दिवाळी म्हटलं की, फराळाने भरलेलं ताट आणि नातेवाईकांच्या घरी गोडधोड जेवणांची मेजवानी आलीच. मात्र, काही दिवस सलग गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोट जड होतं किंवा पचनाचा त्रास जाणवू लागतो. सणासुदीच्या दिवसांत आवडते पदार्थ खाण्यावर बंधनं घालणं कठीण होतं. मग आपल्या आवडीला मुरड घालावी की पर्याय शोधावेत असा प्रश्न आपल्याला पडतो. तज्ज्ञ सांगतात की, सणासुदीत चमचमीत पदार्थांसोबतच आहारात एखादा पौष्टिक घटक वाढवणे फायद्याचे ठरू शकते, तो म्हणजे फायबर!

याच संकल्पनेला ‘फायबर-मॅक्सिंग’ असे म्हटले जाते. नाव थोडं वेगळं वाटत असलं तरी याचा अर्थ साधा आहे. रोजच्या जेवणात भाज्या, फळं, कडधान्यं, डाळी आणि संपूर्ण धान्य यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचं प्रमाण जाणीवपूर्वक वाढवणं. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि आतड्यांमधील उपयुक्त जिवाणूंनाही पोषण मिळतं. तसेच फायबरमुळे जेवणानंतर रक्तात साखर शोषली जाण्याची प्रक्रिया मंदावू शकते, ज्याचा साखर नियंत्रणासाठी फायदा होतो. त्यामुळे दिवाळीच्या गोडधोड आणि चमचमीत पदार्थांवर पूर्णपणे पाणी न सोडता आहाराचा समतोल राखण्यासाठी ‘फायबर-मॅक्सिंग’ हा एक पर्याय ठरू शकतो.

आहारतज्ज्ञ आणि फंक्शनल हेल्थ तज्ज्ञ रोशनी संघवी सांगतात की, दिवाळीच्या जेवणात फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी फार मोठे बदल करण्याची गरज नाही. आवडते गोडधोड किंवा इतर पदार्थ खाणं बंद न करता जेवणात काही साधे बदल करूनही आहाराचा समतोल राखता येतो. यासाठी फायबर मॅक्सिंग हा प्रकार उपयुक्त ठरु शकतो. फायबर मॅक्सिंगसाठी त्यांनी सोपे उपाय सुचवले आहेत.

१. जेवणाची सुरुवात भाज्यांनी करा

दिवाळीच्या दिवसांत जेवणात तळलेले आणि गोड पदार्थ खाण्यापूर्वी कच्च्या किंवा शिजवलेल्या भाज्यांचा समावेश करा. जेवणाच्या सुरुवातीला कोशिंबीर, किंचितशा तेलात परतलेल्या भाज्या किंवा भाज्यांचं सूप घेतल्यास शरीराला फायबर मिळण्यास मिळत होते. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि इतर पदार्थांकडे वळण्यावर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकतं

रोशनी संघवी यांच्या मते, जेवणाच्या सुरुवातीला भाज्यांची कोशिंबीर खाल्ल्याने पुरेशा प्रमाणात फायबर मिळते. तसेच जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यताही कमी होते.

२. एका वेळच्या मेजवानीसाठी दिवसभर उपाशी राहू नका

फायबर सेवनासोबतच दिवसभरातील खाण्यापिण्याच्या वेळा पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सणांच्या दिवशी रात्री भरपेट जेवायचं म्हणून अनेक जण सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण टाळतात. मात्र, बराच वेळ उपाशी राहिल्याने रात्री खूप भूक लागते आणि अशावेळी किती खायचं यावर नियंत्रण ठेवणं कठीण होऊ शकतं.

त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत देखील जेवणाच्या नियमित वेळा पाळाव्यात. आहारात संपूर्ण धान्य, भाज्या, फळं आणि डाळी-कडधान्यांचा समावेश करावा. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. डॉ. संघवी सांगतात की, दिवसभर खाण्यावर बंधनं घालून रात्रीच्या मेजवानीत त्याची भरपाई करण्याऐवजी त्या त्या वेळी संतुलित आहार घेणे गरजेचे असते.

३. मधल्या वेळेत फायबरयुक्त पदार्थ खा

दिवाळीत केवळ जेवणाच्या वेळीच नव्हे, तर दिवसभर घरात मिठाई आणि चिवडा, चकली यांसारखे फराळाचे पदार्थ सहज उपलब्ध असतात. त्यामुळे भूक लागली की पटकन समोरचा गोड किंवा तळलेला पदार्थ खाल्ला जातो. अशावेळी खाण्याचे पर्याय थोडे बदलल्यास फायबरचे प्रमाण वाढवता येऊ शकते. भाजलेले चणे, शेंगदाणे आणि ताजी फळं हे चांगले पर्याय आहेत. या पदार्थांमधून फायबरसह इतर पोषक घटकही मिळतात. त्यामुळे भूक लागल्यावर लगेच मिठाई खाण्याऐवजी असे पदार्थ जवळ ठेवल्यास खाण्याच्या सवयींमध्ये समतोल राखणं सोपं जातं.

४. पारंपरिक मिठाईला द्या पौष्टिक वळण

दिवाळीमध्ये आहाराचा समतोल राखावा, म्हणजे लाडू, करंज्या किंवा इतर गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. त्याऐवजी घरी मिठाई बनवताना नेहमीच्या साहित्याबरोबर काही पौष्टिक घटक वापरता येतात. डॉ रोशनी संघवी यांच्या मते, नाचणीसारखी भरड धान्ये, राजगिरा, सुका मेवा आणि बिया यांचा वापर करून पारंपरिक मिठाईला अधिक पौष्टिक बनवता येतं.

यासाठी खजूर-अंजीर रोल, राजगिरा लाडू आणि नाचणीचे लाडू असे पदार्थ बनवून खाल्ल्याने तुम्हाला ते खाल्ल्याने अपराधीही वाटणार नाही. डॉ. संघवी सांगतात की, अनेकांच्या घरी कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन फराळ आणि मिठाई बनवतात. पण भरड धान्य, खजूर आणि सुका मेवा यांच्यापासून मिठाई बनवल्यास अधिकचे पोषण मिळू शकते. खजूर आणि सुकामेव्यात नैसर्गिक साखर असते आणि बियांमुळे मिठाईतील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे हे पदार्थ पौष्टिक घटकांपासून बनवले असले तरी ते अतिप्रमाणात खाणे टाळावे, असा सल्लाही त्या देतात.

५. फराळाच्या ताटातही पदार्थांची विविधता वाढवा

दिवाळीच्या मेजवानींमध्येही फायबरसोबतच इतर पौष्टिक घटकांचाही समावेश करावा. अशावेळी एखादाच आरोग्यदायी पदार्थ खाण्यापेक्षा भाज्या, फळं, डाळी, कडधान्यं, संपूर्ण धान्य, औषधी वनस्पती आणि मसाले अशा विविध पौष्टिक घटकांचा समावेश करावा. आतड्यांमधील उपयुक्त जिवाणूंचं संतुलन राखण्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो.

यासाठी नेहमीच्या पाककृतींमध्ये छोटे बदल करता येतात. उदाहरणार्थ, शाही पुलावमध्ये बेदाणे आणि बडीशेप घालावा, तर कोफ्ते आणि टिक्कीमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करता येऊ शकतो. डॉ. संघवी सांगतात की, ताटात वनस्पतीजन्य पदार्थांची विविधता वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कारण प्रत्येक अन्नपदार्थातून वेगवेगळ्या प्रकारचं फायबर मिळतं आणि त्याचा आतड्यांच्या आरोग्याला विविध प्रकारे फायदा होतो.

फायबर-मॅक्सिंग म्हणजे खाण्यावरचे बंधन नाही

फायबरयुक्त पदार्थांचा केवळ दिवाळीच्या काळातच नव्हे, तर वर्षभराच्या आहारात समावेश करायला हवा. मिठाई किंवा इतर गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची भरपाई करण्यासाठी फायबर खाणं, एवढाच याचा उद्देश नाही. फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास, शौचास नियमित होण्यास आणि जेवणानंतर पोट भरल्यासारखं राहण्यास मदत होते.

डॉ. संघवी यांच्या मते, आपण खाल्लेल्या मिठाईचा परिणाम नाहीसा करण्यासाठी फायबरचं सेवन करायचं नसतं. तर, आवडते पदार्थ खातानाच आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि डाळी-कडधान्यांचं प्रमाण वाढवणं महत्त्वाचं आहे. यासोबतच पुरेसं पाणी पिणं आणि नियमित शारीरिक हालचाल करणंही आवश्यक आहे.

थोडक्यात, दिवाळीत गोडधोड खाणं टाळण्याची किंवा त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. फक्त रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांना पुरेशी जागा द्या. कारण फायबर-मॅक्सिंगचा खरा उद्देश आवडत्या पदार्थांवर बंधनं घालणं नसून, सणाचा आनंद घेत आहाराचं संतुलन राखणं हा आहे.