scorecardresearch

Premium

विश्लेषण : ‘बॉल गर्ल’ला इजा पोहोचवल्याबद्दल अपात्र? फ्रेंच टेनिस स्पर्धेत नेमके काय घडले?

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या लढतीत एका गुणांसाठी रॅली सुरू असताना एका टेनिसपटूने मारलेला क्रॉस कोर्टचा फटका कोपऱ्यात सहाय्यक म्हणून बसलेल्या बॉल गर्लला लागला. या आघातानंतर ती मुलगी घाबरली आणि रडू लागली.

Disqualified for Injuring Ball Girl?
वाचा सविस्तर विश्लेषण

ज्ञानेश भुरे

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या लढतीत एका गुणांसाठी रॅली सुरू असताना एका टेनिसपटूने मारलेला क्रॉस कोर्टचा फटका कोपऱ्यात सहाय्यक म्हणून बसलेल्या बॉल गर्लला लागला. या आघातानंतर ती मुलगी घाबरली आणि रडू लागली. त्या वेळी पंचांनी सुरुवातीला संबंधित टेनिसपटूला झाल्या घटनेबद्दल ताकीद दिली. पण, त्यानंतर ती टेनिसपटू आणि तिची सहकारी यांना अपात्र ठरवण्यात आले. पंचांनी का घेतला असावा असा निर्णय आणि पुढे काय होणार याचा घेतलेला आढावा…

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

नेमका प्रसंग काय घडला?

जपानची मियु काटो आणि इंडोनेशियाची अल्डिला सुतजीआडी जोडी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकची मेरी बुझकोवा आणि स्पेनची सारा सोरीबेस या जोडीशी चौथ्या फेरीचा सामना खेळत होती. बौझकोव्हा आणि सोरिबेस जोडीने एक सेट जिंकला होता, तर दुसऱ्या सेटमध्ये आघाडीवर होते. दुसऱ्या सेटमध्येच एका रॅली दरम्यान काटोने मारलेला क्रॉस कोर्टचा जोरकस फटका बॉल गर्लच्या खांद्यावर आदळला. या आघातानंतर ती बॉल गर्ल अक्षरशः कळवळली आणि रडायला लागली होती.

या घटनेनंतर काटोची प्रतिक्रिया काय होती आणि पंचांनी काय भूमिका घेतली?

बॉल गर्लला चेंडू लागल्यानंतर काटोने तिच्या जवळ जाऊन तिची विचारपूस केली आणि माफी देखिल मागितली. तेव्हा पंचांनी सुरुवातीला या संदर्भात ताकिद देऊन खेळ सुरू करण्यास सांगितले. मात्र, प्रतिस्पर्धी जोडी बौझकोव्हा आणि सोरीबेस यांनी आक्षेप घेतल्यावहर पंचांनी आयटीएफ निरीक्षक वेन मॅक्वेन यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला.

काटो-सुतजीआडी जोडीला का अपात्र ठरविण्यात आले ?

रॅली सुरू असताना एखाद्या खेळाडूचा जोरकस फटका कोर्टवरच्या कुठल्याही व्यक्तीस लागला, तर ती सकृतदर्शनी चूक मानण्यात येते. अशा वेळी पंच सुरुवातीला संबंधित खेळाडूला ताकीद देतो. मात्र, येथे बौझकोव्हा आणि सोरीबेस या प्रतिस्पर्धी जोडीने आक्षेप घेतल्यामुळे कोटा-सुतजीआडी जोडीला अपात्र ठरविण्यात आले. काटोने आपण जाणूनबुजून ही कृती केली नसल्याचे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, पंचांनी नियमावर बोट ठेवून आपला निर्णय कायम ठेवला.

प्रतिस्पर्धी बौझकोव्हा आणि सोरीबेसने घेतलेला आक्षेप काय होता?

काटोने मारलेला फटका कमालीच्या वेगात होता. चेंडू थेट त्या मुलीच्या दिशेने गेला आणि खांद्यावर तेवढ्याच वेगाने आदळला. या आघातानंतर त्या मुलीला वेदना असह्य होत होत्या. जवळपास १५ मिनिटे ती मुलगी रडत होती. त्यामुळे बौझकोव्हा आणि सोरीबेस जोडीने आक्षेप घेत पंचांना या घटनेकडे गांभीर्याने बघण्यास सांगितले.

आयटीएफचा नियम काय सांगतो?

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) टेनिसपटूंसाठी पोषाखाच्या निवडीपासून अनेक नियम केले आहेत. त्याच नियामाचा एक भाग म्हणजे खेळाडूंनी लढत सुरू असताना रागाच्या भरात कोर्टच्या परिसरात टेनिस बॉलला लाथ मारणे, चेंडू धोकादायक पद्धतीने मारणे किंवा फेकणे, रॅकेट आपटणे हा गुन्हा आहे. आयटीएफचे चेंडूच्या वापराबद्दलही नियम आहेत. त्यानुसार कोर्ट परिसरात चेंडू जाणूनबुजून किंवा निष्काळजीपणे मारणे किंवा परिणामांची पर्वा न करता कोर्टबाहेर चेंडू फटकावणे हा देखील गुन्हा आहे. यामध्ये सुरुवातील पंच संबंधित खेळाडूला ताकीद देतात. पण, एखाद्या खेळाडूकडून अशी कृती वारंवार घडत असेल, तर पंच आणि ग्रॅण्ड स्लॅम निरीक्षक यांचा निर्णय अंतिम राहतो.

याच स्पर्धेत शनिवारी काय घडले?

मिरा अँड्रीवा आणि कोको गॉफ यांच्या दरम्यान सुरू असलेल्या लढतीत १६ वर्षीय मिराने पहिल्या सेटच्या टायब्रेकदरम्यान एक चेंडू प्रेक्षकांत मारला. तो एका प्रेक्षकाच्या अंगावर जोराने आदळला. मात्र, तेव्हा पंच टिमो जॅन्झेन यांनी या प्रसंगाला फारसे गंभीर मानले नाही. पंचांनी मिराला कडक शब्दात पुन्हा अशी कृती न करण्याची ताकीद देऊन पुढे खेळ सुरू करण्यास सांगितले.

ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत यापूर्वी अशा किती घटना घडल्या?

यापूर्वी सर्वात प्रथम १९९५ मध्ये विम्बल्डन स्पर्धे दरम्यान ब्रिटनच्याच टिम हेन्मनला अशाच एका घटनेसाठी अपात्र ठरविण्यात आले. तेव्हा पुरुष दुहेरीच्या सामन्यादरम्यान हेन्मनचा एक फटका चुकून बॉल गर्लला लागला होता. त्यानंतर अलीकडे २०२० मध्ये अमेरिकन टेनिस स्पर्धेत पाब्लो कॅरेनो बुस्टाविरुद्धच्या चौथ्या फेरीच्या लढती दरम्यान अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचलाही अशाच प्रसंगात अपात्र ठरविण्यात आले होते. त्याचा फटका सहायक पंचांच्या गळ्याला लागला होता.

मियु काटोवर काय कारवाई होऊ शकते?

आपल्याकडून अनवधानाने चेंडू बॉल गर्लला लागला हे काटोने पंचांना पटवून देण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला. बॉल गर्लची माफीही मागितली. पण, निरीक्षक वेन मॅक्वेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंच अॅलेक्झांडर ज्युज यांनी काटोची कृती आक्षेपार्ह धरली. आता काटोला फ्रेंच टेनिस स्पर्धेत मिळविलेली पारितोषिक रक्कम परत करावी लागेल आणि मानांकन गुणांनाही मुकावे लागेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 16:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×