Stomach cancer risk गेल्या काही वर्षांत भारतात पोटाच्या कर्करोगाचे (गॅस्ट्रिक कॅन्सर) प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. हा कर्करोग एकेकाळी जपान किंवा कोरियासारख्या पूर्व आशियाई देशांमध्ये अधिक सामान्य मानला जात होता. प्रामुख्याने तंबाखू, मद्यपान आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्गामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. मात्र, आता बदलती आहार पद्धतीदेखील कर्करोगाचा धोका वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. मुलुंड येथील एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरमधील कर्करोग तज्ज्ञ डॉ. समित शेठ यांनी स्पष्ट केले आहे की, अर्धवट शिजवलेले किंवा प्रक्रिया केलेले मांस (प्रोसेस्ड मीट) खाणे टाळण्याची गरज आहे. तज्ज्ञ नॉन व्हेज सेवनाच्या धोक्यांविषयी तज्ज्ञ काय सांगतात? कोणती काळजी घ्यावी? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
आहारपद्धतीतील बदल वाढवताहेत धोका?
भाज्या आणि वनस्पतींवर आधारित असलेला भारतीय आहार आता बदलत आहे. शहरातील बहुतांश घरांमध्ये मांसाहार, ग्रिल केलेले पदार्थ व फास्ट फूड अशा गोष्टींच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक जीवनशैली या बदलास कारणीभूत आहे. तुम्ही जे मांस खात आहात, ते मांस अर्धवट शिजवलेले किंवा अयोग्यरीत्या हाताळले गेले असेल, तर भविष्यात यामुळे आरोग्याच्या गंभीर समया निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.
अर्धवट शिजवलेले मांस, विशेषतः लाल मांस (रेड मीट : उदा. गोमांस, मटण) आणि चिकन यांमध्ये हानिकारक जीवाणू असू शकतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी आणि क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स, तसेच अॅनिसाकिस व टॉक्सोप्लाझ्मासारखे जीवाणू यात असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने हेलिकोबॅक्टर पायलोरीला ‘गट १ कर्करोगजनक’ म्हटले आहे. जगभरातील ७५ टक्क्यांपर्यंत नॉन-कार्डिया गॅस्ट्रिक कर्करोग हेलिकोबॅक्टर पायलोरीच्या संसर्गामुळे होतो. टाटा मेमोरियल सेंटरने भारतात केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ईशान्य भारत आणि काश्मीरसारख्या प्रदेशांमध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्गाचे प्रमाण जास्त आहे आणि या प्रदेशांमध्ये पोटाच्या कर्करोगाचे दरदेखील वाढलेले आहेत.
स्वयंपाकातील धोके
जेव्हा मांस उच्च तापमानावर शिजवले जाते म्हणजेच ग्रिल केले जाते, बार्बेक्यू केले जाते किंवा पॅनमध्ये तळले जाते, तेव्हा हेटेरोसायक्लिक अमिनस (HCAs) व पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) तयार करते. हे दोन्ही घटक कर्करोगजनक म्हणून ओळखले जातात. जेव्हा मांस अर्धवट शिजवले जाते, तेव्हा या संयुगांचे प्रमाण कमी असू शकते. परंतु, हेलिकोबॅक्टर पायलोरीसारखे जीवाणू मोठया प्रमाणात आढळून येऊ शकतात. संक्रमणामुळे होणारी जळजळ आणि आहारातून शरीरात शिरलेले कर्करोगजनक घटक यांमुळे पोटात एक धोकादायक वातावरण तयार होते आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
या धोक्यांविषयी अभ्यास काय सांगतो?
२०२० मध्ये इंडियन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे नमूद केले आहे की, मांस खाण्याची सवय विशेषतः अर्धवट शिजवलेले लाल मांस याचा संबंध काही उत्तरेकडील राज्यांमध्ये गॅस्ट्रिक कर्करोगाच्या वाढलेल्या घटनांशी आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झालेल्या जागतिक अभ्यासातून हे सिद्ध होते की, स्वयंपाक करण्याची पद्धत आणि मांस किती शिजवले आहे, हे दोन्ही घटक गॅस्ट्रिक कर्करोगाचा धोका स्पष्ट करतात. अर्धवट शिजवलेले किंवा पुन्हा पुन्हा गरम केलेल्या मांसाच्या सेवनाचा वाईट परिणाम होणार नाही, असे आपल्याला वाटते. परंतु, हा आपल्या सवयीचा भाग झाल्यास यामुळे आतड्यांमध्ये विषारी वातावरण निर्माण होते, ज्यामुळे जळजळ आणि डीएनएचे नुकसान होते.
धोका टाळण्यासाठी काय करावे?
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून भारतात वाढत असलेली मांससमृद्ध आहाराची आवड पाहता, त्याविषयीची जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत, भारतात अन्न सुरक्षा नियमन अजून विकसित होत आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते आणि लहान उपाहारगृहे वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी अनेकदा निकृष्ट मांस वापरतात किंवा मांस नीट शिजवत नाहीत. परंतु, याचा अर्थ तुम्ही मांस खाऊ नये, असा नाही. त्यावर सावधगिरी बाळगणे आणि जागरूक राहणे हा एकमात्र उपाय आहे.
- मांस पूर्णपणे शिजवा – चिकन ७० सेल्सियस आणि लाल मांस ६३ सेल्सियसपर्यंत शिजवले गेले पाहिजे
- शिजवलेले मांस वारंवार गरम करणे टाळा.
- कच्चे मांस हाताळल्यानंतर हात आणि भांडी स्वच्छ धुवा.
पोटाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
पोटाच्या कर्करोगामध्ये पोट दुखण्याबरोबरच थकवा, भूक कमी होणे, उलट्या, मळमळ, वजन कमी होणे यांसारखी लक्षणे आढळतात. अनेकदा ही लक्षणे अल्सर किंवा गॅस्ट्रायटिस असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, अनेक दिवस ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थ’ (२०२३) मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य अपचन, गॅस किंवा अल्सर समजून दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे निदान व्हायला उशिरा होते आणि उपचार करण्यास वेळ निघून जातो. पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी फळे, भाज्या आणि धान्ययुक्त आहार घेण्याचा सल्लाही डॉक्टर्स देतात. संशोधनानुसार, जीवनशैली आणि आहारात बदल केल्याने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
