Dipika Kakar’s 22% of Liver Removed in Cancer Surgery: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर हीने अलीकडेच यकृताच्या कर्करोगाशी (लिव्हर कॅन्सर) दिलेल्या लढ्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या LOL पॉडकास्टमध्ये बोलताना दीपिकाने सांगितले की, कॅन्सरचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे तिच्या यकृताचा २२ टक्के भाग काढून टाकण्यात आला. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील दीपिका कक्कर या प्रसिद्ध अभिनेत्रीने पुढे सांगितले की, अलीकडेच तिने पुन्हा एक स्कॅन करून घेतलं आणि आता तिचं कुटुंब स्कॅनच्या रिपोर्टची वाट पाहत आहे. या रिपोर्टच्या माध्यमातून ती कॅन्सरमुक्त झाली आहे की, नाही हे समजण्यास मदत होणार आहे.
दीपिका कक्करने कॅन्सर निदानाच्या काळात तिचा पती शोएब इब्राहिम याने दिलेल्या मोलाच्या साथीसाठी त्याचे कौतुक केले आहे. वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त, दीपिकाने सांगितले की, कॅन्सरच्या उपचारांचा परिणाम फक्त शारीरिकच नव्हे, तर तिच्या आणि तिच्या प्रियजनांच्या भावनिक आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे.
कॅन्सर उपचारांबद्दल…
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याशी संवाद साधताना टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने सांगितले की, तिच्या शरीरातून सुमारे ११ सेंटीमीटरचा ट्यूमर काढण्यात आला, जो तिच्या यकृताच्या सुमारे २२ टक्के भागाइतकाच होता. ती पुढे म्हणाली, “नोव्हेंबरमध्ये मी पुन्हा एकदा FAPI स्कॅन करणार आहे. हा स्कॅन CT स्कॅनसारखाच असतो, पण तो शरीरातील कॅन्सर पेशी शोधण्यासाठी केला जातो. यामुळे डॉक्टरांना शरीरात कॅन्सर किती पसरला आहे, हे समजण्यास मदत होते. त्यामुळे पुढील शस्त्रक्रिया किंवा उपचार योग्य पद्धतीने करणे शक्य होते.”
याशिवाय दीपिकाने सांगितले की, तिच्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे, कॅन्सर फक्त ट्यूमरपुरताच मर्यादित होता आणि तो इतर कोणत्याही अवयवांपर्यंत पसरला नव्हता. त्यामुळे कॅन्सरग्रस्त भागासह यकृताचा काही भाग काढून टाकण्यात आला. दीपिकाने म्हणाली की, तिच्या निरोगी जीवनशैलीनंतरही झालेल्या कॅन्सरमुळे डॉक्टरदेखील अचंबित झाले. ती म्हणाली, “डॉक्टरांनी मला सांगितले की, तुझ्यासारख्या हेल्दी व्यक्तीला कॅन्सर कसा झाला, याचं उत्तर आमच्याकडेही नाही.”
FAPI स्कॅन
कर्करोगाचं लवकर निदान हे उपचारांच्या यशाचं पहिलं पाऊल असतं. आजवर कॅन्सर ओळखण्यासाठी FDG PET-CT स्कॅन हा सर्वात लोकप्रिय उपाय होता. पण आता वैद्यकीय जगतात FAPI स्कॅन नावाचं नवं तंत्रज्ञान झपाट्याने पुढे येत आहे. हे तंत्रज्ञान अधिक अचूक, कमी त्रासदायक आणि काही प्रकरणांत FDG पेक्षा अधिक प्रभावी ठरत आहे.

FAPI स्कॅन म्हणजे नेमकं काय?
FAPI म्हणजे Fibroblast Activation Protein Inhibitor. हे एक विशेष प्रकारचे PET (Positron Emission Tomography) स्कॅन आहे, ते शरीरातील कॅन्सर-संबंधित फायब्रोब्लास्ट्स (CAFs) नावाच्या पेशींना लक्ष्य करतो. या फायब्रोब्लास्ट्स साध्या ऊतींमध्ये नसतात, पण जेव्हा शरीरात कॅन्सर वाढतो, तेव्हा या पेशी ट्यूमरभोवती सक्रिय होतात. त्या ट्यूमरला वाढ, पोषण आणि प्रसार करण्यात मदत करतात. FAPI स्कॅनमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिओट्रेसरमुळे (साधारणपणे Gallium-68 FAPI-04 किंवा Fluorine-18 FAPI) त्या पेशी ओळखता येतात. यामुळे डॉक्टरांना ट्यूमरचं नेमकं ठिकाण, आकार आणि प्रसार किती झाला आहे हे अधिक अचूकपणे दिसतं.
कोणत्या कॅन्सरमध्ये FAPI स्कॅन उपयोगी ठरतं?
- गॅस्ट्रिक (पोटाचा कॅन्सर)- लहान किंवा mucinous प्रकारातील ट्यूमर FDG पेक्षा अधिक स्पष्टपणे दिसतात.
- कोलन आणि रेक्टल कॅन्सर- लिंफ नोड्स आणि पेरिटोनियल मेटास्टेसिस ओळखण्यात FAPI PET अधिक अचूक ठरलं आहे.
- लिव्हर आणि बायल डक्ट कॅन्सर- जिथे FDG uptake कमी असतो, तिथे FAPI उच्च संवेदनशीलता दाखवतो.
- पॅन्क्रियाटिक कॅन्सर- लहान ट्यूमर आणि सुरुवातीचे बदल ओळखण्यासाठी उपयुक्त.
- इसोफेगस (अन्ननलिका) आणि स्तनाचा कॅन्सर- स्टेजिंग आणि उपचारानंतर फॉलो-अपमध्ये मदत होते.
हे तंत्र कसं कार्य करतं?
- रुग्णाच्या शरीरात रेडिओट्रेसर (FAPI compound) इंजेक्शनद्वारे दिला जातो.
- हा ट्रेसर कॅन्सर-संबंधित फायब्रोब्लास्ट्स वर जाऊन चिकटतो.
- PET स्कॅनर त्या रेडिओएक्टिव्ह सिग्नल्स पकडतो आणि डॉक्टरांना 3D प्रतिमा मिळते.
- यामुळे निदान, स्टेजिंग आणि उपचाराला मिळणारा प्रतिसाद समजण्यासाठी ट्यूमरची अचूक आकृती टिपली जाते.
मर्यादा आणि काळजी
- काही नॉन-कॅन्सर अवस्थांमध्ये (उदा. दाह, यकृतातील सिरॉसिस, शस्त्रक्रियेनंतरची सूज) FAPI uptake होऊ शकतो, त्यामुळे चुकीचा निष्कर्ष येऊ शकतो.
- अजूनही हे तंत्र प्रयोगात्मक किंवा क्लिनिकल ट्रायल टप्प्यात आहे.
- सध्या ही FDG PET-CT ला पूरक (Complementary) पद्धत मानली जाते. परंतु, पूर्ण पर्याय नाही.
भविष्यातील शक्यता
FAPI स्कॅन केवळ निदानासाठी नाही, तर भविष्यात FAP-targeted उपचारांसाठी (Theranostics) सुद्धा वापरली जाऊ शकते. म्हणजे ज्या प्रथिनांना स्कॅनमध्ये लक्ष्य केलं जातं, त्यांनाच औषध पोहोचवण्याचं साधन म्हणून वापरणं शक्य होऊ शकतं.
थोडक्यात सांगायचं तर
- FAPI स्कॅन हा कॅन्सर शोधण्यातील एक अत्याधुनिक, वैज्ञानिक आणि संवेदनशील उपाय आहे.
- तो केवळ ट्यूमर दाखवतो असं नाही, तर शरीराच्या आत काय घडतंय हेही सांगतो.
