अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने कारकिर्दीच्या ऐन भरात जीवनाचा शेवट केला. त्याची व्यवस्थापक दिशा सालियन हिचा त्याआधी मृत्यू झाला. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत का? उच्च न्यायालयाने दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर अंतिम निकाल देताना ‘केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा’मार्फत (सीबीआय) तपासाची मागणी मान्य केली आहे. आता खरे काय आहे ते सीबीआय तपासानंतर तरी समजू शकेल का?

दिशा सालियन प्रकरण काय?

ऐन बहरात असलेला अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची दिशा सालियन ही व्यवस्थापक. परंतु ८ व ९ जून २०२०च्या मध्यरात्री दिशाचा मालवणीतील जनकल्याण नगरातील सोसायटीच्या आवारात मृतदेह आढळला. बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन तिने आत्महत्या केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. तिचा मित्र रोहन राय याचा हा फ्लॅट. लंडनमधील मैत्रीण अंकिता हिच्याशी मोबाईलवर बराच काळा बोलल्यानंतर दिशा बेडरुममध्ये गेली व दरवाजा बंद करुन घेतला. थोड्या वेळात तिचा इमारतीच्या आवारात मृतदेह आढळला. मात्र हे संशयास्पद आहे, असा आरोप करीत दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली. दिशाच्या मृत्यूनंतर अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचाही मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली होती. पंरतु पोलिसांनी तपास करुन दिशा व सुशांतसिंहची आत्महत्या असल्याचाच निष्कर्ष काढला. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले होते. परंतु आता उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा सहा वर्षांनंतर उघड होणार आहे.

सुशांतसिंहचा मृत्यू कसा?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी झाला. या प्रकरणी सीबीआयने तपास पूर्ण करुन मार्च २०२५ मध्ये विशेष न्यायालयात आपला अंतिम क्लोजर रिपोर्ट सादर केला. या अहवालात सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणताही घातपात किंवा गुन्हेगारी कट नव्हता, हे स्पष्ट करत त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच असल्याचे जाहीर केले. कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल आणि अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या (एम्स) न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या पॅनेलने सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळेच झाल्याचे प्रमाणित केले व हत्येचा संशय फेटाळून लावला. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, सीबीआयने प्रदीर्घ तपासानंतर रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला या प्रकरणात क्लीन चिट दिली. सुशांत सिंह राजपूत गेल्या काही काळापासून नैराश्य आणि तीव्र चिंतेने ग्रासला होता. त्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा निष्कर्ष सीबीआयने काढला. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी दिशाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध नसल्याचे सीबीआयने तेव्हा म्हटले होते. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशात काय म्हटले आहे?

सतीश सालियन यांची याचिका निकालात काढताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. त्यामुळे सीबीआयने वरिष्ठ अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. या अधिकाऱ्याने याचिकाकर्त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करावा. याचिकाकर्त्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याने सखोल तपास करावा. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या पुराव्याअभावी तपासी अधिकाऱ्याने कोणालाही विनाकारण आरोपी म्हणून वागणूक देऊ नये. खरोखरच गुन्हा होत असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याकडे अहवाल सादर करावा. या प्रकरणात काहीही पुरावा नसेल तर तसा अहवालही सादर करावा. हा अहवाल मान्य नसेल तर याचिकाकर्त्याने निषेध याचिका दाखल करावी.

सीबीआय तपासाचा का निर्णय?

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणात गेली सहा वर्षे पोलीस तपास करीत आहेत. परंतु पोलिसांच्या तपासामुळे प्रश्नांची उकल होण्याऐ‌वजी ते अनुत्तरित राहिले आहेत. या प्रकरणातील तक्रारीचा सारांश पाहता, दिशा ही सुशांतसिंग राजपूतकडे काम करीत होती. या काळात काही प्रभावशील व्यक्तींच्या आक्षेपार्ह बाबींची माहिती तिला मिळाली. ही माहिती तिने सुशांतसिंहला सांगितली. सुशांतने ही संवेदनक्षम माहिती काहीजणांना सांगितली असावी आणि त्यातूनच दिशाची हत्या करुन काटा काढला असावा, असे नमूद आहे. त्यामुळे हे गंभीर असून त्याबाबत सविस्तर तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळेच सीबीआयमार्फत हा तपास होणे आवश्यक आहे. अशा संशयास्पद प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांकडून तपास होणे आवश्यक होते. परंतु पोलिसांनी त्या दिशेने प्रयत्न केले नाहीत. तत्कालीन फौजदारी प्रक्रिया संहिता १७४ अन्वये अशा संशयास्पद प्रकरणात तपास पुरेसा नसतो.

पोलीस तपासाबाबत कोणते आक्षेप घेतले गेले?

या प्रकरणात स्थळ पंचनामा नऊ तास विलंबाने का करण्यात आला, असा सवाल न्यायालयाने केला आहे. याशिवाय अपघाती मृत्यू नोंद करताना मालवणी पोलिसांनी पहाटे २.२५ वाजता मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात नोंदीत पहाटे ३.०७ ही वेळ नमूद केली. दिशाच्या वडिलांना तीन वाजता मालवणी पोलिसांनी फोन केला. ते रुग्णालयात पोहोचले व चार वाजता त्यांचा जबाब नोंदवला असे म्हटले आहे. मग अपघाती मृत्यू नोंदीत जबाबाचा उल्लेख कसा, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. दिशाचा मित्र रोहन राय याच्या मूळ व पुरवणी जबाब यात विसंगती आहे. अपघाती मृत्यू नोंदीची वेळ आणि पहाटे एक ते २.१४ पर्यंत पोलीस या इमारतीत कसे पोहोचले? बाराव्या मजल्यावरुन पडून मृ्त्यू झाला तर मग घटनास्थळी रक्त कसे आढळले नाही? शवविच्छेदन अहवालाच उल्लेख असलेल्या जखमा आणि दावे यात तफावत, रासायनिक विश्लेषकांकडून कपड्यावर थोडे रक्त आढळल्याबद्दल व्यक्त केलेला संशय, बेडरुमचा दरवाजा तोडला असा उल्लेख असतानाही प्रत्यक्षात दरवाजावर नुकसानीच्या खुणा नाहीत, न्यायवैद्यक प्रयोगशाळेने उपस्थित केलेल्या त्रुटी आदी पोलिसांच्या तपासाबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.

आदित्य ठाकरेंचा का उल्लेख?

सतीश सालियन यांच्या याचिकेत हस्तक्षेप याचिका म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वतीने सुदीप पासबोला यांनी बाजू मांडली. याचिकेत आदित्य ठाकरे यांचे नाव नाही. राजकीय हेतूने निव्वळ बदनामीसाठी आरोप केला गेला आहे. आदित्य यांचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही. सीबीआयनेही विनाकारण त्या दिशेने तपास करुन त्रास देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोणावरही विनाकारण आरोप केले जाऊ नयेत. पुरावा असेल तर सक्षम प्राधिकरणाकडे सादर करुन पुढील कारवाई करावी, अशी अपेक्षा न्यायालयाने आपल्या आदेशात व्यक्त केली आहे. सध्या आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटा लावल्यानंतर उच्च न्यायालयाचा सीबीआय तपासाचा आदेश यावा, हा निव्वळ योगायोग साधला गेला आहे.

काय होणार?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करतानाच सीबीआयने दिशा सालियन प्रकरण वेगळे असल्याचे म्हटले होते. दिशा सालियन प्रकरणात मालवणी पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे या त्रुटी दूर करण्याची जबाबदारी सीबीआयवर आहे. या त्रुटी दूर करताना नेमके काय घडले ही बाब समोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे सीबीआयचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी या तपासाचा वापर होऊ नये. गेली सहा वर्षे सुरु असलेल्या या प्रकरणातील सत्य सीबीआयने बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
nishant.sarvankar@expressindia.com