Hormonal changes cancer risk महिला चाळिशीत पोहोचल्यानंतर त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. मासिक पाळी अनियंत्रित होते, झोप विस्कळीत होते, भावना अनावर होतात आणि अचानक मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती हा शब्द दैनंदिन संभाषणांमध्ये येऊ लागतो. अनेक महिलांसाठी हा बदल एक मोठा आणि भीतीदायक प्रश्न निर्माण करतो, तो म्हणजे हार्मोन्स बदलाचा संबंध कर्करोगाच्या धोक्याशी आहे का? खरं तर, इंटरनेटवर याविषयी जेवढी भीती घातली जाते, त्यापेक्षा वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे. याविषयी गुरुग्राम येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक ऑन्कोसर्जरीचे संचालक डॉ. पुष्पिंदर गुलिया ‘मनी कंट्रोल’बरोबर बोलले आहेत. ते नक्की काय सांगतात? महिलांनी काय काळजी घ्यावी? हे सर्व सविस्तर समजून घेऊयात…
रजोनिवृत्ती म्हणजे काय?
रजोनिवृत्ती झाली म्हणजे स्त्रीचे गर्भधारणेचे चक्र संपले असे म्हणतात. ही एक नैसर्गिक बाब आहे, कोणताही वैद्यकीय आजार नाही. शरीरात नेमके काय घडत आहे हे समजून घेतल्यास त्याविषयी कुठलीही भीती राहणार नाही, असे डॉक्टर सांगतात, त्यामुळे महिलांना आरोग्याबाबत शांत व समंजस निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. रजोनिवृत्तीच्या आधीच्या काळाला ‘पेरिमेनॉपॉज’ म्हणतात, तो साधारणपणे ४० च्या सुरुवातीच्या किंवा मध्यकाळात सुरू होतो. या टप्प्यात अंडाशय हळूहळू इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची निर्मिती कमी करतात.
हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीत अनियमितता, अचानक अंगात उष्णता जाणवणे, स्वभावात बदल आणि झोप न लागणे यांसारखे त्रास होऊ शकतात. सलग १२ महिने मासिक पाळी न आल्यास रजोनिवृत्तीची खात्री पटते. डॉक्टर पुष्पिंदर गुलिया स्पष्ट करतात की, “हे हार्मोनल बदल केवळ प्रजननावर परिणाम करत नाहीत, तर ते हाडांची मजबुती, हृदयाचे आरोग्य आणि काही प्रमाणात कर्करोगाच्या धोक्यावरही परिणाम करतात. परंतु, हा संबंध गुंतागुंतीचा आहे आणि अनेकदा त्याला चुकीच्या पद्धतीने समजले जाते.”
हार्मोन्स आणि कर्करोग
काही प्रकारचे कर्करोग हार्मोन्सशी संवेदनशील असले, तरी रजोनिवृत्तीमुळे कर्करोगाचा धोका आपोआप वाढत नाही. याउलट, इस्ट्रोजेनची पातळी नैसर्गिकरित्या कमी झाल्यामुळे काही कर्करोगांचा धोका कमी होऊ शकतो. डॉ. गुलिया म्हणतात, “कर्करोग क्वचितच एका कारणामुळे होतो. अनुवंशिकता, जीवनशैली, शरीराचे वजन आणि दीर्घकाळ हार्मोन्सशी आलेला संबंध हे घटक रजोनिवृत्तीपेक्षा मोठी भूमिका बजावतात.”
- स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) : रजोनिवृत्तीतील बदलांपेक्षा संपूर्ण आयुष्यात तुम्ही किती काळ इस्ट्रोजेनच्या संपर्कात होतात, हे जास्त महत्त्वाचे ठरते. कौटुंबिक इतिहास, अल्कोहोलचे सेवन आणि रजोनिवृत्तीनंतर वजन वाढणे (लठ्ठपणा) यामुळे धोका वाढू शकतो.
- गर्भाशयाचा कर्करोग (एंडोमेट्रियल कॅन्सर): प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे गर्भाशयाचे अस्तर जाड होऊ शकते. रजोनिवृत्तीनंतर कोणताही रक्तस्त्राव झाल्यास तपासणी करणे आवश्यक आहे.
- अंडाशयाचा कर्करोग (ओव्हेरियन कॅन्सर) : वयानुसार हा धोका किंचित वाढतो. गर्भनिरोधक गोळ्या आणि ट्युबल लिगेशन (नसबंदी) यामुळे महिलांना दीर्घकालीन संरक्षण मिळते.
हार्मोन थेरपीमुळे आता महिलांची चिंता कमी झाली आहे. आज, ६० वर्षांखालील किंवा रजोनिवृत्तीच्या सुरुवातीच्या काळात असलेल्या महिलांसाठी ही थेरपी सुरक्षित मानली जाते. डॉ. गुलिया सांगतात, “यात वैयक्तिक गरजांनुसार उपचार करणे महत्त्वाचे आहे. कमीत कमी डोस, कमीत कमी कालावधीसाठी आणि वैयक्तिक कर्करोग जोखमीचे मूल्यांकन केल्यानंतरच ही थेरपी केली जाते. हे प्रत्येकासाठी सारखे नसते.”
चाळिशीनंतर महिलांनी काय काळजी घ्यावी?
नियमित तपासणी, योग्य वजन राखणे, व्यायाम, मद्यपानावर मर्यादा आणि वनस्पतीजन्य आहाराचे सेवन यांमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. “सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधल्यास महिलांना लक्षणे आणि उपचारांचे पर्याय समजून घेण्यास मदत होते,” असे डॉ. गुलिया म्हणतात. ते पुढे सांगतात, “रजोनिवृत्ती हा आजार नाही, तो एक बदल आहे, जो योग्य प्रकारे समजून घेणे महत्त्वाचे आहे,” असेही डॉक्टर सांगतात.
हार्मोन्स, रजोनिवृत्ती आणि कर्करोगाचा धोका यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
१. हार्मोन्स महिलांमधील कर्करोगाच्या धोक्यावर कसा परिणाम करतात?
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारखे हार्मोन्स पेशींच्या वाढीसह शरीराच्या अनेक कार्यांचे नियमन करतात. या हार्मोन्सचा शरीराशी दीर्घकाळ किंवा असंतुलित संबंध आल्यास काही ऊतींमध्ये असामान्य पेशी तयार होण्यास चालना मिळू शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
२. कोणत्या कर्करोगांचा महिलांच्या हार्मोन्सशी जवळचा संबंध आहे?
स्तन, एंडोमेट्रियल (गर्भाशय) आणि अंडाशयाचे कर्करोग प्रामुख्याने हार्मोनल बदलांशी संबंधित असतात.
३. रजोनिवृत्तीमुळे कर्करोगाचा धोका वाढतो की कमी होतो?
रजोनिवृत्तीमुळे नैसर्गिक इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगासारख्या काही हार्मोनप्रेरित कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. मात्र, इतर कर्करोगांचा धोका वयानुसार वाढू शकतो, त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक आहे.
४. रजोनिवृत्ती लवकर किंवा उशिरा येण्याचा कर्करोगाच्या धोक्यावर परिणाम होतो का?
लवकर रजोनिवृत्ती आल्यास इस्ट्रोजेनशी असलेला संपर्क कमी होतो, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका किंचित कमी होऊ शकतो. उशिरा रजोनिवृत्ती आल्यास हार्मोन्सचा संपर्क वाढतो, ज्यामुळे स्तन आणि एंडोमेट्रियल कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
