Donald Trump 15 Point Peace Proposal to Iran : गेल्या चार आठवड्यांपासून पश्चिम आशियात पेटलेला युद्धाचा वणवा शांत होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष थांबविण्यासाठी इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रस्तावातील काही जाचक अटी इराणला मान्य होणार का, असा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने एका बैठकीची तयारी केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर ठेवलेल्या शांततेच्या प्रस्तावात नेमके काय आहे? त्याविषयीचा हा आढावा…
अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात शांततेच्या हालचाली सुरू असतानाच प्रत्यक्षात मात्र दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरूच असल्याचे दिसून येत आहे. इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलमधील काही नागरिक जखमी झाले; तर ड्रोन हल्ल्यांमुळे कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाला आग लागल्याचा दावा तेथील माध्यमांनी केला आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा १५ कलमी प्रस्ताव इराण स्वीकारणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादानंतरच पश्चिम आशियातील युद्धाचे भवितव्य ठरणार आहे.
अमेरिकेच्या नेमक्या अटी काय?
अमेरिकेच्या १५ कलमी प्रस्तावात अण्वस्त्र बंदीपासून ते आर्थिक निर्बंध उठवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या अटींचा समावेश असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या शांतता प्रक्रियेत पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. मुनीर यांचे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सशी असलेले जवळचे संबंध असल्याने त्यांना दोन्ही देशांतील महत्वाचा दुवा मानले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या प्रस्तावात इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर कायमची बंदी घालणे, नतांझ आणि फोर्डो सारखे महत्त्वाचे अणू प्रकल्प कायमचे बंद करणे, हिजबुल्लाह, हमास आणि हुथी बंडखोरांसारख्या गटांना दिली जाणारी आर्थिक आणि लष्करी रसद पूर्णपणे थांबवणे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला इराणच्या कोणत्याही संशयास्पद ठिकाणाची तपासणी करण्यासाठी विनाअडथळा प्रवेश देणे, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा घालणे, होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली करणे, इस्रायलचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व मान्य करणे, यांसारख्या अटींचा समावेश आहे.
अमेरिकेकडून इराणला कोणत्या सवलती?
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर या कठोर अटी ठेवल्या असल्या तरीही त्याबदल्यात त्यांनी काही महत्वाच्या सवलती देण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेने घालून दिलेल्या सर्व अटी इराणने मान्य केल्यास त्यांच्यावर लादण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात येईल. तसेच बुशहर येथील नागरी अणू ऊर्जा प्रकल्पाच्या विकासासाठी इराणला तांत्रिक मदत दिली जाईल. त्याशिवाय इराणवर आपोआप निर्बंध लागू करणारी ‘स्नॅपबॅक’ यंत्रणाही हटवण्यात येईल, तसेच इराणची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवून दिले जाईल, असे ट्रम्प यांनी प्रस्तावात नमूद केल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. यादरम्यान अमेरिकेने दिलेला हा प्रस्ताव इराणसाठी स्वीकारणे कठीण ठरू शकतो, असे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ट्रम्प यांच्या अटी इराण मान्य करणार का?
पश्चिम आशियातील युद्ध थांबविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी १५ कलमी शांतता प्रस्ताव पाठवला असला तरीही इराणकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता धूसर आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने या प्रस्तावावरून अमेरिकेला कडक शब्दांत सुनावले आहे. तुमच्या पराभवाला कराराचे नाव देऊ नका, असा इशाराच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. इराणचा नेहमीच असा दावा राहिला आहे की, त्यांचा अणू कार्यक्रम केवळ नागरी वापरासाठी आहे आणि युरेनियम संवर्धनाचा त्यांचा अधिकार ते अजिबात सोडणार नाहीत. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका व इस्रायल यांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला होता. आमचे युरेनियम संवर्धन शून्य करण्यासारख्या अमेरिकेच्या मूर्खपणाच्या अटींवर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी मृत्यूपूर्वी सांगितले होते. त्यामुळेच ट्रम्प यांचा प्रस्ताव इराण अगदी सहजपणे स्वीकारणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Railway New Rules : रेल्वेने तिकीट रद्द करण्याचे नियम अचानक का बदलले? कारण काय?
युद्ध थांबवण्याच्या प्रस्तावावर इस्रायलचा आक्षेप?
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर ठेवलेल्या प्रस्तावामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलला या युद्धविरामाच्या प्रस्तावामुळे मोठा धक्का बसल्याचे वृत्त एबीसी न्यूजने दिले आहे. इस्रायलचे अधिकारी सातत्याने ट्रम्प प्रशासनाकडे इराणविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्यासाठी आग्रह धरत होते. मात्र, अचानक आलेल्या या प्रस्तावामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. जर हा करार झाल्यास इस्रायलला भविष्यात इराणच्या अणू प्रकल्पांवर किंवा लष्करी तळांवर हवे तेव्हा हल्ले करणे कठीण जाईल, अशी भीती नेतान्याहू यांनी व्यक्त केल्याचे एबीसी न्यूजच्या वृत्तात नमूद आहे. यादरम्यान पाकिस्तानने आपल्या देशात अमेरिका व इराणच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीत युद्धावर तोडगा काढला जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अमेरिका व इराणने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे पश्चिम आशियातील हा संघर्ष नेमका कसा थांबणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
