Dog Religious Significance What Court Says : श्वानाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे, तो दैवी शक्तीचा सहचर आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाला श्वानाचे धार्मिक महत्व स्पष्ट करावे लागले, ते का? तर एका पाळीव कुत्र्याला कृष्णाच्या वेशभूषेत सजवल्याने एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

धर्म हा केवळ श्रद्धा, पूजा-अर्चा किंवा विधीपुरता मर्यादित नसतो. तो समाजाच्या मूल्यव्यवस्थेचा, सांस्कृतिक ओळखीचा आणि नैतिकतेच्या संकल्पनांचा पाया मानला जातो. कोणती गोष्ट पवित्र आहे, कोणती अपवित्र? काय योग्य आणि काय अयोग्य; तसेच सौंदर्य आणि विद्रूपतेविषयीच्या कल्पना अनेकदा धार्मिक श्रद्धा आणि परंपरांमधूनच आकार घेतात, असे पंजाब हाय कोर्टाने नमूद केले आहे. जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला एका महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला भगवान श्रीकृष्णाचा वेश परिधान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपाखाली करण्यात आलेली एफआयआर पंजाब कोर्टाने रद्द केली आहे.

प्रकरण नेमकं काय?

एका महिलेने जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्याला भगवान श्रीकृष्णाचा वेष परिधान केला आणि तो फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर केला. त्याकडे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणावर निर्णय देताना न्यायमूर्ती सुभाष मेहला यांनी १ जुलैच्या आदेशात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. त्यांनी म्हटले की, ‘याचिकाकर्त्या महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला जन्माष्टमीच्या पारंपरिक वेषात सजवण्यामागे सद्भावना होती, त्यात कोणतीही द्वेषभावना नव्हती. व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर केला त्यातून तिने तिचे पाळीव प्राण्यावरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली. या कृतीमुळे इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या किंवा भगवान श्रीकृष्णांचा अवमान झाला, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. पण केवळ ‘श्वान ही देवाची अपवित्र निर्मिती आहे’ अशा संकुचित दृष्टिकोनातून विचार करणे योग्य नाही.’

न्यायालयाने असेही नमूद केले की, ‘पहिल्यांदा ही एक किरकोळ आणि निरुपद्रवी घटना वाटू शकते, जिला अनावश्यकपणे मोठे स्वरूप देण्यात आले. मात्र, धर्म आणि अध्यात्माच्या, हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून जीवन, सृष्टी आणि सौंदर्याकडे आपण कसे पाहतो, याचा अधिक सखोल विचार करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होते.’

न्यायालयाने आपल्या आदेशात असेही म्हटले की, संबंधित महिला स्वतः हिंदू आहे त्यामुळे तिने स्वतःच्या समुदायाच्या भावना दुखावल्या, असे म्हणता येणार नाही. तसेच, तिला अपत्य नसल्याने आपल्या पाळीव कुत्र्याला ती स्वतःच्या मुलाप्रमाणे जपते आणि त्याच्यावर प्रेम करते.

जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलांना भगवान श्रीकृष्णाचा वेष परिधान करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. त्याच भावनेतून या महिलेने आपल्या पाळीव कुत्र्याला श्रीकृष्णाचा वेष परिधान केला होता. मात्र, या साध्या आणि निरागस कृतीचा चुकीचा अर्थ लावून तिला गुन्हेगारी स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही न्यायालयाने नोंदवले आहे.

व्हॉट्सअॅप स्टेटसचा वाद काय?

महिलेने स्वत:च्या कुत्र्याला कृष्णाची वेशभूषा केली आणि त्याला नटवले. या क्षणांचे फोटो काढून तिने व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले. पण काहीच वेळात या कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेच्या एका युवा पदाधिकाऱ्याने याविरोधात तक्रार दाखल केली होती. पाळीव कुत्र्याला भगवान श्रीकृष्णाचा वेषात नटवून महिलेने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता, असे न्यायालयाने नमूद केले.

महिलेने न्यायालयाला सांगितले की, जन्माष्टमीच्या दोन-तीन दिवस आधी तिने तिच्या कुत्र्याला श्रीकृष्णाचा मुकुट घालून त्याचा फोटो काढला होता. त्यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी तोच फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला. या कृतीमुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतील याची कल्पना नव्हती आणि तसा माझा हेतूही नव्हता.

‘हिंदू धर्मात श्वानाचे विशेष स्थान’

या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने हिंदू धर्मातील श्वानाच्या स्थानाचा विशेष उल्लेख केला. न्यायमूर्ती सुभाष मेहला यांनी नमूद केले की, हिंदू प्रतिमाशास्त्र आणि आख्यायिकेमध्ये श्वानाला महत्त्वाचे स्थान आहे. भगवान शिवाचे उग्र स्वरूप मानल्या जाणाऱ्या कालभैरवाचे वाहन श्वान असल्याचे मानले जाते. विशेषतः अनेक पंथांमध्ये काळ्या श्वानासह असलेल्या कालभैरवाच्या मूर्तीला मनोभावे पूजले जाते.

‘श्वान हे निष्ठा, करुणा, सतर्कता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तो दैवी शक्तीचा योग्य सहचर असल्याचे हिंदू परंपरेत मानले गेले आहे,’ यावरही न्यायालयाने विशेष भर दिला आहे. याशिवाय, भगवान दत्तात्रेय यांचीही अनेकदा चार श्वानांसह पूजाअर्चा केली जाते. हे चार श्वान चार वेदांचे प्रतीक मानले जातात. यावरून समाज ज्या गोष्टी किंवा प्राण्यांना कमी लेखतो, त्यांच्यामध्येही पवित्र ज्ञान आणि दैवत्व असू शकते, असा गहन संदेश हिंदू तत्त्वज्ञानातून दिला जातो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच न्यायालयाने तक्रारदार पदाधिकाऱ्याला फटकारले आहे. ‘तक्रारदाराने धार्मिक भावनांचा मुद्दा पुढे करून राजकीय लाभ मिळवण्याच्या हेतूने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार स्वतः एका राजकीय पक्षाचा युवा पदाधिकारी आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने समाजातील सौंदर्यदृष्टी आणि नैतिकता यांच्यातील संबंधांवरही परखड भाष्य केले आहे. न्यायालयाच्या मते, एखाद्या समाजाची सौंदर्यदृष्टी अनेकदा त्याच्या नैतिक मूल्यांवर प्रभाव टाकत असते आणि त्यामुळेच विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांविषयीची आपली धारणा तयार होते. हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने वाघ आणि उंदराचे उदाहरण दिले. वाघ हा ताकद, शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो, तर उंदराकडे अनेकदा घाणेरडा, भीरू आणि नष्ट करण्यासारखा प्राणी म्हणून पाहिले जाते. ते प्राणी माणसांसाठी किती धोकादायक आहेत याचाच आपण विचार करतो, पण त्यांविषयी आपली सौंदर्यदृष्टी नसते, असे न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणात न्यायालयाने हिंदू धर्मातील निसर्गपूजा परंपरेचेही महत्व स्पष्ट केले. न्यायालयाच्या म्हटले, हिंदू विचारसरणीत केवळ मंदिरातील देवताच नव्हे, तर नद्या, वृक्ष, पर्वत, सूर्य, चंद्र, प्राणी आणि पक्षी यांमध्येही दैवी अंश असल्याचे मानले जाते. प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटकामध्ये आध्यात्मिक अस्तित्व असल्याची श्रद्धा हिंदू धर्म बाळगतो, त्यातून हिंदू परंपरा विकसित झाली आहे.

याच परंपरेतून गाय, सरस्वती नदी आणि गंगा नदी यांनाही विशेष पवित्र स्थान प्राप्त झाले. सुरुवातीला त्यांचे महत्त्व समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाशी जोडलेले होते. कालांतराने महत्त्वाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आणि त्या श्रद्धेचे केंद्र बनल्या आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायनिवाड्यावरील निष्कर्ष सांगताना न्यायमूर्ती सुभाष मेहला यांनी रामचरितमानसमधील एका प्रसिद्ध ओळीचा उल्लेख केला, ‘जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी.’ प्रत्येक व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे आपल्या मनातील भावना, श्रद्धा, हेतू आणि दृष्टिकोनानुसार पाहत असते. म्हणजेच, एखाद्या कृतीचा अर्थ किंवा त्यामागील भाव समजून घेताना त्या व्यक्तीचा स्वभाव आणि अंतर्भावना महत्त्वाची असते; केवळ बाह्य स्वरूप पाहून निष्कर्ष काढणे योग्य होत नाही, असे न्यायालयाने अधोरेखित केले.