४ जलद डावांनंतर चीनच्या डिंग लिरेनने रशियाच्या इयन नेपोम्नियाशीचे कडवे आव्हान मोडून काढत बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावले. पुरुष विभागातील तो पहिला चिनी आणि बुद्धिबळाच्या लिखित इतिहासातील १७वा जगज्जेता ठरला. इयन नेपोप्नियाशी हा रशियाचा असला, तरी सध्या त्या देशावर असलेल्या निर्बंधांमुळे तो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) ध्वजाखाली खेळत होता. जगातील सध्याचा क्रमांक एकचा बुद्धिबळपटू नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन याने जगज्जेतेपद राखण्याच्या लढतीमध्ये रस नसल्याचे गतवर्षी जाहीर केल्यामुळे ही लढत खेळवली गेली. अर्थात नेपोप्नियाशी आणि डिंग हे दोघेही जागतिक क्रमवारीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांवर असल्यामुळे त्यांच्या योग्यतेविषयी कोणाच्याच मनात संदेह नव्हता.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

मुळात नेपोम्नियाशी आणि डिंग यांच्यात जगज्जेतेपदाची लढत कशी ठरली?

बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीचे स्वरूप गेली कित्येक वर्षे विद्यमान जगज्जेता विरुद्ध आव्हानवीर असे राहिले आहे. आव्हानवीर ठरवण्यासाठी कँडिडेट्स स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेसाठी जे ८-१०-१२ खेळाडू निवडले जातात, ते आणखी काही स्पर्धांतून तसेच एलो गुणांकन अशा संमिश्र निकषांवर ठरतात. मॅग्नस कार्लसन अशाच प्रकारे कँडिडेट्स स्पर्धा जिंकून २०१३मध्ये तत्कालीन जगज्जेत्या विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरला. पुढे आनंदही कँडिडेट्स स्पर्धा जिंकून २०१४मध्ये त्यावेळच्या जगज्जेत्या कार्लसनचा आव्हानवीर ठरला होता. कार्लसन २०१३मध्ये पहिल्यांदा जगज्जेता बनला. मग २०१४, २०१६, २०१८ आणि २०२१ या वर्षी त्याने जगज्जेतेपद राखले. २०२१मध्ये नेपोम्नियाशीविरुद्ध काहीशा एकतर्फी लढतीमध्ये जिंकल्यानंतर, जगज्जेतेपदाच्या लढतींमध्ये रस उरला नसल्याची भावना कार्लसनने बोलून दाखवली. पुढील वर्षी त्याने हा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर केला. त्यावर्षीच्या कँडिडेट्स स्पर्धेत विजेता व उपविजेता राहिलेले इयन नेपोम्नियाशी आणि डिंग लिरेन यांच्यातच मग जगज्जेतेपदाची लढत खेळवण्याचे ‘फिडे’ने ठरवले.

लढतीचे पारडे डिंगच्या दिशेने कसे फिरले?

खरे तर या लढतीत सुरुवातीला नेपोम्नियाशीचे पारडे जड होते. त्यानेच पहिला विजयही मिळवला. डिंग लिरेन पहिल्यांदाच जगज्जेतेपदाची लढत खेळत असल्यामुळे भेदरल्यासारखा झाला होता. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमध्ये चिवटपणे खेळत राहण्याचे डिंग लिरेनचे कौशल्य जगजाहीर आहे. या लढतीत दुसरा डाव पांढऱ्या मोहऱ्यांनिशी गमावूनही डिंग सावरला आणि तोडीस तोड टक्कर देत राहिला. इयन नेपोम्नियाशीने या लढतीत दुसरा, पाचवा आणि सातवा डाव जिंकला. तर डिंग चौथ्या, सहाव्या आणि बाराव्या डावात विजयी ठरला. नेपोम्नियाशी झटपट खेळासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे निर्धारित १४ डावांमध्ये बरोबरी झाल्यानंतर ही लढत जलद टायब्रेकरमध्ये गेली, त्यावेळी त्यालाच संभाव्य विजेता मानले जात होते. मात्र येथेही डिंग लिरेन अविचल राहिला आणि चौथ्या व अखेरच्या जलद डावामध्ये त्याने बाजी उलटवली.

विश्लेषण : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरण नेमके काय होते?

डिंग लिरेनच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? तो दीर्घकाळ बुद्धिबळ जगतावर वर्चस्व गाजवेल काय?

डिंग लिरेन हा अत्यंत भक्कम आणि अविचल बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जातो. त्याचा खेळ नेहमीच निर्दोष असतो असे नाही, पण पटावर किंवा स्पर्धेत कोणत्याही परिस्थितीवर मात करून मार्ग काढण्याची त्याची मानसिक क्षमता आहे. एके काळी पारपंरिक बुद्धिबळात सर्वाधिक काळ अपराजित राहण्याचा (१०० डाव) विक्रम त्याच्या नावावर होता. तो विक्रम पुढे कार्लसनने मोडला, तरी डिंगकडे गेली काही वर्षे कार्लसनचा संभाव्य आव्हानवीर म्हणून पाहिले जात होते. २८०० एलो गुणांकनाचे अत्यंत खडतर शिखरही त्याने मध्ये सर केले होते. तो आणखी किती काळ जगज्जेता राहील याविषयी भाकीत करणे सोपे नाही. कारण आजच्या घडीला अनेक उत्तमोत्तम बुद्धिबळपटू खेळत आहेत. या सर्वांनाच कार्लसनच्या अनुपस्थितीचा फायदा उठवायचा आहे. नेपोम्नियाशीही पुन्हा डिंगला आव्हान देऊ शकतोच. एक मात्र खरे, या लढतीचा अनुभव डिंगला आल्यामुळे पुढील लढतीमध्ये तो अधिक तयारीने खेळेल. त्याला पराभूत करणाऱ्या बुद्धिबळपटूला डिंगपेक्षा अधिक तयारी आणि मानसिक कणखरपणा दाखवावा लागेल, जी बाब अजिबात सोपी नाही. स्पर्धात्मक बुद्धिबळाचा विचार करायचा झाल्यास, अजूनही कार्लसन उत्साहाने खेळत आहे. त्यामुळे तो असेपर्यंत स्पर्धात्मक बुद्धिबळात डिंगच नव्हे, तर इतर कोणालाही निर्विवाद वर्चस्व गाजवता येणार नाही.

नेपोम्नियाशीचे कुठे चुकले?

जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये निव्वळ तयारी किंवा आत्मविश्वास पुरेसा नसतो. थोडी सबुरीदेखील दाखवावी लागते. या लढतीमध्ये आणि एकूणच दर्जाचा विचार करायचा झाल्यास नेपोम्नियाशी डिंगपेक्षा किंचित सरस होता. मात्र पटावर पुरेसा वेळ स्वतःला देणे, हा बुद्धिबळातील मूलमंत्र तो बहुधा काही वेळा विसरला असावा. मुख्य लढतीमध्ये १२व्या डावात आणि जलद लढतीमध्ये चौथ्या डावात नेपोम्नियाशीचे वर्चस्व होते. पण दोन्ही डावांमध्ये त्याला एकेक चूक नडली आणि बाजी उलटली. कार्लसनविरुद्धच्या लढतीतही सुरुवातीचे सहा डाव त्याने हुन्नर दाखवले होते. पाठोपाठच्या दोन कँडिडेट्स स्पर्धा लिलया जिंकून नेपोम्नियाशीने आपला अव्वल दर्जा दाखवून दिलाच आहे. पण पाठोपाठच्या दोन जगज्जेतेपदाच्या लढतींमध्ये पुरेशी सबुरी न दाखवल्यामुळे आणि घाई व फाजील आत्मविश्वासाने त्याचा घात केला. संधी मिळाली, तर डिंगवरुद्धची आगामी जगज्जेतेपदाची लढत त्याच्यासाठी अजिबात सोपी ठरणार नाही.

बुद्धिबळात चिनी वर्चस्वाची ही नांदी ठरावी का?

महिलांमध्ये चीनने यापूर्वीच बऱ्यापैकी दबदबा निर्माण केला आहे. विद्यमान महिलांची जगज्जेती जू वेन्जून हीदेखील चिनीच आहे. महिलांमध्ये सर्वांत उच्च मानांकित हू यिफान हीदेखील चिनीच. याशिवाय पुरुष आणि महिलांच्या संघांनी अलीकडच्या काळात सातत्याने ऑलिम्पियाड सुवर्णपदक जिंकलेले आहे. मात्र बुद्धिबळात सोव्हिएत युग होते, तसे काही चीनच्या बाबतीत म्हणता येणार नाही. कारण भारत, अमेरिका, काही प्रमाणात रशिया, उझबेकीस्तान या देशांकडेही उत्तम बुद्धिबळपटू आहेत. अर्थात विश्वनाथन आनंद जगज्जेता बनल्यानंतर भारतात ज्याप्रमाणे या खेळाविषयी आकर्षण निर्माण झाले, तसेच काहीसे चीनच्या बाबतीतही संभवते.

विश्लेषण : देशाऐवजी फ्रँचायझींसाठी खेळावे… ‘आयपीएल’ फ्रँचायझींकडून इंग्लिश क्रिकेटपटूंना कोट्यवधींची भुरळ?

चीनशी भारत टक्कर घेऊ शकेल का?

काही वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये २७०० एलो गुणांकनाच्या वर असलेल्या चिनी बुद्धिबळपटूंची संख्या ६-७ असायची. मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये ही संख्या चारवर आली असून, उलट भारताचे आजघडीला पाच ग्रँडमास्टर २७०० एलो गुणांकनाच्या वर आहेत. शिवाय २६०० एलो गुणांकनाच्या वर असलेल्या चिनी ग्रँडमास्टरांची संख्या ९ आहे, तर भारताची १९! जागतिक सरासरीमध्ये भारताचा क्रमांक रशियापाठोपाठ दुसरा लागतो, तर चीनचा चौथा. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये विशेषतः पुरुष विभागात भारतीय युवकांनी थक्क करणारी प्रगती साधली आहे. मात्र, चीन तुलनेने अधिक नियोजनपूर्वक खेळावर भर देतो. एकास एक टक्कर निव्वळ गुणांकनावर ठरवायची झाल्यास भारताचे वर्चस्व स्पष्ट दिसते. मात्र आनंदपाठोपाठ आपण किती जगज्जेते निर्माण करतो, किती ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदके जिंकतो, महिलांमध्ये चीनच्या विद्यमान वर्चस्वाला कितपत आव्हान देतो यावरच चीनला किती यशस्वी टक्कर देतो हे ठरवता येऊ शकते.