Birds Animals and Sense of Time: माणसासाठी काळ म्हणजे मोजमाप. घड्याळ, सेकंद, मिनिटं, तास, कॅलेंडर, डेडलाईन, आठवणी आणि येणाऱ्या कालखंडाविषयी असलेल्या अपेक्षा- चिंता. आपलं म्हणजेच माणसाचं संपूर्ण आयुष्य काळाच्या या चौकटीत अडकलेले आहे. पण प्राण्यांचे काय? ते फक्त ‘वर्तमाना’त जगतात? असा एक समज होता की, त्यांना ना भूतकाळ असतो, ना भविष्यकाळ. असतो तो, फक्त वर्तमानकाळ! मात्र आता विज्ञानातील प्रगती आणि नवीन प्रयोगांमुळे या समजाला छेद जातो आहे.

गेल्या दोन-तीन दशकांत झालेल्या संशोधनामुळे माणसाला अस्वस्थ करणारा प्रश्न पुढे आला आहे: प्राण्यांनाही काळाची जाणीव असते का? आणि असल्यास, ती नेमकी कशी असते?

‘वर्तमाना’पलीकडचं प्राणीविश्व

पूर्वी प्राण्यांचे वर्तन प्रामुख्याने सवय, त्यांची नैसर्गिकप्रेरणा (instinct) आणि प्रवृत्ती यांद्वारे समजावून सांगितले जात होते. पण आता Animal Cognition या शाखेने त्या समजास छेद दिला आहे. संशोधकांनी आता प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे, प्राण्यांमध्ये आठवणी असतात का? वेळेचा अंदाज ते कसा घेतात? भविष्यातील गरजांचा विचार ते काळाच्या पटलावर करतात का?

एपिसोडिक मेमरी

या संदर्भात महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘एपिसोडिक मेमरी’ म्हणजेच नेमके काय घडले, कुठे घडले आणि केव्हा घडले, याची एकत्रित आठवण. ही क्षमता पूर्वी फक्त माणसांकडेच आहे, असे मानले जात होते. पण प्राण्यांच्या संशोधनातून वैज्ञानिकांना हे लक्षात आले आहे की, पक्षी, सस्तन प्राणी एवढेच नव्हे तर कीटकांमध्येही ‘एपिसोडिक मेमरी’ असते.

आठवण ठेवणारे पक्षी

पाश्चात्य देशातील स्क्रब जे या पक्ष्यांवरील प्रयोगांनी शास्त्रज्ञांना थक्क केले, हे पक्षी अन्न साठवून ठेवतात. लपवून किंवा साठवून ठेवलेल्या अन्नाचे ठिकाण त्यांना व्यवस्थित लक्षात असते. एवढेच नव्हे तर कुठे ठेवलेले अन्न हे लवकर नासणारे आहे, याची त्यांना नेमकी कल्पना असते आणि ते लक्षात किंवा आठवणीत ठेऊन तिथले अन्न नासण्यापूर्वीच काढून घेतात. जे दीर्घकाळ टिकणारे अन्न असते त्याचा वापर ते नंतर करतात. त्यांना काळाची जाणीव असते, म्हणूनच ते असं करू शकतात, असा संशोधकांचा निष्कर्ष आहे. अशाच प्रकारचे प्रयोग उंदीर, कबुतरे आणि माकडांच्या काही प्रजातींवरही करण्यात आले असून, ते वेळेचा अंदाज घेऊन त्यांचे वर्तन बदलतात, काय करायचे नाही- काय टाळायचे याचा निर्णय काळ-वेळेनुसार घेतात, असे संशोधकांना आढळले आहे.

Scrub-Jay- townsend-walton-unsplash
स्क्रब जे पक्षी (Photo: Townsend Walton, Unsplash)

प्राणीही करतात का भविष्याचा विचार?

संशोधकांसाठी सर्वात धक्कादायक ठरले, ते पक्षी आणि प्राण्यांचे भविष्यकेंद्री वर्तन. एका प्रयोगात कावळ्यांनी अशी वस्तू निवडली, जी त्यांना काही तासांनंतर उपयोगी पडणार होती. जेव्हा त्यांच्यासमोर ठेवली त्यावेळेस त्यांना त्या वस्तूचा काहीच उपयोग नव्हता. तत्काळ मिळणारे बक्षीस (खाणे) नाकारून त्यांनी भविष्यातील फायद्यासाठीच्या त्या वस्तूची निवड केली. चिंपांझी तर माणसाप्रमाणेच इतरत्र दूरवर वापरण्यासाठीची साधने एका ठिकाणावरून दुसरीकडे घेऊन जातात. हे वर्तन केवळ वर्तमानकाळावर आधारित नाही; तर ते भविष्याचा अंदाज घेऊन केलेले वर्तन असते. त्यामुळे संशोधकांना प्रश्न पडला की, पक्षी- प्राणी भविष्याचा विचार करतात, याचा अर्थ ते सहजप्रेरणे वागत नाहीत, कारण त्यांना काळाची जाणीव आहे, असे मानावे का?

जैविक घड्याळ आणि काळ

सर्व प्राण्यांकडे माणसाप्रमाणेच एक जैविक घड्याळ असते. झोप, भूक, स्थलांतर, प्रजनन हे सगळे त्या जैविक घड्याळावरच अवलंबून असते. सरकॅडियन ऱ्हिदमनुसार ते काम करतात. पण हे जैविक नियमन आणि काळाचा अनुभव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्राण्याचं वर्तन ऋतुनुसारही बदलतं. संशोधनातून असे लक्षात आले आहे की, प्राण्यांना कालावधीची जाणीव असू शकते. मालक किती वेळ बाहेर होता, यावर कुत्रे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. उंदरांच्या प्रयोगात असे लक्षात आले की, बाह्यघडामोडी नियंत्रित केल्या तर उंदरांनाही प्रशिक्षण देता येते, ते या गोष्टी लक्षात ठेवतात. ठराविक वेळेनंतर काही घडणार आहे, याची अंदाज त्यांना येतो.

…म्हणजेच काळ फक्त मोजला जात नाही; तर तो अनुभवलाही जातो.

प्राण्यांकडे काय नसते?

बहुतेक शास्त्रज्ञ मान्य करतात की, माणसांसारखा भूतकाळ किंवा भविष्याचा दूरगामी विचार प्राणी करत नाहीत. अस्तित्व, मृत्यू किंवा आयुष्याचा अर्थ यासारख्या अमूर्त कल्पना त्यांच्यामध्ये असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. पण म्हणून त्यांच्याकडे काळाची जाणीवच नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

प्रख्यात संशोधक फ्रान्स डी वॉल म्हणतात, “प्राण्यांचे अनुभव हे आपल्यासारखे नाहीत म्हणून ते अस्तित्वातच नाहीत, असे म्हणणे ही वैज्ञानिक चूक ठरेल.”

विज्ञानापलीकडचा प्रश्न

प्राण्यांना काळाची जाणीव असेल, तर त्याचे परिणाम फक्त विज्ञानापुरते मर्यादित नसतील. प्राणी वेदना आठवत असतील, प्रतीक्षा करत असतील, भविष्यातील परिणामांचा अंदाज घेत असतील तर त्याचा अर्थ त्यांचे मानसिक विश्व हे आपण विचार करतोय त्याहीपेक्षा अधिक मोठे आणि व्यापक आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, प्राण्यांना बंदिस्त करून ठेवणे, त्यांच्यावर प्रयोग करणे किंवा त्यांचे संवर्धन करणे, याबाबतचा दृष्टिकोन माणसाला तपासावा लागेल आणि भविष्यात बदलावाही लागेल.

पक्षी- प्राणी भूत-वर्तमानात अडकत नाहीत!

वाढदिवस साजरा करण्यासाठी पक्षी दिवस मोजत नाहीत किंवा त्यांना निवृत्ती अर्थात रिटायरमेंटची चिंताही नसते. वैज्ञानिक प्रयोगांतून असे लक्षात येते आहे की, ते वर्तमानकाळ आपल्यासारखा निरंतर अनुभवत नाहीत. ते लक्षात ठेवतात, अंदाज घेतात, थांबतात- वाट पाहातात आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जातात. आपल्यासारखे ते भूतकाळात किंवा वर्तमानात अडकून राहात नाहीत.

प्रश्न हा नाही की, प्राणी काळ अनुभवतात का किंवा त्यांचे काळाचे गणित काय आहे; तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण प्राण्यांच्या ‘काळ’विषयक अनुभवाला वर्षानुवर्षे कमी लेखले, कारण कदाचित आपले म्हणजे माणसाचेच काळाचे गणित बिघडलेले आहे!

संदर्भ:
Clayton, N. S., & Dickinson, A. (1998) — Episodic-like memory in animals, Nature
Raby, C. R., et al. (2007) — Planning for the future by western scrub-jays, Nature
Tulving, E. (2002) — Episodic memory and chronesthesia, Annual Review of Psychology
de Waal, F. (2016) — Are We Smart Enough to Know How Smart Animals Are?
Current Biology — Animal cognition and time perception studies
Journal of Comparative Psychology — Temporal processing in animals
Scientific American — “Do Animals Think About the Future?”