Stale Meat Cancer Risk Guide Doctor Advice : गेल्या आठवड्यात बंगळुरू शहरातील विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर अन्न सुरक्षा विभागाने अचानक धाडी टाकल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांना कालबाह्य व शिळे मांस, उघड्यावर ठेवलेले चिकन आणि अस्वच्छ पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेले अन्नपदार्थ आढळून आले. तपासणीदरम्यान हे अन्न मानवी वापरासाठी अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईची चित्रफित समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाल्यानंतर मांसाहार प्रेमींच्या मनात एका भीतीदायक प्रश्न निर्माण झाले. खराब झालेले, शिळे किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेले चिकन-मटण खाल्ल्याने खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांकडून विचारू जाऊ लागला. त्याबाबत तज्ज्ञांनी मांडलेल्या मतांचा हा सविस्तर आढावा…
तज्ज्ञांच्या मते, कालबाह्य झालेले मांस हा प्रामुख्याने तातडीच्या अन्नसुरक्षेशी संबंधित धोका आहे. शिळे झालेले चिकन-मटण खाल्ल्याने तीव्र विषबाधा, पोटाचे विकार किंवा जिवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, कॅन्सरचा संबंध हा मांस खराब होण्याशी नसून, एखादी व्यक्ती नियमितपणे कोणत्या प्रकारच्या मांसाचे सेवन करते. त्याची एकूण खाण्यापिण्याची पद्धत कशी आहे आणि कोणत्या पद्धतीने मांस शिजवले जाते, या दीर्घकालीन घटकांशी जोडलेला आहे. मांस खराब होणे आणि मांसामुळे कर्करोग होणे हे दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे असल्याचे जयपूर येथील सीके बिर्ला रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. आनंद मोहन यांनी ‘फर्स्टपोस्ट’ला सांगितले. त्यामुळे चिकन-मटण प्रेमींनी नेमकी कशाची काळजी घ्यावी? हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. खराब झालेले किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेले मांस तातडीने आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते; तर मांसाचे नियमित सेवन, ते शिजवण्याचे प्रकार, आहारातील इतर घटक आणि स्वयंपाकाची पद्धत यांचा कर्करोगाच्या जोखमीशी वेगळा संबंध असू शकतो.
कालबाह्य मांस कर्करोगाला कारणीभूत ठरते का?
चिकन-मटण अयोग्य तापमानात ठेवल्यास किंवा खराब होऊ दिल्यास त्यात जीवाणूची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे लोक आजारी पडू शकतात. मात्र, कालबाह्य किंवा योग्य पद्धतीने साठवून न ठेवलेले मांस थेट कर्करोगाला कारणीभूत ठरते असा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत डॉ. आनंद मोहन सांगतात की, कालबाह्य किंवा योग्य पद्धतीने साठवून न ठेवलेले मांस खाल्ल्याने ते स्वतःहून कर्करोगकारक ठरत नाही; पण त्यामध्ये वाढलेले जीवाणू गंभीर आजार निर्माण करू शकतात. त्यामुळे शिळे मांस हे कर्करोगापेक्षा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. बेंगळुरू येथील एस्टर व्हाईटफील्ड रुग्णालयातील कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अश्विन यांनीही याच मुद्द्यावर भर दिला. त्यांच्या मते, शिळे मांस खाल्ल्यास त्यातील जीवाणूंमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो; मात्र त्यातून कर्करोग होतो, असे म्हणता येणार नाही. त्याशिवाय शहरातील एचसीजी कॅन्सर रुग्णालयातील डॉ. सतीश यांनीही याच मुद्द्यावरून सर्वसामान्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. शिळे मांस खाल्ल्याने अनेकांना विषबाधा होऊ शकते, पण त्यातून कर्करोग होतो हे अद्याप कोणत्याही प्रकारे सिद्ध झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्या प्रकारच्या मांसाचा कर्करोगाशी संबंध?
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) या जागतिक संस्थेच्या अभ्यासानुसार, अतिप्रक्रिया केलेले चिकन-मटण खाल्ल्याने आतड्याशी संबंधित कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. लाल मांसाबाबत उपलब्ध पुरावे तुलनेने मर्यादित असले तरी त्यामुळेही कर्करोग होऊ शकतो, असेही संस्थेने नमूद केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अतिप्रमाणात मीठ लावलेले, धुरावर भाजलेल्या मांसाचा समावेश होतो. डॉ. आनंद मोहन यांच्या मते, सॉसेज किंवा बेकनसारखे प्रक्रिया केलेले मांस नियमित खाल्ल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच लाल मांसाचे नियमित आणि अतिसेवन केल्यामुळे कर्करोगाचा होऊ शकतो. मांसाचे अधून मधून सेवन केल्यास किंवा एकदा खाल्ल्याने कर्करोग होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अश्विन यांनीही मांस आणि कर्करोगाच्या जोखमीबाबत दीर्घकाळातील आहाराच्या सवयी अधिक महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, मांसाचा प्रकार, किती प्रमाणात आणि किती वेळा खाल्ले जाते, त्यावर कोणती प्रक्रिया केली जाते आणि ते कोणत्या पद्धतीने शिजवले जाते, या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात. आयएआरसीच्या अंदाजानुसार, दररोज ५० ग्रॅम प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्यास आतड्यांच्या कर्करोगाचा धोका सुमारे १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. मात्र, हा निष्कर्ष नियमितपणे आणि दीर्घकाळ सेवन करणाऱ्यांवर आधारित असून, तो केवळ एका वेळेच्या सेवनाने वाढत नाही, असेही त्यांनी सांगितले.
शिळे मांस जास्त शिजवून खाणे किती सुरक्षित?
शिळे झालेले मांस जास्त शिजवले तर ते खाण्यायोग्य बनते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, तज्ज्ञांनी त्याला चुकीचा आणि धोकादायक समज असे संबोधले आहे. डॉ. अश्विन यांच्या मते, खराब होण्याची स्पष्ट लक्षणे दिसणारे मांस सरळ फेकून दिले पाहिजे. मांस नेहमी विश्वासू ठिकाणाहूनच खरेदी करून योग्य तापमानात ठेवायला हवे. मांसाला असामान्य वास येत असेल, त्याचा रंग किंवा पोत बदलला असेल किंवा ते अयोग्य पद्धतीने साठवले गेले असेल, तर ते फेकून द्यावे, असा सल्लाही डॉ. अश्विन यांनी दिला आहे. डॉ. आनंद यांनीही याच मुद्द्यावर भर दिला. शिळ्या मांसामध्ये काही जीवाणूंनी तयार केलेली विषारी द्रव्ये अशी असू शकतात, जी शिजवल्यानेही नष्ट होत नाहीत. त्यामुळे मांस चुकीच्या तापमानात साठवले गेले असेल, तर त्याची चव विचित्र लागते, त्यामुळे ते खाण्याऐवजी फेकून देणे योग्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकदा शिळे मांस खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का?
तज्ज्ञांच्या मते, केवळ एकदा किंवा चुकून शिळे चिकन-मटण खाल्ल्याने लगेच कॅन्सर होत नाही. कर्करोग हा अनेक वर्षांच्या दीर्घ प्रक्रियेनंतर विकसित होतो, असे बंगळुरू येथील शारदा केअर-हेल्थसिटीचे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. हेमकांत वर्मा यांनी ‘फर्स्टपोस्ट’ला सांगितले. त्यांचे हे स्पष्टीकरण तातडीची अन्नविषबाधा आणि दीर्घकालीन कर्करोगाचा धोका यांच्यातील फरक स्पष्ट करते. शिळे मांस खाल्ल्यानंतर लगेच अन्नविषबाधा किंवा पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो; पण कर्करोगाचा धोका हा दीर्घकाळातील आहाराच्या सवयी आणि इतर घटकांशी संबंधित असतो. दुसरीकडे- मांसाहाराकडे व्यक्तीच्या एकूण जीवनशैलीच्या संदर्भात पाहिले पाहिजे. मांसाहार आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम हे वेगळे करून पाहता येत नाहीत. तुम्ही कोणत्या प्रकारचे मांस खाता आणि ते कसे शिजवले जाते, यासोबतच नियमित व्यायाम आणि शरीराचे वजन यांसारखे घटकही आरोग्यावर एकत्रित परिणाम करतात, असे मत डॉ. सतीश यांनी व्यक्त केले. लाल मांस आणि अतिप्रक्रिया केलेले मांसाचे मोठ्या प्रमाणावर नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो आणि जगभरातील ६० मोठ्या अभ्यासांच्या विश्लेषणातही हेच नमूद करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हॉटेलमधील मांसाहाराबाबत काय काळजी घ्यावी?
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवताना ग्राहकांना चिकन-मटण कोणत्या तापमानात आणि किती काळ साठवले गेले, याची प्रत्येक टप्प्यावर तपासणी करता येत नाही. मात्र, एखाद्या पदार्थाची चव किंवा वास असामान्य वाटत असेल, तर ते खाणे थांबवणे हाच योग्य निर्णय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बेंगळुरूमध्ये अन्नसुरक्षा विभागाने केलेल्या छापेमारीत कालबाह्य आणि अयोग्य पद्धतीने साठवलेले खाद्यपदार्थ आढळल्यानंतर अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. तसेच शिळे चिकन-मटण खाल्ल्याने कर्करोग होतो असा समजही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. एकंदरीत शिळे मांस आणि कर्करोगाचा कोणताही संबंध आढळून आला नसला तरी कालबाह्य मांस खाऊ नका, कर्करोगाची भीती बाळगण्यापेक्षा वेळीच सजग व्हा, तसेच कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आपल्या नियमित आहाराच्या आणि स्वयंपाकाच्या सवयींकडे लक्ष द्या, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
